Login

बाबा शिवाय.......... पोरकं झालेलं माहेर

Married Women's Feelings After Her Father Passed Away
पोरकं झालेलं माहेर


            त्या दोघीजणी ! काय बरं म्हणावं त्यांच्या नात्याला? त्या शेजारणी नव्हत्या, बाल मैत्रिणी पण नाही , वर्ग मैत्रिणी पण म्हणता येणार नाही. बरं त्या दोघेही गृहिणी , त्यामुळे नोकरी किंवा कामाच्या ठिकाणाची ओळख म्हणून मैत्री झाली असं कसं म्हणावं? खरंतर त्या दोघींच्या मुली एकाच शाळेत ,एकाच वर्गात शिकत असल्याने आणि त्यांची शाळा शहरापासून 20 किलोमीटर दूर असल्याकारणाने त्यांच्या मुली शाळेत एकाच व्हॅनमधून जायच्या, त्यामुळे पालक सभेच्यावेळी त्यांच्या मुलींनीच त्या दोघींची ओळख करून दिली. आणि मग या छोट्याशा मैत्रीला बाळसे धरायला वेळ लागला नाही.


         कसं असतं ना ! दोन व्यक्तींमध्ये किमान एक बाब जरी समान असली ना तरी मैत्रीचं रोपटं लगेच रुजतं तर अशा त्या दोन सख्या. त्यांची आर्थिक आणि काही बाबतीत कौटुंबिक परिस्थिती समान होती. दोघींच्याही लग्नाला उणेपुरे तीन-चार वर्ष झाली होती. त्यामुळे संसारात, एकत्र कुटुंबात त्या पाहिजे तशा रुळल्या नव्हत्या आणि मुरण्याचा तर प्रश्नच नव्हता. तर दर महिन्याला मुलींच्या पालक सभेच्या निमित्ताने त्यांचं भेटणं व्हायचं.



         त्या दोघीमधली \"रेखा\" त्याच शहरातली तर \"राधा\" एका निमशहरी गावातून आलेली त्यामुळे रेखाच्या सोबतीनं आणि ओळखीनं राधाला त्या शहरातलं बरंच काही म्हणजे ,पावसाळ्यात लागणारे साड्यांचे सेल, वेगवेगळी कपड्यांची प्रदर्शन, साड्यांवर मॅचिंग ऍक्सेसरीजची रास्त भावाची दुकानं आणि इतरही पुष्कळ काही माहिती पडलं.



       जशा जशा गाठीभेटी वाढायला लागल्या तसतसं , त्यांना एकमेकींच्या बोलण्यातून जाणवलं की , त्यांच्या भावना त्या एकमेकींजवळ व्यक्त करू शकतात. त्या दोघींचे बोलण्याचे विषय म्हणजे नवऱ्याचं टिपिकल भारतीय पुरुषा प्रमाणे वागणं, सासु - मोठ्या जावेचं किचन पॉलिटिक्स किंवा डॉमिनेट करणं आणि गेलाबाजार माहेरी आलेल्या नणंदेचं उगाच प्रत्येक लहानसहान गोष्टीत नाक खुपसणं आणि टोमणे मारण्याची एकही संधी न चुकवणं.




         खरं तर प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्याफार फरकाने असंच काहीसं चित्र असतं नाही का? नाहीतर \"पार्वती भाभी\" आणि \"तुलसी बहु\" च्या हजारो भागांच्या मालिका इतक्या गाजल्याही नसत्या आणि वर्षानुवर्षे चाललेल्या ही नसत्या. तर मुद्दा असा की रेखा आणि राधा यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग थोड्याफार फरकाने सारखेच होते. त्यामुळे त्यांच्यात छान मैत्री रंगली आणि लवकरच त्यांची गट्टीही जमली.



         उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ,बऱ्याच दिवसानंतर एकदा त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच \"रेखा\" ची आई देवाघरी गेली होती, तर \"राधाच्या\" वडिलांचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं . त्या दोघीही एकमेकींचे सांत्वन करत होत्या आणि आपल्या माहेरा बाबत सांगत होत्या.

रेखा- "राधा, आई गेली की माहेरपण संपत गं."

राधा - "खरं आहे ग, पण वडिलां नंतर ते पोरगं होतं."

रेखा - "यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी गेली.तेव्हा तो फरक मला लगेच जाणवला."

राधा- "का ग? काय झालं?"

