Login

उरतो तो केवळ कोरडा व्यवहार

Short story of a simple girl having lots of dreams of her married life

उरतो तो केवळ कोरडा व्यवहार (लघुकथा)



      लग्न करून सोबत राहणं, मुलांना जन्म देणं आणि त्यांना मोठं करणं म्हणजेच  संसार असतो का? प्रत्येकाची विवाहाची आणि सहजीवनाची व्याख्या वेगळी असू शकते , पण एकाने केवळ पैसा द्यायचा, आणि सगळी जबाबदारी दुसऱ्याकडे ढकलायची.  दुसऱ्याने  संसाराची संपूर्ण जबाबदारी एका हाती सांभाळायची याला सहजीवन म्हणावं का?  एक जण संसारात असूनही नसल्यासारखा जसा कमळाच्या पानावर चा पाण्याचा थेंब. आणि दुसर्‍याची जी सहजीवनाची ओढ असते ती त्यांनं बासनात गुंडाळून अडगळीच्या खोलीतल्या माळ्यावर फेकून द्यावी का?





   



                     इतर चारचौघींसारखी ती दिसायला फार सुंदर नव्हती पण नाकी डोळी नीटस होती. घरची आर्थिक परिस्थिती बेतास बात , अगदी जेमतेम पण तरीही ती हट्टाने शिकली. तिला नोकरी करून मोठं अधिकारी व्हायचं होतं , पण म्हणतात ना नियतीपुढे कोणाचं काहीच चालत नाही.

        तिच्या वडिलांची ती खूप लाडाची पण म्हणून फाजिल लाड झाले नाही तिचे. आईने पण तळहातावरच्या फोडासारखं जपलं तिला. पण महिना अखेरी ची पैशाची तंगी, संसाराचा गाडा ओढताना आई-वडिलांची होणारी ओढाताण ती बघत होती. कदाचित त्यामुळेच फालतू खर्च, शान- शोक, मित्र-मैत्रिणींबरोबर सहली,  महिन्यातून नव्हे तर किमान वर्षातून एखादा सिनेमा, वारेमाप शॉपिंग, डोक्यातल्या केसांच्या क्लचर पासून ते पायाच्या सॅंडल पर्यंत मॅचिंग ,असं काहीच तिने कधीच अनुभवलं नव्हतं आणि त्याबद्दल कधी तिला खेदही वाटला नव्हता.

          घरच्या आर्थिक परिस्थितीला थोडासा हातभार लागावा म्हणून, डिग्री पूर्ण झाल्यावर ती एका प्रायवेट शाळेत नोकरी करायला लागली. शिक्षण सुरू होतं पण मनासारखी नोकरी मिळणं दिवसेंदिवस कठीण झालं. नोकरीसाठी पैसे भरणं तिच्या तत्वात बसत नव्हतं आणि तिला ते शक्यही नव्हतं. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींची लग्न तर केव्हाच झाली होती, आणि त्यांना एखाद-दोन अपत्ये  झाली होती. हिनेही पंचविशी कधीच ओलांडली होती . आता तिच्या आई-वडिलांना आणि तिला हि लग्न होणं जरुरीचं वाटत होतं.

          इतर सर्व मुलींसारखी तिने ही लग्नाची आणि सहजीवनाची अनेक स्वप्न पाहिली होती. आपल्या सहचरा साठी वेगवेगळे पदार्थ करायचे. तो आपण केलेल्या पदार्थांचं, आपल्या दिसण्याचं तोंड भरून कौतुक करणार......कधी कारणा निमित्त तर कधी विनाकारणच आपल्याला बाहेर फिरायला नेणार, चांदण्या रात्री समुद्र काठावर मुक्त भटकंतीही होणार, आपला  वाढदिवस किंवा लग्नाची एनिवर्सरी म्हणजे तो आपल्यासाठी काहीतरी खुप खास करणार…. जसा एखादा हिंदी सिनेमातला नायक नायिकेसाठी करतो अगदी तसचं…. 

