पेमॉन (भाग ९)
इथे तराई गावात... एलिझाबेथच्या घरी.
रात्रभर एलिझाबेथच्या डोळ्यांत झोप नव्हती. ती फक्त कुस वळत होती. उलटसुलट होत होती, उशी घट्ट धरून स्वतःला आलिंगन देत होती. पण मन शांत होईना. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त मिखाईलचाच चेहरा येत होता.
मिखाईलचे ते बोलणे, त्याची नजर, त्याचा स्पर्श जेव्हा जेव्हा त्याने तिला पडताना झेलले तेव्हा झालेला हलका रोमांच. सगळं सगळं तिच्या मनात वारंवार फिरत होतं. कधी ती हसत होती, कधी लाजत होती, कधी घाबरत होती.
मदर मीरिंडाची भीती एकीकडे, आणि दुसरीकडे मिखाईलची आठवण. दोन वेगवेगळ्या जगांत अडकलेली ती एलिझाबेथ रात्रभर जागी राहिली. कधी सकाळ होते आणि मी त्याला पुन्हा भेटेन असं तिला वाटत होतं.
तिच्या रात्रभरच्या जागरणाची साक्ष म्हणून एलिझाबेथच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसत होती , पण तिच्या मनात आता एकच ठाम इच्छा होती. आज तिला स्वतःला सर्वांत सुंदर वाटायचं होतं.
एलिझाबेथने हळूच हात उचलला आणि बेडखाली लपवलेली छोटी, काळ्या मखमली पेटी बाहेर आली. तो तिची जादुई मेकअप बॉक्स होता. बॉक्स उघडताच आतून हलका, चांदीसारखा प्रकाश बाहेर पडला. आतमध्ये छोट्या छोट्या काचेच्या भांडी, रंगांच्या फुलपाखरांसारख्या पावडर, चमकणाऱ्या पाण्याच्या थेंबांसारखे लिपस्टिक, आणि एक लहानशी, चमकणारी जादुई कांडी जी तिच्या हातात येऊन बसली.
तिने कांडी हवेत हलकेच फिरवली. कांडीने एक गोलाकार फिरका मारला आणि स्वतःच हवेत तरंगू लागली. मग ती एलिझाबेथच्या चेहऱ्याभोवती नाचू लागली, जणू एखादी छोटी परी तिच्या सौंदर्याची सेवा करत होती.
पहिल्यांदा कांडीने तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू पुसली.
जणू कोणीतरी मऊ, थंड बोटींनी तिच्या डोळ्यांखालील थकवा दूर केला. मग ती कांडी हवेतून हलका गुलाबी लिली रंगाचा कन्सिलर घेऊन आली आणि हवेतूनच तो तिच्या त्वचेवर रेखाटू लागली. प्रत्येक स्पर्शासोबत तिची त्वचा अधिक चमकू लागली, जणू चंद्रकोर तिच्या चेहऱ्यावर उतरली होती.
जणू कोणीतरी मऊ, थंड बोटींनी तिच्या डोळ्यांखालील थकवा दूर केला. मग ती कांडी हवेतून हलका गुलाबी लिली रंगाचा कन्सिलर घेऊन आली आणि हवेतूनच तो तिच्या त्वचेवर रेखाटू लागली. प्रत्येक स्पर्शासोबत तिची त्वचा अधिक चमकू लागली, जणू चंद्रकोर तिच्या चेहऱ्यावर उतरली होती.
मग कांडीने गालांवर हलका, नाजूक ब्लश उजळायला सुरुवात केली.
तो रंग हळूहळू पसरत गेला. जणू सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणांनी तिच्या गालांना चुंबन घेतलं होतं. ब्लश इतका नैसर्गिक आणि जादुई होता की तो तिच्या भावनांनुसार बदलत होता. जेव्हा ती मिखाईलचं नाव मनात घेत होती, तेव्हा तो रंग थोडा गडद, थोडा उष्ण होत होता.
तो रंग हळूहळू पसरत गेला. जणू सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणांनी तिच्या गालांना चुंबन घेतलं होतं. ब्लश इतका नैसर्गिक आणि जादुई होता की तो तिच्या भावनांनुसार बदलत होता. जेव्हा ती मिखाईलचं नाव मनात घेत होती, तेव्हा तो रंग थोडा गडद, थोडा उष्ण होत होता.
डोळ्यांभोवती कांडीने जादुई काजळ रेखाटलं. प्रत्येक रेषा तिच्या डोळ्यांना खोल, रहस्यमय आणि आकर्षक बनवत होती. जेव्हा ती डोळे मिटत होती, तेव्हा पापण्यांवर छोट्या छोट्या ताऱ्यांसारख्या चमक दिसत होत्या. तारे एकत्र नाचत होते.कांडीने हवेतून फिकट गुलाबी रंगाचा थर लावला, पण त्यात एक विशेष जादू होती जेव्हा ती हसत होती तेव्हा त्या ओठांवरून हलका, चमकणारा प्रकाश बाहेर पडत होता. जणू तिच्या हास्यात छोट्या छोट्या जादुई फुलपाखरं उडत होती.
मेकअप पूर्ण झाल्यावर एलिझाबेथने कांडीला हातात घेतलं आणि तिच्या डोक्याभोवती तीन वेळा फिरवलं.
“ल्यूमिनारा अॅट्रॅक्टिया." सौंदर्य आणि प्रेम यांचा मेळ घालणारा तिने हळू आवाजात मंत्र म्हटला.
क्षणार्धात तिच्या सभोवताली एक सूक्ष्म, चमकणारा प्रकाशाचा गोळा तयार झाला. तो प्रकाश इतका नाजूक होता की तो फक्त जवळच्या व्यक्तीला दिसत होता – आणि त्यातून एक हलका, गोड सुगंध येत होता. जसा जंगलातील फुलं आणि ताज्या सकाळच्या दवाचा मिश्रित सुगंध.
ती प्रकाशाची परत जणू तिच्या सौंदर्याला वेढून टाकत होती, तिला अधिक चमकदार, अधिक जादुई, अधिक... अप्रतिरोधक बनवत होती.
एलिझाबेथने आरशात स्वतःला पाहिलं. आज तिच्या चेहऱ्यावर फक्त मेकअप नव्हता. तर तिच्या चेहऱ्यावर मिखाईलच्या प्रेमाची लाली उमलली होती
मदरला तिने सांगितलं, “मला थोडं फिरायचंय, लवकर परत येईन.”
मदर मिरिंडा जादुई काढा बनवत होती. त्यातच बीजी होती, फक्त डोळे वर केले आणि “लवकर ये” एवढंच बोलली.
एलिझाबेथने संधी साधली आणि आपल्या झाडूवर बसून सुसाट घराबाहेर पडली. आपला जादुई झाडू बाजूला ठेवून, तिने जादुई दरवाजा ओलांडला आणि थेट मानवी जगात पोहोचली.
समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी खूप वर्दळ होती. मच्छिमार आपल्या बोटी तयार करत होते. जाळ्या तपासत होते, दोरखंड बांधत होते, एकमेकांना हाक मारत होते. हवेत मासे, मीठ आणि ओलाव्याचा वास होता.
एलिझाबेथ दूरवरून मिखाईलला पाहत होती. तो एकटा किनाऱ्यावर बसला होता. हातात तीच माळ घेऊन, डोळे लांब समुद्राकडे लावून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि आशा यांचा विचित्र मेळ होता. त्याचा चेहरा एखाद्या लहान बाळासारखा केविलवाणा वाटत होता.
निकोबेल त्याच्याजवळ आला. हातात कॉफीचा मग, दुसऱ्या हातात सिगारेट. तो हसत म्हणाला,
“मिखाईल, काय झालंय बाबा? रात्रीपासून तू ही माळ घेऊन बसलायस. आता बोट सोडायची वेळ झाली तरी तुझी नजर समुद्रावर खिळलेली आहे. कोण येणार आहे का रे?”
मिखाईलने उसासा टाकला. हात काळजावर ठेवून म्हणाला,
“निक, तुझी होणारी वहिनी येणार आहे. तिचीच वाट बघतोय. तिला ही माळ द्यायची आहे.”
निकोबेलचे डोळे मोठे झाले. तो जवळ येऊन ओरडल्या सारखा म्हणाला,
“काय? हे कधी झालं? आणि मला माहीतही नाही? कोण आहे ती? नाव काय तिचं? कुठली आहे?”
मिखाईल हळू आवाजात, जणू स्वतःशीच बोलत म्हणाला,
“कालच इथे मला धडकली. तिची माळ माझ्याकडे आली आणि माझं हृदय तिच्याकडे गेलं. नाव माहीत नाही. कोण कुठली, कुठून आली हेही माहीत नाही. फक्त इतकंच माहीत आहे की ती माझी होणारी बायको आहे.”
निकोबेल हसला. मोठ्याने हसला.
“अरे पागल झालायस का? धडकलेल्या मुली परत भेटत नाहीत रे. बोट घे आणि सरळ समुद्रात जा. ही स्वप्नं पाहायची वेळ नाही. काम करायची वेळ आहे. मासे पकडणार नाही तर खाशील काय ?".
पण मिखाईल ऐकत नव्हता. त्याच्या मनात एक ठाम विश्वास होता. ती येईल. ती नक्की येईल.
निकोबेलने डोक्याला हात मारून चर्च मध्ये जायला निघाला.
एलिझाबेथ दूरवरून हे सगळं पाहत होती. तिच्या छातीत धडधड वाढत होती. तिने हळूच पावलं टाकली आणि त्याच्याजवळ गेली.
