हळुवार भाग चार

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग चार


दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू झाली, पण रमा मात्र अभ्यासात व्यस्त होती.

मीरा -"ताई तू लग्नाला कशी काय तयार झालीस ग?"

रमा -"म्हणजे?"

मीरा -"तुला तर शिकायचं होतं. बाबांसारखं सनदी अधिकारी व्हायचं होतं मग?"

रमा -"हे बघ मीरा माझे पेपर जवळ आले आहेत, मला अभ्यास करू दे." रमाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

मीरा -"ताई तु मला बावळट समजते, ते मला माहिती आहे, पण मी बावळट नाही. तुझं लग्न इतकं तडका फडकी लावून देण्याचं कारण मला माहिती आहे." मीराच्या या शब्दांनी रमा दुखावली होती, पण तिने मीराला काहीच उत्तर दिलं नाही.

मीरा -"ताई तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून यश आहे."

रमा -"काssय? तुला कसं माहीत?"

मीरा -"घरी एवढं महाभारत सुरू होतं, मग मी जयाला फोन लावला, तर ती सांगत होती की, यशला तू आवडतेस आणि त्या एका कुठल्याशा राज्यस्तरीय स्पर्धेत वादविवादात तू यशला हरवलंस, तेव्हाच त्याला तुझ्याबद्दल तसं काहीतरी वाटायला लागलं."

रमा -"पण तो माझा…….

"एक चांगला मित्र आहे असं म्हणायचंय ना तुला?" मीरा ने रमाचे वाक्य पूर्ण केले. "ताई आपण चांगलं म्हणून जग चांगलं असं होत नाही ना! त्याला तुझ्याशी लग्न करायचं की तुझा बदला घ्यायचाय?"

रमा -"बदला कशाचा? कशासाठी?"

मीरा -"ते कॉलेजमध्ये तुमची नोक-झोक झाली होती म्हणे."

रमा -"हो मग?"

मीरा -"तू त्याला वादविवाद स्पर्धेत हरवलेलं, त्याने तुझ्याशी मैत्रीचं नाटक केलं आणि साऱ्या कॉलेजमध्ये तुला बदनाम केलं!"

रमा -"कस शक्य आहे ते?"

मीरा -"पण तसंच झालं आहे."

रमा -"थांब चांगली खरडपट्टीच काढते त्याची!"

मीरा -"त्याने काय होणार? बाबांना पटेल तुझं म्हणणं? आणि आता हे ठरलेलं लग्न! त्याचं काय?"

रमा -"खरंच लग्नाचं काय?" रमाला आता हे लग्न नकोस वाटत होतं.

मीरा -"ते होणारच! ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी. त्यामुळे अभ्यास करण्यापेक्षा लग्नाची खरेदी, कुळाचार, पूजा विधी आणि नवीन आयुष्य एन्जॉय कर!" मीरान रमाला समजावण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यात सीमाताई तिथे आल्या.

"काय ग काय गुजगोष्टी सुरू आहेत दोघींच्या?"

मीरा -"काही नाही ग! म्हटलं आता ही माझी लाडकी ताई जाणार म्हणून, गप्पा माराव्या तिच्याशी!"

सीमाताई -"असं होय. पण जास्त रात्र करू नका, लवकर झोपा! नाहीतर…."

मीरा -"डोळ्याखाली काळी वर्तुळ येतील." मीरा मस्करीच्या टोन मध्ये बोलली.

मीराच्या ह्या वाक्यावर तिघी मायलेकी अगदी मनमुराद हसल्या. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडलाही. हॉलवर सर्वत्र फुलांच्या माळा लावल्या होत्या. रोषणाई केली होती. शहनाईच्या मंद स्वर लहरी वातावरणात उत्साह पेरत होत्या. मंगल संगीत वाजत होतं. प्रवेशद्वारावर सुवासिनी पाहुण्यांचं हळदीकुंकू लावून, अत्तराने स्वागत करत होत्या. लाल, पिवळ्या, हिरव्या अक्षदा वऱ्हाडाला देत होत्या. तिकडे मात्र रमाच्या आईची नुसती उलघाल होत होती.

रमा वधूवेशात खूप सुंदर दिसत होती. मेहंदीने रंगलेले तिचे गोरे पान हात, त्यावर हिरवा चुडा, नाकात नथ, मरून रंगाची पैठणी, केसांच्या अंबाड्यात लावलेला मोगऱ्याचा गजरा अगदी नक्षत्रासारखं रमाचे रूप खुलून आलं होतं. देवदत्तही शेरवानी मध्ये अगदी भारदस्त दिसत होता.

