पहिली फेरी - कथामालिका
शीर्षक - सखा सोबती- द रियल कंपॅनियन
( भाग -१)
( भाग -१)
लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
" तुझ्या एक लक्षात आलंय का ? स्त्रिंयांनी स्वतःची मुक्तता, स्वतः करून घेतली नाही. त्यासाठी त्यांना पुरुषाची गरज पडलीच." तो
"हो मग! बंधनंही पुरुषांनीच घातली होती ना! आणि ज्याने बेड्या घातल्या त्यानेच सोडवायला मदत करायला हवी होती ." ती
"म्हणजे तू म्हणतेस तस "मनुस्मृती" लिहिणारा पुरुषच होता म्हणून अशी पुरुषसत्ताक संस्कृती रूढ झाली. . . मान्य ! अगं, मग कल्पना कर की ती स्त्रीने लिहिली असती तर . . . . ?" तो
"हं. . . . . मुद्दा आहे हां! मग पुरुषांना मुक्तीसाठी लढावं लागलं असतं आणि आम्ही स्त्रियांनी त्यासाठी हातभार लावलाच असता. . " ती
यावर दोघांनी टाळ्या दिल्या व मोठ्यांदा हसायला लागले.
"काय तरी गप्पा मारतो रे आपण?" मुक्ता त्याच्याकडे पहात म्हणाली.
"कुणी ऐकलं तर वाटेल ही दोघं भांडताहेत!" विवेक हसायला लागला.
"तेच महत्वाचं. म्हणजे वादाचा मुद्दा असेल तर आपण दोघेही तो धरून ठेवतो, मग त्यावर आपला सखोल अभ्यास होतो आणि आपण सर्वांसमोर वाद घालतो." मुक्ताने पुन्हा मुद्दा मांडला.
" पण यामुळे एक होतं की आपली बोलण्याची हातोटी सुधारतेय म्हणजे कौशल विकसित होतंय. नवनवीन शब्दांचा अर्थ कळतोय आणि शब्दसंग्रह व ज्ञान वाढतंय!" विवेक ने टाळी दिली.
"आता बघ, हे सुद्धा तू किती मुद्देसूद सांगितलंस. विवेक, तू शिक्षकी पेशात गेलास तर खरच मुलांना फायदा होईल तुझ्या या हातोटीचा."
"माहित नाही मी कुठल्या क्षेत्रात जाईन , ज्ञान मिळवण्याच्या लालसेने नुसत्या डिग्र्याच जमा केल्यात. रेग्युलर वेगळ्या आणि डिस्टंस च्या वेगळ्या. पण तुला मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवून मोठी ऑफिसर झालेलं बघायला आवडेल मला!"
"आणि तू??"
" मी सॅल्युट करेन तुला , असिस्टंट म्हणून!"
त्याने सॅल्युट केलेला पाहून मुक्ता मुक्तपणे खळखळून हसली.
"काय यार तू? पुरुषांना तर मुळात स्त्रीपेक्षा पुढेच असावं किंवा अधिकार गाजवावा असं वाटतं पण तू तर. . .?"
"माहित नाही मुक्ता पण तुझ्यासोबत असलो ना की जिंकण्या हरण्याची भीतीच रहात नाही. म्हणजे तुझ्यासोबत वादविवादात हरलो तरीही मला आनंद होतो कारण तू जिंकलेली असतेस."
"अरे वा ! ग्रेटच. ही आपल्या मैत्रीची खरी पावती आहे विवेक. चला निघूयात उद्याच्या सभेची तयारी करायचीय."
"निघ तू. मी थांबेन थोडावेळ या शांत तलावाला पहात. घरी गेलं की पुन्हा तेच. . !" विवेकचा सूरच बदलला.
"का रे काय झालं?"
"अगं आता हेच बघ , आपण इतकं सामाजिक कार्यात झोकून देतो स्वतःला . पण आपल्याच घरी परिस्थिती नाही बदलता येत. तेच नोकरी- लग्न , नोकरी - लग्न व हुंडा या चर्चा चालू असतात."
"अरे हे खूप साहजिक आहे. आपला तसा कुठलाच संबंध नाही पण रहायला जवळ आणि सामाजिक कार्यात सहभाग यानेच अपली मैत्री झाली ना. आपले विचार बदलले, आपण जन जागृतीची कामं करू लागलो. पण मग आपल्या बाहेरच्या कार्याने घरातल्या लोकांचा स्वभाव कसा बदलेल बरं?"
"पण एक मुलगा म्हणून हे खूप जड जातय मला. म्हणजे तू मुलगी आहेस उद्याला तुला इथलं काही पटलं नाही तर तू दिल्या घरी जाशील आणि तिथे हवे ते बदल करू शकशील, पण माझं तसं नाही."
"म्हणजे?"
" मला माझ्या लोकांसोबतच राहावं लागेल आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावेच लागेल. त्यामुळे घरात तरी तडजोड होईल किंवा माझ्या तत्वांसोबत तरी! शिवाय बायका लेकरांना काय खाऊ घालशील हा एक आमच्या नानांचा नेहमीचा प्रश्न ."
"अरे असं नाही . हळूहळू सगळं ठीक होईल. हिंमत हरू नकोस. बर तुला असं वाटतं ना दिल्या घरी मी काहीतरी बदलेल पण तसं होईल त्याची तर बिलकुल शाश्वती नाही. फक्त मला एका गोष्टीची खात्री आहे की माझ्या मनाविरुद्ध माझे आई वडील माझे लग्न लावून देणार नाहीत. कारण माझे विचार खूप स्पष्ट आहेत हे त्यांना माहित आहे. शिवाय माझं स्वप्न त्यांना माहित आहे त्यामुळे तर मला घरून खूप सपोर्ट आहे."
"हेच बघ किती भाग्यवती आहेस तू."
" हो नशीबवान तर मी आहे कारण तुझ्यासारखा डोक्याला खाद्य देणारा एक मित्र पण आहे. चल निघते आता!
आणि हो ,उद्याच्या सभेत मी सुरुवात करणार आहे आणि तू कंटीन्यू कर , अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा तुला घ्यायचा आहे .थोडा अभ्यास करच त्यावर!"
आणि हो ,उद्याच्या सभेत मी सुरुवात करणार आहे आणि तू कंटीन्यू कर , अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा तुला घ्यायचा आहे .थोडा अभ्यास करच त्यावर!"
"चल बाय !"
"बाय."
तिला जाताना ,कितीतरी वेळ . . . लांबपर्यंत जाताना तो पहात होता.
क्रमशः
********************************
लेखिका -©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक ३१. ०१ .२३
दिनांक ३१. ०१ .२३