Login

द पेमॉन (भाग 18)

Linana Tasaa Jedan Paimon

द पेमॉन भाग १८


चर्चच्या वातावरणात आज एक वेगळीच गंभीरता पसरली होती. मुख्य प्रवेशद्वारापासून आत येऊन मुख्य हॉलमध्ये पोहोचताच, जुन्या लाकडी खुर्च्या रांगेत मांडल्या गेल्या होत्या. दिव्यांच्या मंद प्रकाशात सगळ्यांचे चेहरे गंभीर दिसत होते.

मुख्य फादर डिकॉस्टा आणि व्हॅटिकनमधून आलेले पोपचे प्रतिनिधी फादर अँथनी यांच्या समोरच्या उंच खुर्च्यांवर बसले होते. त्यांच्या बाजूला जवळच्या प्रमुख चर्चमधील इतर महत्त्वाचे फादर्स बसले होते . फादर मार्क, फादर जोसेफ, बिशप थॉमस आणि बिशप लॉरेन्स. चान्सलरची टीम तीन सदस्यांची एका बाजूला बसली होती, त्यांच्या हातात कागदपत्रे आणि बायबल होती.

चर्चचे ब्रदर्स, सिस्टर्स, बिशप्स आणि गावातील सगळे लोक जे कालच्या भीषण हल्ल्यातून वाचले होते. हॉलमध्ये गर्दी करून उभे होते. हवेत धूप आणि जळलेल्या मेणबत्त्यांचा वास पसरला होता.

फादर एल्विस, सिस्टर एग्नेस आणि फादर निकोबेल हे तीनही समोरच्या रांगेत उभे होते. एल्विसचे डोके खाली घालून होते, एग्नेसचे डोळे लाल झाले होते आणि निकोबेल शांतपणे सगळे निरीक्षण करत होते.

फादर डिकॉस्टा उठले. त्यांचा आवाज हॉलमध्ये घुमला.

"प्रिय बंधू-भगिनींनो, काल रात्री जो प्रकार घडला तो खरोखरच अत्यंत वाईट आणि धक्कादायक होता. कोको गावातील अनेक निष्पाप जीव हे डीमन्सच्या हल्ल्यात मारले गेले. त्यांच्या शरीरातून त्यांचे आत्मे क्रूरपणे शोषले गेले. आमच्या या पवित्र चर्चलाही मोठे नुकसान झाले. काही ब्रदर्स आणि सिस्टर्स सेवेकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला साधारण नव्हता... हे एक सुनियोजित, शक्तिशाली आक्रमण होते. आज आपण सर्वजण मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराकडे त्यांच्या आत्म्यांसाठी करुणा मागतो. आमेन."

सगळ्यांनी डोके खाली घालून 'आमेन' म्हटले. काही स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू आले.

मग पोपचे प्रतिनिधी फादर अँथनी उठले. त्यांचा आवाज ठाम होता.

"फादर एल्विस, काल रात्री चर्चमध्ये मुख्य कारभार तुमच्याकडे होता. तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार होता. कृपया सविस्तर सांगा, नक्की काय घडले?"

फादर एल्विस पुढे आले. त्यांचा आवाज थरथरत होता.

"सर, मी नेहमीप्रमाणे रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी चर्चच्या मुख्य वेदीसमोर उभा होतो. सिस्टर एग्नेस माझ्याबरोबर होत्या. अचानक एक वेगळीच नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. जणू हवेत विषारी धूर पसरला होता. आकाश अचानक काळे पडले. मग हजारो रेवन बर्ड्स. कावळ्यांसारखे काळे पक्षी आकाशातून गावाच्या दिशेने धावले. त्यांच्या मागून एक मोठे पोर्टल उघडले. आत्म्यांचे पोर्टल. त्यातून मानवी रक्ताने माखलेले, क्रोधित आत्मे भरभर खाली येऊ लागले. ते डीमन्स होते. अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर. मी ताबडतोब सगळ्यांना अलर्ट केले. आम्ही क्रॉस, पवित्र पाणी आणि प्रार्थना वापरून त्यांच्याशी लढलो. पण ते खूप होते. आम्ही जखमी झालो, पण आम्ही थांबलो नाही."

एल्विसचे बोलणे संपताच हॉलमध्ये शांतता पसरली. फादर निकोबेल मधेच बोलू लागले.

"पण हे इतके सोपे नाही. डीमन्स रिच्युअल्स नुसार, कुणी स्वतःहून समन्स केल्याशिवाय एकाच वेळी असे हजारो डीमन्स येऊ शकत नाहीत. नेहमी एक डीमन्स एका होस्टच्या शरीरातून येतो. हे वेगळे आहे. यात निषिद्ध, प्राचीन आणि चर्चने हजारो वर्षांपासून बंदिस्त केलेल्या गोष्टींचा वापर झाला आहे. आणि त्या गोष्टी फक्त चर्चच्या आतील ग्रंथागारातून किंवा व्हॅटिकनच्या गुप्त खोल्यांतूनच शक्य आहेत."

निकोबेलचे बोलणे ऐकून हॉलमध्ये कुजबुज सुरू झाली. फादर्स एकमेकांकडे पाहू लागले. बिशप्स चिंतेत दिसले.

