Login

आम्ही सावित्रीच्या लेकी

There is no age limit to learn anything new From anyone

आम्ही सावित्रीच्या लेकी




 कथेचे नाव - आम्ही सावित्रीच्या लेकी


 विषय - स्त्री आणि परावलंबित्व


 फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा 


*******************************************

        


            कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी वापरण्याची वेळ आली की बायका चटकन पुढे येत नाहीत हा अनेक घरातील अनुभव असतो. बरं हे तंत्रज्ञान काही फक्त मोबाईल, कम्प्युटर च्या बाबतीत असतं असं नाही तर, जी बाई वर्षानुवर्ष घरात जे यंत्र (मिक्सर)वापरत असते, तिला तेच तंत्र वापरण्याचे सगळे फायदे माहिती असतात,आणि मान्यही असतात पण तरीही तिची हे नवीन तंत्रज्ञान ( मायक्रोवेव्ह किंवा फूड प्रोसेसर) वापरण्या विषयी ची पहिली प्रतिक्रिया - नाही, नको, कशाला उगाच? मला नाही जमणार!अशीच असते. कधी कधी तर गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबतीत घरातील महिला या पूर्णपणे आपल्या मुलांवर किंवा नवऱ्यावर अवलंबून असतात.


             तंत्रज्ञानाशी मैत्री करून ते वापरायला शिकणे आणि आपलं आयुष्य सुखकर करून घेणे यात अवघड काहीच नाही. फक्त प्रत्येकीने एक पाऊल पुढे उचलं पाहिजे.


**********************************************


                  त्या सगळ्या जणी पन्नाशीच्या किंवा त्या पुढच्याच, म्हणजे मुलांच्या जबाबदाऱ्या तसं म्हटलं तर नाहीच. कारण त्यांची मुलं मोठी झालीत, काहिंच्या मुला-मुलींची लग्न झालेली, तर काही ग्रॅज्युएशन - पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेली. नवरा त्याच्या व्यापात गुंतलेला. नोकरी, मीटिंग, मित्र, क्लब, बिझनेस टूर, आणि एकंदरीतच स्वतःतच रमलेला.


             काहींचे सासू-सासरे आहेत, पण आता तेही स्वतःची स्पेस जपणारे आणि आपल्या सुनबाईंना थोडी मोकळीक देणारे.



             रमा, रीता, रीना, रिया, रेणू आणि रेवती यांचा एक भिशी चा ग्रुप आहे. दर महिन्यात एखाद्या दिवशी सगळ्यांच्या सोयी आणि सवडीनुसार त्या एकत्र येतात, भेटतात, निवांत बोलतात मज्जा करतात, काही दुखलं-खुपलं तर एकमेकींजवळ मन मोकळं करतात.



            दर महिन्यात त्या काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कधी अनाथ आश्रमाला भेट देतात, तर कधी नुसतीच दिवसभर खाणं-पिणं, कधी एखादा सिनेमा बघतात, तर कधी एखाद्या थीमवर प्रत्येक जण दोन-चार मिनिटांचा अभिनय करतात, कधी पोलीस स्टेशन, कधी वृद्धाश्रम, तर कधी शासकीय रुग्णालयाला सदिच्छा भेट ही देतात. पण प्रत्येक महिन्यात काहीतरी नाविन्यपूर्ण पण अफलातून असा त्या करत असतात.


                मागच्या महिन्यात रियाने सगळ्या सख्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला की,




रिया, "मैत्रिणींनो, या महिन्यात आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि नवीन तंत्रज्ञान विषयी असणाऱ्या अज्ञानावर मात करायची आहे, म्हणजे काय? तर कोणी ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ते शिकायचं, कुणी कॅब बुक करायला शिकायचं, कुणी घरातली कार चालवायला शिकायचं, तर कोणी आणखी काही…"



          हे नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या आणि वापरण्याच्या बाबतीत प्रथम कोणीही लवकर तयार होईना! पण नंतर मात्र सगळ्याच जणी तयार झाल्या आणि आजच्या भेटीमध्ये तर सगळ्याजणी आपापली प्रगती आणि अनुभव एकमेकींना सांगत होत्या.



 रिया, " सख्यांनो मागल्या महिन्यात ठरवल्याप्रमाणे आज आपण आपापल्या तंत्रज्ञान, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि स्मार्टफोन वापराबाबत काय शिकलो ते एकमेकींना सांगणार आहोत, तर सुरुवात करुया माझ्यापासूनच….



              मला स्वतःला बेकिंग, कुकिंग ची प्रचंड आवड आहे हे तुम्हाला माहितच आहे. मी बनवलेली नानकटाई, केक, कुकीज तर माझी ओळखच जणू! पण बेकिंग करण्याकरिता , मायक्रोव्हेव वापरण्याची मला प्रचंड भीती वाटायची. पण माझ्या असं लक्षात आलं कि, गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हन मध्ये पदार्थ व्हायला खूपच वेळ लागतो. म्हणून मग मी माझ्या सुनेकडून मायक्रोव्हेव चे सगळे फंक्शन समजून घेतले. सोबतच एक दोनदा मी स्वतः मायक्रोव्हेव ऑपरेट करून पाहिलं, त्यानंतर मला असं जाणवलं की, मायक्रोव्हेव वापरणं वाटतं तेवढं कठीण नाही. उलट मायक्रोव्हेव वापरल्याने गॅस, वीज आणि वेळ तीन ही गोष्टींची बचत होते. शिवाय पदार्थची चव पण मस्त खुसखुशीत बनते, अगदी बाजारात विकत मिळणाऱ्या पदार्था सारखीच.


रीना, "मैत्रिणींनो मी ना ! फक्त फूड प्रोसेसर चालवायला शिकले बाई ! थोडेसे संकोचून रीना बोलली. म्हणजे बघा हा, घरात काहीही नवीन वस्तू आणली ना ! तरी ती वापरण्याची मला हिम्मतच होत नाही. लहानपणी माझे बाबा मला सारखे ओरडायचे हे नको करू, ते नको करू, त्याला हात नको लावू, ते बिघडून ठेवशील. कदाचित म्हणूनच मला तर प्रथम फुडप्रोसेसर , एअर फ्रायर, वापरण्याची भीतीच वाटली पण माझ्या मुलीने मला छान शिकवलं! आता पीठ मळताना माझी बोटं वाताने आखडत नाहीत, भाज्या आणि सलाद पण मस्त वेगवेगळ्या आकारात कापता येतात मला. एअर फ्रायर मुळे कमी तेलात मी आता छान वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकते ."


रमा, " लॉकडाऊन मध्ये अहो घरीच होते त्यामुळे वीज बिल, नळाचं बिल, फोन बिल तेच ऑनलाईन भरायचे. इतर वेळी त्यांच्या फिरस्तीच्या नोकरी मुळे, त्यांना ही बिलं भरायला वेळच नसायचा. मग मीच सकाळची काम आटपून सगळी बिलं भरून टाकायची . आता ते परत कामावर रुजू झाले आहेत. पण मला मात्र बिलं भरायला लांब -लांब रांगामध्ये उभं राहायचा आता कंटाळा येतो. मग मीच ठरवलं आपणच ऑनलाइन पेमेंट करायला शिकायचं आणि माझ्या मुलाने मला अगदी छान समजावून सांगितलं, ऑनलाइन पेमेंट कसं करायचं ते. आता सगळी बिलं मी फोन वरूनच ऑनलाइन भरते आणि माझा मोबाईल पण घरच्या घरी रिचार्ज करते .


रिता, " मैत्रिणींनो माझं स्वच्छतेचं वेड तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना ! सकाळी कामवाली बाई येऊन झाडू-पोछा करून गेली की, मी दुपारी भिंतींची जाळी काढ, किचनच्या ट्रॉल्या पूस, फर्निचर वरची धूळ स्वच्छ कर, असं करत बसे . एकदा वैतागून अहो मला म्हणाले सुद्धा, \"अग ही धूळ साफ करण्यापेक्षा, बुद्धी वरची धूळ साफ कर आणि घर साफ ठेवण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर चा वापर कर\". मग मीही ठरवलं व्हॅक्युम क्लिनर वापरायचा. माझ्या लहान दिरांनी मला व्हॅक्युम क्लिनर कसा वापरायचा ते समजून सांगितलं ."


रेणू, " मैत्रिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे की, मी स्मार्टफोन, फक्त फोन करण्यासाठी आणि व्हाट्सअप पाहण्यासाठीच वापरते . मला तर साधी टू व्हीलर पण चालवता येत नाही , पण प्रत्येक वेळी तुम्ही आपल्या भिशी साठी वेगवेगळी ठिकाणं ठरवता. प्रत्येक वेळी कुणाला म्हणायचं \" कॅब बुक करून दे \" , म्हणून मीच आता स्वतः कॅब बुक करायला शिकले बरं का! आणि रोज सकाळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला पण जाते. घरची कार मला चालवता आली पाहिजे असं कुठेतरी मनात वाटत आहे . 



रेवती, " अग मागच्या वेळच्या भिशी ला काय झालं माहिती आहे का ? त्या कॅब वाल्याने मला अर्ध शहर फिरवलं आणि भलत्याच ठिकाणी पोहोचवलं. त्यामध्ये वेळ तर गेलाच, पण अंतर वाढल्याने पैसे पण जास्त द्यावे लागले. पण आता मी माझ्या लहान जावेच्या मदतीने गुगल मॅप वापरायला शिकते आहे ."



रिया, " मैत्रिणींनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची , आपल्याला सोयीचे म्हणून जे जे तंत्रज्ञान असेल ते वापरून पाहायचं, शिकून घ्यायचं. प्रत्येक

वेळी, प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या लोकांवर अवलंबून राहायच नाही. ते तंत्रज्ञान वापरायला घाबरायचं नाही. चुकलं तर चुकलं. पण शिकायचं. अगदी घरातल्या स्वयंपाक घरातील आधुनिक साधनांपासून ते हातातल्या स्मार्टफोन वरून बँकेचे व्यवहार करण्यापर्यंत. तंत्रज्ञान आपलं जगणं सोपं करतं. त्याकडे पाठ फिरवायची नाही. शिकायचं नव्या उत्साहात , कोणी काहीही म्हणो वापरायचं. जी वस्तू वापरल्याने आपले श्रम वाचणार असतील किंवा त्यातून आपल्याला आनंद मिळणार असेल तेव्हा ते वापरायला शिकायचं आणि बिनधास्त वापरायचं. आपलं आयुष्य आपण सोपं करून घ्यायचं कारण ते इतर कोणीच करणार नसतं ! "



          रिया असं बोलली आणि एका नवीन उत्साहात अजून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सावित्रीच्या लेकी पुन्हा हातात हात घेऊन निघाल्या.



*************************************************



© राखी भावसार भांडेकर


 टीम - नागपुर