“एक्स्क्यूज मी...” तिचा आवाज थोडा थरथरला, “माझी माळ बहुतेक इथे कुठेतरी काल संध्याकाळी तुम्हाला धडकताना पडली असेल. तुम्हाला सापडली का?”
मिखाईलने तिच्याकडे पाहिलं. एक क्षण त्याला वाटलं हे स्वप्न आहे. पण नाही, ती खरंच समोर उभी होती. तिच्या डोळ्यांत लाज, ओठांवर हलकी हसू आणि गालांवर फिकट गुलाबी रंग.
त्याने हसत माळ पुढे केली.
“हो, ही घे तुझी माळ.”
“थँक्स... मी तुमची खूप आभारी आहे.” एलिझाबेथने माळ हातात घेतली. तिला बोलणे संपवायचे नव्हते. ती काहीतरी बोलत राहिली.
मिखाईलने हसत म्हटलं,
“थँक्स कशाला? तुझी वस्तू होती तुला दिली. पण हो, जर आभार मानायचेच असतील तर आपण एकत्र कॉफी घेऊन सेलिब्रेट करू शकतो.”
एलिझाबेथच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तिला हवं तेच मिळालं होतं. दोघे चालू लागले. समोरच्या छोट्याशा कॉफी दुकानापर्यंत. रस्त्यावर चालताना तिने माळ गळ्यात घातली. त्या माळीच्या प्रत्येक मनक्याला स्पर्श होताच तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती.
दुकानात गेल्यावर मिखाईलने तिला अतिशय अदबीने खुर्चीवर बसवलं. जणू ती एखादी राणी असावी. मग त्याने दोन कॉफीची ऑर्डर दिली.
“मी मिखाईल. इथेच जवळच राहतो. समोर मासेमारीचं काम करतो.” त्याने ओळख करून दिली आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
“मी एलिझाबेथ. बाजूच्या गावात राहते. इथे नवीनच राहायला आलोय. म्हणून काल फिरत इथे आले होते.” तिने सांगितलं.
“ओह ग्रेट! नवीन आहेस तर मग मी तुला सगळं गाव फिरवून देईन. काय म्हणतेस?” मिखाईल उत्साहाने म्हणाला.
दोघे कॉफी घेत घेत बोलत राहिले. आवडी-निवडी, आवडते रंग, आवडते गाणी, आवडता पदार्थ... सगळं सगळं विचारलं. वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी एलिझाबेथने घड्याळाकडे पाहिलं.
“ओके, मी जाते. नाहीतर उशीर झाला तर माझी मॉम ओरडेल. ती खूप स्ट्रिक्ट आहे.”.
मदर मिरिंडाचा रौद्र अवतार तिच्या डोळ्यांसमोर काही क्षणासाठी आला.
मिखाईलचा चेहरा एकदम उतरला.
“इतक्यात चाललीस?” त्याच्या आवाजात लहान मुलासारखा केविलवाणा स्वर होता.
एलिझाबेथने त्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचं हृदय दडपून गेलं.
“हवे तर रात्री भेटू शकते ना?” तिने हसत विचारलं.
“ठीक आहे... पण एक बोलायचं होतं.” मिखाईल अडखळत म्हणाला.
“बोल ना, काय?”
एलिझाबेथ निघता निघता मागे वळली.
मिखाईलने खोल श्वास घेतला आणि म्हणाला,
“तू तुझी वस्तू म्हणजे माळ तर घेऊन चालली आहेस. पण माझं हृदय तुझ्याकडे गेलंय. ते कधी परत करशील?”
एलिझाबेथ एकदम थबकली. तिचे डोळे मोठे झाले. काही क्षण तिला काही समजलं नाही. मग हळूहळू तिला अर्थ कळला. तिच्या गालांवर लालिमा पसरली. तिने ओठ चावले, मान खाली घातली, हातात चेहरा लपवला आणि लाजत म्हणाली,
“मी तर परत करू शकत नाही. कारण त्याच मोबदल्यात मी पण माझं हृदय तुला दिलंय की!”
हे बोलून ती पळत सुटली. मागे वळूनही पाहिलं नाही.
मिखाईलला क्षणभर काही समजलं नाही. मग त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड हसू पसरलं.
“येसsss!” त्याने दोन्ही मुठी आवळून आकाशाकडे पाहत जल्लोष केला.
तो धावतच तिच्या मागे गेला, पण एलिझाबेथ आधीच जादुई दरवाज्याच्या दिशेने निघाली होती आणि क्षणार्धात गायब झाली.
मिखाईल उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले. त्याने समुद्राकडे पाहिलं. लाटा आनंदाने उड्या मारत होत्या जणू.
तो धावतच आपल्या बोटीवर गेला. आज त्याला काम करायचं नव्हतं. फक्त एकच इच्छा होती... रात्र कधी होते आणि तो तिला पुन्हा भेटेल.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा