द स्टंटमॅन - अनोखी प्रेमकथा -भाग १

प्रेमकथा


द स्टंटमॅन - अनोखी प्रेमकथा - भाग १

नाईट शुट झाल्यावर सकाळी साडेसहाला सलील स्टुडिओतून बाहेर पडला. त्याची बुलेट स्टार्ट करून तो बुलेट वर स्वार झाला. पिळदार शरीरयष्टी, कुरळे केस, गव्हाळ वर्ण असा सलील खूपच राजबिंडा दिसत होता. रस्त्यावर तुरळक वाहनं असल्याकारणाने तो जरा वेगातच बुलेट चालवत होता. त्याचे घर जवळ आले असतानाच अचानक एक तरुणी रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या बाईक समोर आली. त्याला करकचून ब्रेक मारावा लागला. ती तरुणी थोडक्यात वाचली. सलील तिला म्हणाला,

"मॅडम रस्ता क्रॉस करताना थोडी काळजी घेत जा." ती तरुणी खूपच बावरली होती. ती म्हणाली,

" सॉरी मी तुम्हाला लांबून येताना पाहिलं पण मला वाटलं की मी रस्ता क्रॉस करून पलीकडे जाईन म्हणून मी धावत चालले होते पण तुमची बाईक खूप वेगात होती."

"हो म्हणूनच जरा सावकाश जायचं. इतकी कसली घाई."

"माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि माझी बहीण रात्रभर तिथे होती. तिला सोडवायला मला जायचे आहे म्हणून मी एवढी घाई केली."

" ओके. तुम्हाला उशीर होत असेल तर मी तुम्हाला कुठे सोडू का?" तिने नकारार्थी मान हलवली. सकाळी बहुदा उठल्या उठल्याच ती निघाली असावी. काही मेकअप न करतादेखील ती खूपच देखणी दिसत होती. नंतर सलील आपल्या घरी आला आणि त्या तरुणीला विसरून गेला. एस वाय ची परीक्षा दिल्यानंतर सलीलचे बाबा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू पावले. सलीलचं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं. आईची तब्येत नरम गरम असायची म्हणून सलील ने नोकरी करण्याचा विचार केला परंतु ग्रॅज्युएशन ही पूर्ण न झाल्यामुळे चांगला पगार मिळणारी नोकरी मिळणे कठीणच होते. सलीलला आठवलं त्याचा एक जवळचा मित्र 'स्टंटमॅन' म्हणून काम करत होता त्याला चांगले पैसे मिळत होते. सलिलने त्याला काम मिळू शकेल का असे विचारलं आणि काही दिवसातच सलील सुद्धा 'स्टंटमॅन' म्हणून काम करू लागला होता.

सलीलच्या आईचा या सर्वाला विरोध होता कारण हे खूपच जोखमीचे काम होते. अर्ध्या संसारातून पतीचे निधन झालं आणि आता ती मुलाचा वियोग सहन करू इच्छित नव्हती. सलिलने तिला खूप समजावले की ह्या कामामध्ये खूप पैसे मिळतात. त्याने तिला सांगितले की मी बाहेरून शिक्षण पण पूर्ण करेन आणि नंतर दुसरी एखादी चांगली नोकरी बघेन तोपर्यंत मला हे काम करू दे. तो काही काळच हे काम करेल या अटीवर आईने ते मान्य केलं.

सलीलला कधी रात्री तर कधी दिवसा शूट असायचं. तो कधीही घरी आला तरी आई त्याला चांगलं पौष्टिक खायला प्यायला देऊन झोपायला सांगायची. झोप पूर्ण झाल्यावर तो थोडाफार अभ्यास करायचा संध्याकाळी मित्रांमध्ये फेरफटका मारायचा.

इथे सानिका म्हणजे जी तरुणी सलीलच्या बाईक समोर आली होती ती विचार करत होती त्या तरुणाच्या जागी इतर कोणी असता तर तिला किती बोलला असता पण ह्याने किती समजूतीने घेतलं. तिच्या मनात येत होतं हा आपल्याला आता परत भेटेल का कधी आपल्याला तर त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. दोन-तीन दिवसांनी तिच्या बाबांना डिस्चार्ज मिळाल्यावर ती कॉलेजला जाऊ लागली होती. तिच्या मनात तो तरुण रुंजी घालत होता. त्याला एकदाच पाहिलं होतं पण तिला तू खूप आवडला होता. अशीच एक दिवस ती कॉलेजमधून घरी परत होती तेव्हा सलील त्याच्या बाईक वरून तिला गेटमधून जाताना दिसला. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही म्हणजे तो आपल्या सोसायटीतच राहतो हे तिला कळून चुकलं. सलीलने पण तिला पाहिलं पण त्याने दुर्लक्ष केलं. त्याला कोणत्याही मुलीशी जास्त मैत्री करण्याची इच्छा नव्हती कारण त्याचं हे काम खूप जोखमीचं होतं.

क्रमशः

(पुढील भागात पाहूया सानिका आणि सलीलची मैत्रीण होते का)

©️®️सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all