          पण इथेही प्रश्न आलाच, मुलाचे शिक्षण की पैसा? तिच्या आईला वाटायचं आपलं आयुष्य काटकसर आणि महिन्याची पहिली आणि शेवटची तारीख जुळवण्यात  गेलं ,आपल्या मुलीला मात्र अशी काटकसर करावी लागु नये. तर हीच्या  दृष्टीने शिक्षण जास्त महत्त्वाचं.

             यथावकाश एका चांगल्या ठिकाणी (शिक्षण आणि पैसा दोन्ही असलेलं आणि हुंडा न मागणारं स्थळं) तिचं लग्न जुळलं. इतर लग्नाळू मुलीं प्रमाणे तिलाही खूप इच्छा होती नटायची , खरेदी ची , सगळी सगळी हौस पूर्ण करण्याची.  पण तिथेही पैशाला कात्री लावावी लागली. मुलाकडच्यांना हुंडा न दिल्याने कपडे ह्यांचे ह्यांनाच घ्यावे लागले , त्यामुळे तेही अगदी बजेट मधलेच. मैत्रिणीच्या लहान बहिणीने तिला मेंहदी काढून दिली, तर मावस बहिणीने मेकअप करून दिला.

                इतर मुलींसारखं तिलाही प्री-वेडिंग फोटोशूट करायचं होतं, पण नवऱ्याला वेळच नव्हता.  तिने त्याला फोन केला की, तो सारखा म्हणायचा मीटिंग सुरू आहे नंतर फोन करतो. त्याने हिला  साक्षगंधात महागडा फोन घेऊन दिला. पण बोलायला त्याच्याजवळ वेळच नव्हता. साक्षगंध झाल्यावर एक -दोनदा  झालेल्या भेटीत थोडाफार बोलणं झालं होतं.  त्याला आवडणाऱ्या भाज्या, पुलावाचे प्रकार तिनं शिकून घेतले होते . चार-दोन उखाणे ही पाठ केले होते.

             यथावकाश लग्न पार पडलं पण नवऱ्याला कशातच इंटरेस्ट नव्हता. स्टेजवरही तो जबरदस्तीने उभा असल्यासारखा वाटला. सप्तपदी, लाज्जाहोम करताना , तो गुरुजींना सतत "लवकर आवरा, आटोपता घ्या" म्हणत होता. हिला काहीतरी खटकत होतं , मनात काहीतरी चुकचुकत होतं पण सांगणार कोणाला?

            तिचा संसार सुरू झाला. पण त्यातही काही नवी नवलाई नव्हतीच. जाऊ-नंणदेनं आधीच सांगितल्याप्रमाणे, रात्री कितीही जागरण झाले , आणि झोपायला कितीही वेळ झाला तरी  सकाळी लवकर उठायचं होतं. जावेच्या "त्या" चार दिवसात  आणि नंतर  ही नेहमी च तिलाच पुतण्यां चा शाळेचा डब्बा , आणि दोन दिरांचा हि डबा ,घरचा संपूर्ण स्वयंपाक करायचा होता. तिला काही हवं नको असल्यास जावे बरोबर किंवा सासू बरोबर  बाहेर जावं लागायचं. कधी नवऱ्या सोबत  शॉपिंग नाही, हातात हात घालून फिरणं नाही, आईस्क्रीम ची मजाही नाही .  प्रत्येक वेळी त्याला काहीतरी काम नाही तर मीटिंग असायची . आणि हिला सोबतीला सासूला नाहीतर जावेला  न्यावं लागायचं. लग्नात आई-वडिलांनी मोठं आंदण दिलं नाही ,फ्रिज वॉशिंग मशीन मिळाली नाही , म्हणून सासूचं टोमणे मारणं ."माझ्या मामे भावाच्या सुनेने खूप  आंदण आणलं, माझ्या चुलत बहिणीने तिच्या मुलीला खूप आंदण दिलं" असं सासूबाईंचं सतत बोलणं आणि भून भून सुरू असायची .तिचा नवरा सकाळी लवकर ऑफिसमध्ये जाणार,  म्हणून सकाळचा स्वयंपाक तीलाच करावा लागायचा. आणि कितीही छान स्वयंपाक केला, कितीही चविष्ट ,रुचकर भाजी केली ,तरी नवरा कधीच कौतुक करत नव्हता. " तू छान स्वयंपाक करते ,आजची भाजी छान झाली , तु आज छान दिसतेस" असं त्यांनं कधीही तीला म्हटले नाही.  तीला स्वतःबरोबर कधी कुठेही घेऊन गेला नाही. 

