पेमॉन ..!! (भाग २०)
सूर्यास्ताच्या लालसर किरणांनी समुद्राच्या पाण्याला रंगवलेले असतानाच, आकाशात काळ्या ढगांचे साम्राज्य पसरू लागले. हळूहळू सूर्य अस्ताला जाऊन रात्रीचा गहन अंधार सर्वत्र पसरला. वाऱ्यात एक विचित्र थंडावा जाणवत होता, जणू निसर्ग स्वतःच काहीतरी भयानक घटनेची चाहूल देत होता. समुद्राच्या काठावर, लाटांच्या गाजावाजात लपलेल्या एका छोट्याशा झोपडीत एलिझाबेथ बसली होती. तिची झोपडी ही केवळ लाकडी भिंती आणि पेंढ्याच्या छपराची नव्हती; ती जणू जादुई रहस्यांनी भरलेली एक गुप्त खोली होती. दोन दिवसांपूर्वीच ती बाळंत झाली होती. तिच्या कुशीत असलेले ते छोटेसे बाळ काळ्याभोर केसांचे, निळसर डोळ्यांचे, आणि दुधात केसर घालून जसा गुलाबी रंग येतो तसा गोरा रंग असलेले एक चमत्कार वाटत होते. तिच्या पांढऱ्या गाऊनमध्ये ती जमिनीवर भेदरलेल्या अवस्थेत बसली होती,
तिचे ते लाघवी हास्य, जे नेहमीच गावकऱ्यांना मोहित करायचे, आता केव्हाच मावळले होते. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, ज्या त्या बाळाच्या गालावर ठिबकत होत्या. ती एकटक त्या मुली कडे पाहत होती, जणू तिच्या डोळ्यांत आणि मनाच्या गाभाऱ्यात तिचे प्रत्येक स्मित, प्रत्येक हालचाल साठवून घेत होती. वेळ निघून जात होता, आणि तिच्या धैर्याचा बांध हळूहळू सुटत चालला होता.
अचानक तिच्या मनात एलेनाचे ते शब्द घुमू लागले "आणीबाणीची वेळ आली की बाळाची जबाबदारी 'त्यांना' सोपव. ते तुझ्या रक्षणासाठीच आहेत."
एलेना ही तिची जरी लहान बहिण होती, पण जी जादू आणि रहस्यांच्या जगात पारंगत होती. एलिझाबेथने डोळे मिटले आणि मनाशी ठाम निश्चय केला. ती उठली, तिच्या पायांत एक विचित्र कंपन जाणवत होते, जणू पृथ्वी स्वतःच तिच्या निर्णयाला प्रतिसाद देत होती. तिने झोपडीच्या कोपऱ्यातील लाकडी कपाट उघडले. आत एक प्राचीन पुस्तक लपलेले होते – 'डीमन्स ऑफ द अंडरवर्ल्ड' नावाचे ते पुस्तक. त्यात चौसष्ठ डीमन्सची छायाचित्रे, त्यांचे प्राचीन मंत्र आणि समर्पणाच्या विधींचे वर्णन होते. हे पुस्तक कधीही नष्ट होत नसे; ते अभिमंत्रित होते, जणू नरकाच्या अग्नीतून जन्मलेले. त्याच्या पानांवर सोनेरी अक्षरे चमकत होती, आणि स्पर्श केल्यावर एक उबदार ऊर्जा शरीरात संचारत गेली.
पुस्तक हातात घेताच एलिझाबेथच्या शरीरात एक विद्युतप्रवाह दौडला. तिने डोळे मिटले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली.
"आयबसेक्रिफाय डीमन्स ऑफ द डार्क... अवेकन!"
प्रत्येक मंत्राने तिच्या शरीरावर तडे जाऊ लागले, जणू तिची शक्ती बाहेर पडत होती. तिच्या त्वचेतून निळसर ज्वाळा बाहेर पडत होत्या, ज्या हवेत मिसळून एक जादुई वातावरण तयार करत होत्या. तिच्या बाळासाठी तिने आपली संपूर्ण शक्ती, आत्मा आणि जीवनाचा सौदा डीमन्सशी केला.
"मी तुझ्या सेवेसाठी माझे सर्व काही देत आहे... माझ्या मुलाला वाचव!" तिच्या शब्दांनी हवा दाट होऊ लागली. तिच्या शरीरातून निघणाऱ्या ऊर्जेने एक गोलाकार वायूमंडळ तयार झाले, ज्यात रंगीबेरंगी विद्युतलहरी नाचत होत्या. पुस्तक त्यावर तरंगू लागले, जणू ते जिवंत झाले होते. अचानक त्याची सगळी पाने सुटी होऊन हवेत विखुरली गेली. प्रत्येक पानावर एक डीमनचे चित्र चमकत होते. काही अग्नीचे, काही अंधाराचे, काही वाऱ्याचे.
एलिझाबेथने डोळे उघडले आणि त्या वायूमंडळात हात घातला. तिच्या हाताला एक पान लागले. ते सर्वांत शक्तिशाली डीमनचे होते. तिने ते पान बाळाच्या दिशेने फेकले.
उच्च स्वरात म्हणाली, "हे नरकाच्या राजा, माझ्या मुलाला तुझ्या स्वाधीन करत आहे! तुझे रक्षण त्याला मिळो! पेमॉन, अवेकन!" ते पान झपकन बाळावर जाऊन चिकटले.
त्यावर जे चित्र होते, ते होते नरकाचा सर्वांत शक्तिशाली राजा – द लॉर्ड किंग ऑफ हेल, पेमॉन. उंटावर स्वार, लाल रेशमी कपड्यात, हातात सोनेरी दंड घेतलेला, आरस्पानी सौंदर्याचा चिरतरुण, सिंहासारखी गर्जना करणारा. त्याच्या डोळ्यांत नरकाच्या ज्वाळा चमकत होत्या, आणि त्याच्या मुकुटावर रत्नांची जादुई चमक होती. पान चिकटताच, बाळाभोवती एक निळा प्रकाशमंडळ तयार झाले, जणू पेमॉनची ऊर्जा त्याला आच्छादित करत होती. बाळाच्या डोळ्यांत एक विचित्र चमक आली, आणि ते हसू लागले, जणू ते डीमनशी बोलत असावे.
तेवढ्यात तिच्या कानांवर लोकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती, जणू संपूर्ण गाव एका राक्षसी शक्तीने प्रभावित झाले होते. तिने बाळाला छातीशी कवटाळले आणि बंद दरवाज्याच्या फटीतून बाहेर पाहिले. गावकऱ्यांचा तांडा होता. पुरुष, महिला, वयोवृद्ध सगळे तिच्याच झोपडीच्या दिशेने येत होते.
त्यांच्या हातात जळत्या मशाली होत्या, ज्या रात्रीच्या अंधारात भयानक छाया निर्माण करत होत्या. काहींच्या हातात कोयते, काठ्या, सुरे, रश्श्या आणि काही जादुई वस्तूंसारख्या दिसणाऱ्या गोष्टी होत्या. "चेटकीण! सैतानाची आई!" असा त्यांचा ओरडा ऐकू येत होता.
एलिझाबेथने घाईघाईत आपल्या गळ्यातील चैन काढली. ती चैन जादुई होती, त्यावर एक प्राचीन रत्न जडलेले होते जे नरकाच्या राजांना आवाहन करू शकत होते. तिने ते मुलीच्या गळ्यात घातले. बाळ तिला पाहून हातपाय हलवत हसत होते, जणू त्याला काहीच कळत नव्हते. त्याला पाहून तिच्या मायेचा बांध फुटला.
"बाळा, तुझ्या आईला माफ कर... मला तुला वाचवण्यासाठी हे करावेच लागेल," ती रडत म्हणाली. तिने बाळाला एका जादुई टोपलीत ठेवले. ती टोपली एलेनाने दिलेली होती, जी स्पर्श केल्यावर अदृश्य होत असे. त्याच्यावर पांघरूण घालून तिने बाळाला मागच्या दारात लपवले. टोपलीत ठेवताच, एक हलकी जादुई धुंध तयार झाली, आणि बाळ अदृश्य झाले.
आता झोपडीच्या दारावर लोकांच्या थापा चालू झाल्या. "उघड दरवाजा, चेटकीण!" असा ओरडा सुरू झाला. लोक जोरजोरात दरवाजा धडकू लागले. अखेर दरवाजा तुटला, आणि समुदाय आत घुसला. त्यांनी तिला घेराव घातला.
"ही चेटकीण आहे! या गावाला श्राप आहे! हिला जिवंत सोडू नका!" सगळे एका स्वरात ओरडत होते.
एक म्हातारा पुढे आला आणि म्हणाला, "सांग, तुझ्या पोटी जन्मलेला सैतान कोठे आहे? तो नरकाचा दूत आहे!"
"नाही, मी निर्दोष आहे! माझे बाळ सैतानी नाही! सोडा मला... वाचवा!" ती किंचाळत होती.
पण त्यांनी तिला धुसक्या देत मारहाण सुरू केली. सगळे जण तिच्या घराची झडती घेऊ लागले. कपाटे उघडली, भिंती तोडल्या, पण काहीच सापडले नाही. पेमॉनच्या जादूने बाळ अदृश्य झाले होते. त्याभोवती एक अभेद्य संरक्षक कवच तयार झाले होते, ज्यातून केवळ जादुई दृष्टीने पाहता येईल.
"नक्कीच हिने इथेच तो सैतानीपुत्र लपवला आहे! ही झोपडीच जाळून टाका!" एका नेत्याने ओरडले.
सर्वांनी मशाली फेकल्या, आणि झोपडी पेटली. एलिझाबेथला केसांना धरून फरफटत बाहेर खेचले. एका प्राचीन झाडाला बांधून तिच्यावर लाकडे, शेण, सुकलेले गवत टाकले आणि जीवंत पेटवले. संपूर्ण परिसर अग्नीच्या ज्वाळांनी आणि तिच्या किंकाळ्यांनी दुमदुमून गेला. तिच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाने हवेत एक जादुई स्पार्क निर्माण होत होता, जणू तिची शक्ती शेवटच्या क्षणातही बाळाला आशीर्वाद देत होती.
पण झोपडी धूमधूम पेटली होती. आत सगळीकडे आगीचा वेढा पडला. तेवढ्यात अग्नीतून एक चमत्कार घडला . एक सुंदर राजकुमार प्रकट झाला. तो पेमॉनच होता, पण एका मानवी रूपात, सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, लाल रेशमी वस्त्रात. त्याच्या पाठीवर सोनेरी पंख चमकत होते, जे अग्नीच्या ज्वाळांमध्येही शांत राहिले. त्याने ते पंख बाळाभोवती आच्छादले, आणि आगीच्या लाटा त्याला स्पर्शही करू शकल्या नाहीत.
ते बाळ जी एक छान मुलगी होती. तिची नजर त्या सुंदर अग्नीच्या राजकुमारावर पडली. त्याला पाहून ती हसत होती, जणू तिच्या छोट्याशा हृदयात एक प्राचीन बंधन जन्म घेत होते. आणि तो डीमॉनिक राजकुमार, पेमॉन, तिच्या नजरेच्या मोहात हरवला. त्याच्या डोळ्यांत एक नवीन चमक आली. प्रेमाची, संरक्षणाची, आणि एका नव्या युगाची.
आणि इथेच एक नवीन अध्याय सुरू झाला. जो ईश्वर, सैतान, नरक आणि स्वर्ग यांच्या बेड्या तोडून टाकणार होता. या जादुई बंधनातून एक नवी शक्ती जन्म घेणार होती, जी जगाच्या सीमांना आव्हान देईल. पेमॉनच्या सामर्थ्याने बाळाला एक जादुई आशीर्वाद मिळाला. हा अध्याय केवळ सुरुवात होता, एका महाकाव्याचा.
संतोष उदमले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा