Login

द पेमॉन (भाग 15)

सैतान आणि विच यांचा संघर्ष
हॅलोविनच्या कार्यकामासाठी सिनियर फादर डिकॉस्टा आणि फादर निकोबेल हे व्हॅटिकनमध्ये गेले होते. जवळपास एक आठवडा ते तिकडेच असणार होते. कोको चर्चची सगळी जबाबदारी ही आता फादर एल्विसवरच होती. आणि त्याची मदतनीस म्हणून सिस्टर एग्नेस असणार होती. दोघेही या जबाबदारीला पूर्ण मनाने सामोरे जात होते, पण त्यांच्या मनात एक गुप्त योजना आधीच रचली गेली होती.

फादर एल्विसच्या एका अनुयायाने, जो व्हॅटिकनच्या चर्चमधील प्राचीन ग्रंथालयाचा रक्षक होता, तेथून गुपचूपपणे **द ग्रँड ग्रीमॉइरे** या भयंकर पुस्तकाचे छायाचित्रण करून आणले होते. हे पुस्तक हजारो वर्षांपासून व्हॅटिकनमध्ये अनेक मंत्रांनी निष्क्रिय करून, अनेक पेट्यांमध्ये बंदिस्त ठेवलेले होते. त्यात सैतानी शक्तींना जागृत करण्याचे, त्यांच्याशी करार करण्याचे आणि त्यांना अधीन करण्याचे अत्यंत घातक विधी होते. हॅलोविनचा आठवडा हा एव्हील रिचवल्ससाठी अत्यंत अनुकूल असतो, कारण या काळात पृथ्वी आणि नरकातील सीमा पातळ होतात, आत्मे अधिक सक्रिय होतात. त्यामुळे त्यांना सगळे योग उत्तम प्रकारे जुळून आले होते.

हॅलोविनच्या रात्री, जेव्हा गावात लहान मुलं मास्क घालून फिरत होती आणि घरांमध्ये मेणबत्त्या पेटवल्या जात होत्या, तेव्हा फादर एल्विस, सिस्टर एग्नेस आणि त्यांचे काही विश्वासू अनुयायी चर्चच्या तळघरात जमले. तळघर अंधारलेले, थंड आणि ओले होते. त्यांनी एक मोठा सर्कल बनवला. सगळे त्या भोवती उभे राहिले. समोर एक वर्तुळ रेखाटले, ज्यात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे लाख आणि कोळश्याची रांगोळी काढली. त्यावर अठरा मेणबत्त्या पेटवल्या – प्रत्येकी एका विशिष्ट दिशेला आणि एक केंद्रस्थानी. मेणबत्त्यांच्या ज्योती हलक्या हलक्या थरथरत होत्या, जणू काही त्यांना येणाऱ्या शक्तीची चाहूल लागली होती.

त्यांच्या समोर तीन प्राचीन पुस्तके ठेवली गेली – **एव्हील बायबल**, **कोडेक्स गिगास** (ज्याला डेव्हिल्स बायबल म्हणतात, आणि त्यात सैतानाचे पूर्ण पानावर चित्र आहे), आणि **बुक ऑफ सोईगा**. आणि मुख्य म्हणजे **द ग्रँड ग्रीमॉइरे** ची प्रत. फादर एल्विसने मोठमोठ्याने ग्रीमॉइरेमधील रिचवल वाचायला सुरुवात केली. त्याचे शब्द हवेत घुमत होते, प्रत्येक शब्दासोबत वातावरण अधिक दाट होत होते.

आधी काहीही न वाटणारे वातावरण हळूहळू बदलू लागले. चर्चच्या वर काळे ढग जमा झाले, जणू रात्र अजून गडद झाली. कडकडून विजा तेजाळू लागल्या, आणि प्रत्येक विजेच्या कडकडाटासोबत तळघर हादरू लागले. एक प्रचंड वावटळ तळघरात घुसली. तिने सगळ्या वस्तू उडवल्या, पुस्तके उघडी पडली, मेणबत्त्या विझू लागल्या पण पुन्हा पेटल्या. तळघरात बंदिस्त असलेले नरकाचे द्वार – ज्याची कुणालाही कल्पना नव्हती – उघडले गेले. त्या द्वारातून काळोखाचा एक लाट आला, ज्यातून थंडगार वारा आणि कुजबुज ऐकू येऊ लागली.

तिन्ही पुस्तके थरथरायला लागली, जणू काही त्यांत कैद केलेल्या शक्ती मुक्त होण्यासाठी धडपडत होत्या. एकामागून एक सैतानी शक्ती सगळीकडे वावरू लागल्या – काळ्या छायांसारख्या, लाल डोळ्यांसारख्या, कुजबुजणाऱ्या आवाजांसारख्या.

द ग्रँड ग्रीमॉइरे ग्रंथाचे रिचवल करताना त्यातील सैतानी मंत्र होस्टला पोजेस करतात हे त्यांना माहीत होते. तरीही चूक झालीच. त्यांनी सुरक्षा कवच म्हणून आखलेले वर्तुळ विस्कळीत होऊन गेले. सगळ्यांना पोजेस झाले. फादर एल्विस आणि सिस्टर एग्नेस यांनी प्रचंड इच्छाशक्तीने स्वतःला सावरले, पोजेशनमधून बाहेर काढले आणि त्या सैतानी शक्तींना स्वतःच्या अधीन करण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्या शक्तींनी त्या दोघांच्या व्यतिरिक्त बाकी सर्व अनुयायांचा बळी घेतला होता. तळघरात सर्व अनुयायांचे मृतदेह उखरले पडले होते – डोळे उघडे, चेहरे विकृत, जणू काही आतून काहीतरी त्यांना खाऊन टाकले होते.

आणि अनेक भटकते आत्मे चर्चच्या बाहेर पडले. ते गावभर पसरू लागले, लोकांना झपाटून आपल्या अधीन करू लागले. आता मात्र या दोघांची पंचायत झाली. कारण बाहेर पडलेल्या या असंख्य आत्म्यांना एकत्रित थोपवणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. गावात अराजकता पसरली होती.

******


इकडे हॅलोविनच्याच दिवशी सकाळीच एलिझाबेथच्या पोटात कळा सुरू झाल्या होत्या. तिने तिच्या गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे डोळे मिखाईलसारखे तेजस्वी आणि गहिरे होते. रंग जरी मिखाईलसारखा निमगोरा असला तरी रूप पूर्णपणे एलिझाबेथचे घेऊन ते मूल जन्माला आले होते – तिच्या नाकाचा आकार, ओठांचा वळण, आणि तिच्यासारखीच शांत मुद्रा. एलिझाबेथची सुईण तिची डिलिव्हरी करून निघून गेली होती. घरात कोणी बाईमाणूस हवी म्हणून टॉनी आपल्या आंटीला आणायला तिच्या गावी गेला होता.

मिखाईल आणि एलिझाबेथ दोघेही खूप आनंदी होते. त्यांचे प्रेमाचे वर्तुळ आता पूर्ण झाले होते. एलिझाबेथ आनंदी झाली होती कारण ती आई झाली होती. ती बाळाला जवळ घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत राहिली, जणू काही जगातील सगळे दुःख दूर झाले होते.

दोघेही दिवसभर आनंदातच होते. मिखाईल बाजारात थोडे रेशन आणि बाळासाठी आवश्यक वस्तू आणण्यासाठी गेला होता. एलिझाबेथ एकटीच घरात बाळाला घेऊन बसली होती. ती बाळाला स्तनपान करवताना मनातून कुठेतरी खट्टू होती. कारण या आनंदात तिच्या बहिणी आणि तिची आई तिच्या बरोबर नव्हत्या. तिला एकटीला वाटत होते की हे सगळे सुख अपूर्ण आहे.

तितक्यात तिला एलिनाने दिलेल्या एका ग्रंथाची आठवण झाली. तिने हळूच आपल्या कपाटातून ते पुस्तक काढले. **'फिफ्टीसिक्स डीमन्स ऑफ हेल'** – डीमन्स ऑफ हेल. तिने किंचित हसत पुस्तक चाळले. हे पुस्तक छप्पन्न नरकातील डीमन्सचे रिचवल्स सांगणारे होते, ज्यांची चेटकीणींच्या साम्राज्यात पूजा व्हायची. प्रत्येक डीमन्सचे नाव, त्याचे चिन्ह, त्याला आवाहन करण्याचा मंत्र – सगळे तपशीलवार लिहिलेले होते.

अचानक तिला एलिनाचा आवाज आला, जणू कानीशी कुजबुजत. "जेव्हा सगळे दारे बंद होतील तेव्हा तुझ्या मुलाला एकाकडे सोपव." तिने आजूबाजूला पाहिले, कुणीही नव्हते. तेवढ्यात दरवाजात कुणी येत होते. तिने वाकून पाहिले – मिखाईल होता. लगेच तिने पुस्तक कपाटात लपवले आणि बाहेर आली.

मिखाईल आत आला तोच गोंधळलेल्या अवस्थेत होता. जणू काही त्याने भयानक भूत पाहिले असावे, असा त्याचा चेहरा झाला होता. डोळे मोठे, घामाच्या थेंब, हात थरथरत होते.

"एलिझाबेथ, घराचे दरवाजे आणि खिडक्या लावून घे..." त्याने तिला सांगतच घरचा दरवाजा आणि खिडक्या भराभर बंद करायला सुरुवात केली.