रेखा - "आधी माहेरी गेली की सगळ्या घराला आनंदाचं नुसतं उधाण यायचं. आई दारातच दोन्ही नातवंडांवर दोन्ही हात फिरून तिची बोटं कानशिला जवळ दुमडायची आणि नातवंडाची नजर काढायची. वहिनीला माझ्या डोक्यावरून भाकरतुकडा आणि पाण्याचा तांब्या ओवाळायला सांगून , लिंबलोण करायला लावायची. आता मात्र तसं काहीच नाही. माहेरी गेली तर लहान भावजय आपल्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेली होती , तर वहिनी स्वयंपाक घरातून लवकर बाहेर ही आली नाही‌, आणि आल्यावर चेहऱ्यावर केवळ कोरडे हसू होतं तिच्या.
         वहिनी तर आता अगदी तेवढ्यास तेवढेच बोलते आणि आधी मैत्रिणीसारखी वाटणारी लहान भावजय माझ्याशी अंतर राखून वागते. आईची रिकामी खोली बघून, परत एकदा डोळे भरून आले. इतक्या दिवसात ती खोली कोणी उघडलीच नव्हती. आईची जपाची माळ, टेबलावर ठेवलेली ज्ञानेश्वरी आणि त्याच्या बाजूलाच असलेला श्रीकृष्णाचा फोटो,स्पर्श करताना वाटलं,आईलाच परत भेटते आहे आणि ती मला कुरवाळते आहे.
             
आईचं कपाट आवरताना , त्यात किती वस्तू आणि आठवणींचा खजिना मला भेटला ते तर मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या मुलासाठी तिने हाताने बनवलेली कुंची, भाऊच्या आरवसाठी स्वतः बनवलेला स्वेटर आणि कान टोपी आणि लहान भावजयीच्या पहिल्या संक्रांत सणाचे हलव्याचे दागिने , किती व्यवस्थित सांभाळून ठेवलं होतं तिनं सारं! वस्तुंसारखीच माणसंही जपली आई नं आयुष्यभर.

कपाटातल्या काही ठेवणीतल्या साड्या मोठ्या वहिणीला दिल्या तर ती म्हणाली,\" या जुन्या फॅशनच्या साड्या मला नकोत.\" मी म्हंटल, \"वहिनी ही डाळिंबी पैठणी तुला आवडायची ना गं!\" हो आवडायची तुमच्या भावाला कितीदा घेऊन मागितली पण नाही दिली. आईंना बरोबर घेऊन दिली त्यांच्या पासष्टी ला. केवढं ते कौतुक आईचं, नकोच मला ती आता! तुम्हीच ठेवा!\"- वहिनी.
          

               माझा मोठा भाऊ खासगी कंपनीत नोकरी करणारा. त्याच्या पगार तो किती ? सगळं घर सांभाळावं लागतं त्याला . आईचं सगळं शेवटपर्यंत त्यानंच केलं .संजू तर तिकडे परदेशात आहे ना! संजू माझा लहान भाऊ नीता चा नवरा. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं वहिनी आधी कधी अशी कुरकुरली नव्हती, पण आता जाऊदे…... लहान भावजय तर स्पष्टच म्हणाली \"ह्या जुन्या साड्या काय देताय ? मला आईंची बोरमाळ हवी\". आधी स्वतः च्या दागिन्यांचा केवढा तोरा मिरवायची. तेव्हा मात्र माझा संयम सुटला, मी पण मग स्पष्टच बोलली \"नीता बोरमाळ , पाटल्या आणि चपलाहाराचा एक पदर मी वहिनीला देणार आहे. तुला पाहिजे असेल तर तू आईची अंगठी ठेव. तन्मणी आणि कुड्या मला हव्यात कारण मला मोत्याचे दागिने आवडतात\", त्यावर ती नाक उडवून तावातावानं निघून गेली.


             सासरी परतताना वहिनी ओटी भरताना म्हणाली, \"वन्स आता पापड, लोणची, कुरडया , आता माझ्याच्याने होत नाहीत. त्यामुळे यावेळी दिल्या नाहीत, शिवाय मिनूचं दहावीचं वर्ष आहे. निताचा स्वभाव तुम्ही ओळखूनच आहात, अजून जास्त काय बोलू\"?

          
            राधा मला सांग आपण माहेरी कुरडया, पापड , लोणची किंवा भारी भारी साड्या किंवा मोठ्याल्या आहेरां साठी जातो का ग? माहेर असतो एक विसावा , आपली हक्काची प्रेमळ माणसं असतात तिथे. रोजच्या रहाटगाडग्यातून दोन चार दिवसांची विश्रांती आणि प्रेम , जिव्हाळ्या, सोबतच आपुलकीची ऊब मिळते म्हणूनच माहेर आपल्याला इतकं आवडतं ना ग\"?



