एलिझाबेथ आणि मिखाईल दोघांचेही लग्न कोको गावातच तेथील जुन्या चर्चमध्ये लावले गेले. ते चर्च ऐतिहासिक जुने होते. ब्रदर निकोबेलने एलिझाबेथच्या भावाची भूमिका निभावून पालकत्व घेत तिचे आणि मिखाईलचे लग्न लावले.
मिखाईलला ही जवळचे कुणीही नातेवाईक नव्हते. फक्त एक जवळची आंटी नायरा आणि भाऊ मॉन्टी होते. आंटी नायरा वयस्क झाली होती, मिखाईलच्या लग्नामुळे तिची एक चिंता मिटली होती. तिच्या डोळ्यांत एक मायाळू चमक होती.
मिखाइलच्या लग्नात मॉन्टी जास्तच उत्साही होता, त्याने मिखाईलच्या काही मित्रांसोबत लग्नाच्या तयारीत मदत केली. ब्रदर निकोबेलने लग्नाची सर्व जीमेदारी उचलली होती म्हणून चर्चच्या सर्वच फादर्स, सिस्टर्स यांनी स्वतः पुढाकार घेतला. कारण ब्रदर निकोबेल हे चर्च मधील प्रभावी व्यक्ती होते.
त्यांचे शब्द सर्वांना मान्य होते. चर्चचे मुख्य बिशप फादर डिकॉस्टा यांनी त्यांच्या लग्नाचे विधी केले. त्यांच्या हातातून वधू-वराला आशीर्वाद देताना हवेत एक प्रकारचा पवित्र कंप होता. तेथेच एलिझाबेथ आणि सिस्टर एग्नेस हिची ओळख झाली. सिस्टर एग्नेस एक गूढ आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होती. तिच्या डोळ्यांत एक खोल, तीक्ष्ण दृष्टी होती, जणू ती लोकांच्या आत्म्यात डोकावत असे.
सिस्टर एग्नेस एलिझाबेथला जरा रोखुनच पाहत होती. कारण तिला तिच्यात काहीतरी वेगळे जाणवत होते. एक अनोखी ऊर्जा, एक लपलेली शक्ती, जणू ती सामान्य माणूस नव्हती. तिच्या नजरेत संशय आणि कुतूहल दोन्ही होते. पण तरीही तिने काही बोलले नाही फक्त शांतपणे पाहत राहिली. लग्न निर्विघ्नपणे पार पडले. चर्चमध्ये उपस्थित सर्वजणांनी टाळ्या वाजवल्या, फुले उधळली, आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. एलिझाबेथच्या डोळ्यांत आनंद आणि थोडसं दुःख होत.
तिने तिच्या जुन्या जीवनाचा निरोप देत, नव्या जीवनाची सुरुवात केली.
एलिझाबेथने नव्याने संसाराला सुरुवात केली. मिखाईलची आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरीही त्याचेही हातावर पोट होते. त्यांचे छोटेसे घर समुद्रकिनाऱ्याजवळ होते, लाकडी भिंती, छतावर नारळाच्या झावळ्या, आणि खिडकीतून समुद्राचा आवाज येत असे. एलिझाबेथ घरचे आवरून त्याला मासेमारीसाठी मदत करायची. सकाळी लवकर उठून ती जाळे विणायची, मासे स्वच्छ करायची, आणि मिखाईल बोट घेऊन समुद्रात जायचा तेव्हा टॉनी आणि ती मासे विक्रीला न्यायचा.
त्यांचा संसार सुखाचा चालला. मिखाईल, एलिझाबेथ आणि टॉनी तिघांचे कुटुंब आणि चाहूल लागलेल्या चवथ्या सदस्याची आतुरता यात त्यांचा हसतखेळत संसार चालला. सकाळी चहा पिताना ते हसत खिदळत गप्पा मारायचे, संध्याकाळी समुद्राकडे फिरायचे, आणि रात्री छोट्या दिव्याच्या उजेडात एकमेकांच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहायचे. त्यांची एक हॅपी फॅमिली झाली होती. साधी, पण भरपूर प्रेमाने भरलेली.
निकोबेलने मिखाईलला एलिझाबेथ विषयी सर्व माहिती आधीच सांगितली जरी असली तरी त्याला त्याचा काहीच फरक नव्हता. त्याने ती गोष्ट स्वतः पर्यंतच ठेवली. कुणालाही सांगितली नाही. उलट त्याच्या साठी तिने आपले जग सोडून दुसऱ्या जगात स्वतःला झोकून दिले म्हणून तो तिचा आदरच करायचा.
एलिझाबेथच्या रूपाने त्याच्या घराला घरपण आले. तिच्या हाताने बनवलेले जेवण, तिची हसरी, तिची काळजी, तिच्या डोळ्यांतील प्रेम. मिखाईलला आता समजले होते की खरे प्रेम म्हणजे काय. ते फक्त शब्द नाही, ते त्याग आहे, विश्वास आहे, आणि एकमेकांसाठी जग सोडणे आहे.
