Login

संस्काराचं बीज भाग १

Story of Culture
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जलदलेखन

संस्काराचं बीज- भाग १

ग्रीष्मातल्या सकाळी सूर्याच्या किरणाने तुळशीसमोर नेहमीप्रमाणे दिवा लावला होता. अंगणातील जास्वंद प्राजक्ताच्या टप टप पडणाऱ्या फुलांना न्याहाळताना लालबुंद झाला होता, तर हिरव्या पानाच्या आडोशातून मोगऱ्याची नजर जुईच्या नाजूक पाकळ्यारूपी गालावरुन हटत नव्हती. म्हशीच्या गळ्यातील हलणारी पितळी घंटाचा स्वर अन् तात्यांचा भुईमूगाच्या शेंगा फोडण्याचा कार्यक्रम एका सुरात सुरु होता. शेणाची हिरवी चादर पांघरलेलं अंगण प्रशस्त ठेवीत होतं.

आज स्वामी मुंबईवरून येणार होता. स्वामी, एकुलता एक मुलगा, लग्नाच्या १२ वर्षानंतर झालेला. त्यामुळे अगदी हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला. आज पहिल्यांदाच स्वामी मुंबईवरुन भेटायला येणार होता. स्वामीचा तसा परवाच फोन येऊन गेला होता. एका आशेवर जगत आलेली आणि आयुष्यभर कष्टाने उभा केलेला संसार, आपल्या लेकरासाठी खर्ची केलेलं आयुष्य अन् लेकराच्या वाटेला डोळे लावून बसलेली ही जोडी आज मात्र आनंदात होती.

"व्हयं गं, झाल्या बघ शेंगा फूडून."

"आले,आले!" आतून द्वारकामाय काठी टेकवतचं होत्या. एक हात कंबरेवर तर दुसरा काठीवर, शरीराला बाक पडला होता, पण कष्टाने अजूनही पाठ सोडली नव्हती.

"आज राच्च्याला आळूची भाजी भाकर अन बासुंदी कर. लै आवडतं ना स्वामीला." बापाचं प्रेम सहसा मुलांना दिसत नसतचं. बाप असतो त्यांच्या आयुष्यातला एक शापित गंधर्व कारण आई जितक्या प्रखरतेने व्यक्त होते तेवढे बापाला व्यक्त होता येत नाही.

"व्हयं तेच करणार हाय."

दुपारी जेवण झाल्यावर तात्या पेपर शोधत असताना-

" किती यळा सांगितलं तुम्हास्नि तुमच्या चष्म्याचा एक डोळा गेलाय तर बसून घ्या."

"माझा स्वामी काय म्हनल परत?"

"अगं, एका डोळ्याने दिसतंय ना थोडं थोडं बघू की नंतर, चालतंय तव्हर चालवायचं." म्हणत तात्या पेपर शोधायला लागले.
"प्यापर व्हय?त्यो बघा उशीखाली." द्वारकामाय उत्तरल्या.
तात्यांनी पेपर उचलला.
"मी यतो पारावार जाऊन, लै ओढातान नको करु, जेवढं जमतंय तेवढंच कर."
तात्या माईला प्रेमाचे दोन शब्द देत पाराकडे निघाले, कोल्हापुरी वहान तात्याला शोभून दिसायची.!

"रामराम गुणाजी."

"रामराम आप्पा."

" रामराम खंडू."

तात्यांनी लांबूनच आपल्या मित्रांना त्यांच्या भाषेत हॅलो केलं.

"रामरामsss तात्या, या या बसा!" सर्वांनी एका सुरात तात्याचं स्वागत केलं.

महाकाय वडाच्या झाडाखाली गोलाकार केलेला कट्टा अन् वडाच्या पारंब्यारुपी माळा हवेच्या लहरी सोबत झोका घेत होत्या. पलिकडे दोन तीन लेकरं पारंब्यासोबत झोका खेळत होती.

"कस्काय, आज लै लेट केलं येणं?"
आप्पाने खिशातली तपकीरची डबी पुढं करत तात्याला प्रश्न केला.

"काय नाय रं!"

"शेंगा फोडत हुतु अन् चष्मा बी सापडत नव्हता!"

"नक्की तेच ना? की वैनींनी येऊ नै दिलं." (गुणाजी तात्याच्या मांडीवर थाप टाकत मिश्किल हसले)
"या वयात काय मजाक सुचतो रे तुला?" तात्यानं सुनावले.

"अरे, स्वामीचा फोन आलेला परवा. आज राच्याला इतोय म्हणलाय."

"आरं, तू मागच्या महिन्यात बी म्हणाला व्हता की स्वामी ईतोय म्हणून !"
"म्हणला व्हता की नै? कुढं आला?" खंडू मागच्या गोष्टीची तात्याला आठवण करून देत बोलला.

"अरे,सहा महिन्यांपासून स्वामी ईतोय, स्वामी ईतोय म्हणतोय हा तात्या पण अजून आला नाही." आप्पा विषय वाढवत बोलू लागले.

"ह्यो गुणाजी बघ, चार वर्षांपूर्वी गेलेला याचा सुरेश अजूनही आला तर नाही पण कधी मधी फोन करायचा तर त्यो बी बंद केला. असले पोरं असतील तर नसलेली बरी."
आप्पाचा तोंडाचा पट्टा चालूच होता.
"गप रे, कशाला जखमा काढत बसलाय.!"
खंडूने आप्पाला गप्प केले.