Login

द पेमॉन (भाग 17)

मानवी सैतान
पेमॉन...!! (भाग १७)

एलिझाबेथ एकटीच या प्रचंड सैन्याशी लढत होती. तिच्या शरीरातून घाम येत होता, श्वास धाप लागत होती. बाळंतपणानंतर अवघे सात आठ तास उलटले होते. तिची शक्ती हळूहळू कमी होत होती. डीमन्स शिरजोर होत होते. त्यांचे हल्ले ती परतवून लावत होती, पण प्रत्येक हल्ल्यात अग्नीचे स्फोट होत, निखारे उडत होते. तिच्या शरीरावर जखमा होत होत्या, रक्त येत होते. ती खाली कोसळण्याच्या बेतात होती.

तितक्यात आकाश फाटले आणि एक प्रचंड प्रकाश झाला. त्यातून सात स्वर्गाचे राजे मिथाईल, रोफेईल, जिब्राईल, तुरीईल, शामुईल, रोगुईल, जोफ्रिईल, सोनेरी पंख पसरून खाली उतरले. त्यांच्या सोनेरी तलवारींचा प्रकाश इतका तेजस्वी होता की डीमन्स मागे सरकले. सात राजांनी एकाच वेळी वार केले. प्रकाशाच्या लाटा डीमन्सवर पडल्या आणि ते लांब फेकले गेले. त्यांच्या सोबत तीनशे साठ स्वर्गदूत प्रकाशावर आरूढ होऊन उतरले. ते सर्व दृष्ट आत्म्यांवर, डीमन्सवर तुटून पडले. काही क्षणांतच सर्व डीमन्स नरकात परत ओढले गेले. लोकांच्या शरीरातील पोजेशन नष्ट झाले. लोकांचे डोळे उघडले, ते धक्क्यातून बाहेर पडले.

एलिझाबेथ थकून खाली कोसळली. तिच्या डोळ्यांत अंधूकपणा आला.

तेवढ्यात फादर निकोबेल धावत आले. ते वेळेवर पोहोचले होते. त्यांनी आर्ट सोईगाच्या मंत्रांनी स्वर्गदूतांना आमंत्रित केले आणि अरिष्ट परतवले.

आजची रात्र एकदम अफरातफरीचीच गेली. संपूर्ण कोको गावात एकच हल्लोकोळ माजला होता. रात्रीच्या अंधारात अचानक पसरलेल्या काळ्या धुरासारख्या सावल्या, त्या सावल्यांतून येणारे विचित्र गुरगुरणे, आणि मग एका क्षणात शेकडो लोकांचे जीव गेले होते. निव्वळ जीवच गेले नव्हते तर त्यांच्या शरीराची एखादे ओले कापड पिलून काढावे तसे त्यांचे शरीर शोषून घेतले होते रक्त, मांस, हाडे सगळे काही जणू कोरड्या वाळूच्या कणासारखे उडून गेले होते. फक्त रिकाम्या कवट्या आणि कपडे पडलेले राहिले होते. त्यांनी पहिल्यांदाच असल्या प्रकारचा सैतानी अनुभव घेतला होता. जणू पाताळातून थेट नरक उघडला गेला आणि त्याने गावावर हल्ला केला. जे वाचले होते ते आपल्या आप्तांचे अंतिमसंस्कार करून घेत होते. रडण्याचा, ओरडण्याचा, आणि प्रार्थनांचा एकच गोंधळ माजला होता. पण सगळेच लोकं मात्र एलिझाबेथला दुवा देत होते. कारण तिच्यामुळे गावावरचे संकट टळले होते. तिने जे केले ते कोणीही समजू शकत नव्हते, पण परिणाम स्पष्ट होता – उरलेले लोक जिवंत होते.

इथे चर्चमध्ये मात्र वेगळेच वातावरण होते. मुख्य फादर रागाने तडफडत होते. त्यांच्या डोळ्यात रक्त आले होते, हात थरथरत होते. त्यांनी तातडीने आपला संदेशवाहक इटलीमध्ये पोप जवळ रवाना केला. घोड्यावर बसवून, रात्रभर धावत जाण्याचे आदेश दिले. कारण जे कोणी हे कृत्य केले होते त्यांना ते कठोरतील कठोर शिक्षा देणार होते. कारण डीमन्सचे सैन्य आणि पाताळातला दरवाजा खुलला गेला होता. थोडक्यात निभावले होते. नाहीतर आतापर्यंत संपूर्ण कोको गावच नाही तर संपूर्ण अमेरिका खंड डीमन्सच्या अंमलाखाली असता. यातील दोषींला फक्त आणि फक्त मृत्युदंडच देण्यात यावा या निर्णयावर बिशप्स टीम पोहचली होती. चर्चच्या खोल दालनात दिवे मंदावले होते, क्रॉसवर सावल्या पडत होत्या, आणि फादरच्या मनात फक्त एकच विचार होता. हे पाप कधीच माफ होणार नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच फादर एल्विस सिस्टर एग्नेसला भेटायला एबीमध्ये गेले. एका दालनात सिस्टर एग्नेस आणि फादर एल्विस चिंताग्रस्त होऊन बसले होते. दालनात फक्त एकच मेणबत्ती जळत होती, बाहेरून येणारा समुद्राचा आवाज ऐकू येत होता, पण आतली शांतता भयानक होती.

"आपल्या कडून खूप मोठी चूक झाली. आपल्याला ग्रँड ग्रीमॉइरेच्या रिचवल्स बद्दल पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. त्यातील डीमन्स होस्टचाच बळी घेतात. पण प्रत्येक मंत्रा बरोबर त्यातील डीमन्स शक्ती पृथ्वीवर अवतारीत होते. ते फक्त एकदा बोलावले की मग ते परत जात नाहीत . ते राहतात, शोषतात, आणि वाढतात." फादर एल्विस हात चोळत धीम्या आवाजात म्हणाले. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब होते.

"पण आपण वाचलो. आणि आपल्या जवळ डीमन्सला वश करण्याची पावर आली आहे हे विसरु नकोस एल्विस. आता आपण त्यांचे स्वामी आहोत. ही शक्ती आपण वापरू शकतो. चर्चसाठी, जगासाठी." एग्नेस बाजूच्या फादरकडे रोख करून म्हणाली. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती.

"ते आहेच, पण किती लोकांचे बळी गेलेत माहीत आहे का. शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. ती एलिझाबेथ होती म्हणुन वाचले नाहीतर काय झाले असते. तिने जे केले... ते आपण करू शकलो असतो का?" फादर एल्विस घामळलेल्या हातांना चोळत म्हणाले.

"इट्स ओके एल्विस, अश्या शक्ती मिळवण्यासाठी काही सेकरिफाईज करावेच लागतात. इतिहास सांगतो की मोठ्या यशासाठी नेहमीच किंमत चुकवावी लागते." एग्नेस बेफिकीरपणे म्हणाली. तिच्या आवाजात पश्चात्ताप नव्हता.

"आता त्या शक्तीचे काय करणार? उद्या सकाळी व्हॅटिकन मधून चान्सलरची टीम येईल. आणि दोषींना मृत्युदंड देणार आहे. आणि तुलाही माहीत आहे दोषी कोण आहेत? आपण दोघे... आपणच." फादर एल्विसच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. त्याने डोके खाली घातले.

"एल्विस, एलिझाबेथने लोकांना वाचवले हे सत्य आहे. पण एक गोष्ट विसरलास की ती विच आहे. आणि तिला कालच मुलगी झालीय. हॉलोविनच्या दिवशींच... अशा रात्री जन्मलेला मुल सामान्य नसते. त्याच्यात काहीतरी आहे. कदाचित डिमन चीच छाप." एग्नेस फादर एल्विसचा चेहरा हातात धरुन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. तिच्या शब्दांत एक रहस्यमय आकर्षण होता.

*****

सकाळी एलिझाबेथ आपल्या मुलाला दूध पाजत होती. छोटा जीव तिच्या छातीला चिकटून शांत होता. मिखाईल घर आवरत होता भांडी धुणे, मजला पुसणे, सगळे काही. आंटीची तब्येत खराब होती म्हणून ती चार दिवसांनी येणार होती. त्यामुळे मिखाईल बोटींवर गेला नव्हता. घरात फक्त त्यांचा शांत श्वास आणि बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज.

"मिखाईल मी करेल रे सगळे. तु कामावर जा बरं. चार दिवसात टॉनी आणि आंटी येतील ना. आणि मी करू शकते माझे. आधीच आपल्याला पैशांची कमतरता आहे. त्यात हे बाळ. जरा तरी प्रॅक्टिकल वाग." एलिझाबेथने तिच्यासाठी काढा बनवला होता तो घेत ती म्हणाली. तिच्या आवाजात काळजी होती.

"माझी बायको कालचे प्रताप करून थकली आहे त्यामुळे मला काळजी घ्यावीच लागेल. सगळीकडे तुझी लोक वाहवाह करत आहे. आणि माझा मुलगा माझ्या सारखाच समुद्राचा राजा होईल बघ." त्याने बाळाला हातात घेत त्याचे चुंबन घेतले. बाळ त्याला पाहून हसत होते. त्याचे छोटे हात मिखाईलच्या दाढीला स्पर्श करत होते.

टॉनी मिखाईलचा लहान भाऊ आणि बाळाचा काका याचा त्या बाळावर खूप जीव होता. टॉनी नेहमी म्हणायचा, "ही माझी राजकुमारी आहे. मी तिला समुद्राचे सगळे रहस्य शिकवेन."

"आता टॉनी आला तर आपल्या वाट्याला कमी आणि त्याच्याच वाट्याला बाळ जाईल बघ. याचे नाव तोच ठेवेल असे आधीच त्याने बजावले आहे." एलिझाबेथ हसत म्हणाली. तिच्या डोळ्यात आनंद होता.

"आता अर्ध्या दिवस तरी तु बोटीवर जा प्लिज. आंटी येतील. थोडे पैसे हवेत जवळ. असे करून चालणार नाही. बाकीचे मी आवरते." तिने बाळाला जवळ घेतले. बाळ झोपायला आले होते. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते.

घरावर कुणाची थाप पडली. "मिखाईल आणि लेडी एलिझाबेथ आहेत का. आम्ही चर्च मधून आलोय. तुम्हाला आताच्या आत्ता चर्च मध्ये बोलावले आहे." बाहेरून आवाज आला. ते चान्सलरचे माणसे होते – काळे पोशाख, कठोर चेहरे.

"बाळ एक दिवसाचेच आहे. त्याला बाहेर नेता येणार नाही. माझी पत्नी राहील जवळ. कारण आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. हवं तर मी येतो." मिखाईलने त्यांना समजावून सांगितले.

त्यांनी आत डोकावून पाहिले आणि संमतीने डोके हलवुन त्याला बरोबर येण्याची संमती दिली.

"एलिझाबेथ मी लवकरच येतो. देव आपल्या बरोबर आहे. तु लोकांसाठी लढलीस त्यामुळे ते लोकं तुला बक्षीसच देईल. सगळा गाव तुझ्यापाठी आहे." मिखाईलने तिला एक चुंबन दिले आणि त्यांच्याबरोबर गेला.

एलिझाबेथ घरी एकटीच होती. बाहेर कुणीही नव्हते. बहुतेक गावातील सगळे लोकं चर्चमध्ये गेले होते. व्हॅटिकनचे चान्सलर काय डीसीजन घेतात. आणि आरोपी कोण आहे हे ही त्यांना पहायचे होते. कारण गावकरी जाम भडकले होते. सगळ्या घरातून कुणी तरी मेले होते. त्यांना सूड हवा होता. हवा थंड होती, पण तिच्यात एक विचित्र उब होती . जणू काही नवीन सुरुवात होत होती. किंवा एखाद्या नव्या संकटाची.


0

🎭 Series Post

View all