एलिझाबेथने धीर एकवटला आणि जादुई वेस ओलांडली. तिच्या पायाखाली मऊ, उबदार वाळूची अनुभूती आली. जणू काही पृथ्वीने तिच्या आगमनाचे स्वागत केले होते. ती किंचितशी थबकली, श्वास रोखून धरला आणि मग हळूहळू पुढे सरकली. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. हे खरे आहे का? की ती स्वप्नात आहे? कारण मानवी जगात ती पहिल्यांदाच आली होती.
समोर अथांग समुद्र पसरला होता. लाटा खळखळत होत्या, एकमेकांना मिठी मारत, फेसाळून परत माघारी फिरत होत्या. सूर्य मावळायला लागला होता; आकाशात नारिंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या पट्ट्या पसरल्या होत्या. जणू एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्याने रंग फासले असावेत असे वाटत होते.
हवा आल्हाददायक आणि खारट होती, एलिझाबेथचे लांब, काळेभोर केस उडवत होती. एक बट कपाळावर येऊन रेंगाळली, तिने हाताने ती मागे सारली आणि आजूबाजूला पाहू लागली.
तिने कधीच समुद्र पाहिला नव्हता फक्त गावकऱ्यांच्या गोष्टींमध्ये ऐकले होते. त्या गोष्टींमध्ये समुद्राला ‘अथांग जलराशी’ म्हटले जायचे, जिथे पाणी कधी संपत नाही आणि लाटा आकाशाला स्पर्श करतात. प्रत्यक्ष पाहताना तिच्या छातीत काहीतरी फुलले एक अनोखी आनंदाची लाट मनमस्तीक्षात पसरली.
तेराई गावात फक्त घनदाट जंगल आणि उंच डोंगर होते. तिथे पाणी म्हणजे फक्त झरे किंवा छोटे तलाव, जे शांत आणि स्थिर असायचे. हे दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. दूरदूरपर्यंत सोनेरी वाळूचा किनारा पसरला होता, जणू एखाद्या रेशमी साडीचा पदर. एका बाजूला माडाची झाडे हळुवार वाऱ्यात डोलत होती, त्यांच्या लांब पानांचा खरखर आवाज येत होता, जो लाटांच्या खळखळाशी मिसळून एक संगीतमय लय तयार करत होता. समुद्रात छोट्या छोट्या मासेमारी होड्या तरंगत होत्या, त्यावरचे पांढरे शिड पवनाने फुगलेले दिसत होते, जणू त्या आकाशात उडायला तयार असाव्यात. दूर क्षितिजावर काही मोठ्या जहाजांचे सावल्या दिसत होत्या, त्यांचे धुराचे रेषा आकाशात विरून जात होत्या.
सूर्याचा लाल गोळा हळूहळू क्षितिजावर खाली सरकत होता, जणू समुद्र त्याला गिळंकृत करायला तयार होता. किरणांच्या खेळात पाण्याची पृष्ठभाग चमकत होती. कधी सोनेरी, कधी निळी, कधी लाल. असे जाणवत होते.
आकाशातील पक्षी समुद्री घारांसारखे मोठ्या वर्तुळात फिरत होते, त्यांचा चिवचवाट हवेत घुमत होता. एलिझाबेथ हरखून गेली. तिच्या ओठांवर हसू उमलले. तिने आजूबाजूला पाहिले कोणीही नव्हते. फक्त ती आणि हे अनंत नैसर्गिक सौंदर्य ती अनुभवत होती. ती हळूहळू पुढे चालू लागली, वाळूवर तिच्या पायांचे ठसे उमटत होते, जे लगेच लाटांनी पुसले जायचे.
पाण्यात पर्यंत पोहोचली तेव्हा एक लाट तिच्या पायांना स्पर्श करून मागे सरकली. थंडगार, खेळकर अनुभूती तिला जाणवली. तिने खाली वाकून हात पाण्यात बुडवला. पाणी स्वच्छ आणि निळे होते, तळाशी वाळू आणि छोटे खडे दिसत होते. काही ठिकाणी रंगीत खडे चमकत होते, जणू समुद्राने आपले रत्न तिला दाखवले असावेत. तिने हातातून पाणी वाहू दिले, ते तिच्या बोटांमधून रेंगाळत खाली पडले. तिने डोळे मिटले आणि क्षणभर फक्त लाटांचा आवाज, पक्ष्यांचा ओरडा आणि वाऱ्याचा स्पर्श अनुभवला. हवेत खारटपणा आणि माशांच्या वासाचा मिश्रण होता.
एलिझाबेथला समजत नव्हते, हे स्वप्न आहे का? की जादुई वेसने तिला खऱ्या स्वर्गात आणले आहे?
तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला अधिक बारकाईने पाहू लागली. किनाऱ्यावर काही शंक आणि गोळे पडलेले दिसले. तिला वाटू लागले समुद्राने भेट म्हणून आणले आहेत. तिने एक शंख उचलला, तो गुळगुळीत आणि थंड होता. तिने तो कानाजवळ धरला आतून लाटांचा आवाज येत होता, जणू समुद्र तिच्या कानात कुजबुजत होता.
तिच्या मनात तेराईच्या जंगलाची आठवण आली. तिथे झाडांच्या पानांतून वाऱ्याचा आवाज यायचा, पण हा वेगळा होता, अधिक मुक्त आणि अनंत.
अचानक मागून आवाज आला, "है... शुक शुक..."
तो आवाज इतका जवळून आला की एलिझाबेथ दचकून मागे वळाली. तिच्या मनात लगेच भीतीची लाट उसळली.
'कोण आहे ? जादुई वेसमागे कोणी आले का?'
पायाखालची ओली वाळू निसरडी होती, तोल गेला आणि ती पडायला लागली. पाण्यात पाय अडकले, शरीराचा तोल बिघडला. पण लगेच मजबूत हातांनी कोणीतरी तिला घट्ट पकडले. तिचे शरीर अधांतरी लटकले होते, तिच्या छातीचा धडधड त्याच्या छातीशी भिडला होता. तिचा श्वास थांबला. तो तरुण ओणवा होऊन तिला पाहत होता. त्याचे तपकिरी केस वाऱ्यात उडत होते, चॉकलेटी डोळे चमकत होते, सावळे रूप आणि बलदंड शरीर . जणू समुद्रातूनच बाहेर पडला असावा. त्याच्या अंगावर साधा पांढरा शर्ट आणि निळी पँट होती, जी ओली झाली होती, कदाचित तोही पाण्यात होता. गळ्यात काळ्या दोऱ्यात एक छोटे क्रॉस लटकत होते, ते सूर्यकिरणात चमकले.
दोघांची नजरानजर झाली जणुकाही वेळ थांबली होती. एलिझाबेथला त्याच्या डोळ्यात समुद्राची खोली दिसली. शांत पण रहस्यमय, आणि त्याला तिच्या निळ्या डोळ्यात जंगलाची रहस्यमयता गहन आणि अबाधित. काही क्षण दोघेही हरवले. तिच्या हृदयाचे ठोके जलद झाले, गाल गरम झाले. तिने कधीच एखाद्या तरुणाला इतक्या जवळून पाहिले नव्हते. त्याच्या स्पर्शात एक उब होती, जी तिच्या थंडगार शरीराला आल्हाद देत होती. तिच्या मनात अनोखी संवेदना जागी झाल्या . भीती, कुतूहल आणि काहीतरी गोड, जे तिला समजत नव्हते.
"हॅलो, आय एम मिखाईल," त्याने हसत म्हटले.
त्याचा आवाज मधुर आणि खोल होता, जणू लाटांसारखा शांत पण शक्तिशाली. त्याच्या ओठांवर हसू होते, जे त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले होते.
त्याच्या आवाजाने एलिझाबेथ भानावर आली. ती लगेच सावरली, त्याच्या हातातून स्वतःला सोडवले आणि काही पावले मागे सरकली. पहिल्यांदाच एखाद्या तरुणाच्या इतक्या जवळ ती आली होती. तिच्या मनात अनोखी, गोड भावना जागली. जी तिला समजली नाही. पण लगेच गावातील मोठ्यांच्या शिकवलेल्या धडे आठवले.
‘मनुष्य धोकादायक असतात. त्यांच्यापासून दूर राहा. ते फसवतात, हेरतात. त्यांच्या गोड बोलण्यात फसू नको.’
तिच्या मनात भीतीचे सावट पडले. हे मनुष्य आहे ज्यांच्याबद्दल गावात इतक्या गोष्टी सांगितल्या जायच्या. तो हसतोय, पण त्यामागे काय लपले आहे? तिने मागे वळून पळायला सुरुवात केली, वाळू उडवत, जादुई वेसकडे धावली. तिचे हृदय धडधडत होते.
"थांब! प्लीज थांब! कोण आहेस तू? नाव तरी सांग!"
मिखाईल तिच्या मागे धावला, त्याचा आवाज चिंतेने भरला होता. तो पुढे येऊ पाहत होता, पण वाळूवर पाय घसरण्याची भीती त्यालाही होती.
पण एलिझाबेथ थांबली नाही. तिने जादुई दरवाज्यातून उडी मारली आणि परत आपल्या जंगलात आली. तिचा श्वास धापा टाकत होता, हृदय धडधडत होते. ती झाडाला टेकून बसली, डोळे मिटले. तिच्या मनात समुद्राचे दृश्य, लाटांचा आवाज आणि तो तरुण फिरत होता.
तिला फक्त ते चॉकलेटी डोळे, ते हसरे ओठ आणि ते शब्द आठवत होते.
"हॅलो, आय एम मिखाईल."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा