लव आज कल भाग एक

The Love लव आज कल
लव आज कल भाग एक

“मीरा ए मीरा कुठे आहे तू? जरा चहा तरी कर. आज दिवसभर ऑफिसमध्ये एक मीटिंग खूपच लांबली. भूक पण लागली आहे थोडेसे कांदे भजे पण कर.” वऱ्ह्यांड्यात जोडे काढून मनोज घरात येता येतात बोलत होता. “मीरा अग मी तुला आवाज देत आहे. घरात आहे की नाही तू?” मनोज ऑफिस मधून घरी आल्याच अगदी दरवाजातूनच बायकोच्या नावाचा पुकारा करत होता. आज सकाळी ऑफिसमध्ये त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती आणि नेमका सकाळी घरून निघताना त्याला उशीर झाला होता. प्रेझेंटेशनच्या काळजीमुळे तो डबा ही घरीच विसरला होता. दिवसभर केवळ कॉफी आणि स्नॅक्स खाल्ल्याने त्याला आता कडकडून भूक लागली होती आणि डोकंही दुखतत होतं, म्हणूनच त्याचा सतत बायको मीराच्या नावाने पुकारा सुरू होता.

“अरे मनोज, मीरा आज महिला मंडळाच्या मीटिंग करिता गेली आहे. परवा कोजागिरी पौर्णिमा आहे ना, त्याबद्दलच सगळ्याजणी मिळून जागरणाचं काहीतरी प्लॅनिंग करणार आहेत, असं ती मला सांगून गेली.” मनोजच्या आईने माहिती पुरवली.

“या मीराला काय म्हणावं आता? तिला माहिती आहे की संध्याकाळी मी घरी आल्यावर ती मला घरीच हवी असते. पण एकदा तरी ती माझा शब्द ऐकेल तर शपथ. माणूस एवढं काम, एवढी मरमर कशासाठी करतो? कुणासाठी पैसे कमवतो? आपण कितीही मेहनत करा, ऑफिसमध्ये डोक्याचा भुगा करा, एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी रात्र रात्र जागवा, प्रमोशनसाठी रक्ताचे पाणी करा, पण घरात त्याचं कुणाला काहीच नाही?” दिवसभराचा उपवास आणि घरी बायको नाही असं बघून मनोजचा राग टिपेला पोहोचला होता आणि तो मनाला वाट्टेल तशी बडबड करत होता.

“काय झालं मनोज कशाला एवढा त्रागा करतो आहे? तुला विचारूनच तिने महिला मंडळात नाव नोंदवलं ना! आणि दिवसभर ती घरीच असते उगीच कशाला चिडचिड करतो. तू थकला असशील मी तुला चहा करून देते.” मनोज ची आई समजूतदारीच्या स्वरात बोलली.

“रमा मी पण आलोय ग घरी. मला पण जरा कप भर चहा देशील का?” मनोज चे बाबा पण तेवढ्यात बाजारातून घरी आले होते. त्यांनाही चहा हवा होता.

रमाने मुलगा मनोज आणि त्याचे बाबा दोघांसाठीही चहा आणि मस्त कांदेपोहे केले.

“वा! रमा पोहे अगदी छान झाले हो आणि चहाही अगदी फक्कड.” मनोजचे वडील कौतुकाने बोलत होते. तेवढ्यात मीरा पण घरी आली.

“अगं मीरा ये ये, हे बघ मी आत्ताच कांदे पोहे आणि चहा केला आहे. तुही गरम गरम खाऊन घे. तू पण थकली असशील ना?” रमाने प्रेमाने मीराला पोहे दिले.

फ्रेश व्हायला मीरा स्वतःच्या खोलीत गेली तर तिथे मनोज तिच्याकडे रागारागाने बघत होता. “मीरा मी तुला किती वेळा सांगितलं आहे की संध्याकाळच्या वेळी बाहेर भटकायला जायचं नाही. मला ते आवडत नाही. संध्याकाळी आमच्या सगळ्यांसाठी चहा करायचा सोडून, एक तर तू महिला मंडळाच्या बैठकीला गेली. वरून आईने केलेले पोहे आणि चहा पण घेतलास! तुला काहीच वाटत नाही का असं आयतं खायला?” मनोजचा राग अजून शांत झाला नव्हता.

“एक मिनिट मनोज, मनाला येईल तसं मला बोलू नको. आणि मी काही मैत्रिणींसोबत सिनेमा बघायला गेली नव्हती. महिला मंडळाची मीटिंग होती आणि एक गोष्ट विसरू नको की, मी घरी बोर होऊ नये म्हणून तुझ्या इच्छेने, आई आणि बाबांच्या संमतीनेच किंबहुना त्यांच्या आग्रहानेच मी महिला मंडळात नाव नोंदवलं आहे. तीथे चार ठिकाणच्या बायका येतात. एखादा कार्यक्रम ठरवायचा असतो, त्याची रूपरेषा बनवायची असते तर वेळ लागणारच ना! प्रत्येकीच मत लक्षात घ्यावच लागतं ना? साध्या महिला मंडळाच्या मिटींगला केवळ अर्धा तास वेळ झाला, तर तु मला एवढं बोलतो आहेस? आणि जेव्हा तुझ्या मिटींग्ज रात्री उशिरापर्यंत चालतात त्याचं काय? आणि चहाच म्हणशील ना, तर मी सुरुवातीला एक दोनदा तुला चहा करून दिला होता, पण तुला माझ्या हातच्या चहा पेक्षा आईंच्याच हाताचा चहा जास्त आवडतो म्हणून मी चहा करणं बंद केलं आहे” मनोजच्या प्रश्नाला मीराने अगदी सडेतोड उत्तर दिलं.

पुढल्या भागात बघूया की मीरा आणि मनोज भांडण मिटत की पुढे सुरूच राहतात.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.