पेमॉन (भाग 21)
त्या रात्री, जेव्हा गावकऱ्यांचा क्रोधाचा लोंढा एलिझाबेथच्या झोपडीवर येऊन धडकला, तेव्हा तिच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होता.
"मिखाईल." तो शब्द तिच्या हृदयात खोलवर रुजलेला होता, जणू तिच्या रक्तात मिसळलेला.
चर्चने त्याला फासावर लटकावले होते. तिचा पती, तिचा एकमेव साथीदार, तिच्या आयुष्याचा एकमेव आधार. आता निर्जीव, थंड झाला होता. त्या क्षणी एलिझाबेथच्या डोळ्यांत राग नव्हता, तर एक प्रचंड, शोक होता. तिच्या छातीवर जणू हजारो काटे रुतले होते, प्रत्येक श्वासात वेदना भरून येत होती. तिच्या मनात एकच विचार वारंवार येत होता.
जर तिने मनात आणले असते, तर संपूर्ण गावाला राखेचा ढीग बनवून टाकले असते. तिच्या हातातली शक्ती तशीच होती. लकीयर विचची शक्ती,
जी शक्ती डीमन्सनाही आपल्या पाशात बांधू शकते.. तिच्या मंत्राने आकाश, तिच्या डोळ्यांतून ज्वाळा उसळू शकतात, आणि तिच्या शब्दांतून नरकाचे दरवाजे उघडू शकतात. पण मिखाईलशिवाय हे सगळं तिला आता फक्त एक रिकामी, काळी पोकळी वाटत होते. जग आता तिच्यासाठी अर्थहीन झालं होतं फक्त एकच गोष्ट उरली होती, तिची मुलगी.
ती लहानशी, निष्पाप जिवाची आठवण. तिच्या डोळ्यांत मिखाईलची मृदुता आणि एलिझाबेथची शक्ती मिसळलेली होती. एलिझाबेथला समजलं होतं की तिच्या मृत्यूनंतरही या जगात तिच्या मुलीला एकटं सोडता येणार नाही. तिने स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेतला होता, पण त्याआधी तिने एक शेवटचं, सर्वांत मोठं बलिदान देण्याचा निर्धार केला. तिच्या हातातली शक्ती आता तिच्या मुलीच्या भविष्यासाठी होती तिच्या प्रेमाची शेवटची साक्ष.
ती एक शक्तिशाली लकीयर विच होती. तिच्या रक्तात डीमन्सचे दैवत वास करत होते प्राचीन, क्रूर, पण तिच्या प्रेमाशी बांधलेले. तिने डोळे बंद केले, हात मुलीच्या लहान छातीवर ठेवले आणि श्वास रोखून आपली सगळी शक्ती, सगळं जादूटोणा, सगळी जीवन-ऊर्जा... एका क्षणात ओतली. त्या क्षणी तिच्या शरीरातून काळा प्रकाश उसळला, जणू नरकाचे दरवाजे उघडले गेले. तिच्या रक्तातील प्रत्येक थेंब तिच्या मुलीच्या रक्तात मिसळला. ती मुलगी पूर्ण विच नव्हती, पूर्ण लिकीयन नव्हती अर्धी मानव, अर्धी लिकीयन. तिच्या रक्तात दोन्ही जगांचा मेळ होता, पण ती शक्ती तिच्यासाठी पूर्णपणे जागृत होऊ शकणार नव्हती, कारण तिचं शरीर अद्याप नाजूक होतं, अर्ध-मानवी. तरीही एलिझाबेथला माहीत होतं. हाफ-लिकीयन मुलीला जिवंत ठेवण्यासाठी एकटा लिकीयन मेल विचर पुरेसा नाही. त्याला एका अत्यंत शक्तिशाली डीमन्सची साथ हवी होती, ज्याची ऊर्जा तिच्या रक्तातील पोकळी भरू शकेल.
म्हणूनच तिने शेवटच्या श्वासात, डोळ्यांत अश्रू आणि हृदयात मिखाईलची आठवण घेऊन, नरकाच्या सर्वांत महान आणि शक्तिशाली राजाला आवाहन केलं.
महान पेमॉन.
तिचा आवाज कमकुवत होता, पण तो नरकाच्या खोल गर्तेत पोहोचला. आणि पेमॉनने उत्तर दिलं. त्या रात्री झोपडीत जे काही घडलं, ते गावकऱ्यांना कधीच कळलं नाही. त्यांनी घराची झडती घेतली, प्रत्येक कोपरा उघडा केला, प्रत्येक कपाट फोडलं, पण ती लहान मुलगी त्यांना कुठेच सापडली नाही. कारण पेमॉनने स्वतः तिला आपल्या विशाल, लाल अंगरख्याखाली लपवून ठेवलं होतं त्या अंगरख्याची सावली इतकी गडद होती की प्रकाशही तिथे पोहोचू शकत नव्हता. जेव्हा गावकऱ्यांनी झोपडीला आग लावली, तेव्हा ज्वाळा उसळल्या, लाकडं तडतडली, धूर आकाशात मावळला... पण पेमॉनने त्या नाजूक जीवाला आपल्या कुशीत घट्ट धरलं. ज्वाळांच्या त्या नरकातून तो तिला बाहेर काढून घेऊन गेला, जणू अग्नी त्याच्या आज्ञेने मागे हटला होता.
जेव्हा फादर निकोबेल तिथे पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चमत्कार उभा होता. ते मूल जिवंत होतं. ज्वाळांच्या मधून निघालेलं ते लहान शरीर अजूनही उबदार होतं, जणू आईच्या मिठीतच होतं. फादर निकोबेलने थरथरत्या हातांनी त्याला उचललं. त्यांच्या मनात एकच विचार होता
"मला हे मूल वाचवायचं आहे."
