Login

द पेमॉन (भाग 19)

Lenan Tasa Jedan Paimon

पेमॉन..!! (भाग १९)

निकोबलला एलिनाचे शब्द आठवले.

"ब्रदर निकोबेल, डेस्टिनी इशारा देतेय. एलिझाबेथच्या पोटातील मुलाचे मातृत्व भविष्यात तुलाच स्वीकारावे लागेल. तुझ्या हातात तिचे भवितव्य सोपवून जातेय. तुला खूप सांभाळून राहावे लागेल. तुझी परीक्षा होईल. परमेश्वरावरचा विश्वास अढळ आहे. त्याने आधीच सर्व लिहले आहे.". असे एलिना त्याला म्हणाली होती.

"मी प्रयत्न करेन, मित्रा. मी वचन देतो तुझ्या बाळाला मी काहीच होऊ देणार नाही. मी हे थांबवण्याचा प्रयत्न करेन."

पण दोघांच्याही डोळ्यात निराशा होती. चर्चच्या बाहेर रात्रीचे अंधार पसरले होते. आणि आकाशात डेथची सावली दिसू लागली.

दुपारच्या सुमारास सूर्य माथ्यावर पोहोचला होता, पण त्याचा प्रकाश आज एलिझाबेथच्या घरात प्रवेश करत नव्हता. खोलीत अंधार साचत चालला होता, जणू सावल्या स्वतःच तिच्या मनात रेंगाळत होत्या. ती छोट्या खोलीत येरझाऱ्या घालत राहिली. प्रत्येक पाऊल जड, प्रत्येक श्वास खोल. दाराकडे नजर टाकत ती थांबत होती. तिच्या मनात काहीतरी विचित्र भावना निर्माण होत होती. का माहीत नाही पण मनात एक अनामिक भीती वाटत होती

मिखाईलची वाट पाहत होती. एक एक क्षण तिला दहा क्षणांचा वाटत होता. पण मिखाईलचा पायरी चढण्याचा आवाज येत नव्हता. तिच्या हातातली दुधाची बाटली थंड पडली होती. तिने बाळाला दूध पाजून झोपवले होते.. फक्त बाळाला कुशीत घेऊन ती बसली, बाळाच्या हालचालींना स्पर्श करत. त्या छोट्या ठोक्यांतून तिला मिखाईलचीच आठवण येत होती. पण काहीतरी अघटीत घडले असे वाटत होते.

अचानक घरात एक वाऱ्याची झुळूक आली. संपूर्ण घरात एकच शांतता पसरली, आणि त्या शांततेत एक घातक, मधुर आवाज सतत घुमत राहिला.

"दगा झाला, एलिझाबेथ... तुझ्या प्रेमाला फाशी दिली गेली. तुझ्या विश्वासाला जाळून टाकलं. तुझे मूल... माझं मूल... आता फक्त राख होईल. मला शरण ये. मी तुला सगळं परत देऊ शकतो. मिखाईलला परत आणू शकतो... फक्त एक शब्द उच्चार..."

पेमॉनचा हा आवाज तिच्या कानात साखरेसारखा गोड पण विषासारखा घातक होता. तो तिच्या मनात शिरकाव करत होता, तिच्या दुःखाला हात लावत होता.

एलिझाबेथने डोळे घट्ट मिटले. तिने हात जोडले, शांतपणे प्रार्थना केली.
“परमेश्वरा... मला ताकद दे... मी त्याच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही...” तिने त्या आवाजाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण मिखाईलची अनुपस्थिती तिच्या हृदयाला चिरत होती. प्रत्येक मिनिट जणू तासासारखा जड वाटत होता. तिच्या डोळ्यांत अश्रू साठले, पण ती ते ओघळू दिले नाहीत.

ती स्वतःला सांगत राहिली, “तो येईल... तो नक्की येईल...”

संध्याकाळ झाली. सूर्य डोंगरामागे लपला. आकाश नारिंगी काळे झालं. थंडगार वारा खिडकीतून आत येऊ लागला, पडदे हलवत. तेवढ्यात दारावर हलकीशी थोपट पडली. एलिझाबेथ धावत दार उघडायला गेली, मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटवून. पण दार उघडताच तिची आशा विझली.

समोर फादर निकोबेल उभा होता . पण तो आज पूर्णपणे वेगळा दिसत होता. त्याचे खांदे खचलेले, चेहरा म्लान आणि पांढरा पडलेला, डोळे लाल आणि ओले, हात थरथरत. देहबोलीतून पश्चाताप आणि हतबलता एकाच वेळी ओरडत होती. त्याला पाहताच एलिझाबेथच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा श्वास थांबला.

"ब्रदर... काय झालं? तुझी अशी अवस्था का? मिखाईल कुठे आहे? तो... तो ठीक आहे ना?" तिचा आवाज कंपायमान झाला. तिने प्रश्नांचा भडिमार केला, पण निकोबेल शांतच उभा राहिला. त्याच्या ओठांवरून शब्द निघेनासे झाले होते.

काही क्षण शांततेनंतर त्याने खूप कष्टाने डोळे मिटले, धैर्य एकवटले आणि हळू आवाजात म्हटले,

"मिखाईल... मिखाईल गेला, एलिझाबेथ. चान्सलर टीमने त्याला दोषी ठरवले. त्याला... फासावर लटकावले." बोलताना निकोबेलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तो स्वतःला सावरू शकत नव्हता.

हे शब्द ऐकताच एलिझाबेथच्या शरीरातून विद्युतप्रवाहासारखा धक्का गेला. तिच्या कानात गरम शिसे ओतल्यासारखे झाले. ती एकदम किंचाळली,

"कायsss?! नाही... हे खरं नाही! हे कसं शक्य आहे? त्याचा काय दोष? त्याने काय केलं? सगळं सांग... खरं सांग मला!"

निकोबेलने डोके खाली घातले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गालावरून ओघळू लागले. तो हळूहळू बोलू लागला,

"चर्चच्या बिशप्सच्या टीमने, व्हॅटिकनच्या चान्सलरने आणि काही साक्षीदारांनी एकत्र येऊन तुला ‘विच’ म्हणून घोषित केलं. तुझ्या पोटी सैतानाचा अवतार जन्माला येतोय, असा त्यांचा ठाम निष्कर्ष आहे. म्हणूनच गावावर हे सैतानी संकट आलंय, असं त्यांना वाटतं. मी खूप विरोध केला. मी सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे, की तू निष्पाप आहेस... पण माझा एकट्याचा आवाज त्यांच्या निर्णयाला थांबवू शकला नाही. माझ्यासमोरच... माझ्या डोळ्यादेखत माझ्या मित्राला फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. मी ओरडलो... मी रडलो... मी त्यांच्या पायाशी पडलो... पण ते थांबले नाहीत."

एलिझाबेथची जणू दुनिया कोसळली. ती भिंतीला टेकून खाली बसली. तिच्या हातातून शक्ती गळून गेली होती. तिचे डोळे रिकामे झाले. निकोबेल पुढे बोलू लागला,

"आता व्हॅटिकनचे लोक आणि चर्चचे अधिकारी तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या मागे आहेत. ते तुला जिवंत जाळायला येणार आहेत. मी तुझी जबाबदारी घेतली होती, एलिझाबेथ. म्हणून मी तुझ्या बहिणीकडे संदेश पाठवला आहे. तू बाळाला घेऊन आत्ताच इथून निघ. मी रात्रीच्या अंधारात तुझ्यासाठी मार्ग आणि वाहनाची व्यवस्था करतो. कृपा करून जा... तुझं जीवन वाचव." निकोबेल हात जोडून विनवणी करू लागला, त्याचा आवाज फाटत होता.

एलिझाबेथ हळूच उठली. तिचा चेहरा आता शांत झाला होता, पण तो शांतता मृत्यूच्या आधीची शांतता होती. तिने खोल, स्थिर आवाजात म्हटलं,

"भाऊ निकोबेल... जर मी मनात आणलं तर मी आत्ताच या संपूर्ण गावाला, त्या चर्चसकट जाळून टाकू शकते. कारण परमेश्वराला सत्य माहीत आहे. तो मला रोखू शकत नाही. माझ्या रक्तातली शक्ती... माझ्या रागातली आग... ती सगळी सोडून देऊ शकते. पण... मिखाईल नसेल तर हे सगळं करून मी काय साध्य करणार? मला आता जीवन नको. मी त्या पवित्र येशूच्या नावाने या लोकांना क्षमा करते. त्यांना जे करायचंय ते करू देत. हीच माझी शिक्षा असेल – माहीत असतानाही मी मानवांवर विश्वास ठेवला, त्यामुळे मला हे दुःख भोगावं लागतंय."

तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते. फक्त एक गाढ शून्यता होती. तिने बाळाला कुशीत घेतलं. छोट्या हाताने तिच्या गालाला स्पर्श केला. ती हळूच हसली. ती हास्य मातृत्वाचं होतं, प्रेमाचं होतं, आणि आता त्यात मृत्यूची स्वीकृती मिसळली होती.

"तू जा, फादर. तुझ्यासाठी मी प्रार्थना करते. पण मी इथेच राहणार. मिखाईल जिथे गेला तिथे मीही जाणार."

निकोबेल काकुळतीने म्हणाला, "एलिझाबेथ, विचार कर... तुझ्या बाळासाठी विचार कर. त्याला मृत्यूच्या दाढेत तू घालू शकत नाहीस."

पण तिने हात वर करून त्याला थांबवलं. त्याने तिला जायला सांगितले.
तिला तिची आई मिरांडाचे शब्द आठवले.

"मानवी लोकांवर विश्वास ठेऊ नका. ते आपल्याच रक्तातील लोकांना दगा देतात. त्यांना जर माहीत झाले तर तू एक विच आहेस तर ते तुला जाळून टाकतील. प्रेम वैगेरे तर दुरच्याच गोष्टी आहेत."... मीरिंडा रागाच्या भरात ओरडली."

तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही भीतीचा भाव नव्हता. फक्त प्रेम आणि समर्पण होता. त्याचबरोबर एक गाढ आत्मविश्वास होता. आणि लॉर्ड पेमॉनची श्रद्धा होती . तो माझ्या बाळाला वाचवेल.

तिच्या मनात एक छोटीशी प्रार्थना उमटली, पण ती प्रार्थना येशूची नव्हती... ती पेमॉनची होती. "जर तू खरंच माझ्या बाळाचा रक्षक असशील. तर आता दाखव. मला फक्त इतकंच हवंय. या साठी मी तुला सेक्रिफाइज करते.."

बाहेरून पावलांचा आवाज येऊ लागला.

तिला माहित होते आवाज तिला जाळण्यासाठी येणाऱ्या लोकांचा होता. पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती.

फक्त मिखाईलचं नाव... आणि बाळाच्या रक्षणासाठी हृदयाचा ठोका... दोन्ही एकत्र वाजत होते.


0

🎭 Series Post

View all