"काय झाले मिखाईल? नीट सांगशील? आणि तू इतका घाबरलेला का आहेस ते तरी सांग..." तिने मिखाईलच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, तिच्या आवाजात काळजी होती.

"संपूर्ण गावात लोकं विचित्र वागू लागली आहे. एकमेकांना मारू लागली आहेत. काहीजण अचानक ओरडू लागले, डोळे लाल झाले, आणि मग ते स्वतःच्या जवळच्यांनाच हल्ला करू लागले. नक्कीच काही विचित्र घडलंय..." त्याने बाजारात घडलेल्या भयावह गोष्टी सांगितल्या – लोक कसे पळत होते, कसे एकमेकांना चावत होते, कसे आकाशाकडे पाहून किंचाळत होते.

ते बोलत असतानाच त्यांच्या घरावर कावळ्यांचा थवा उतरला आणि काव काव करू लागला. एलिझाबेथने झडपेतून बाहेर पाहिले. ऐन दुपारी ढग दाटून आले होते, सूर्य लपला होता, आणि वातावरण एकदम नकारात्मक, भयानक झाले होते. हवा थंड आणि जड झाली होती.

"ही केरोचंमँसीची जादू आहे. कुणीतरी ग्रीमॉइरेचे मंत्र जागृत केले आहेत. कळत नकळत किंवा जाणूनबुजून. त्यामुळे सर्व मृत आत्मे जागृत झाले आहेत. सैतानी शक्तींची प्रबळता वाढून नरकाचा दरवाजा उघडला गेला. म्हणजे या गावातच पृथ्वी आणि नरकाचा येण्यासाठी एक जागा आहे. आता हे आत्मे सर्वांना आपल्या काबूत घेतील..." एलिझाबेथ डोळे मोठे करून म्हणाली, तिच्या आवाजात भीती आणि निश्चय दोन्ही होते.

"म्हणजे तुला काय म्हणायचे आहे?" मिखाईल तिच्याकडे आश्चर्यकारक पद्धतीने पाहत म्हणाला.

एलिझाबेथने शांतपणे समजावले, "जगात आठ ग्रंथ आहेत ज्यामार्गे सैतानी शक्तींशी संवाद करता येतो. त्याला डेव्हिल रिचवल्स म्हणतात. त्या रिचवल्सला केरोचंमँसी म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे द ग्रँड ग्रीमॉइरे. पृथ्वीवर त्याची एकच प्रत आहे, जी हजारो वर्षांपासून देवाचे पोप यांच्या कडे लपवून ठेवली जाते. ती प्रत आता व्हॅटिकनमधील चर्चमध्ये अनेक मंत्रांनी निष्क्रिय करून अनेक पेट्यांमध्ये बंद करून ठेवली आहे. कारण ते पुस्तक भयंकर आहे. त्या ग्रंथाद्वारे सर्व पारलौकिक शक्ती जागृत होतात. पण त्याचबरोबर एक श्राप आहे.  तो ग्रंथ वाचताना त्यातील आत्मे होस्टला पोजेस करतात. आणि सगळीकडे पसरून समोर जो येईल त्याला पोजेस करून त्याचा बळी घेतात. कुणीतरी त्यातील काही मंत्र मिळवून रिचवल केले आहे. आणि तो ही पोजेस आहे. यांना थांबवले पाहिजे. नाहीतर संपूर्ण गाव मृतदेहाने भरून पोजेस आत्म्यांच्या अंमलाखाली येईल."

तिने एकदम आपल्या पेटीकडे धाव घेतली आणि तिची जादुई छडी घेऊन बाहेर जाऊ लागली.

"एलिझाबेथ, तू वेडी आहेस का? तू आताच बाळंत झालीस. तू ओली बाळंतीण आहेस, ते तुला लगेच पोजेस करतील..." मिखाईलने तिला थांबवले, त्याच्या आवाजात भीती आणि प्रेम दोन्ही होते.

"मला बाहेर जावे लागेल. आम्ही छप्पन्न डीमन्सच्या पूजारणी आहोत. डीमन्स वाईट नसतात. ते मदत करतील..." एलिझाबेथ त्याला समजावून सांगू लागली, तिच्या डोळ्यात निश्चय दिसत होता.

"फादर आणि निकोबेल संध्याकाळपर्यंत येतील. ये, यातून मार्ग काढतील..." मिखाईल तिला समजावू लागला.

"तो पर्यंत वेळ निघून जाईल. वाईट आत्म्यांनी आक्रमण केले आहे. माझी चिंता करू नकोस. मी कुणाचे वाईट करत नाही. परमेश्वर माझे वाईट होऊ देणार नाही..." एलिझाबेथ आपल्या जादुई छडीला घट्ट धरून बाहेर पडली, तिच्या मागे बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता, पण ती थांबली नाही.