Login

शुभमंगल सावधान!

The Beauty And Duty In Married Life


शुभमंगल सावधान

चारचौघींसारखी ती. दिसायला फार सुंदर नव्हती,पण नाकी डोळी नीटस होती. तिघी बहिणींमधली थोरली. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम, तरीही हट्टाने ती शिकली आणि घरात थोडा आर्थिक हातभार लावावा म्हणून एका ठिकाणी प्रायव्हेट नोकरीही करत होती. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींची लग्न व्हायचीच होती, पण तिची पंचवीशी जवळ आली आणि आई-बाबांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. तिच्या आई-वडिलांना ही तिचं लग्न होणं जरुरीचं वाटत होतं.


यथावकाश एका चांगल्या ठिकाणी तिचं लग्न जुळलं. ती आणि तो मग स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाले. येणाऱ्या भविष्याची स्वप्न रंगवत दोघेजण फोनवर रात्री जागवू लागले. फोनवर बोलणं, एकमेकांच्या आवडी-निवडी, घरातले सणवार, रितीरिवाज, एकमेकांच्या आई-वडिलांचा, भावा-बहिणींचा स्वभाव असं सगळं बोलणं सुरू होतं. कपड्यांचा कुठला रंग आवडतो, इथपासून ते आवडती भाजी आणि चित्रपट किंवा सिनेतारकांविषयीच्या गप्पाही रंगायच्या. हे असे जादूभरे दिवस कुठे उगवत होते आणि मावळत होते हे दोघांनाही कळत नव्हतं.

पाहता पाहता लग्न एका महिन्यावर आलं, त्यामुळे दोन्ही घरात कामाची, खरेदीची, याद्यांची, कार्यक्रमांची नुसती धामधूम आणि लगबग होती. एकीकडे कुठेतरी तिला लग्नावर होणारा खर्च मान्य नव्हता, पण तिचाही नाईलाज होता. शिवाय जोडीदाराविषयी सहजीवनाची ओढही लागलीच होती.

अशाच एका दुपारी ती आणि तिच्या मैत्रिणी लग्नाच्या साड्या, मेंदी, मेकअप, दागिने, हेअर स्टाईल, रुखवत याविषयी बोलत होत्या. तेवढ्यात तिची एक मैत्रीण तिला म्हणाली-

पहिली -"अगं काल तुला किती फोन लावत होते मी! तुझा फोनच लागत नव्हता. सतत बिझी येत होता. जिजुंशी बोलत होतीस का?"

ती -"नाही ग \"त्यांच्याशी\" नाही. मावशींशी बोलत होते."

पहिली -"अग बाई! \"त्यांच्याशी\"."

दुसरी -"त्यांच्याशी म्हणजे कोणाशी ग?"

तिसरी -"त्यांच्याशी म्हणजे \"ह्यांच्याशी\"."

चौथी -"ओ हो हो!"

ती -"हे काय सुरू आहे ग तुमचं? अरेंज मॅरेजमध्ये त्यांना नको म्हणून तर काय आरे कारे करू का?"

पहिली -"आमचे साहेब म्हटलं तर चालेल."


दुसरी -"माझे मालक तर धावेल."

तिसरी -"इकडची स्वारी कसं वाटतं म्हणायला?"

चौथी -"माझ्या कुंकवाचा धनी कसं वाटतं?"

पाचवी -"एकदम जबरदस्त, मस्त आणि सुपर्ब नाही का?"

ती -"चला ग किती बोलताय!"

पहिली -"बर बाई आमचे सरकार कसं वाटतंय किंवा अहो चालेल का?"

ती -"आता मी मारेन हा!"

पहिली -"बर सांग काय बोलणं झालं ते?"

ती -"व्हिडिओ कॉल करून त्यांची रूम दाखवत होते म्हणाले, \"बघून घे काय बदल करायचे आहेत?\" मी म्हटलं, \"काही बदल नको. ठीक आहे.\"


दुसरी -"ओ हो!"

ती -"त्यादिवशी मला खूप सर्दी झाली होती तर फोनवर विचारत होते काय झालं? बरं वाटत नसेल तर औषध पाठवतो. आराम कर. संध्याकाळची डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ का? बापरे मला तर असं वाटत होतं की मी जणू एखाद्या राजाची राणीच आहे की काय?"


तिसरी -"मग नेलं का दवाखान्यात तुझ्या ह्यांनी
?"


ती -"नाही ग! त्यांना अर्जंट मीटिंग आली म्हणून मग नाही गेलो दवाखान्यात. पण खरं सांगू का त्यांच्या त्या चार वाक्यांनीच माझी तब्येत ठीक झाली."

चौथी -"अग्गोबाई!"

पाचवी -"अजून काय बोलणं झालं ग तुमचं?"

ती -"असंच काही नाही. त्यादिवशी आम्ही व्हिडिओ कॉल वर बोलत होतो तर त्यांच्या बहिणीची मुलगी तिथे आली आणि मला म्हणाली \"हॅलो मामी\" मामी म्हटल्यावर मला एकदम असं वाटलं म्हणजे म्हणजे…"


पहिली -" काकूबाई झाल्यासारखं!"

ती -" काय ग शी: बाई. मारेन हा आता तुला."


दुसरी (पहिलीला) -"ए तू जरा गप बस ना ग! बरं अजून सांग ना काय म्हणत होते तुझे अहो?"


ती -"म्हणत होते, \"मला दोडके, तोंडली, पडवळ, कारली या भाज्या अजिबात आवडत नाही. प्लीज त्या नको बनवत जाऊ\" मी म्हटले, \"मला तर स्वयंपाकच येत नाही. आत्ता कुठे चहा करायला शिकते आहे.\" तर म्हणाले, \"असू दे मीच बनवत जाईन. इंजीनियरिंग करताना रूमवर बनवायचो मी स्वयंपाक."


यथावकाश तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. नव्याचे नऊ दिवस संपले. रोजचा दैनंदिन व्यवहार सुरू झाला. पहिल्या दिवाळी करता ती आता माहेरी आली होती. तिला भेटायला परत तिच्या सगळ्या मैत्रिणीपण आल्या.


पहिली -"काय म्हणतात राणी सरकार?" कसं काय सुरू आहे?"

ती -"कशाची राणी आणि कशाचं सरकार! नुसतं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम, काम, काम."

दुसरी -"म्हणजे काय झालं ग?"

ती -"काय होणार आहे? त्या घरात कितीही काम करा कोणाला कदरच नाही. जणू त्या घरातली फुकटची मोलकरीण आहे मी."


तिसरी -"काय?"

ती -"लग्न झालं ना तेव्हापासून माझा नवरा हातात पाणी मागतो, लॅपटॉप जरा बाजूला ठेवत नाही. चहा हातात, जेवणही तिथेच, जेवताना भाजी गरम व्हावी, पोळी पण गरमच पाहिजे असते. सकाळी पिलेल्या चहाची कपबशी आणि नाश्त्याची प्लेट दुपारी चार वाजेपर्यंत जर मी नाही उचलली ना तरी तिथेच पडून असते."

चौथी -" बरं ते स्वयंपाकाचे काय झालं? तुझे अहोच करणार होते ना?"

ती -"कशाचं काय ग! नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. सासू-सासऱ्यांना शुगर म्हणून बटाटे चालत नाही. नवऱ्याला गिलकी, दोडकी, तोंडली, कारली आवडत नाही. लहान दिराला वांग्याची आणि पालेभाज्यांची ऍलर्जी. रोज त्या गॅस ओट्यासमोर उभं राहून एकाच प्रश्नाचा भुंगा डोकं खातो सकाळी काय भाजी? संध्याकाळी काय भाजी?"


पाचवी -"बरं पण शनिवार रविवार तरी बाहेर जाता की नाही हॉटेलिंगसाठी?"

ती -"कशाचं बाहेर आणि कशाचं हॉटेलिंग? सासर्‍यांचा पाय मुरगळण्याचं निमित्त झालं आणि सगळ्या पाहुण्यांनी घरी येण्याची रिघच लावली. दिवस रात्र स्वयंपाकघरात चहा कॉफी उकळत असते. पोहे, उपमा, ढोकळा, शिरा, भजी असं काहीतरी बनवावं लागतं. असं वाटतं की, मी एखाद्या हॉटेलमधली चीफ शेफ झाली आहे की काय!

अगदी दुपारी तीन-चार वाजता पण पाहुणे येतात ग! आणि सासूबाईंच्या मैत्रिणी! नुसता वैताग!."


पहिली -"आणि ते रूम वगैरे व्यवस्थित ठेवतात ना? म्हणजे त्यांनी तुला व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतं म्हणून विचारते आहे."


ती -"कसलं काय ग! नुसतं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आंघोळ केल्यानंतर ओला टॉवेल पलंगावर पडलेलाच असतो. ऑफिसमधून आल्यानंतर सॉक्स तिथेच पडलेले असतात, बॅगमधून टिफिन काढायचं नाव नाही. वॉलेट, घड्याळ,रुमाल, गाडीची चावी सगळं हातात हव असतं. कपाटातून जर मी शर्ट काढून नाही दिला ना तर ते स्वतः काढून घेतात आणि उरलेल्या बाकीच्या सगळ्या कपड्यांची ऐशी तैशी करून टाकतात. सांग आता काय म्हणावं याला?

अगं त्या दिवशी काय झालं, माझं थोडं डोकं दुखत होतं. नवऱ्याला म्हटलं थोडा बाम लावून द्या डोक्याला."


नवरा -"मी घरी यायची वाट पाहत होतीस का? गोळी घ्यायला काय झालं तुला?"

ती -"एक क्षण वाटलं लग्नाआधी माझी काळजी घेणारा, करणारा तो हाच होता का? बर बामच बोट माझ्या डोक्याला लावलं आणि दुसऱ्या मिनिटाला तो माणूस चक्क घोरायला लागला. कधीकधी तर असं वाटतं की, मी लग्न कशाला केलं? दिवस रात्र स्वयंपाक घरात गॅसच्या ओट्या समोर झुंजायला की घरातल्या प्रत्येकाला हातात चहा नाश्ता द्यायला?

खरंच बाई अरेंज मॅरेजमध्ये ना समोरच्याकडून म्हणजेच नवऱ्याकडून अजिबात अपेक्षा करू नये. ते बोहल्यावर चढल्यावर मंगलाष्टकाच्या शेवटी म्हणतात ना शुभमंगल सावधान. ते सावधान होण्यासाठीच म्हणत असतात बरं का! तेव्हाच सावध व्हायला हवं होतं आता काय उपयोग?"


तिच्या ह्या अनुभव कथनामुळे, तिथे जमा झालेल्या तिच्या मैत्रिणींचे  चेहरे मात्र अगदी पाहण्यालायक झाले होते.


 लेखिका राखी भावसार भांडेकर.




******************************************************

वाचकहो लग्ना आधीचे आणि लग्नानंतरचे तुमचेही असे काही अनुभव असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.


जय हिंद.






🎭 Series Post

View all