खरेदी भाग एक
माहित नाही मागल्या जन्मी कुठलं पाप केलं होतं म्हणून या जन्मी हा बायकांचा जन्म मिळाला. दिवस रात्र मरमर काम करा पण साधे कौतुकाचे दोन शब्द सुद्धा वाटायला येवू नये? घरचे तर काय सतत घरातल्या गृहिणींकडून कामाचीच अपेक्षा करतात. पण निदान माहेरच्या माणसांनी आणि मैत्रिणींनी तरी तिचं कौतुक करावं, तिच्याशी प्रेमाने वागावं, बोलावं अशी अपेक्षा करणं मला सांगा चूक आहे का?
तुम्ही म्हणाल आज हिला काय झालं? आज चक्क नमनालाच घडाभर तेल. तर माझा ना एक भीशीचा ग्रुप आहे. हा तसे माझे वेगवेगळ्या गोष्टींचे अनेक ग्रुप आहेत. म्हणजे बघा आधी सांगितल्याप्रमाणे ‘सासरच्या लोकांविषयी भडाभडा बोला भिशी ग्रुप,’ ‘सकल सासू पीडित सासुरवाशिणी मंच,’ ‘वेंधळ्या नवऱ्यांच्या बेजार बायका संघ,’ नवरा कौतुक करत नाही म्हणून, ‘माझंही कौतुक करा मंडळाचं’ ही मी सदस्यत्व घेतलं आहे. याशिवाय ‘स्वयंपाक घरातील झुरळ पाली हाकलवा रणरागिणी मंच, ‘नवऱ्याच्या खिशातल्या पैशांची वाट लावा शॉपिंग क्लब.’ ‘किती ग बाई मी हुशार म्हणून माझ्या सगळ्या जावा बेजार.’ आणि यासारख्या इतर अनेक मंच, क्लब, मंडळं, ग्रुपची मी स्वयंघोषित, सन्माननीय संस्थापक, आजन्म मानद, अध्यक्ष आणि निर्माती आहे.
सांगायला नाही लिहायला विशेष आनंद होतो आहे की, प्रत्येक संघात कमीत कमी दहा ते पंधरा पीडित महिलांनी स्वतःचं नाव नोंदवलं आहे.
काय बाई बोलण्याच्या नादात मूळ मुद्दा बाजूलाच राहिला, तर अशाच एका क्लब ची किटी पार्टी होती, तिथे एक मैत्रीण जी नेहमी सगळ्यांच्या आधी जाऊन पोहोचायची आणि घरातील नवरा म्हणू नका, सासू म्हणू नका,नणंद म्हणू नका, अवेळी आगंतुका सारखे येणारे पाहुणे म्हणू नका, गेला बाजार मोलकरीण म्हणू नका, सगळ्यांच्या कुटाळक्या करायची नेमकी तीच उशिरा आली.
असे माननीय सत्कार मूर्ती वेळाने आले की बाकीचे सदस्य त्यांचा शाब्दिक उद्धार करायला मागे थोडीच राहणार आहेत? म्हणून एकीने तीला प्रेमळ शब्दात विचारलं,”काय ग प्रत्येक वेळी कट्ट्यावर तू सगळ्यांच्या आधीच येऊन धडकतेस आणि नेमकी आजच तू उशिरा कशी आलीस?”
तर या समस्त सासरच्या मंडळींचा जाच सहन करून, घर संसार निगुतीन सांभाळून, मुला बाळांना सतत मोबाईल देणाऱ्या नवऱ्याच्या अंगावर वस्कन धावणाऱ्या, पिडीतेनं एक दीर्घ उसासा टाकला आणि ती तिची राम कहाणी सांगू लागली, “अगं पुढल्या आठवड्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आज माझे अहो मला शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे. दोन अनारकली ड्रेस आणि एक कांजीवरम साडी घेण्याचा माझा मानस आहे, म्हणून म्हटलं नवऱ्याला जरा चांगलं-चुंगलं करून खाऊ घालावं, त्याच्या आवडीची बाजरीची भाकरी, भरल्या वांग्याची भाजी केली, व्हेज मटर पुलाव, बुंदी रायता, चटण्या कोशिंबिरी आणि शिरा करता करता घरून निघायला बाई मला जरा वेळच झाला! पण वेळेत पोहोचली की नाही?” तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते की एखादा दहावी बारावीचा विद्यार्थी परीक्षा केंद्राचा मुख्य दरवाजा बंद होण्यापूर्वी परीक्षा केंद्राच्या आवारात धापा टाकत पोहोचतो ना अगदी तसचं!
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.