          नवीन लग्नाची नवी नवलाई कधी तिच्या वाट्याला आलीच नाही . लग्नाची नव्हाळी कधी आली आणि निघुन गेली तिला कळलच नाही. दोघांचेही वय जास्त असल्याने नवऱ्याला "बाबा" व्हायची घाई झालेली होती. गरोदरपणात एकदाही तिच्या सोबत तो डॉक्टरकडे गेला नाही. यथावकाश तिच्या संसारवेलीवर एक सुंदर कळी उमलली , नवऱ्याला इतर नवऱ्यां प्रमाणेच मुलगा हवा होता ,पण तरीही तो आपल्या मुलीचे खूप लाड करायचा. पण त्याच्या मूळ स्वभावात फरक पडला नाही. आधी कधी तो तिच्याशी मनमोकळं बोलला,  वागला नाही. आणि आताही तो तिच्याशी तसचं वागत होता.

             घरातल्या कुरबुरीत त्याने कधीही तीची बाजू घेतली नाही.  जर वाद विकोपाला गेलाच तर तो तिच्यावर हात उगारायचा आणि घाणेरड्या शिव्यांची लाखोली वहायचा. शेवटी कंटाळून ती माहेरी गेली. तिथेही त्याने घटस्फोटासाठी तगादा लावला. तिनेही निक्षून सांगितलं  "मी घटस्फोट देणार नाही आणि परत ही येणार नाही". मग मात्र तो वरमला. दुसरं मूल झाल्यावर, स्वतः च्या इच्छेखातर  आणि मुलां साठी ती वेगळी राहायला लागली , पण तो मात्र अजूनही आईकडे राहत होता.

             तिच्याकडे फक्त रात्री येत होता, मुलांशी बोलायचा , खेळायचा. आणि एखाद वेळी वाटलं तर तिला जवळ घ्यायचा. दिवसभर बायको मुलांसाठी त्याच्याकडे आधीही वेळ नव्हता आणि आता ही वेळ नाही. घरातल्या भाजीपाल्यापासून, मुलांच्या अभ्यासापर्यंत आणि घरातल्या आला- गेल्यापासून , मुलांच्या आजारपणापर्यंत सर्व काम तीच करते.  तो फक्त तिला पैसे आणून देतो. वेगळं झाल्यावरही त्याच्या स्वभावात फारसा फरक पडला नाही. बाहेर फिरायला जायचं असलं तर तो केवळ मुलांना घेऊन जातो, एखादवेळी  तिला सोबत नेलं तरी तिची जागा कारच्या मागच्या सीटवर. तिच्या आयुष्यात आधी ही कुठली हौस नव्हती आणि आताही नाही.

          केवळ नवऱ्याने आपल्याशी चांगलं वागावं , इतर चारचौघांप्रमाणेच आपलंही वैवाहिक आयुष्य सुखा- समाधानाचं असावं म्हणून, ती जीवाचा खूप आटापिटा करते, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी आणि प्रत्येक वस्तू नवर्‍याच्या हातात द्यायचा प्रयत्न करते, पण तो मात्र कोरडाच. त्याच्या या नीरस वागण्याचा तिला आता कंटाळा आला होता ,एका तपाच्या संसारानंतरही त्याच्या स्वभावात आणि वृत्तीत कुठलाच फरक पडला नव्हता. त्यांच्यात उरला होता तो फक्त कोरडा व्यवहार.

          पण आता ती स्वतःला जास्त वेळ देते ,स्वतःचे छंद जोपासते, मुलांना एखाद्या पार्क मधे घेऊन जाते, काही समविचारी मैत्रिणींचा तिने ग्रुप बनवला आहे . त्या ग्रुप सोबत ती विविध स्थळांना भेटी देते, फूटपाथवरच्या मुलांसाठी आठवड्यातून तीन दिवस फूटपाथ शाळा चालवते. महीन्यातून एखाद गेट टुगेदर पण एनजाॅय करते. शेवटी तिने तिचा आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आहे.


🎭 Series Post

View all