Login

एक आई अशीही

एक आठवण आईची
आई

भर दुपारी एक ते दोन दरम्यानची वेळ,दारावरची बेल वाजली."तूप घ्याचं का तूप,ताई गावरान तूप हाय."

दोन स्त्रिया दारातच समोर उभ्या असलेल्या दिसल्या.दहा ते वीस किलो वजनाचे तुपाचे डब्बे दोघींच्याही डोक्यावर होते.चेहऱ्यावर कासावीस झालेला भाव स्पश्ट दिसत होता.

बरोबरचय ! एव्हढ्या भर दुपारी तीन मजले एव्हढे वजन घेऊन चढून येणे सोपी गोष्ट नाही आम्ही शहरातल्या स्त्रियांसाठी .

पण कुठल्यातरी चाळीस गाव जवळच्या गावातून तूप विकण्यासाठी आलेल्या स्त्रिया ,त्यांच्यासाठी काय सोप्प अन काय अवघड,यापेक्षा विक्री होणे महत्त्वाचे.

दोघीजनीनी बोलायला सुरवात केली.चांगले तूप आहे,आम्ही नेहमी येत असतो,आता घेऊन बघा,आम्ही स्वतः बनवलेले आहे,भेसळ मुळीच नाही, वगेरे वगेरे...

त्यातली एक स्त्री पाच सहा महिन्यांची प्रेग्नंट होती.आणि दुसरी तिची आई होती.मुलगी डोक्यावरच्या अन् पोटातल्या वजनाने आधीच हिरमुसली होती.त्यात जिने चढून आल्याने दमही भरला होता.

दुपारची वेळ तशी पण भुकेचीच होती.तुपाचा भाव विचारला ,थोडी चवही घेऊन बघितली.नंतर भावात घासाघीस सुरू झाली. तस तशी आईच्या मार्केटिंगची धार अजूनच तीक्ष्ण व्हायला लागली...!!
"त्याचं काय ना ताई,माझी मुलगी पोटुशी हाय.आता लवकरच बाळंत हुईल !पैशाची लय गरज हाय !"...

दुपारची जेवणाची वेळ होती.तूप ही घेतले थोडे. म्हटल.. "जेवतेस का ग..?"

तसे आईच्या चेहऱ्यावरचे भाव सुखावले.म्हणाली... "थोडी भाजी चपाती द्या माझ्या लेकीला."..

म्हटल, "अग माझ्या कडेही जास्त काही नाही आहे पण तूही खा एखादी चपाती "..
तर म्हणाली ,"नको ताई,तसा पण आज माझा उपास हाय.
माझ्या वाट्याची चपाती बी द्या हीलाच..लय उपकार होतील ."...

काय खोटं अन् काय खरं, आवश्यकताच नव्हती विचार करण्याची.एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला ओळखू शकते.

आणि एक आईच दुसऱ्या आईच्या भावना समजू शकते.त्या आईने तांब्याभर पाणी पिले..
अन् म्हणाली ..."आता लय बर वाटतयं लेकीला पोटाला खायला मिळालं अन् माझे बी मन मोकळं झालं"...
द्या तो तुपाचा डब्बा इकड हे थोड तूप घालते आभार म्हणून."

आल्या होत्या तशाच झर झर पायऱ्या उतरत निघाल्या होत्या माय लेकी.आणि माझ्या हातात होता एका आईच्या मातृत्वाचा जिव्हाळ्याने भरलेल आठवनींचा डबा....!!!
@Sush.