Login

सखा सोबती - द रियल कंपॅनियन ( भाग -४)

Companianship in life

अष्टपैलू  लेखक  महासंग्राम

पहिली फेरी  कथामालिका

सखा सोबती - द रियल कंपॅनियन

( भाग -४)


मध्यंतरी महिना दीड महिना विवेकची आणि मुक्ताची भेट झाली नाही.
त्यादरम्यान बरेच सामाजिक कार्यक्रम आयोजित झालेले होते परंतु मुक्ताच्या एमपीएससीच्या परीक्षेमुळे आणि त्या ठरत असलेल्या स्थळांच्या प्रक्रियेमुळे तिला बाहेर पडताच आलं नाही.


घरी लँडलाईन फोन होता तेव्हा, पण नकोच , प्रत्यक्ष भेटूया या विचाराने तिने फोन करणे टाळले होते.

एक दिवस अचानक संध्याकाळच्या वेळी विवेक तिच्या घरी आला.
तिच्या आईशी जुजबी बोलला मग संमती घेऊन तिच्याशी बोलायचंय म्हणून सांगितलं.

दोघे गच्चीवर गप्पा मारायला म्हणून गेले.

आज तो काहीतरी वेगळाच दिसत होता. वेगळंच वागत होता. नजरही मिळवत नव्हता पण महत्वाचं सांगायचंय हेच पुन्हा पुन्हा म्हणत होता.

मुक्ता चिडली तेव्हा त्याने तोंड उघडलं.

" मुक्ता माझं लग्न झालं!"

"कधी ,कुठे, कुणाशी?"

"काल संध्याकाळी , तालखेडला ,एका मुलीशी !"

" अरे हे काय असं? . इथे बस आणि निवांत सांग मला !"

"मुक्ता नोकरी लागल्यापासून खूप बिजी झालो होतो गं. मधे दोनदा असंच अंधश्रद्धा निर्मुलन शिबीर घेतलं , आणखी एक बालविवाह थांबवला . खूप बातमी झाली गं या घटनांची. खूप प्रशंसा प्रसिद्धी मिळाली. म्हणजे लोक ओळखायला लागलेत मला अगदी चेहर्‍यानिशी! "

" विवेक हे विषयांतर होतंय . . . लग्न कसं झालं अचानक ते पण मलाही न कळवता. जवळच्या मैत्रिणीला वगळून? ते सांग "

" अगं त्याचीच पृष्ठभूमी तयार करतोय ना . . . तुझ्याशी बोलायचं म्हटलं की घाम फुटतो गं मला. "

"अरे बोल , तालखेड सारख्या गावात कोण मिळाली तुला? आता कुठेय तुझी बायको?"

"अगं सगळं सांगतो. ऐक- माझा मित्र नाही का तो संग्राम . . त्याचं लग्न होतं तालखेडला. कुठून ओळखीतून लग्न ठरलं होतं. वडिल महा जुनाट विचारांचे अन हा कधी मधी आपल्या संगतीतला सुधारवादी. घरच्यांनी लग्न ठरवलं पण हा बाहेर बढाया मारत होता की \" बघा मी पण हुंडापद्धतीच्या विरुद्ध आहे त्यामुळे एका गरीब मुलीशी लग्न करतोय वगैरे. तिचा काय दोष वडील गरीब आहेत तर असं ! आपल्या लीडर दादांना सांगितलं की कमीत कमी खर्चात लग्न करणार , कमीत कमी लोक बोलावून लग्नसोहळा करणार , भरजरी कपड्यात पैसा घालणार नाही वगैरे. . . !"

"अरे यार विवेक , आता कामाचं सांगतोस का ?"

" हे कामाचंच आहे. सगळं लक्षात ठेव. पण वास्तविकता अशी की काल लग्नाला गेल्यावर वेगळंच दृश्य होतं. सगळा खर्च केला मग २० माणसं म्हणाला तर ५० माणसं घेवून आला. बरं व्यवस्था ठीक नाही म्हणून त्याचे वडिल वधुपित्याचा अपमान करू लागले. तिची आई सतत हात जोडत होती. घोडी साठी, अन मांडवासाठी किरकिर!
इतक्यात ऐन मंगलाष्टकाच्या वेळी त्याच्या वडिलांनी वरदक्षिणा म्हणून १० हजार मागितले.
मग काय वधुपिता अक्षम होता. बिचारा हाता पाया पडू लागला. मला हे काही पटलं नाही . मी व आमच्या दोन मित्रांनी विरोध केला. पण नवरदेव काहीच बोलेना. मी समजावलं संग्रामला पण तो वडिलांच्या शब्दाबाहेर नाही."