राधा - हो ग ते तर आहेच . पण केवळ आई नसली म्हणजेच माहेर दुरावत असं नाही तर ,वडील गेल्यावर तर ते पोरकं होतं. यावेळी जेव्हा मी माहेरी गेली तेव्हा हॉल मधला भिंतीवरचा बाबांचा फोटो बघून मनात कालवाकालव झाली. आईचं कुंकवा शिवायचं कपाळं, मोकळा गळा, अंगावरची फिकट साडी बघून असं वाटलं जणू बाबा गेल्यानंतर तिच्या आयुष्यातले रंगही फिकट झाले आहेत.


           आधी माहेरी गेली की बाबा माझ्या मुलांचं किती कौतुक करायचे ! मी घरी पोहोचेपर्यंत व्हरांड्यात अस्वस्थ फेर्‍या मारायचे ,किंवा आराम खुर्चीवर तोंडासमोर वर्तमानपत्र धरून त्या आडून दर पाच मिनिटाला अंगणातल्या फाटकाकडे बघायचे. आईला विचारायचे \"आला का ग काही फोन? कुठपर्यंत पोहोचली ती? रेल्वे लेट तर झाली नाही ना ? शेवटी आई म्हणायची, \"आता पहिल्यांदा येत आहे का ती ? एवढ्या वर्षात सवय झाली तिला! अॅटो नसेल मिळाला , थोडं स्वस्थ बसा !
ना ! जरा जरा संयम ठेवा! , येइलच एवढ्यात\".


       दुसऱ्या दिवशी दुपारी गप्पा मारताना प्रत्येक वेळी आई मला हे सारं सांगायची पण , यावेळी मात्र ती स्वतः खूप शांत वाटली. कुठे तरी हरवल्यासारखी. दुपारी अंगणातल्या झाडांना बघून परत किती आठवणी धावत आल्या मला भेटायला . ताईला फुलं खूप आवडायची म्हणून मग जाई -जुई, सायलीचा वेल, अबोलीची झाडं, देवाला फूल हवीत म्हणून तगर , झेंडू, कन्हेर ,जास्वंद ,पांढरा -निळा गोकर्ण आणि आईला आवडतो म्हणून पारिजात आणि मधुमालती. माझ्यासाठीही मग मोगरा, गुलाब , किती झाडे लावली होती बाबांनी!\".


         ताईचं लग्न झाल्यावर , नातवंड आजोळी येतील तर अंगणात सावली हवी म्हणून , मग आंबा , पेरू , चिकू आणि अजून कितीतरी झाड लावली बाबांनी अंगणात. आंब्याची फळे तर मुलं अजूनही उन्हाळ्यात चाखतात . झाडावर चढतात, त्याच्या सावलीत खेळ मांडतात आणि दिवसभर मज्जा करतात.



  ‌ बाबांचं पेन्शन आईच्या नावे करायचं म्हणून बाबांच्या ऑफिसमध्ये गेली होती. तेव्हा तिथले बाबांचे सहकारी सांगत होते ,बाबा फार शिस्तप्रिय आणि वक्तशीर होते, अडल्यानडल्याला मदत करायचे पण ,कामचुकारपणा त्यांना कधीच आवडला नाही. प्रत्येक वेळी बाबांच्या आठवणी अशा चारीकडून धावत येत होत्या आणि माझे डोळे नकळत भरुन येत होते.

           बाबांचं लिखाणाचं टेबल आवरताना मन अधिकच अलवार झालं. त्यांचा लिहिण्याचा पेन , कुठली कुठली बिलं भरली त्याची नोंद वही, त्यांची दैनंदिनी आणि चष्मा या सगळ्या वस्तू आवरता आवरता एक क्षण वाटलं की , \"व्यक्ती निघून गेली की मग तिच्या सामानाची ही अडगळ होते नाही का?\".

                              पण सगळ्यात जास्त केविलवाणी अवस्था सासरी परततांना झाली, मी निघाली म्हणून आई माझी ओटी भरू शकत नव्हती . ती स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवत होती. तिची असाह्य अगतिकता बघून, मीच देवाला हळद-कुंकू वाहिलं आणि तिच्या पाया पडले तेव्हा आम्हा दोघींनाही हुंदका आवरता आला नाही.



             सासर- माहेर हे प्रत्येकच स्त्रीच्या आयुष्यातले दोन भाग असतात. कधी आई गेल्यानंतर माहेर दुरावत, तर कधी बाप गेल्यानं ते पोरकं होतं पण शेवटी माहेर ते माहेरच असतं.