Login

संस्काराचं बीज भाग २

Story Of Culture
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जलदलेखन

संस्काराचं बीज- भाग २

गुणाजी म्हणाला, "अरे असतं एकेकाचं नशीब. पोरगं तिकडं आनंदी आहे तेच आमच्यासाठी महत्वाचं!"

"तिच्या डोळ्यात अजूनही त्याच्या येण्याची आस लागून आहे.आता कितीही समजावलं तरी ती ऐकणार थोडीचं, त्यामुळे तिच्या आशेवर तिला राहू देतो."

तात्या सर्वांचं बोलणं शांतपणे ऐकत होते.

"अरे गुणा, आपल्या सुरेशला एकदा का बापाच्या कष्टाची जाणीव झाली की येईल की, तू नगं उग तरास करून घेऊ बघ!"
तात्या गुणाजीला समजावण्याचा प्रयत्न करू लागले.

"काय तात्या, चार वर्षे लै मोठा काळ असतो अन् तुम्ही काय समजावताय? स्वामी बी सहा महिन्यापासनं इतुय ना? कुठं आला अजून?
आरं, पिढी बदलली की पोरं बदलतात.
चमचमीत अन् चकचकीत मुंबईत राहायला गेल्यावर जुनं फर्निचर त्यांच्या काय कामाचं तात्या?"

"तात्या, तू बी उगाच आशेचं गाठोडं डोळ्यात साठवून वाट पाहत बसलाय!"

तात्यांच्या मनात शंका आपली जागा निर्माण करू लागली.

"आपला स्वामी येईन नव्हं आज?"

"आपला बाबू बदलला नसेन ना?"

"चांगली संगत भेटली असेल ना त्याला?"

"सहा महिन्यांपासून ईतोय ईतोय म्हणतोय, आजही नाही येता येणार म्हणतोय का काय?"

प्रश्नांची गर्दी वाढतच होती.

"अहो तात्या, कुठे हरवलात?"
खंडूने तात्याच्या मांडीवर हात मारत तात्याला भानावर आणले.

"चला रे, मी ईतो बघू आता, आला तर आला नाहीतरी आपण आशेवर जगतो आहेच की."

गुणाजीचे डोळे ही पाणावले, धोतराच्या एका पदराने अश्रू पुसून घेतले अन् मनातले भाव लपत गुणाजी तात्याच्या मांडीवर हात मारत म्हणाले,

"चला तात्या, मी बी निघतो. स्वामी आला तर पाठवा घरी त्याला. सुरेशच्या आईला बी बरं वाटेल त्याला पाहिलं की, अन् नाही आला मुंबईवरून तरी तरास नका करून घेऊ."

तोपर्यंत तात्यांच्या मनात विचारांनी गर्दी केली होती.
प्रश्नांचे वादळ डोळ्यांसमोर नाचत होते.
"तात्याला शंभर मीटरचा प्रवास कैक मैलाचा भासला होता."
तात्या येऊन बाजावर टेकले.

"द्वारका, ये द्वारकाsssss"

माई घरात नव्हती.

तात्या तसेच बाहेर बाजावर आडवे झाले, गुणजीचं बोलणं आज तात्यांनी मनावर घेतलं होतं,

शंकेचं वटवाघूळ मनात घिरक्या घेत होतं.

"काय वो कमून झोपलात?"
बर नै का?
लवकर आले पारावरून?

तात्यांनी माईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत प्रश्न केला
"तू कुढं गेलती? अहो, बोळकं आणायला, दृष्ट काढ़ीन म्हणते लेकराची."
"खरचं, लेकराला दृष्ट लागली असेल का?"
तात्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता माईच्या मनाने ते समजण्याइतका विचार केला नव्हता.