द पेमॉन (भाग १६)
एलिझाबेथने आपल्या नवजात शिशूला मिखाईलच्या हातात सांभाळून दिले आणि त्याला घराच्या आत सुरक्षित ठिकाणी ठेवले. मग ती धावत बाहेर आली. बाहेरचा नजारा भयानक होता. रस्त्यावर, घरांच्या आसपास, प्रत्येक ठिकाणी नरकातील सैतान लोकांच्या शरीरात शिरले होते. ते लोकांच्या जीवनशक्तीला खेचून घेत होते. रक्त, मज्जा, श्वास, आयुष्य सगळे. जणू काही त्यांच्या आत्म्यांना चिरडून त्यातून नवे जीवन ओढत होते. कित्येक लोक निव्वळ हाडांचा सांगाडा होऊन जमिनीवर पडले होते, त्यांचे डोळे रिकामे, चेहरा विकृत. ही सगळी डीमन्सची प्रचंड सैना होती, जी सिस्टर एग्नेस आणि फादर एल्विस यांच्या मूर्खपणामुळे या जगात मुक्त झाली होती. त्यांच्या चुकीच्या विधीमुळे नरकाचे दरवाजे उघडले गेले होते आणि आता हे भयंकर प्राणी मुक्त संचार करत होते.
आकाशाकडे पाहताच एलिझाबेथला धक्का बसला. आकाश काळे झाले होते आणि त्यातून हजारोच्या संख्येने रेवन बर्ड्स काळे, भयंकर पक्षी जमिनीच्या दिशेने वेगाने येत होते. त्यांचे पंख फडफडताना मृत्यूचे सावट निर्माण होत होते. एलिझाबेथने शांतपणे आपल्या गळ्यातील माळ काढली. ती माळ एनाबेलाने तिला दिलेली होती, ज्यात प्राचीन शक्ती सामावलेली होती. तिने ती बाजूला ठेवली आणि डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला.
"रूपपरिवर्तन स्वरूपदर्शन प्रकटम दृश्य..."
तिच्या शब्दांसोबतच तिच्या शरीरात एक प्रचंड बदल घडू लागला. आतापर्यंत नाजूक, मोहक आणि स्त्रीसुलभ दिसणारी एलिझाबेथ आता क्रूर, भयंकर आणि डीमॉनिक स्वरूपात बदलली. तिचे केस हवेत उडत लालभडक झाले, जणू रक्ताच्या लाटा. डोळे रक्ताळले, त्यातून आग बाहेर पडत होती. तिचे चेहर्यावर एक भयानक हास्य उमटले. तिने स्वतःभोवती एक जोरदार गिरकी घेतली. त्याच क्षणी तिच्या पायाखाली एक प्रचंड हवेचे वावटळ निर्माण झाले—ते वावटळ इतके शक्तिशाली होते की आसपासची झाडे, धूळ, कचरा सगळे त्यात खेचले जाऊ लागले.
वादळावर स्वार झालेल्या एलिझाबेथने आपली जादुई छडी उचलली आणि ती रेवन बर्ड्सच्या दिशेने वळवली. तिच्या ओठांवरून मंत्र बाहेर पडला.
"हिंडोशीट मॉरिया डिकॉर्डि बोरिया मिकथनरसा..."
तिच्या छडीतून एक तेजस्वी प्रकाशपुंज बाहेर पडला. तो प्रकाश तिला व्यापून गेला आणि तिच्या खालील वावटळात विजांचा कडकडाट झाला. आकाशातून विजा कोसळू लागल्या. सगळे रेवन बर्ड्स त्या वावटळात खेचले गेले. त्यांचे पंख तुटले, शरीर जळले आणि ते मृत होऊन जमिनीवर कोसळू लागले. जमीन काळी पडली, पक्ष्यांच्या मृतदेहांनी भरून गेली.
एलिझाबेथने थांबले नाही. तिने छडी आकाशाकडे उचलली आणि जोरात म्हणाली.
"हे आत्म्यांच्या राज्याच्या पवित्र रक्षकांनो, आणि त्यांना शिक्षा देणाऱ्या निर्दोष डीमन्स आणि त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखवणाऱ्या स्वर्गदूतांनो., मी तुम्हाला विनंती करते आणि आदेश देत, या सगळ्या भटकलेल्या आत्म्यांना परत खेचून घ्या!"
तिच्या शब्दांसोबतच तिने आणखी एक मंत्र उच्चारला
"डिकारी डोकामीनी मग्रूएस निवस्ता टेंगरिया स्पिरीट ओरगियाss."
त्याच क्षणी आकाशात एक विद्यूतलहर उठली. ती लहर आकाशाला भिडली आणि तिथे एक मोठे गोलाकार मंडल तयार झाले. ते मंडल प्रकाशमान होते, जणू स्वर्गाचा दरवाजा. एलिझाबेथने केरोचोमेंसीचा मंत्र म्हणत सर्व भटकलेल्या आत्म्यांचे आवाहन केले. ते आत्मे तिच्याकडे खेचले जाऊ लागले. पण ते चवताळले होते. त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला काळ्या छायांनी तिला वेढले, ओरडले, खेचले.
पण एलिझाबेथची जादुई शक्ती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी शक्तिशाली होती. ती एकेक आत्म्याला आपल्या छडीच्या शक्तीने पकडत होती आणि त्यांना त्या आकाशातील मंडलात ढकलत होती. प्रत्येक आत्मा मंडलात गेल्यावर प्रकाशात विलीन होत होता.