"मग रे . . . काय भयानक प्रकार हा ? लग्न मोडलं की लागलं?"

" तेच तर . . त्या रकमेवरून लग्न मोडलंच. वडिल व नातेवाईक मांडव सोडून निघाले . . मी खूप संतापलो व संग्रामला शिव्या घातल्या तर त्याचे वडिलही रागाने म्हणाले \" एवढा समाज सुधारक आहेस तर तूच कर की लग्न या मुलीशी नेसत्या वस्त्रानिशी व हुंड्याशिवाय. . . !\".मग काय सगळे घोषणा द्यायला लागले. . . पत्रकारांची झुंबड . . . आणि फोटोग्राफर चा कॅमेरा माझ्यावर. अंगात काहीतरी संचारलं गं आणि मी तिच्याशी त्याक्षणी लग्नाला उभा राहिलो. खूप सुंदर आहे मुलगी . . .असं झालं लग्न!"

मुक्ता काही क्षण शांतच बसली. काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. याने काय केलंय आणि का केलंय याचा तर्क लावत होती.

मग तिने टाळ्या वाजवल्या व हात मिळवला.

"ग्रेट मित्रा ! मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अशा प्रसंगाना तोंड द्यावं लागतं. वास्तविक पाहता समाज सुधार हा घरापासूनच सुरू व्हयला पाहिजे . हे तू दाखवून दिलंस. खूप अभिमान वाटतोय तुझा!"

" बस्स जिंकलो. मला आई बाबांपेक्षा तुझी जास्त भीती होती की तू काय प्रतिक्रिया देशील? आता ठीक आहे. मी सगळ्यांचा सामना करू शकतो."

"काय नाव तिचं?"

" तिचं नाव . . . काय बरं रुक्मिणी बहुतेक!"

"बहुतेक? अरे तू तिच्याशी बोलला पण नाहिस का अजून?"

"तुला सांगितलं ना कशा परिस्थितीत लग्न झालं. मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. संग्रामशी तर भांडण होवून संबंधच तुटला या लग्नामुळे त्यामुळे कुणाला विचारू? ती नववी पास आहे असं कळंलं सकाळी. दिसायला मात्र खूप सुंदर आहे."

"बरं !" मुक्ता खूप मिश्किलपणे बोलली.
तो लाजला .

" आपला रविंद्र आहे ना त्यांच्याकधेच वहिनीसोबत सोडलं तिला काल व आज सकाळी भेटून आलो."

"म्हणजे घरी नेलं नाहीस तिला? आई -बाबा ?"

" इतकं सोपं आहे का मुक्ता हे? मित्राच्या लग्नाला जाऊन येताना बायको घेवून यायची. . . कसे स्वीकारतील ते?"

"नाही स्वीकारलं तर?"

" काय. . मग ? वेगळं रहावं लागेल. तू मदत कर ना माझ्या आई बाबांना समजावून बघ. . . "

" हा सगळा विचार कसा केला नाहीस तू विवेक? इतका प्रगल्भ आहेस ना , मग असा बाळबोध, बालिश का वागलास ? सिनेमासारखं स्टंट झालं हे. . . पण कशापोटी केलंस ? प्रसिद्धी पोटी की ती आवडली म्हणून?"

" मला नाही माहित मुक्ता. . . पण याची पेपरबाजी झाली तर सगळ्यांनाच कळेल. मग तिला सांभाळून ठेवावं लागेल मला, खूप सुरक्षित असं. प्रचंड लाजाळू आहे ती."

"अरे हो हेच तर. . सगळं ? काय यार. चला बघूयात. मी तुझ्यासोबत आहे. करूयात काहितरी. तिची काळजी घे."

त्यांच्या गप्पा झाल्या व मुक्ता खूपच विचारात पडली

🎭 Series Post

View all