ते जंगलाच्या गुप्त वाटेने, मानवी आणि विचांच्या जगाच्या मधल्या प्राचीन दरवाज्याकडे निघाले. तिथे त्यांनी मुलीला एलेना आणि एनाबेलाच्या स्वाधीन केलं. दोघी बहिणींनी तिला जवळ घेताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
पण तिथेही सुरक्षिततेची हमी नव्हती. एलिझाबेथने तेराईचा सर्वांत कठोर नियम मोडला होता. एका मानवाशी लग्न करून मूल जन्माला घातलं होतं. हे अपराध तेराईच्या विच समाजात सर्वांत मोठा अपमान होता. शंग्रीला हे कळलं तर.. तो शक्तिशाली जादूगार, ज्याच्या डोळ्यांतून जादूचे तारे निघतात आणि ज्याच्या शब्दांतून वास्तव बदलतं, तो आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या निष्पाप बाळाला क्षणात नष्ट करून टाकेल, हे सर्वांना माहीत होतं. तरीही एनाबेला आणि एलेनाने त्या मुलीला जवळ घेतलं. त्यांच्या हातात ती लहानशी आठवण होती. एलिझाबेथची शेवटची साक्ष बेबी एलिझाबेथ होती.
जेव्हा त्यांनी त्या लहान मुलीला हातात घेतलं, तेव्हा दोघींच्या डोळ्यांतून आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू एकत्र वाहू लागले. ती एलिझाबेथची शेवटची आठवण होती. तिच्या मुलीच्या डोळ्यांत त्यांना एलिझाबेथ दिसत होती. तिची हसरी, तिची चंचलता, तिचं अमर प्रेम. एनाबेलाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि हळू आवाजात म्हटलं,
“आम्ही तुझी काळजी घेऊ, एलिझाबेथ... तुझी ही छोटीशी आठवण आम्ही कोणत्याही परिस्थितीत जपून ठेवू. तुझं प्रेम आमच्यात जिवंत राहील.”
आठ दिवस निघून गेले की. फादर निकोबेल पुन्हा येणार होते. कारण तेराई गावात हे मूल कधीच सुरक्षित राहू शकणार नव्हतं. ते मुलीची दुसरीकडे व्यवस्था करण्यासाठी गेले होते, कदाचित अधिक दूर, अधिक सुरक्षित ठिकाणी.
एनाबेला आणि एलेनाने त्या लहान मुलीला दुखणीवर्णी तलावाच्या टेकड्यांमधील एका गुप्त गुफेत लपवून ठेवलं. तिथे जंगल इतकं दाट होतं की सूर्यप्रकाशही पानांमधून झिरपत येत असे, फक्त हिरव्या छायांच्या रूपात. गुफेच्या आत एक छोटीशी झरा होता, जिथे पाणी सतत गाणं गात होतं. त्या दोघी आळीपाळीने तिची काळजी घेत होत्या. रात्री एलेना तिला कुशीत घेऊन झोपत असे, दिवसा एनाबेला तिला गोष्टी सांगत असे. एक बाळंत झालेली हरिणी रोज येऊन त्या लहान जीवाला आपलं दूध पाजत असे. तिच्या डोळ्यांत एक प्रकारची करुणा होती, जणू तीही एलिझाबेथच्या प्रेमाची साक्ष देऊ इच्छित होती. त्या हरिणीच्या उबदार स्पर्शात मुलगी शांत होत असे, जणू तिला आईची उब पुन्हा मिळत होती.
सहा दिवस असेच निघून गेले. सातव्या दिवशी ते सात दिवसांचं मूल एनाबेलच्या कुशीत शांतपणे खेळत होतं. तिच्या लहान हातांनी एनाबेलच्या बोटांना पकडलं होतं, जणू ती म्हणत होती — “मी इथे आहे, मला सोडू नका.” ती त्यांना पाहून हसत होती त्या हास्यात एलिझाबेथचीच छटा दिसत होती, तीच मृदुता, तीच चमक. एलेना आणि एनाबेला तिला खेळवत होत्या, तिच्या कपाळावर चुंबन घेत होत्या, आणि मनात सतत प्रार्थना करत होत्या.
“हे मूल वाचावं, एलिझाबेथ... तुझं प्रेम वाचावं. तुझी ही छोटीशी किरण आम्ही जगाला दाखवू.”
अचानक...
आकाशात एक भीषण गडगडाट झाला. जणू स्वर्ग आणि नरक एकत्र येऊन कोसळले. झाडांच्या फांद्या थरथरल्या, पाने खाली पडू लागली. पृथ्वी हादरली, जणू ती भयभीत झाली होती. आणि ड्रॅगनच्या विशाल, काळ्या पंखांच्या सावलीखाली... शंग्रीला उतरला.
त्याच्या डोळ्यांत क्रोध होता, जळजळीत, पेटता अंगार आणि अपमान होता. एलिझाबेथ आणि त्याचे लग्न ठरले होते. आणि ती मिखाईल बरोबर पळून गेली होती. इतका मोठा अपमान त्याचा तो कधीच विसरू शकणार नव्हता.
तो उतरला, आणि त्याच्या पावलांनी जमीन जळू लागली. त्याच्या हातात एक जादुई काठी चमकत होती, आणि त्याच्या मागे ड्रॅगनच्या श्वासाने वारा गरम झाला होता.
"एलेना आणि एनाबेला बाहेर या. तुम्ही तेराईचा नियम मोडला आहे. तुम्ही मानवी मुलाला आत आणलेत. ते मूल माझ्या ताब्यात द्या."... तोओरडला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा