सदर लघुकथा एका सत्यघटनेवर आधारित आहे
सासू-सुनेच्या जुन्या नात्याची नवी सुरुवात…..
वडिलांचे वर्षश्राद्ध करून रेवा सासरी परतत होती. रेल्वेच्या बाहेर बघताना नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. छोटू मांडीवर झोपला होता. पुढचा पाच सहा तासाचा प्रवास रेवा आता एकटीच रेल्वेत बसून पार करणार होती. मागल्या वर्षी जेव्हा तिचे वडील गेले तेव्हा सुनील- रेवाचा नवरा -पहिल्या दिवशी आला होता. पण भावकीतल्या कुणाचं तरी निधन झालं म्हणून त्यांनी तेरवीच्या कार्यक्रमाला पाठ दाखवली होती. तसेही सुनीलला रेवाला माहेरी नेण्यात काडीचाही रस नव्हता. तो नेहमी आपल्या कामात मग्न असायचा. रेवाने काही म्हटले, माहेरी चलण्याविषयी गळ घातली की ,सुनील म्हणायचा, \"अग इतकं सोपं आहे का ते? मी तुला रेल्वेचे रिझर्वेशन करून देतो. तू जाऊन ये मुलांना घेऊन.\"
रेवाच्या लग्नाला आता सात-आठ वर्ष झाली होती. पण सुनील सात-आठ वेळा ही कधी रेवाच्या माहेरी आला नव्हता. त्याचा व्यवसाय, मिटिंग्स आणि डील्स एवढंच त्याचं विश्व होतं. त्याच्या कामामुळे मुलांनाही फार वेळ देऊ शकत नव्हता तो. एखादवेळी रविवारी बाहेर जायचं म्हणजे रेवाला सासू-सासरे, आजे सासू ,मोठे दिर ,पुतणे, या सगळ्यांचे करूनच मग बाहेर पडता यायचं.
रेवा असा विचार करत असतानाच एकदम तिला तिच्या वडिलांची आठवण झाली. रेवाच्या वाढदिवसाला, सुनीलच्या वाढदिवसाला, तिच्या विवाह वाढदिवस किंवा दिवाळी - दसरा प्रत्येक सणावाराला बाबा आवर्जून फोन करायचे. तोंड भरून आशीर्वाद द्यायचे. तिच्या सासरच्या लोकांची ख्यालीखुशाली विचारायचे. पण सुनील कधीच दोन वाक्यांच्या वर तिसरं वाक्य त्यांच्याशी बोलला नाही. आता इतक्या वर्षात आपल्याला आहे त्याची सवय झाली आहे. पण बाबा \"गेल्यानंतर\" दोन महिन्यातच आई पण \"देवाघरी\" गेली. बाबा गेल्यावर माहेरी फारसा फरक जाणवला नाही, पण आता असं वाटतं आई-बाबा सोबतच माहेरही काळाच्या पडद्याआड जणू गडप झालं आहे.
मागल्या वर्षी बाबा गेल्यावर जेव्हा रेवा माहेरी गेली होती तेव्हा बाबांच्या रिकाम्या खुर्चीकडे बघून तिला भरुन आलं होतं. त्यावेळी मोठ्या वहिनींना काही न बोलता केवळ तिचा प्रेमळ हात रेवाच्या पाठीवरुन फिरवला. किती आश्वासक स्पर्श होता तो! लहान भावजय तर सतत \"ताई असं झालं, ताई तसं झालं, आज काय बनवू संध्याकाळी? उद्या सकाळी नाष्ट्याचा काय मेनू ठरवायचा?\" असं म्हणत पाठ सोडत नव्हती,पण आता आई गेल्यावर मात्र सारंच चित्र पालटलं.
रेवा मनाशीच विचार करत होती. आधी आईसारखी माया करणारी मोठी वहिनी वैशाखातल्या नदीपात्रासारखी कोरडीठाक झाली होती. तर \"अहो ताई अहो ताई\" म्हणणारी लहान भावजय तोंडाला कुलूप लावून अन् गालावर अबोलीची फुले माळून बसली होती. असू देत माहेरचा हिस्सा नकोच होता आपल्याला! दोघीही भावजयांनी घर आणि शेतीचा हिस्सा वाटून घेतला. आता त्यांना माझ्याशी काही घेणेदेणे नाही. पण प्रॉपर्टी वाटून घेतली तशा आईच्या आठवणी का नाही वाटून घेता आल्या त्यांना? आईच्या साड्या जुन्या फॅशनच्या त्या नकोत म्हणून वृद्धाश्रमात द्या म्हणे\", आणि ती शाल ज्यात आईच्या मायेची उब होती. ती मी मागितली तर महागाची पश्मीना शाल मागणार नाही तर काय?\" असे म्हटले त्यानीं काय म्हणावं या स्वार्थी विचारसरणीच्या बायांना? मग आपणही आईची मोत्याची नथ आणि मोत्याचा कंठा हट्टाने आणि थोड्या रागानच घेऊन आलो. जाऊदे आता माहेर आपल्याला नेहमी करताच परकं झालं! असा विचार करून रेवाने एक उसासा टाकला.
लेखिका राखी भावसार भांडेकर.
*****************************************************