Login

द परफ्युम फॅक्टरी (भाग ८)

Prasad a well-educated, handsome young guy is a farmer. He is deeply in love with Sudha. Being a simple farmer Prasad was not sure that Sudha will accept his proposal. Whereas, Sudha is a bright intelligent girl looking for a job in the city. Both ar

(कथेचापुढील भाग प्रस्तुत करण्यासाठी विलंब लागला यासाठी वाचकांची मनापासून माफी... क्षमस्व)

सुधाची इंरन्शिप चालू होण्याआधी एक दिवस  सुधा पुण्याला पोहोचली. प्रसाद आत्याला घेऊन आधीच पोहोचला होता. सुधा अतिशय आनंदात होती. तिने आत्याचे मनापासून आभार मानले. प्रसादने तिला आजूबाजूची सगळी माहिती दिली, जाण्या येण्याचा बसचा मार्ग बस स्टॉप, रिक्षा अशी सगळी माहिती दिली. आता सुधा जॉइनिंग साठी अत्यंत उत्सुक होती. सुधा  आणि  प्रसादने एकमेकांना नवीन कामा साठी शुभेच्छा दिल्या.

तिथून पुढे...

दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रसाद गावाकडे परतण्यास निघाला. थोडा मनोमन सुखावलाहि होता.सुधाने त्याच्या कपड्यावरून केलेले कौतुक त्याला सतत आठवत होते.जरी त्यावेळेस त्याने तसे दाखवले न्हवते तरी तो प्रचंड खुश झाला होता मनातून. आता सुधासोबत थोडा वेळ अजून मिळेल. कदाचित आपल्या मनातील भावना बोलून दखवता येतील लवकरच. त्याच्या मनात फक्त एकाच विचार होता, कि आता सुधाशी कसे  आणि कधी बोलायचे. त्याआधी त्याला गावाकडे सर्व व्यवस्था लावून यायचे होते. किमान एक आठवडा तरी लागणार होता. परत  येईपर्यंत सुधा इथे जरा रुळेल असा त्याने विचार केला.

इकडे सुधाला सकाळी लवकर जाग आली.  खरेतर गजरच लावला होता तिने. आज पहिला दिवस होता ऑफिस चा! आणि आत्त्यांना सगळी मदत करून निघायचे होते तिला. ती उठून  हॉल मध्ये आली तेव्हा आत्या मॉर्निंग वॉक ला चालल्या होत्या. " अरे उशीर झाला वाटतं  मला उठायला. माझ्यापेक्षा पण लवकर उठल्या वाटतं!" असा विचार करून थोडी ओशाळून गेली.

"गुड मॉर्निंग! मी वॉक ला जाऊन येते. दूध हि आणेन येताना."

"गुड मॉर्निंग आत्या! प्रसाद कुठे आहे?"

"तो निघाला पहाटेच! पोचेलही तासाभरात घरी. तू चहा घे आणि डब्याची तयारी करून यावरून घे. पहिलाच दिवस आहे आज लवकर पोच ऑफिसला." असे म्हणून आत्या बाहेर पडल्या. 

"असा काय हा? पहाटेच निघाला. मला वाटलं निघेल नऊ दहा वाजता. खरतर थांबायला पाहिजे होता मला जरा बरं वाटलं असतं. किती टेन्शन आलंय मला. आजचा दिवस खूप इम्पॉर्टन्ट आहे माझ्यासाठी. मला इथे सगळं नवीन आहे. कसा काय लवकर गेला काय माहित?" थोडा रागच आला होता तिला  पण नंतर

 तिने  विचार केला, "असेल त्यालाही काम. मला खूपच सवय झालीये का त्याची? तो होता तर किती कॉन्फिडन्ट वाटत होत!"

असेच विचार करत तिने सगळे आवरले. डबा नाश्ता बनविला आणि अत्यांना सांगून ऑफिसला निघाली.

आज इंडक्शन प्रोग्रॅम होता. पिंक कुर्ता आणि जीन्स मध्ये एकदम छानच दिसत होती. केस मागे अर्धे बांधले होते. एका हातात घड्याळ आणि एका हातात छानसे ब्रेसलेट. एकदम स्मार्ट दिसत होती.

ऑफिस मध्ये प्रवेश करताच ए सी च्या थंड वाऱ्याने सुधा सुखावून गेली. चकचकीत फर्निचर, सुंदर लाईट्स, आणि प्रत्येक जण डेस्कवरच्या लॅपटॉप मध्ये बघून कामामध्ये व्यस्त. "वाह! आय अँम अँट राईट प्लेस! काय मस्त आहे ऑफिस! मी पण आता अशा मोठ्या ऑफिस मध्ये काम करणार! ग्रेट! खूप मन लावून काम कारेन मी!" असा विचार करत असताना रिसेप्शनिस्ट ने सर्वांना कॉन्फरेन्स रूम मध्ये बसायला सांगितले. सुधाप्रमाणेच अजून १०-१५ जणांचे आज जॉइनिंग होते. सर्वजण कॉन्फेरेंस रूम मध्ये बसले. सुधा अजूनही ऑफिसच्या वातावरणाला समजून घेत होती. तेवढ्यात थोडी गडबड झाली. एक माध्यम वयीन, ब्लाझेर घातलेले, फ्रेंच दाढी ठेवलेले, चेहऱ्यावर एक अनोखे तेज आणि आत्मविशास असलेले गृहस्त आत आले. त्यांच्या चालण्यात आणि बरोबरीच्या लोकांशी बोलण्यात एक वेगळीच छाप दिसत होती. त्यांच्या सोबत अजून चार पाच जण होते. एकूण हालचाल आणि हावभावांवरून सुधाच्या लक्षात आले कि हेच कंपनीचे मालक असतील. सुधाचा अंदाज बरोबर ठरला.

"वेल कम यू ऑल!" असे म्हणत त्यांनी बोलायला सुरवात केली. मागे स्क्रीनवर कंपनीच्या माहितीची फिल्म लागली होतीच.

"आय अँम मि. नार्वेकर. फाउंडर ऑफ धिस कंपनी." कंपनीच्या फिल्म मधून कंपनी ची प्रगती आणि मि. नार्वेकर म्हणजेच मोठ्या सरांची धडाडी बघून सुधा खूपच भारावून गेली होती.

मि. नार्वेकर यांनी मग त्यांच्या सोबत असलेल्या असिइस्टंटस ची ओळख सांगितली. आणि पुढच्या सूचना द्यायला सुरवात केली.

बॉस चे हे अससिस्टंट्स सर्व इंटर्न्स चे ट्रेनर्स असणार होते. प्रत्येक असिस्टंट काढे दोन ते तीन इंटर्न्स असणार होते. इंटर्न्स ना ह्या असिसंट्स कडून काम शिकून घ्याचे होते.

"तुमचे काम आणि प्रगती बघून तुम्हाला ह्या कंपनीमध्ये भविष्यातील रोल दिला जाईल. सो वर्क हार्ड अँड मोस्ट इम्पॉर्टन्टली एन्जॉय युअर वर्क. ऑल द बेस्ट!" असे म्हणून बॉस निघाले.

"हाय! मी यश महाजन. बी. टेक. एम. बी. ए. दोन वर्षांपासून ह्या कंपनी मध्ये काम करत आहे.  पुढचे कमीत कमी तीन महिने तुम्ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहात." असे म्हणून मिश्किल हसत सुधाचा ट्रेनर म्हणाला. फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर मरून टाय, कानाला ब्लू टूथ, आणि हातात महागडा स्मार्ट फोन. त्याच्या परफ्युम चा सुगंध त्याच्या केबिन मध्ये पसरला होता. उंच, गोरापान, मस्त राहणीमान, फ्लुएंट इंग्लिश बोलणे. सुधा खूपच इम्प्रेस झाली यश वर. त्याच्या उठण्या बसण्यात एक प्रोफेशनल सफाईदारपणा होता.  सुधासोबत अजून एक मुलगा यशकडे ट्रैनिंग साठी होता. दोघाच्याकडे कडे बघत यश म्हणाला,""आता तुम्ही मला तुमची माहिती द्या." जुजबी माहिती आणि ओळख करून घेताना यशची नजर थोडा जास्त वेळ सुधाकर रेंगाळत होती. सुधाच्याही हे लक्षात आले. सुधामधील स्पार्क यशाच्या नजरेने हेरला होता.  सुधा अजूनही हरवल्यासारखी बघत होती. सगळेच तिच्यासाठी नवीन आणि आकर्षक होते.

"तर आता आपण ह्या प्रोजेक्ट बद्दल बोलू..."  असे बोलून त्याने एका प्रोजेक्ट बद्दल सर्व माहिती सांगितली. "मी तुम्हाला काही जुने रिपोर्ट्स देतो. त्याप्रमाणे ऍनालिसिस करून बघा. उद्या रिव्हिएव घेऊ. काही अडचण असेल तर विचार" असे म्हणून तो थांबला. 

सुधाचे लक्ष यश काय सांगतो तिकडे तर होतेच पण त्याचे बोलणे, सफाईदारपणे काम करणे, आणि काम करता करता मधूनच हसणे ह्या साऱ्याने सुधा खूपच भारावून गेली होती. यश कडे बघतच बसली होती. त्याचे बोलणे संपताच भानावर आली. तिच्या लक्षात आले कि ती खूप वेळ यश कडे बघत होती. त्यामुळे थोडी ओशाळली. आणि आता आपण येथून लवकर निघाले पाहिजे असा विचार करत  "ओके सर..." म्हणत सुधा निघाली.

"यश...ओन्ली यश!" तेव्हड्यात यश म्हणाला. 

तसे सुधाने चमकून पहिले. "अं?"

"मला फक्त यश म्हणायचे! सर नाही." हसून यश म्हणाला आणि त्याने शेकहॅण्ड साठी हात पुढे केला. कसेबसे किंचितसे हसून, आणि थोडे घाबरतच तिने हॅन्डशेक केला. आणि तिच्या जागेवर येऊन बसली.

"काय मस्त पर्सनॅलिटी आहे यश सरांची! अं...... नाही नाही... यश सर नाही ओन्ली यश!" हसंतच तिने मेल ओपन केला. तर यशने जुने रिपोर्ट्स पाठवले होतेच. "चला आता कामाकडे लक्ष दिले पाहिजे" असे स्वतःला बजावत तिने काम चालू केले. पण यश ची जादू मात्र झाली होती तिच्यावर. मधूनच त्याच्या प्रोफाइल च्या फोटोकडे लक्ष गेले. त्याचे हसणे, आत्मविश्वासाने काम करणे, त्याचे ड्रेसिंग सगळेच सतत तिच्या डोळ्यासमोर येत होते. त्याचा तो फर्म हॅन्डशेक अजूनही तिच्या हाताला जाणवत होता. पण पुन्हा स्वतःला सावरून तिने कामात लक्ष द्यायचे ठरवले.

क्रमशः

🎭 Series Post

View all