चान्सलरच्या प्रतिनिधीने म्हणजे फादर व्हिक्टरने जोरात म्हटले,

"फादर निकोबेल, तुम्ही नक्कीच विद्वान आहात. तुम्ही योग्य वेळी डीमन्सला पाताळात परत पाठवले, याबद्दल तुमचे कौतुक आहे. पण तुमचे हे विधान... यामुळे लोकांचा चर्चवर आणि परमेश्वरावरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमच्याकडे याचा ठोस पुरावा आहे का?"

निकोबेल शांत राहिले. त्यांच्याकडे पुरावा नव्हता. ते घटना घडताना तिथे नव्हते.

तेव्हा सिस्टर एग्नेस पुढे आली. तिचा आवाज शांत पण ठाम होता.

"आदरणीय सभे, लहान तोंडी मोठा घास घेत आहे हे खरे. पण मी यावर बोलू इच्छिते. यामुळे अनेक गोष्टींची साखळी जुळेल."

चान्सलरने मान हलवली. "बोला, सिस्टर. पण पुराव्यासह सांगा."

"गावात एक स्त्री आहे, तिचे नाव आहे एलिझाबेथ. ती विचक्राफ्ट करते हे मी स्वतः पाहिले आहे. ती फक्त सामान्य चेटकीण नाही. ती लिकियन जगातील आहे. लिकियन जग माहीतच असेल. जिथे चेटकिणी, पिशाच्च, व्हॅम्पायर आणि इतर नरकातील प्राणी राहतात. ते सर्व डीमन्स आणि नारकीय देवतांची पूजा करतात. एलिझाबेथ त्या जगातून या मानवी जगात आली आहे, मानवी वेशात राहत आहे. काल संपूर्ण गावाने तिचे खरे लिकियन चेटकीणीचे रूप पाहिले. तिचे डोळे लाल, नखे लांब, शरीरावर केस. ती पूर्णपणे उघड झाली."

एग्नेसने गावकऱ्यांकडे बोट केले. चान्सलरने विचारले, "खरे आहे का?"

सगळ्या गावकऱ्यांनी एकच होकार दिला. "हो.. हो, आम्ही पाहिले!"

"पण याचा डीमन्स हल्ल्याशी काय संबंध?" चान्सलरने विचारले.

"त्याच दिवशी, हल्ल्याच्या काही तास आधी एलिझाबेथने बाळाला जन्म दिला. हे योगायोग नाही. ती सैतानी लिकियन विच आहे. तिने नेलोमला जन्म दिला आहे. एका सैतानाला. मानव आणि सैतानी अंशातून जन्मलेली संतान नेलोमच असते, हो ना फादर? आणि नेलोमच्या जन्मासाठी बलिदान आवश्यक असते. तिने गावातील लोकांचे बलिदान दिले असणार. त्यांच्या आत्म्यांचे. विचांवर कधीच विश्वास ठेवू नये."... फादर एल्विस म्हणाले.

एग्नेस पुढे म्हणाली, "मिखाईलला हे माहीत होते. त्याला कळले होते की ती विच आहे आणि तिच्या पोटी सैतान येणार आहे. तरीही त्याने सर्वांना लपवून तिच्याशी लग्न केले. सैतानाला पृथ्वीवर आणण्यासाठी त्याने हे केले. तोही तितकाच दोषी आहे."

हॉलमध्ये एकच खळबळ उडाली. लोक ओरडू लागले, "फाशी द्या! जाळा तिला!"

चान्सलर आणि बिशप्सनी एकत्र बसून चर्चा केली. निर्णय झाला तो ही एकतर्फी.

एलिझाबेथ आणि तिच्या नवजात बाळाला जिवंत जाळण्याची शिक्षा. मिखाईलला तात्काळ फाशी.

कारण व्हॅटिकनला आणि चान्सलरला कुणाला तरी बळी देऊन या प्रकरणावर पडदा टाकायचा होता. चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवायचे होते. त्यासाठी मिखाईल आणि त्याच्या कुटुंबाचा बळी देणे सोपे होते.

मिखाईलला सैनिकांनी ओढत नेले. तो ओरडत होता, "माझी पत्नी निर्दोष आहे! माझे बाळ निर्दोष आहे!"

फादर निकोबेल धावत त्याच्याकडे गेले. त्याचे डोळे पाण्याने भरले.

"मित्रा... हे काय करताय? ही रडायची वेळ नाही. माझ्या मुलाला वाचव... ते डीमन्स नाही. तो माझ बाळ आहे... प्लिज, निकोबेल... तू माझा मित्र आहेस. काहीतरी कर... त्यांना सांग..."

निकोबेलने मिखाईलच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा गळा दाटून आला .

निकोबलला एलिनाचे शब्द आठवले.

"ब्रदर निकोबेल, डेस्टिनी इशारा देतेय. एलिझाबेथच्या पोटातील मुलाचे मातृत्व भविष्यात तुलाच स्वीकारावे लागेल. तुझ्या हातात तिचे भवितव्य सोपवून जातेय. तुला खूप सांभाळून राहावे लागेल. तुझी परीक्षा होईल. परमेश्वरावरचा विश्वास अढळ आहे. त्याने आधीच सर्व लिहले आहे.". असे एलिना त्याला म्हणाली होती.

"मी प्रयत्न करेन, मित्रा. मी वचन देतो तुझ्या बाळाला मी काहीच होऊ देणार नाही. मी हे थांबवण्याचा प्रयत्न करेन."

पण दोघांच्याही डोळ्यात निराशा होती. चर्चच्या बाहेर रात्रीचे अंधार पसरले होते. आणि आकाशात डेथची सावली दिसू लागली.

संतोष उदमले
0

🎭 Series Post

View all