Login

द पेमॉन (भाग 13)

Witch And Gentlemen Love Story
पेमॉन (भाग १३)

"रात्रभर कोठे होती ? आणि तो तुच्छ मनुष्य कोण आहे ?"... मिरिंडाने झिंज्या ओढतच तिला विचारले. तिचा आवाज घराच्या भिंतींना कंपावून सोडत होता. तिच्या डोळ्यांत रागा बरोबरच एक खोल, जुनी भीती दिसत होत. जी शतकांच्या अनुभवातून, रक्तातून, आणि जळालेल्या आठवणींमधून आली होती. तिचे हात थरथरत होते, पण ती स्वतःला सावरत होती.

"मदर मी सांगणारच होते. तो.. तो मिखाईल आहे. माझे त्याच्यावर प्रेम आहे. आणि त्याचेही...."... एलिझाबेथ थरथरत्या आवाजात म्हणाली.

तिचे हात पोटावर आपोआप गेले, जणू ती आतल्या छोट्या जीवाला धरून ठेवत होती, त्याला जगापासून वाचवत होती. तिच्या डोळ्यांत अश्रू आणि प्रेम यांचा मेळ होता. तिच्या ओठांवरून एक हलकीशी, दुःखी हसू फुटले जणू ती स्वतःलाच सांगत होती की हे प्रेम खरे आहे, हे बाळ खरे आहे.

"तुम्हाला किती वेळा सांगितले आहे, मानवी लोकांवर विश्वास ठेऊ नका. ते आपल्याच रक्तातील लोकांना दगा देतात. त्यांना जर माहीत झाले तर तू एक विच आहेस तर ते तुला जाळून टाकतील. प्रेम वैगेरे तर दुरच्याच गोष्टी आहेत."... मीरिंडा रागाच्या भरात ओरडली.

तिचा आवाज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमला, खिडक्यांच्या काचा हलल्या. तिने हात उगारला, जणू ती पुन्हा थापड मारणार होती, पण मध्येच थांबली. तिच्या मनात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या. त्या आठवणी ज्यात तिच्या बहिणी, तिच्या शिष्या, तिच्या जवळच्या विच होत्या . ज्या कधीकाळी मानवी जगात जळाल्या गेल्या होत्या. त्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येऊन उभ्या राहिल्या. त्याचे जळते शरीर, तो धूर, गावकऱ्यांचे मशाली आणि कुऱ्हाडी घेऊन ओरडणे, जळत्या कातडींचा वास. तिचा श्वास जड झाला.

"पण मिखाईल तसा नाही मदर"... एलिझाबेथच्या आवाजात आर्जव होता. ती मदरच्या डोळ्यात पाहत होती, जणू तिच्या शब्दांनी मदरचे मन वाकवता येईल अशी आशा बाळगून. तिच्या डोळ्यांतून एक अश्रू गालावरून खाली सरकला.

"तो मला समजतो. तो मला स्वीकारतो. त्याने मला कधीच विच म्हणून पाहिले नाही. फक्त एलिझाबेथ म्हणून मला प्रेम करतो."

"ते काही नाही. मी शब्द दिलाय तेराईचे प्रमुख ड्रॅगनकिंग यांना तुझे आणि शँग्रीलाचे लग्न लावून द्यायचे. माझे ऐक पोरी. शँग्रीला एक लकीयर आहे. म्हणजे आपल्याच विच परिवाराचा पुरुष विच आहे. अत्यंत शक्तिशाली आणि अनेक शक्तींनी परिपूर्ण. देखणा तरुण आहे. ड्रॅगनकिंग नंतर तोच तेराईचा प्रमुख होईल. त्याच्याशी लग्न केलेस तर तुझे आयुष्याचे कल्याण होईल." मदर मीरिंडा तिला समजावून सांगू लागली.

तिच्या आवाजात आता रागापेक्षा एक प्रकारची विनवणी होती. ती एलिझाबेथला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यांत एक जुनी, थकलेली माया दिसत होती.

"ओहह मदर, आता ते शक्य नाही. माझ्या पोटात मिखाईलचा अंश वाढतोय.".. एलिझाबेथ हातांनी तोंड झाकत मुसमुसत म्हणाली.

तिच्या आवाजात दुःख आणि भीती यांचा मेळ होता. ती रडत होती, पण त्या रड्यात एक आईची सुरुवात होती

एक नवीन जबाबदारीची सुरुवात. तिच्या हाताने ती पुन्हा पोटावरून हलकेच फिरवले, जणू त्या छोट्या हृदयाच्या ठोक्यांना स्पर्श करत होती.

मदरने हे ऐकताच ती चार पाऊले मागे सरली आणि धडपडत भिंतीला टेकली. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला. तिच्या डोळ्यांत अविश्वास आणि भीती दिसत होती. तिने हात छातीवर ठेवला, जणू तिचे हृदय थांबेल की काय अशी भीती वाटत होती. तिचा श्वास खूप वेगाने चालू होता.

"एलीझा.. बेथ, हे काय केलेस तू ? याचा परिणाम माहीत नाही तुला. ती लिकीयन जमात तुला आणि आपल्या परिवाराला जिवंत सोडणार नाही. ते आपल्या रक्ताचा सूड घेतील. शतकांपूर्वीच्या सूडाचा, आजच्या अपमानाचा."

मदरने एलिझाबेथला बेसमेंटमध्ये कैद करून ठेवले. तो बेसमेंट अंधारात, थंड आणि जादूच्या मंत्रांनी मिरिंडाने स्पेल केलेला होता. भिंतींवर जुन्या जादूच्या चिन्हे कोरलेली होत. काही चिन्हे अजूनही हलकेच लाल-निळ्या प्रकाशाने चमकत होती. हवेत एक भारी, जादुई दाब होता, जणू हा जागा श्वास घेत होता.

तिने एलिझाबेथच्या हात-पायांना हलके जादुई बंधने बांधली. फक्त तिच्या हालचाली मर्यादित ठेवण्यासाठी, तिला इजा करण्यासाठी नव्हे. ती काहीतरी विचार करू लागली.

कारण विच, चेटकीण, पिशाच्च यांची लिकीयन जमात असते. जर त्यांना लिकीयन जमातीतुन बाहेर काढले तर ते काय करणार होते. मदर मीरिंडाने आपल्या तिन्ही मुलींना सर्व शक्तिशाली जादू शिकवल्या होत्या. त्यामुळे ते लिकीयन जमतीशी एकवेळ मुकाबला करेल ही, पण शँग्रीला आणि ड्रॅगनकिंग शक्तिशाली जादूगार आहेत. त्यांच्या पुढे टिकाव करणे शक्य नव्हते. मदरने खूप विचार केला. विचक्राफ्ट आणि लिकीयन नियमांनुसार पोटातील बाळाचा मृत्यू करता येत नाही. ते पाप अक्षम्य ठरते. त्यामुळे तिने हाच विचार केला की एलिझाबेथचे बाळ जन्माला येई पर्यंत तिला कैद म्हणून बेसमेंट मधेच ठेवायचे. तिला वेळ हवी होती काही तरी मार्ग शोधण्यासाठी.

तीन दिवस झाले होते एलिझाबेथला घरात कोंडून ठेवले होते. तिला फक्त थोडेसे अन्न आणि पाणी दिले जात होते. एक छोटीशी ट्रे, ज्यात ब्रेड, पाणी आणि फळांचे काही तुकडे. एनाबेला आणि एलिनाला तिला भेटण्यासाठी कडक निर्बंध घातले होते. पण तरीही मीरिंडाची धाकधूक कमी झाली नव्हती. ती रात्री झोपत नव्हती. तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता.

पण एलिनाकडे भविष्यात डोकावण्याची शक्ती होती. त्यामुळे तिला हे भविष्य आधीच दिसू लागल.. ' लवकरच ड्रॅगनकिंगला याची माहिती लागेलच. आणि झालेही तसेच. शँग्रीलाला एलिझाबेथ प्रेग्नेंट आहे याचा पता लागलाच. त्याच्या साठी तो मोठा धक्का होताच पण त्यापेक्षा कितीतरी त्याला त्याचा अपमान वाटला. ती माझी झाली नाही तर ती कुणाचीच होऊ शकत नाही हे त्याने ठरवले होते. त्याच्या डोळ्यांत एक काळा, सूडाचा राग होता. त्याने ड्रॅगनकिंगला सांगून लिकीयनच्या सभेत एलिझाबेथ आणि तिच्या कुटुंबावर एकतर्फी खटला भरवुन एलिझाबेथवर मानवाबरोबर संबंध ठेऊन त्याचे पाप आपल्या पोटात वाढवला म्हणून देशद्रोही ठरवून मृत्यदंड घोषित केला. सभेत उपस्थित सर्वजण शांत होते फक्त शँग्रीलाचा आवाज घुमत होता.व

भविष्य पाहताच एलिनाच्या मनात एकच विचार होता. आता वेळ कमी आहे. त्यामुळे एलिना आणि एनाबेलाने गुपचुप एलिझाबेथची मुक्तता करून तिला मानवी मितीत घेऊन आल्या. रात्रीच्या अंधारात, मदर मीरिंडा झोपली असताना, त्यांनी बेसमेंटचे जादुई कुलूप उघडले ते एक छोटीशी, चमकणारी किल्ली वापरून. एलिझाबेथ कमकुवत झाली होती, तिचे डोळे बुडलेले, पण तिच्या डोळ्यात आशा होती. त्यांनी ब्रदर निकोबेल याच्याशी संपर्क साधून एलिझाबेथला त्याच्या स्वाधीन केले.

एलिझाबेथ आपल्या दोन्ही बहिणीच्या गळ्यात मिठी मारून रडत होती. त्या तिघी एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन उभ्या होत्या. कारण तिघींनाही माहीत होते की ही त्यांची शेवटची भेट आहे. या नंतर त्यांची कधीच भेट होऊ शकणार नव्हती. हवेत एक गहिरे दुःख होते. तीन बहिणींचे प्रेम आणि त्यांचा निरोप. वारा शांत होता, जणू तोही त्यांच्या दुःखाला जाणवत होता.

एनाबेलाने एलिझाबेथला एक माळ दिली. "एलिझाबेथ ही माळ घे, युनिकोनच्या शिंगाच्या पासून बनवलेले दुर्मिळ मणी आहेत. त्यात आपल्या विचक्राफ्टची सर्वात शक्तिशाली जादू मी वापरली आहे. ही जो पर्यंत तुझ्या गळ्यात असेल तो पर्यंत तुला कोणीही शोधू शकत नाही. आणि तुझे खरे स्वरूप कुणालाही कळणार नाही."... एनाबेलाने तिच्या गळ्यात ती माळ घातली. माळ हलकीशी चमकत होती—एक निळसर, शांत प्रकाश. त्या प्रकाशाने एलिझाबेथच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उजेड पडला.

"एनाबेला तू तुझी सर्व शक्ती माझ्यासाठी खर्ची केल्यास ?"... एलिझाबेथने डोळ्यांत पाणी आणून विचारले.

"त्यात काय एव्हडे ? माझ्याजवळ अजूनही बऱ्याच शक्ती आहेत. तू तुझी काळजी घे. आणि तुझ्या बाळाची सुद्धा."... एनाबेलाने तिला धीर देत म्हटले. तिच्या आवाजात प्रेम आणि त्याग होता. तिने एलिझाबेथच्या कपाळावर हलकेच स्पर्श केला.

दुसरीकडे एलिना ब्रदर निकोबेल जवळ येऊन म्हणाली.

"ब्रदर निकोबेल, डेस्टिनी इशारा देतेय. एलिझाबेथच्या पोटातील मुलाचे मातृत्व भविष्यात तुलाच स्वीकारावे लागेल. तुझ्या हातात तिचे भवितव्य सोपवून जातेय. तुला खूप सांभाळून राहावे लागेल. तुझी परीक्षा होईल. परमेश्वरावरचा विश्वास अढळ आहे. त्याने आधीच सर्व लिहले आहे."...

कधी नव्हे ती एलिना एका गूढ शब्दांत म्हणाली. बहुतेक तिने भविष्य जाणले असावे. तिच्या डोळ्यांत एक दूरदृष्टी होती. जणू ती पलीकडे काहीतरी पाहत होती.

एलिनाने एलिझाबेथला एक पुस्तक दिले. "एलिझाबेथ एकवेळ अशी येईल जेव्हा तुझा जन्म आणि मृत्यूचा वेळ असेल. तेव्हा तुझ्या मुलाला वाचवायला यातील एक पान फाडुन त्याच्या हातात ठेव. तोच त्याची रक्षा करेल."

ते चामडी पुस्तक 'फिफ्टीसिक्स डीमन्स' यांचे होते. त्याच्या कव्हरवर गडद, जादुई चिन्हे कोरलेली होती, आणि ते हातात घेताच एक थंड स्पर्श जाणवत होता. जणू नरकाच्या श्वासाचा स्पर्श.

आणि इथेच एक नवीन अध्यायला सुरुवात झाली होती. त्याबद्दल कुणालाही कल्पना नव्हती. फक्त दोघांना सोडून. एक स्वर्गाचा परमपिता परमेश्वर आणि दुसरा नरकाचा सम्राट लुसिफर.