पण नरकातून काही शक्तिशाली डीमन्स बाहेर आले होते. ते सामान्य आत्म्यांसारखे नव्हते. त्यांचे शरीर विशाल, डोळे अग्नीचे, हातात काळ्या आगीच्या तलवारी. त्यांनी एलिझाबेथवर थेट हल्ला चढवला. आकाशातून अग्नीचे गोळे येऊ लागले, जमीन हादरू लागली.
जवळपास संध्याकाळ झाली होती. एलिझाबेथ एकटीच या प्रचंड सैन्याशी लढत होती. तिच्या शरीरातून घाम येत होता, श्वास धाप लागत होती. बाळंतपणानंतर अवघे सात आठ तास उलटले होते. तिची शक्ती हळूहळू कमी होत होती. डीमन्स शिरजोर होत होते. त्यांचे हल्ले ती परतवून लावत होती, पण प्रत्येक हल्ल्यात अग्नीचे स्फोट होत, निखारे उडत होते. तिच्या शरीरावर जखमा होत होत्या, रक्त येत होते. ती खाली कोसळण्याच्या बेतात होती.
तितक्यात आकाश फाटले आणि एक प्रचंड प्रकाश झाला. त्यातून सात स्वर्गाचे राजे मिथाईल, रोफेईल, जिब्राईल, तुरीईल, शामुईल, रोगुईल, जोफ्रिईल, सोनेरी पंख पसरून खाली उतरले. त्यांच्या सोनेरी तलवारींचा प्रकाश इतका तेजस्वी होता की डीमन्स मागे सरकले. सात राजांनी एकाच वेळी वार केले. प्रकाशाच्या लाटा डीमन्सवर पडल्या आणि ते लांब फेकले गेले. त्यांच्या सोबत तीनशे साठ स्वर्गदूत प्रकाशावर आरूढ होऊन उतरले. ते सर्व दृष्ट आत्म्यांवर, डीमन्सवर तुटून पडले. काही क्षणांतच सर्व डीमन्स नरकात परत ओढले गेले. लोकांच्या शरीरातील पोजेशन नष्ट झाले. लोकांचे डोळे उघडले, ते धक्क्यातून बाहेर पडले.
एलिझाबेथ थकून खाली कोसळली. तिच्या डोळ्यांत अंधूकपणा आला.
तेवढ्यात फादर निकोबेल धावत आले. ते वेळेवर पोहोचले होते. त्यांनी आर्ट सोईगाच्या मंत्रांनी स्वर्गदूतांना आमंत्रित केले आणि अरिष्ट परतवले. त्यांनी एलिझाबेथला उचलले आणि घरात नेले. आत आलेले लोक हक्केबक्के होऊन तिला पाहत होते. एलिझाबेथमध्ये जादुई शक्ती आहेत हे पाहून ते थक्क झाले होते. पण शहरात या डीमन्स अटॅकने कित्येकांचे बळी घेतले होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते, हवेत मृत्यूचे वास होते.
एलिझाबेथ जेव्हा जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती. तिचे बाळ पाळण्यात शांत झोपले होते. मिखाईल तिच्या जवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रिपी, रहस्यमय हास्य होते.
"कशी आहेस आता, एलिझाबेथ?" त्याने हळू आवाजात विचारले.
"मी आता ठीक आहे. सगळे डीमन्स आणि आत्मे गेले ना?" तिने बेडवर बसत आपली माळ गळ्यात घालत विचारले. तिचा आवाज अजूनही कमजोर होता.
"हो, सगळे नीट झाले. ऐन वेळी फादर निकोबेल आला. त्याने सोईगा तंत्रचा वापर केला. ग्रँड ग्रीमॉइरेच्या पोजेशनला फक्त सोईगा तंत्रच तोडू शकते. ते मानवजातीला कठीण असते. पण निकोबेल महान बिशप आहे. त्याने उत्तम प्रकारे वापर करून डीमन्सला परत पाठवले आणि नरकाचा दरवाजा बंद केला. जो त्याच चर्चमध्ये आहे. तू खरंच महान जादूगारणी आहेस. तू एकटीने आत्म्यांच्या दरवाजाला उघडून त्यांना कमजोर केलेस. नाहीतर सोईगा तंत्र कामी आले नसते. मदर मीरिंडाने तुला उत्तम प्रशिक्षित केले आहे." मिखाईल हसत म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
"तुला एवढे सगळे कसे माहीत, मिखाईल?" तिला त्याच्या शब्दांनी धक्का बसला. कारण जादू बद्दल त्याला काहीच माहीत नव्हते. तिने ही कधीच सांगितले नव्हते.
"ते महत्त्वाचे नाहीये. तू खूप मोठी चूक केली आहेस. तू मानवजातीला वाचवण्यासाठी लढलीस. पण मानव खूप मतलबी असतो. ते स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याच मदत करणाऱ्याला फासावर लटकवतात. जीजस याचे उत्तम उदाहरण आहे. तू जी मदत केलीस, त्याची शिक्षा तुला नक्कीच भेटेल बघ." मिखाईल हसत हसत मागे सरकला. त्याचे हास्य आता भयानक वाटू लागले.
"तू काय म्हणतोयस? मला काहीच कळत नाहीये." ती घाबरून त्याच्या मागे गेली. पण आत कुणीच नव्हते. फक्त समोरचा आरसा उभा होता. तिने आरशात पाहताच दचकली.
आरशावर एक निशाण उमटले होते. ते लॉर्ड लुसिफरचे निशाण होते. नरकाचा अनधिकृत सम्राट. तो मिखाईलच्या रूपात येऊन तिला सूचना देऊन गेला होता.
एलिझाबेथच्या मनात भीती आणि संभ्रम एकत्र आले. ती बाळाकडे पाहत बसली, पण आता तिला कळले होते. खरा लढा अजून संपलेला नव्हता. तो नुकताच सुरू झाला होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा