ज्याप्रमाणे वयात येताना मुलींमध्ये काही हार्मोनल बदल होतात. त्याचप्रमाणे पाळी जाताना स्त्रियांमध्येही काही बदल होत असतात. अंगावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे, विनाकारण चिडचिड, विनाकारण डोळे भरून येणे,संसारातल्या भूतकाळातल्या वाईट घटना आठवून त्याविषयी खंत वाटणे, संसारामध्ये काही वेळेला नवऱ्याने सोबत न दिल्याचे प्रसंग आठवून उगीच रडायला येणे आणि अजून काही….
रजोनिवृत्ती ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. त्यामुळे या घटनेकडे एखादी समस्या म्हणून न पाहता नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून पहायला काहीच हरकत नाही…
*********************************************
मीना एक सर्वसामान्य चाळीस-पंचेचाळीस वर्षाची गृहिणी. चार चौघींसारखी नीटनेटका संसार करणारी. आपलं घरदार आणि मुलाबाळांमध्ये रमणारी, मुलांचा अभ्यास, नवऱ्याच्या आवडीनिवडी मनापासून जपणारी. पण गेल्या वर्षभरापासून ती फारच चिडचिडी झाली होती. कुठल्याही लहानसहान गोष्टीवर ती विनाकारणच चिडायची. नवऱ्यावर तर फारच वैतागायची आणि मग एकट्यात बसून उगाच अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. त्यादिवशीही असंच झालं…….
मीना दुपारच्यावेळी फ्रिज साफ करत होती. तिला फ्रीजमध्ये काही लीची दिसल्या, झालं मीनाचा पारा चढला. मुलगी नेहा हिला उद्देशून मीनाची बडबड सुरू झाली.
मीना -"नेहा मागच्या पंधरा दिवसापासून तुझा आग्रह सुरू होता पप्पा लीची आणा, पप्पा लीची आणा आणि आता चार दिवस झाले तरी ह्या लीची खायला तुला वेळ मिळत नाहीये. नुसत्या फ्रीजमध्ये सडून राहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट तुला आणि तुझ्या भावाला हातात पाहिजे. दोन हात दिले आहे मला देवाने दहा नाही! अष्टभुजा दुर्गादेवी नाही मी सगळं तुम्हाला हातात द्यायला."
नेहा -"आई कशाला क्षुल्लक गोष्टीसाठी कट कट करते, खाईन ना मी उद्या लीची."
मीना - "मागच्या दोन दिवसांपासून हेच ऐकते आहे, आता उद्या जर मला फ्रीजमध्ये लिची दिसल्या ना तर सर्व फेकून देईन मी त्या कचऱ्याच्या टोपलीत."
दोघी माय लेकींचा हा संवाद सुरूच होता तेवढ्यात नीतू तिथे आला. नीतु - मीनाचा लहान मुलगा, नेहाचा लहान भाऊ. क्रिकेटचे प्रचंड वेड असणारा, क्रिकेट क्लब जॉईन केलेला, क्रिकेट खेळताना कपडे, केस, अभ्यास कशाचं भान त्याला राहत नसे.
मीना -(नीतुला उद्देशून)"या राजकुमार, या! स्वागत आहे तुमचं. आता हे ग्लोव्ज, पॅड ,सॉंक्स,मळलेले कपडे इथेच हॉलमध्ये सोफ्यावर फेकून आंघोळ न करताच टीव्ही पाहत रहा. आणि थोड्या वेळाने टीव्ही पाहता पाहताच त्याच घाणेरड्या हाताने खा. मग संध्याकाळी जेवा आणि अभ्यासाला दांडी."
मीनाच्या या वाक्यावर दोघा भावंडांनी एकमेकांकडे पाहिले आणि निमूटपणे अभ्यास करायला आतल्या खोलीत गेले.
रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर मीनाच्या नवऱ्याने- संजयने दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगबद्दल सांगितलं.
संजय -"मीना माझी उद्या एक महत्त्वाची मिटींग आहे. सकाळी लवकर जायचं आहे ऑफिसमध्ये. प्लीज लवकर उठून देशील ना!"
मीनाने केवळ होकारार्थी मान हलवली.
संजय -"अगं विजय आणि अजयला तुझ्या हातचे मेथीचे थालीपीठ खायचे आहेत. प्लीज उद्या करून देशील का? मीटिंग झाल्यावर आम्ही सगळे सोबतच डबा खाणार आहोत."
मीना मनात विचार करत होती की, \"यांच्या मित्रांना बरे माझ्या हातचे थालीपीठ खायचे आहेत. स्वतःच्या बायकांना काडीचा सुद्धा त्रास देत नाही आणि माझ्याकडून सगळ्या फर्माईशी पूर्ण करून घेतात. यांच्या मित्रांसाठी थालीपीठ बनवण्याशिवाय दुसरं कुठलंच तर काम नसतं ना मला घरात!\"
खरंतर गेल्या वर्षभरापासून मीनाची पाळी अनियमित झाली होती. स्वभाव चिडचिडा आणि काम करताना तिला आधीसारखा उत्साहही वाटेना! कुठेतरी काहीतरी चुकत होतं पण मीनाला, संजयला आणि मुलांना काही कळत नव्हतं की काय चुकतंय?
दुसऱ्यादिवशी मीना सकाळी लवकर उठली. नेहाची प्रॅक्टिकल परीक्षा होती. ती पण लवकरच जाणार होती, नितीनची मॅच होती त्यालाही लवकर जायचं होतं. नेहासाठी ढोकळा, नितीनसाठी सँडविच आणि नवऱ्यासाठी मेथीच्या थालीपीठ करताना मीनाची अक्षरशः दमछाक होत होती.
सकाळी लवकर उठून गॅसवर मीनाने एकीकडे दूध गरम करायला ठेवलं. दुसरीकडे ढोकळ्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आणि ती थालीपीठाची कणिक भिजवत होती. नितीनसाठी तिने दूध तयार करून ठेवलं होतं आणि वाटीत बदामा काढून ठेवल्या. नेहा आणि स्वतःसाठी कॉफी, संजयसाठी चहा गॅसवर ठेवला. तेवढ्यात नितीन घाई करायला लागला-
नितीन - (तोंडात बदामांचा बकणा भरता भरता म्हणाला)"आई झाले का सँडविच? लवकर दे. मला वेळ होतो आहे."
मीना - "अरे तू आधी दुध तर पी. मी बनवते आहे ना सँडविच!"
सँडविच बनवताना घाईघाईत मीनाचा हात भाजला. हाताला मलम लावेपर्यंत कॉफी ऊतू गेली. तिकडे नेहाची वेगळीच घाई. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मीना प्रचंड वैतागली आणि तिची परत बडबड सुरू झाली.
पुढच्या भागात बघूया मीना आपल्या नवऱ्याला थालीपीठ करून देते की नाही? तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत…..
©® राखी भावसार भांडेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा