Login

द पेमॉन (भाग ३)

सैतान आणि मानव यांची प्रेमकथा
खाली दरीच्या तळाशी, घनदाट जंगलात आणि धुक्याने व्यापलेल्या नाळेजवळ, एलिझाबेथ एका भव्य युनिकॉर्न समोर उभी होती. हा युनिकॉर्न अत्यंत पवित्र आणि रहस्यमय प्राणी होता. 

सफेद रंगाचा, नाकावर चमकदार सफेद शिंग आणि मोठे पंख असलेला उडणारा घोडा. जितका शांत आणि दिव्य दिसायचा, तितकाच तो हिंसक आणि शक्तिशाली होता. अनोळखी व्यक्तीला पाहताच तो प्रचंड वेगाने हल्ला करायचा, आणि त्याच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नव्हता.

युनिकॉर्नच्या रक्तात अमरत्व आणि तरुण होण्याचे गुणधर्म होते, त्यामुळे अनेक लोभी जादूगार आणि विचेस त्याची शिकार करायचे. त्याच्यावर कोणतीही जादू काम करत नव्हती. जोपर्यंत तो स्वतः संमती देत नाही, तोवर कोणीही त्याला वश करू शकत नव्हता.

हा युनिकॉर्न जखमी होता. त्याच्या पंखांना गंभीर मार लागला होता, त्यामुळे तो खाली कोसळला आणि शरीरावर अनेक खोल जखमा झाल्या होत्या. रक्ताने माखलेला तो वेदनेने गुरगुरत होता, पण तरीही त्याच्या डोळ्यात प्रचंड क्रोध चमकत होता. जंगलातील पक्षी आणि प्राणी दूरून हे दृश्य पाहून शांत झाले होते, जणू त्यांनाही या पवित्र प्राण्याच्या वेदनेची जाणीव होती.

हवेत तरंगत असलेल्या एनाबेला आणि एलेना यांनी हे दृश्य पाहिले आणि थिजल्या. त्यांच्या हृदयाची धडधड वाढली – त्यांना माहित होते की जखमी **युनिकॉर्न** सर्वात धोकादायक असतो.

"एलिझाबेथ... परत ये, त्याच्याजवळ जाऊ नकोस. तो भयंकर आहे. जखमी युनिकॉर्न समोर उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे!" एलेना घाबरून ओरडली. तिचा आवाज दरीत घुमला.

पण एलिझाबेथने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. तिच्या हृदयात फक्त करुणा होती. तिला जणू युनिकॉर्नच्या वेदना जाणवत होत्या, त्याच्या जखमा दिसत होत्या. तिने हळूहळू पुढे सरकताना आपल्या मनात प्रार्थना केली निसर्गाच्या शक्तींना, मदर ट्रीला.

"हे पवित्र युनिकॉर्न, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी शत्रू नाही, मित्र आहे. तुझी मदत करायला आले आहे," एलिझाबेथ हळूहळू पुढे सरकत म्हणाली. तिने हात पुढे करून त्याच्याजवळ पोहोचली आणि हळूवार स्पर्श केला.

युनिकॉर्नने प्रथम गुरगुरले, त्याचे शिंग वर उचलले. जणू हल्ला करायला तयार. पण एलिझाबेथच्या स्पर्शातली शुद्ध माया त्याला जाणवली. त्याच्या डोळ्यातील क्रोध हळूहळू विरला, आणि त्याने तिला मित्र म्हणून स्वीकारले. त्याने तिचा हात जीभेने चाटला आणि शिंग हलकेच खाली घातले. एलिझाबेथने त्याच्या मानेवर थाप मारली, आणि युनिकॉर्नने शांतपणे डोके खाली घातले.

"मला तुझ्या जखमा बऱ्या करण्याची परवानगी दे," तिने विनंती केली आणि जादूची छडी पुढे धरली.

युनिकॉर्नने मान हलवून संमती दिली. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता चमकली.

"हैस्सरा मोटास्स टेरेमिया एनवेताssss..."

 एलिझाबेथने प्राचीन मंत्र म्हणताच तिच्या छडीतून तेजस्वी निळा प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश युनिकॉर्नला पूर्णपणे व्यापून टाकू लागला. त्याच्या शरीरात तरतरी आली, तो आनंदाने खिंकाळला आणि दोनदा मान हलवून आभार मानले. पण जखमा अजून खोल होत्या पण पूर्ण बऱ्या झाल्या नव्हत्या. प्रकाश विरला, आणि युनिकॉर्न पुन्हा वेदनेने खिंकाळला.

एनाबेला आणि एलेना हवेतून खाली उतरल्या, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आदर.

"ओह, जखमा खूप खोल आहेत. लवकर बऱ्या होणार नाहीत," एनाबेलाने निरीक्षण केले, तिने युनिकॉर्नच्या पंखाकडे पाहिले ते फाटलेले आणि रक्तबंबाळ झाले होते.

"याला इथे लपवून ठेवू आणि औषधी आणू. मी सर्व पोशन बनवते दुर्मीळ वनस्पतीं पासून," एलेनाने सुचवले, तिच्या आवाजात उत्साह होता.

"नाही! कोणाला सुगावा लागला तर ते याची शिकार करतील. जखमी युनिकॉर्न त्यांच्यासाठी सोन्याची खाण आहे. त्याचे रक्त अमरत्वाचं देते आणि शिंग जादुई शक्ती देते. त्यामुळे त्याला एकटे सोडणे धोक्याचे आहे." एलिझाबेथने नकार दिला, तिच्या डोळ्यात चिंता दिसत होती.

"मग काय करायचं?" एनाबेलाने विचारले, तिच्या डोळ्यात कुतूहल आणि भीती मिसळली.

एलिझाबेथने ठामपणे सांगितले, "आपण याला टेकडीवर न्यायचं आणि दुखनिवारी तलावात सोडायचं. त्या जादूई पाण्यात स्नान केलं की त्याच्या शारीरिक आणि आत्मिक जखमा दोन्ही लगेच बऱ्या होईल."

"वेडी झालीस का? ही दरी किती खोल आहे! हा अवजड प्राणी बाहेर काढणं किती धोकादायक आहे! आपण जखमी होऊ किंवा मारले जाऊ! आणि वर चढताना तो पुन्हा हिंसक झाला तर?" एलेनाने घाबरून म्हटले, तिच्या हातातून झाडू थरथरला.

"कोणी जादूगाराने याच्यावर हल्ला केला आहे. काळ्या जादूने. ते शोधत आले तर आणि आपल्याला पाहिलं तर. तेराईच्या नियमांनुसार बाहेरील प्राण्याला मदत करणं गुन्हा आहे. शिक्षा होईल, कदाचित निर्वासन!" एनाबेलाने समजावले, तिचा आवाज गंभीर.

"मानवता ही काहीतरी असते. परमेश्वर पाहतोय. आपण मदत केली तर तो आपली मदत करेल. नाहीतर लोभी जादूगार याचं रक्त आणि शिंग घेऊन याची कत्तल करतील. तुम्हाला भीती वाटते तर जा, मी एकटी करेन." एलिझाबेथने ठणकावून सांगितले.

"काही गरज नाही, आता जे होईल ते पाहू. काढू याला बाहेर." एनाबेला आणि एलेना एकदम ओरडल्या. त्यांची मैत्री अशीच होती. धोक्यात एकमेकांना सोडणं अशक्य होत  त्यांना. त्या तीन मैत्रिणींनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसल्या भीती असली तरी प्रेम आणि मैत्रीने त्यावर मात केली होती.

एनाबेला आणि एलेनाने जाड्या, जादूई वेली गोळा करून युनिकॉर्नचे पुढचे पाय बांधले आणि आपल्या झाडूंना जोडले. ते हवेत उडू लागले, युनिकॉर्नला हळूहळू वर ओढू लागले. त्याचे शरीर हवेत लटकत वर उचलले जात होते.

"इलायमोस्सराssss" एलिझाबेथने शरीर हलकं करणारा मंत्र टाकला, 

ज्यामुळे युनिकॉर्नला उचलणं सोपं झालं. पण युनिकॉर्नचे पाय जखमी होते, तो स्वतः चढू शकत नव्हता. एलिझाबेथ मागून दोन्ही हातांनी ढकलत होती, खाली कोसळणारे दगड आणि माती तिच्या अंगावर पडत होती.

"तू करू शकतोस हिम्मत धर, आम्ही तुझ्यासोबत आहोत." ती प्रोत्साहित करत होती, तिचा आवाज थरथरत असला तरी त्याला धीर देत होती.

युनिकॉर्न धडपडत होता, पण तोल जात होता. एलिझाबेथ त्याला आधार देत चढत होती. त्याच्या पायांचा धक्का, खाली कोसळणारे दगड तिला लागत होते. तिच्या हातून, पायून रक्त येऊ लागलं, कपडे फाटले, पण ती थांबली नाही. वाऱ्याचा झोत, थंडगार धुके, आणि खालील अंधाराची भीती  सगळं सहन करत त्या तीन मैत्रिणी आणि युनिकॉर्न वर चढत होते. दोन-अडीच तासांच्या अथक, घामाने आणि रक्ताने माखलेल्या प्रयत्नाने त्यांनी युनिकॉर्नला दरीतून बाहेर काढलं. त्या सर्व थकल्या होत्या, श्वास फुलला होता, पण यश मिळालं होतं.

आता ते दुखनिवारी तलावाकडे निघाले. हा तलाव एका डोंगराच्या पायथ्याशी होता, दुर्मीळ जादूई औषधी वनस्पतींचा गालिचा पसरलेला. त्यातून एक गरम झरा तलावात पडत होता. तलावाचं पाणी नेहमी निळ्या प्रकाशाने चमकत गरम असायचं. कोणतीही जखम त्यात बुडाल्याने चुटकीसरशी बरी होत असे. पण तलावावर प्राचीन जादू होती. फक्त तेराईच्या रहिवाशांना आत प्रवेश मिळायचा. बाहेरील प्राणी आत आला की तलाव त्याला खेचून घ्यायचा, आणि तो कायमचा गायब होत असे.

युनिकॉर्नला तलावाच्या काठावर आणताच तो थरथरला. जादू त्याला ओढू लागली. भीतीने की आकर्षणाने? तेच  कळत नव्हतं. एलिझाबेथने त्याच्या मानेवर हात ठेवला.

 "घाबरू नको. हे पाणी तुझी मदत करेल. मी तुझ्यासोबत आहे."

एलिझाबेथ युनिकॉर्नला धरून त्याला तलावात घेऊन गेली. हळूहळू दोघेही पूर्ण पाण्यात डुंबले. पाणी उसळलं, निळा प्रकाश प्रचंड उजळला, हवेचे बुडबुडे वर येऊ लागले. एनाबेला आणि एलेना काठावर थांबल्या, त्यांच्या हृदयात शंका होती. जर तलावाने युनिकॉर्नला बाहेरील प्राणी मानलं तर? एलिझाबेथ सकट तो आत खेचला जाईल!

कितीतरी वेळ फक्त बुडबुडे येत होते. घाबरून दोघींनी हाक मारायला सुरुवात केली: "एलिझाबेथss बाहेर येss"

अचानक पाण्यात प्रचंड हालचाल झाली. निळा प्रकाश आकाशात उजळला, आणि पंख फडकवत युनिकॉर्न तलावावरून उडत बाहेर आला. त्याच्यावर एलिझाबेथ स्वार झाली होती. दोघांच्याही जखमा पूर्ण बऱ्या झाल्या होत्या, शरीरात नवसंजीवनी आली होती. युनिकॉर्नचे पंख मजबूत झाले, शिंग चमकले, आणि तो आनंदाने खिंकाळला.

युनिकॉर्नने एलिझाबेथकडे पाहिलं, शिंगाने हळूवार स्पर्श करून आभार मानले. मग तो आकाशात उडाला, तेराईच्या मदर ट्रीकडे तलावाने आणि तेराईने त्याला स्वीकारले होते. तो आता या जादूई जगाचा भाग झाला होता.

त्या तिघी मैत्रिणी थकलेल्या होत्या, जखमी होत्या. पण तलावाच्या काठावरील झऱ्याने त्यांच्या जखमा भरून आल्या होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर अपार समाधान आणि आनंद होता. आपण काही चांगले काम केले याचे समाधान होते.


(प्लीज कथेला कमेंट आणि स्टार द्या.)


0

🎭 Series Post

View all