Login

पेमोन (भाग ६)

सैतान आणि मानव यांच्यातील प्रेमकथा
पण एलिझाबेथ आपल्या जादूई दरवाज्यातून आपल्या मितीत परत आली होती.

तिचा श्वास लागला होता. तिला फक्त त्याचे ते चॉकलेटी डोळे आणि त्याचे शब्द आठवत होते. आणि तेच दृश्य तिच्या समोर येत होते. 


एलिझाबेथ मिखाईलच्या हातांच्या पंज्यात आपल्या पाठीवर पडून अधांतरी लटकत होती. आणि तो ओणवा होऊन तिला न्याहाळत होता. दोघांची नजरानजर झाली. आणि काही क्षणाच्या साठी दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवुन गेले. तो तिच्या निळ्याशार डोळ्यांत एकटक पाहू लागला.

"हॅलो, आय एम मिखाईल."... त्याने लाघवी हास्य करत तिला आपला परिचय दिला. त्याच्या आवाजाने एकदम भानावर येत एलिझाबेथ सावरून उभी राहिली. आणि एक निमिष त्या तरुणाला पाहिले.

त्याचे ते सावळे रूप, तपकिरी केस, चॉकलेटी डोळे. बलदंड शरीर. गळ्यात काळा दोरा त्यात एक क्रॉस. त्याला पाहून एलिझाबेथच्या मनात वेगळ्याच अनुभूती जागवल्या. पहिल्यांदाच कुणातरी तरुणाच्या इतक्या जवळ आणि त्याच्या कुशीत ती गेली होती. त्याचे रूप पाहून ती एकदम आकर्षित झाली. पण दुसऱ्याच क्षणी. तिला आठवले मनुष्य निर्दयी असतात. त्यांच्यापासून धोका असतो. एलिझाबेथने घाबरून पळ काढला. 

"है... कोण आहेस तुझं नाव तरी सांग"... तिला अचानक पळताना पाहून तो तरुण तिच्या मागे आला. 

"हल्लो, आय एम मिखाईल


*******


इकडे तेराईमध्ये  जादूच्या जगातील गडद, रहस्यमयी जंगलात. त्या तिघी घरी  आल्या.  

पण घरी आल्यावर मात्र नवीन संकट उभे होते. ते म्हणजे मदर विच मिरिंडा.

एलिझाबेथ, एनाबेला आणि एलिनाला रांगेत उभे करून त्यांची मदर विच मीरिंडा त्यांना घाण घाण शिव्या घालत होती. त्यांचे  केस कपडे विस्कळीत झाले होते. थोबडेही सुजले होते. तसे हे त्यांच्या साठी नवीन नव्हते म्हणा. कारण या तिघांची नेहमीची कामगिरी अशीच असायची की मदर विच त्यांना हेच बक्षीस देत असायची.

त्या तिघींच्या पायाखाली जुने, ओलसर दगड होते, आणि हॉलच्या भिंतींवरून हिरवीगार वेली लोंबकळत होत्या. जणू त्या वेलीही हसत होत्या, 

"आज पुन्हा या तिघींची वाट लागणार." 

हवेत जादूच्या औषधींचा तीव्र वास होता, आणि छतावरून थेंबथेंब पाणी गळत होते.  


 त्या तिघींना मदरने चांगले रट्टेही दिले होते (म्हणजे लाथा  बुक्क्यांनी फोडून काढले) जादूच्या छडीने धबधबा मार पडत होता. पण पुरेसे दुखावणारे की त्यांच्या त्वचेवर लाल रेषा उमटल्या होत्या. त्या तिघी मन खाली घालून, डोळे जमिनीकडे रोखून नुसत्या ऐकत होत्या. 

एनाबेलाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते (पण ते खरे की नेहमीचे नाटक, हे फक्त तीच जाणे), एलिना तर भीतीने अशी थरथरत होती जणू काही तिला फ्रीजमध्ये ठेवली होती. (तेही तिचे नाटकच होते म्हणा). 


आणि एलिझाबेथच्या मनात मात्र मिखाईलच्या चॉकलेटी डोळ्यांचे सावट फिरत होते. जणू ती हॉलमध्ये नव्हे तर मिखाईलच्या मिठीत होती. 

वातावरणात प्रचंड तणाव होता, आणि दूर कुठेतरी जादूच्या प्राण्यांचे विचित्र, कर्कश आवाज येत होते. 

 मिरिंडाचा  पाळीव कावळा त्या तिघींना पाहून जोरजोरात हसत होता,

 "हा हा, आज पुन्हा मार!"

"तुमच्या तिघींच्या मस्ती खूपच वाढत चालल्या आहेत! खरंखरं सांगा, तुम्ही जंगलाच्या त्या बाजूला कशासाठी गेल्या होत्या? आणि त्या गुप्त दरवाज्याला कोणी हात लावला? सांगा, नाही तर मी तुम्हाला बेडक्या बनवून टाकते!" मदर विच मीरिंडा एकदम रागात, डोळे पेटून त्यांना विचारू लागली.

 तिचा आवाज कठोर आणि दणदणीत होता, जणू हॉलच्या भिंतींना कंप आणणारा होता. आणि तिच्या नाकाातून धूर येत होता, खरंच! मीरिंडा उंच, काळ्या झग्यात होती, तिचे लांब केस पांढरे-काळे मिसळलेले, आणि हातातली जादूची छडी हवेत धूर सोडत होती. जणू ती सिगारेट ओढतेय आणि रागारागात फुंकर मारतेय.

"हंप्फ, या कार्ट्या मला वेडे करून ठेवणार आहेत." मदर ओरडली.

"नो मदर, आम्ही फक्त फिरत फिरत गेलो होतो. बहुतेक चुकून पायच लागला असेल आमचा," एनाबेला शब्द फिरवत, नजर वर न करता हळूच म्हणाली. तिच्या आवाजात थोडासा थरकाप होता, पण आतून ती विचार करत होती, ("ही स्टोरी आता दहाव्यांदा ऐकली तरी चालेल का? की यावेळी नवीन स्क्रिप्ट हवी?"(

"तू तर गप्पच बस, खोटारडे! मला माहित आहे तुझ्या बोलण्यात एक शब्द खरा आणि नऊ शब्द खोटे असतात  आणि ते एक खरे सुद्धा चुकून येतं!" मीरिंडाने रागाने ओरडत तिच्या हातातील जादूची छडी एनाबेलाच्या डोक्यात हाणली. छडीचा स्पर्श होताच एक छोटा विद्युत प्रवाह गेला.

 एनाबेला कळवली "आय! मदर, हे तर करंट लागलं!" म्हणत डोके चोळत मागे सरकली, पण ती उभीच राहिली. आतून मात्र ती म्हणत होती, "आज डोकं नव्हे, थेट मेंदूत शॉर्ट सर्किट झालं! उद्या मी पण असाच करंट देईन!"

"मीरिंडा, जाऊ देत. लहान आहेत त्या. त्या वयात नाही राहत भान, होत कधी कधी असं एखादं ऍक्सिडंट," जादूगार रॉईलो  म्हणाला.

रॉईलो नेहमी शांत आणि प्रेमळ असायचे मीरिंडाला समजावत म्हणाले. ते पांढऱ्या दाढीचे, मोठे चष्मे घातलेले वृद्ध जादूगार होते, ज्यांना या तिघींवर फार जीव होता.

  त्यांचा आवाज मऊ आणि समजावून सांगणारा होता, "मीरिंडा, तू पण कधी लहान होतीस ना आणि तेव्हा किती मस्ती केलीस ते विसरलीस का?" ते हॉलच्या कोपऱ्यातून पुढे आले, 

 त्यांच्या हातात एक जुनी जादूची पुस्तक होती. बहुतेक त्यात "किशोरवयीन विचेसना कसे हाताळावे. चॅप्टर १०१: एनाबेला स्पेशल" असा चॅप्टर शोधत होते. (हे पुस्तक इनाबेलन लिहिले होते. ही गोष्ट वेगळी.)

"तुमच्या पैकी कोणी दरवाजा ओलांडून मानवी मितीत तर गेला नव्हता ना? प्लिज बेटा, मला सांगा मी कुकीज देईन," रॉईलो एलिझाबेथकडे येऊन, तिच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारू लागले. त्यांच्या डोळ्यांत फक्त काळजी होती, आणि त्यांचा हात उबदार होता. 

एलिझाबेथला त्यांच्यावर विश्वास होता, पण सत्य सांगितले तर मदर काय करेल याची भीतीही होती. कदाचित तिची जादूची छडी कायमची जप्त करेल आणि तिला साध्या झाडूने उडावे लागेल!

तिघीही भूत बघितल्या सारखे एकमेकांना पाहू लागल्या.

 एलिनाने हळूच एनाबेलाच्या हाताला धरले आणि इशाऱ्यानेच  म्हणाली. " काही झालं तरी तू बोलू नकोस."

 आणि एनाबेलाने एलिझाबेथकडे अर्थपूर्ण नजर टाकली  "आज तरी तोंड बंद ठेव, नाही तर तिघीही बेडक्या होऊन तलावात पोहायला लागू!" 

जर मदरला माहीत झाले की एलिझाबेथ खरंच गेली होती तर तिला कोणीच वाचवू शकत नव्हता. तिची शिक्षा फार कठोर असायची, कदाचित बरेच दिवस एकांतवास किंवा जादूची शक्ती काही काळासाठी बंद करणे.

म्हणजे फक्त साधी मुलगी होऊन राहणे, आणि सकाळी उठून "गुड मॉर्निंग" म्हणण्याऐवजी "डराव डराव" करावे लागेल. विचारानेच एलिझाबेथचे अवसान गळाले. 

