Login

सखा सोबती- द रियल कंपॅनियन( भाग -५)

companianship in life


 अष्टपैलू  लेखक  महासंग्राम 

पहिली फेरी

सखा सोबती-द रियल कंपॅनियन

(भाग -५)

तीन - चार महिन्यानंतर


मुक्ता प्रिलीम परीक्षेत पास झाली होती. मुख्य परीक्षेची तयारी चालू होती.

एक दिवस विवेकचा लँडलाईन वर फोन आला भेटूयात म्हणून.

दोघे तिथेच तलावाकाठी भेटले कितीतरी वेळ दोघेही पाण्यात खडे टाकत बसले. कुणीच काही बोलत नव्हतं .

त्याने हळूच तिचा हात हातात घेतला.

"काय झालं रे? इतका डिस्टर्ब का आहेस. बोल काय असेल ते? मला जितकं समजतं तेवढं नक्कीच सांगेन !"

" कमाल आहेस मुक्ता तू! अगं हेच गं. . . काय आयुष्य आहे आणि कशी वळणं येतायत बघ. किती शांतता वाटते आहे अगदी आतपर्यंत. . . अगदी मेंदूपर्यंत , कारण मी तुझ्यासोबत आहे. तुला न बोलता कळालं की मी डिस्टर्ब आहे . पण तिला ? रुक्मिणी ला इतके दिवस मला रोज पाहूनही कळत नाहीय . सारखं बरं वाटत नाही का? डोकं दुखतय का ? बाम लावून देवू का ? असं विचारते. तिच्यासोबत काय शेअर करू मी आणि कशी सांगू ही घुसमट?"


" कसली घुसमट विवेक ? . . . नवीन लग्न झालं आहे. दोघे मजेत रहा. एकमेकांना समजून घ्या. छान आयुष्य जगा. काय त्यात?"

" तू म्हणायचीस तेच बरोबर होतं असं वाटतं कधी कधी! म्हणजे गेल्या ३ महिन्यात आपण चार पाच वेळा भेटलो असू. अगदी तुझ्या पुढाकारामुळेच रुक्मिणी व मी आमच्या घरात आहोत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीय आता. . . !"

" तू बोल यार, मोकळं बोल. आपण पूर्वीपासून सगळ्या विषयांवर बोलतो ना . . . काय झालं?"

"मुक्ता , सामान्य लोकांना वाटतं की लग्न म्हणजे एक स्त्री- पुरुष सोबत राहतात ,बस इतकंच ! पण तसं नाही गं. आयुष्य बदलून जातं साथीदारामुळे. शिक्षण , संस्कार , विचार , मॅच्युरिटी या सगळ्याचा खूप फरक पडतो गं. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा मनाला. . . म्हणजे बुद्धीला एक तृप्ती . . . एक संपूर्णता जाणवते. म्हणजे पंधरा मिनिट भेटलो तरीही किती आनंद होतो . तोच आनंद रुक्मिणी सोबत दिवसभर राहूनही मिळत नाही गं. "

" का रे. . . म्हणजे ती व्यवस्थित कॉपरेट करत नाही की. . . बोलत नाही . . . अजून वेगळं काही ? म्हणजे काय नेमकं?"

" तू हे समजू शकतेस, माणसाची एक शारिरीक गरज , कधी भावनिक गरज , कधी वैचारिक गरज. . . आणि ती बौद्धिक गरजही असते. ही बौद्धिक पातळी मिळणं खरंच खूप आवश्यक आहे गं मुक्ता.
तू एकदा म्हणाली होतीस ना की आयुष्यात एक रियल कंपॅनियन हवा. . . तोच मुद्दा कुठेतरी नाहीय. म्हणजे दोष तिचा पण नाहीय. . तिची बौद्धिक क्षमताच नाहीय तितकी. खेड्यात नववी पर्यंत शिकली , अठरा वर्ष होताच आई वडिलांनी लग्न ठरवलं. . . पण मी अजूनही सगळं . . . म्हणजे आमच्या दोघांतलं सगळं कर्तव्य किंवा कर्म म्हणून करतोय. . . त्यात आनंद नाहीय. म्हणजे आता तुझ्याशी हे शेअर करतोय त्यातही केवढा आत्मिक आनंद किंवा सुकून आहे. . . मी काय करू गं!"

त्याला अगतिक झालेलं पाहून मुक्ताने हात सोडवून घेतला व पाठीवर थोपटलं.

"सावर विवेक, हे असच असतं . जगात पाहतो ना आपण जीवनाचा जोडीदार प्रत्येक वेळी चांगला कंपॅनियन नसू शकतो. बौद्धिक , भावनिक व शारीरिक पातळी मॅच होवून जीवनसाथी मिळणं ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे. आठव बरं आपण दोघांनी कधीच दिसण्याचा विचार केला नाही. कारण सवयीने व सोबतीने कुठलाही माणूस आवडायला लागतो. भावनिक आधार कधी कधी लागतो. . . नेहमी नाही. शारीरिक गरजेबद्दल तर मी सध्या जास्त भाष्य करू शकत नाही पण. . . बौद्धिक सोबतीची गरज असते तेव्हा मात्र. . .हे सगळं अवघड होवून जातं. "

" किती छान बोलतेस गं मुद्देसूद . आपलं नातंच वेगळं आहे मुक्ता. कुणालाच नाही कळणार की मी का नेहमी तुझ्या कंपनीत राहू इच्छितो. . . . हे आकर्षण नाहीय , ही ओढ पण नाहीय पण एक मस्त सोबत आहे. तुझी कंपनी मला आवडते. आता मी करू गं. . . खूपच बधीर झालोय."


"मिस्टर समाज सुधारक सावरा! त्या वेळी त्या प्रसंगात मुलीचा क्षणिक विचार केलास. आता ते प्रसिद्धी मुळे दबावात केलंस ते केलंस. पण आता मात्र तिचा खरंच विचार कर. मी एक पाहिलंय की तिच्या चेहर्‍यांवर सतत दबलेला भाव आहे. तुझ्या उपकाराखाली दबलीय ती. त्यातून तिला बाहेर काढ. ती मानसिक गुलाम होतेय कारण तू वेळेवर तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवलीस. तिला मैत्रिण बनव. पुढे दहावी शिकव , स्वतंत्र व स्वावलंबी बनव. "

" म्हणजे नेमकं काय?"

"अरे आपण किती समाज सुधारकांच्या जीवन गाथा ऐकल्यात वाचल्यात त्या आठव. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घरच्याच्या भरवशावर सोडलं असतं तर चाललं असतं ना ? पण नाही. शिक्षण देवून सावित्री बाईंना स्वतःच्या वैचारिक पातळीत आणलं की नाही. न्यायमूर्ती रानडे व रमाबाईंची कथाही जगजाहीर आहे. त्या काळात तेवढ्या संघर्षात त्यांनी केलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
बरं तू कॉलेजात आहेस ना . .तिला पुढे शिकव. विचारांची देवाण घेवण कर ,पण उपकाराच्या भावनेने नाही. तिचा सखा बनून रहा. तुला
रियल कंपॅनियन मिळाली नाही तर आता तू तिचा कंपॅनियन बन. तिला सन्मानाने वागव आदर दे. ती तुझ्या प्रेमात पडेल बघ. अजून एका स्त्रीला काय हवं असतं."

मुक्ताने त्याच्या समोर चुटकी वाजवली.

" कसली जादू आहे मुक्ते तुझ्या बोलण्यात. ब्लॉक झालेला मेंदू तू उघडून दिलास. पण तू आहेस नं माझ्या सोबत?"

"कायम आहे, वी आर गुड फ्रेंडस यार!"

"बरं तुझा कलेक्टर कसा आहे?"

" ही इज अमेजिंग! भलताच भारी आहे, माझ्या डोक्याच्या वर हुशार ! अँड आय थिंक वी विल बी रियल कंपॅनियन!"

"मस्तच! तुझ्या सल्ल्यासाठी खूप खूप थँक्यू !"

असं म्हणून विवेकने मुक्ताला मिठी मारली.

हे अनपेक्षित होतं पण मुक्ताला कुठेच त्यात शारीरिक स्पर्श जाणवला नाही उलट हरवलेलं लेकरू आईला बिलगतं तसं वाटलं.

तो बाजूला झाला तेव्हा तिचा खांदा ओला होता.

ती समजून चुकली की इतक्या लोकांच्या गराड्यात त्याला हे अश्रू गाळण्यासाठी हक्काचा खांदाही मिळाला नव्हता.

" ती तुझी सखी नसेल तरीही तू तिचा सखा सोबती बन! बाय!" त्याच्या कानात ते शब्द घूमत होते.

समाधानाने दोघे दोन दिशेला परत जाण्यासाठी वळले.

समाप्त

लेखिका -©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक ३१. ०१ .२३