एलिझाबेथच्या रूपाने त्याच्या घराला घरपण आले. तिच्या हाताने बनवलेले जेवण, तिची हसरी, तिची काळजी, तिच्या डोळ्यांतील प्रेम. मिखाईलला आता समजले होते की खरे प्रेम म्हणजे काय. ते फक्त शब्द नाही, ते त्याग आहे, विश्वास आहे, आणि एकमेकांसाठी जग सोडणे आहे.
एलिझाबेथच्या पोटात वाढणारा जीव त्यांच्या जीवनात नवीन आशा आणत होता. ती रात्री हात पोटावर ठेवून हलकेच गाणी गात असे, आणि मिखाईल तिच्याकडे पाहून हसत असे. ते दोघेही जाणत होते की हे सुख कदाचित काही काळाचे असेल—पण आता, या क्षणात, ते पूर्ण होते.
******
इकडे चर्चमध्ये सिस्टर एग्नेस आणि ब्रदर एल्विस हे दोघे देवाचे समर्पित पुजारी होते, तरीही त्यांच्या मनात नेहमीच एक गुप्त आणि तीव्र लालसा जागी राहिली होती. ती म्हणजे अलौकिक शक्तींची, ज्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होत्या. ते फक्त प्रार्थना आणि बायबलच्या शिकवणींवर समाधान मानण्यास तयार नव्हते. त्यांना काही तरी अधिक हवे होते. अशी शक्ती जी जग बदलू शकेल, आजार बरे करू शकेल, भविष्य दाखवू शकेल आणि अगदी मृत्यूलाही आव्हान देऊ शकेल.
चर्चने त्यांना म्हणजे फादर एल्विस, सिस्टर एग्नेस, ब्रदर निकोबेल आणि इतर प्रमुख बिशप्सना विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यांना बायबलमधील गूढ रहस्ये उलगडून सांगितली गेली होती. त्यांनी 'बुक ऑफ गोईसाचे' गहन अध्ययन केले होते, जे जॉन डी यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेले एक रहस्यमय ग्रंथ होते. तसेच किंग सोलोमनच्या जादुई परंपरांचा अभ्यास केला होता.
त्यांना ' आर्ट पॉलेना' मधील चोवीस देवदूतांचे नावे, त्यांचे मंत्र आणि तीनशे साठ पवित्र आत्म्यांचे तंत्र शिकवले गेले. चर्चच्या गुप्त खोल्यांमध्ये त्यांना पाताळातील, नरकातील आणि अंधाऱ्या साम्राज्याच्या शक्तींचीही ओळख करून दिली गेली. त्यांनी सैतानी बायबल म्हणजे ' कोडेक्स गिगास' चे सूक्ष्म वाचन केले होते – ते भयंकर पुस्तक जे स्वतः सैतानाने लिहिले असे म्हणतात. 'आर्स थेऊग्रीय गोशिया' मधून त्यांना भटकत्या आत्म्यांना कसे बंदिस्त करायचे, कसे नियंत्रित करायचे हे शिकवले गेले.
पण दोन महत्त्वाचे ग्रंथ त्यांच्यापासून दूर ठेवले गेले होते. ' बुक ऑफ सोईगा' ची पूर्ण डिकोडेड आवृत्ती आणि 'द ग्रँड ग्रीमॉइरे'.
बुक ऑफ सोईगा ही एक अत्यंत गूढ सांकेतिक भाषेत लिहिलेली होती. तिचा कोड फक्त एकाच व्यक्तीने यशस्वीपणे उकल केला होता तो म्हणजे एलिझाबेथियन काळातील प्रसिद्ध ऑक्क्युलिस्ट जॉन डी. पण त्याच्या मृत्यूला आता तीनशे वर्षांहून अधिक काळ लोटला होता. त्याने डिकोड केलेली हस्तलिखित प्रत कुणालाही माहीत नव्हती की ती कुठे लपवली आहे. काहींच्या मते ती ब्रिटिश लायब्ररीत किंवा ऑक्सफर्डच्या बोडलियन लायब्ररीत आहे, पण ती सांकेतिक भाषेतच राहिली होती, आणि जॉन डीची डिकोडेड नोट्स गायब होत्या. फादर एल्विसने अथक प्रयत्न केले आणि अखेर ग्रीक चर्चमधील एका जुने हस्तलिखित सापडले. ज्यात जॉन डीच्या डिकोडिंगचा एक भाग होता. त्यामुळे त्यांना पुस्तकातील काही रहस्ये समजली, पण पूर्ण शक्ती मिळवण्यासाठी एकच गोष्ट हवी होती. 'द ग्रँड ग्रीमॉइरे'.