"रॉईलो, ते काही नाही. नुसत्या विचेस जर गेल्या असत्या तर काही नव्हते. पण यांच्या बरोबर नक्कीच कोणी तरी अजून होते.एखादा प्रिन्स चार्मिंग का कोण?" मीरिंडा आता आणखी रागावून, छडी हवेत फिरवत दरडावून म्हणाली. तिच्या छडीतून निळ्या रंगाच्या ठिणग्या उडाल्या, आणि हॉल थोडासा प्रकाशित झाला.


"कोणीच नव्हते, आम्हीच होतो. आणि आम्ही कशाला जाऊ तिकडे मानवी जगात? ते वाईट असतात हे आम्हाला माहीत आहे हो.त्यांच्याकडे तर जादूची छडीही नसते, फक्त रिमोट कंट्रोल!" हवे तर तुझी शपत घेऊ का मदर?" एनाबेला उधारीचा आत्मविश्वास दाखवत, पण थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली. 

ती पुढे झुकली, जणू खरंच शपथ घ्यायला तयार आहे.  पण आतून विचार, "शपथ घेतली तर उद्या छडीने मार खाण्याऐवजी थेट थंडरबोल्ट!"

पुन्हा एक जोरात छडी एनाबेलाच्या कंबरेवर मारत मीरिंडा ओरडली, "घे माझी खोटी शपत घे! दुष्ट मुली! तुझ्या शपथा मला काय करणार, मी तर रोज तुझ्या खोट्यांना शपथा घालते!" 

एनाबेला वेदनेने वाकली, तिच्या डोळ्यातून अश्रू गालावरून वाहू लागले, पण ती गप्प राहिली. तिने ओठ घट्ट आवळले आणि डोके खाली घालून घेतले. आतून मात्र म्हणत होती, 

"एक दिवस मी पण मोठी विच होईन, मग तुझ्या छडीला मी डान्स करायला लावेन!"

मग मीरिंडाची नजर एलिझाबेथकडे वळली. ती हळूहळू एलिझाबेथजवळ आली, आणि तिचा चेहरा जवळून पाहू लागली. जणू डिटेक्टिव्ह फिल्ममध्ये संशयी आरोपीला इंटेरॉगेट करतेय, फक्त लाईट ऐवजी छडी फिरवत. 

"आणि एलिझाबेथ... तुझी माळ कोठेय? हरवली की एखाद्या हँडसम मनुष्याला गिफ्ट दिलीस?" तिने एलिझाबेथचा मोकळा, रिकामा गळा पाहून कठोर आवाजात विचारले. तिचे डोळे आता संशयाने भरले होते. आणि थोडे हसूही दडलेले.

एलिझाबेथला आता काय बोलावे तेच सुचत नव्हते. तिचे हृदय जोरजोराने धडधडू लागले, आणि तिच्या हातांना घाम फुटला. जणू ती सॉना बाथ घेतेय. कारण तिला आठवले की ती त्या तरुणाला धडकली तेव्हा, त्याच्या जवळ जाताना बहुतेक माळ सुटून त्याच्याकडेच राहिली असेल. ती आईची शेवटची आठवण असलेली माळ. आणि हे जर मदरला माहीत झाले की तिची प्रिय माळ मानवी जगात आहे, एखाद्या मनुष्याच्या हातात तर एलिझाबेथची काही खैर नव्हती, कदाचित तिला 

"जा, माळ परत आण आणि त्याला प्रेमाची जादू करून ये" अशी तिखट शिक्षा होईल! तिच्या डोळ्यांत भीती आणि अपराधीपणा दोन्ही दिसू लागले, तिचे ओठ थरथरू लागले, पण ती गप्पच राहिली. तिने फक्त डोके खाली घालून घेतले  आणि आतून प्रार्थना करत होती, 

"कृपया मदर, आज तरी माळ सोडून दुसऱ्या विषयावर ये – उदाहरणार्थ, एनाबेलाच्या नव्या खोट्यावर."

तेराईतील तो हॉल आता पूर्ण शांत झाला होता. फक्त मीरिंडाच्या रागाचा श्वास, तिघींच्या धडधडत्या हृदयांचा आवाज, आणि दूरच्या जंगलातून येणारे रहस्यमयी आवाज जणू प्राणीही म्हणत होते.

"पुढचा भाग कधी?" मीरिंडा एलिझाबेथकडे एकटक पाहत राहिली, जणू तिच्या डोळ्यातून सत्य बाहेर काढणार की किमान एखादे नवे खोटे तरी.

रॉईलो चिंतेने त्या तिघींकडे पाहत होते, आणि हॉलमध्ये तणाव इतका वाढला होता की हवेत जादूची ठिणग्या उडू लागल्या होत्या.