लज्जा होम झाला, सप्तपदी झाली, पण कन्यादानाच्या वेळी रमेशराव आणि सीमाताई खूप भाऊक झाले. रमेशरावांनी हात जोडून जावयाला विनंती केली.

"आमची रमा अल्लड आहे अजून! काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या."

देवदत्तने विनंती नम्रपणे मान्य केली. पाठवणीच्या वेळी मात्र रमा-मीरा-आई-आजी यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

रमा नागपूरला तिच्या सासरी आली. उंबरठ्यावरचे माप ओलांडताना एक हात दार अडवण्यासाठी पुढे आला.

"थांबा! तुम्हाला आत येता येणार नाही!"

सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे होत्या.देवदत्तची मामे बहीण दार अडवून उभी होती. रमाच्याच वयाची ती, पण मीनाताईंनी सगळं घर तिच्यावर सोपवलं होतं.

"अरे म्हणजे वहिनीने नाव घेतल्याशिवाय, तेही उखाण्यात! मी तिला घरात येऊ देणार नाही." नेहा खट्याळ स्वरात बोलली.

रमाने छान उखाणा घेतला. सत्यनारायणाची पूजा झाल्यावर देव-रमा फिरायला जाणार होते, पण मीनाताईंनी माहूरच्या कुलदेवतेला जाऊन या. मग फिरायला जा! असं सांगितल्यावर देवदत्तला नाही म्हणता आलच नाही.

रमा मीनाताईंच्या खोलीत झोपली. दुसऱ्या दिवशी देवची मीटिंग होती अमरावतीला. सकाळी देव लवकर जाणार होता म्हणून, मग मीनाताई रमाला सगळं समजावून सांगत होत्या.

मीनाताई -"हे बघ रमा देवला सकाळी पूजे करिता ताजी फुले लागतात. आदल्या दिवशीची धुपाची, उदबत्तीची रक्षा स्वच्छ करायची. नैवेद्यासाठी खडीसाखर एका छोट्या वाटीत बाजूला काढून ठेवायची. सकाळी नऊला देवला नाश्ता लागतो आणि त्याआधी चहा." अशा सगळ्या सूचना सांगत-ऐकत मीनाताई, रमा झोपी गेल्या.

सकाळी रमा लवकर उठली. सूस्नात होऊन मनोभावे पूजा करून, तिने उपम्यासाठी रवा भाजायला घेतला. देवदत्त बरोबर आठ वाजता चहासाठी डायनिंग टेबलवर आला. रमाने चहा दिला पण तो देवदत्तला आवडला नाही.

"आपण स्वतः जर कडू चहा पिऊ शकत नाही तर समोरच्याला का द्यावा?" देवदत्त खोचकपणे बोलला. रमाला काही कळतच नव्हतं. एक तर गृहप्रवेशापासून देवदत्त तिच्याशी फार काही बोलला नव्हता आणि त्याचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज रमाला अजून पर्यंत आला नव्हता. पण एक गोष्ट मात्र रमाच्या लक्षात आली होती, त्या घरात देवदत्तचा शब्द म्हणजे अखेरचा हे तिला एव्हाना कळलं होतं.

रमा विचारच करत होती, तेवढ्यात देवचा आवाज आला.

"मी वीस मिनिटात खाली येतो आहे. नाश्ता तयार ठेव." देवदत्त तयार व्हायला निघून गेला. रमानं चहाचा एक घोट पिला तर तिला चहा गोड लागला, पण देवच्या बोलण्याचा संदर्भ तिला लागेना. जास्त विचार न करता रमा उपमा करण्यासाठी किचनकडे वळली.

देव पेपर वाचत नाश्ता करण्यासाठी थांबला होता. रमाने उपम्याची प्लेट देव समोर धरली, पण गडबडीत चमचा मात्र खाली पडला. रमा जरा भांबावली. देवने हातानेच तिला थांबवून चमचा स्वतः उचलला. दोन-चार घास खाल्ल्यावर देवला एक फोन आला. देव फोनवर बोलता बोलता चहा पीत होता. चहा संपल्यावर, तो जायला निघाला.

रमा घाबरतच म्हणाली "खाऊन तरी जा! उपमा आवडला नाही का?"

देवने फक्त त्याच्या हातातले घड्याळ दाखवले. बरोबर नऊ वाजले होते. रमा हिरमुसली.

चार पावलं पुढे जाऊन देव मागे वळला आणि रमाच्या कानात कुजबुजला "उपमा छान झाला होता आणि आता चहा तर मधाहून गोड." देवच्या या वाक्यावर रमा मधाळ हसली.