हे पुस्तक व्हॅटिकनने कडक बंदी घातले होते. कारण यात काळ्या जादूच्या सर्वात धोकादायक मंत्रांचे, सैतानांना जागृत करण्याचे, त्यांना आज्ञा देण्याचे आणि अगदी त्यांच्याशी करार करण्याचे रहस्य लपलेले होते. हे पुस्तक कोडेक्स गिगास, आर्स थेऊग्रीय गोशिया आणि बुक ऑफ सोईगा मधील सर्व शक्तींना एकत्र आणू शकते अशी अफवा होती. म्हणून व्हॅटिकनच्या गुप्त तळघरात जिथे फक्त थोड्याच उच्च पदस्थ व्यक्तींना प्रवेश मिळतो, हे पुस्तक पवित्र कपड्यात लपेटून, लोखंडी पेटीत बंदिस्त ठेवले होते. त्यावर अनेक सील आणि अभिमंत्रित टाळे लावलेले होते.
पण सिस्टर एग्नेस आणि फादर एल्विस यांची महत्वाकांक्षा आता थांबत नव्हती. त्यांना फक्त चर्चच्या मर्यादित शक्ती पुरत नव्हती. त्यांना अशी शक्ती हवी होती जी अमानवीय, अतर्क्य आणि पूर्णपणे नियंत्रणात येईल. ते गुप्तपणे या पुस्तकांचा मागोवा घेऊ लागले. वर्षानुवर्षे त्यांनी गुप्त संपर्क, जुने दस्तऐवज आणि चर्चच्या आर्काइव्ह्जमध्ये खोलवर जाऊन माहिती गोळा केली. अखेर त्यांना बुक ऑफ सोईगा ची जॉन डीने डिकोड केलेली एक दुर्मीळ कॉपी मिळाली. ती एका खाजगी संग्रहातून चोरून आणली गेली होती. या जगात फक्त दोनच मूळ प्रती होत्या. एक ब्रिटिश लायब्ररीत आणि दुसरी ऑक्सफर्डच्या बोडलियन लायब्ररीत. पण सांकेतिक भाषेमुळे त्या वाचता येत नव्हत्या. फादर एल्विसच्या हातात आलेली ही प्रत जॉन डीच्या डिकोडिंगचा एक भाग होती. पुरेशी नव्हती, पण महत्वाची होती.
जवळपास सहा महिन्यांनी ब्रदर निकोबेल यांना बिशप पदवी मिळाली. ते आता फादर निकोबेल झाले आणि व्हॅटिकनच्या शिष्टमंडळात त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या जागी फादर एल्विस यांची मुख्य फादर म्हणून नियुक्ती झाली. आता चर्चमध्ये सिस्टर एग्नेस आणि फादर एल्विस यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. कोणतीही अडथळा नव्हता. ते रात्रीच्या वेळी गुप्त रिच्युअल्स करू लागले. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात, जुन्या ग्रंथांच्या पानांवर बोटे फिरवत, मंत्रांचा उच्चार करत.
चर्चचे मुख्य फादर डोकॉस्टा आणि नवीन बिशप निकोबेल अधूनमधून रोमला जाऊ लागले. चर्चच्या उच्च सभांसाठी, महत्त्वाच्या निर्णयांसाठी. एकदा हॅलोविनच्या आठवड्यात दोघांनाही रोमला एका आठवड्यासाठी जावे लागले. व्हॅटिकनमध्ये काही अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाच्या चर्चेसाठी ते गेले. हा संधीचा उत्तम प्रसंग होता.
त्याच आठवड्यात, हॅलोविनच्या दिवशी, फादर एल्विसच्या एका विश्वासू सहकाऱ्याने, ज्याला या रहस्यात पूर्ण सहभाग होता. एक धाडसी योजना आखली. त्याने व्हॅटिकनच्या तळघरातून द ग्रँड ग्रीमॉइरेची प्रत एका दिवसासाठी चोरून कोको चर्चमध्ये आणली. हे पुस्तक एका रात्रीसाठी चर्चच्या गुप्त खोलीत आणले जाणार होते. तिथे ते "करोचंमँसी रिच्युअल" करणार होते . मृत आत्म्यांना बोलावणे, सैतानांना जागृत करणे आणि त्यांच्याकडून शक्ती मागणे. हे त्या रिच्युअलचा उद्देश होता.
त्यांचे उद्दिष्ट वाईट नव्हते, तरीही. ते स्वतःला पटवून घेत होते की ही शक्ती मिळवून ते लोकांचे भले करतील. आजार बरे करतील, गरिबांना मदत करतील, युद्ध थांबवतील. पण त्यांचा मार्ग चुकला होता.
ज्ञानाची लालसा ही स्वतःमध्ये वाईट नसते, पण जेव्हा ती अंधकारमय मार्गाने मिळवली जाते, तेव्हा ती विध्वंसक बनते. त्यांना हे माहीत नव्हते की या रिच्युअलमुळे जागृत होणारी शक्ती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाईल. ती शक्ती त्यांना आणि संपूर्ण चर्चला काळ्या छायेत बुडवेल. त्यांची भारी किंमत भोगावी लागणार होती. आणि ती किंमत फक्त त्यांची नव्हती, तर सर्वांच्या आसपासच्या लोकांचीही जीव घेणारी होती.
Santosh udmale.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा