पाळी…... बापरे आळीमिळी गुपचिळी
आज आई , काकी आणि आजी बाहेर अंगणात सांडगे करत होत्या. तर हॉलमध्ये दादा आणि काका भारताची वन डे मॅच बघत होते. आपल्या खोलीत छोटू विज्ञानाचे पुस्तक वाचत बसला होता. तर ताई तिच्या खोलीत आराम करत होती. पुस्तक वाचता वाचता अचानक छोटू अंगणात आपल्या आईकडे आला आणि म्हणाला - "आई पाळी म्हणजे काय ग? "
तेवढ्यात बाबाही बाहेरून वाणसामान
घेऊन आले होते, छोटूच्या या प्रश्नाबरोबर आई ,काकी ,आजी आणि बाबा एकदम एकमेकांकडे बघायला लागले. पण उत्तर मात्र कोणीच देत नव्हतं. बाबा सामानाची पिशवी घेऊन घरात गेले.
आई- "मला माहिती होतं तू कधी ना कधी हा प्रश्न विचारशील. पण एवढ्या लवकर विचारशील असं वाटलं नव्हतं. कसं सांगू तुला? मला असं वाटतं तू अजून लहान आहेस रे हे सगळं समजून घ्यायला."
काकी- "रमा मला असं वाटतं तू त्याला समजून सांगायला काही हरकत नाही, नाही पूर्ण समजलं तरी थोडं थोडं नक्की कळेल त्याला."
छोटूला वाटलं,\"चला निदान घरात काकीला तरी असं वाटतं की, मला आता सगळं समजायला हवं.\"
आई - "पहिले मला सांग तुला हा प्रश्न का पडला?"
खरंतर छोटूच्या घरचं वातावरण अगदी मैत्रीपूर्ण. छोटूला पडणारे कुठलेही प्रश्न तो घरातल्या कोणालाही अगदी बेधडक विचारु शकत होता आणि घरातले ही त्याला उत्तर द्यायचं कधी टाळत नव्हते. पण आता हा प्रश्न छोटूला नेमकं त्याच्या आईलाच विचारावासा वाटला कारण त्याच आणि त्याच्या आईचं बॉण्डिंग खूप छान होतं.
तर झालं असं की, मागल्या आठवड्यात छोटूच्या वर्गातल्या एका मुलीला पाळी सुरू झाली होती. त्यामुळे ती अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी गेली होती. छोटूला सुरुवातीला प्रश्न पडला होता की ,सकाळी शाळेत आलेली रिया अचानक सर्व ठीक असताना अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन घरी का गेली? तिच्या मैत्रिणींनाही त्यांनं आपापसात कुजबुज करताना ऐकलं होतं कि, "रियाची पाळी आली आहे." त्या दिवसापासून पाळी हा शब्द सारखा छोटूच्या डोक्यात फिरत होता. मित्रांसोबत खेळताना, ते पाळी हा शब्द वापरायचे, पण तेव्हा याचा अर्थ आता तुझी टर्न किंवा बारी असा व्हायचा. पण मग मुलींची पाळी ? हे काय सीक्रेट आहे? हे छोटूला जाणून घ्यायची खूपच उत्सुकता लागली होती.
आज विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये पुनरुत्पादन हा धडा वाचतांना छोटूला एकदम पाळी हा शब्द आठवला आणि तो थेट आपल्या आईजवळ गेला.
छोटू- "आई सांग ना माझी पाळी केव्हा येणार?"
आता मात्र घरातले सगळे हसायला लागले.
आई - "अरे बुद्धू , मुलांना नाही येत पाळी. फक्त मुलींना येते." (आईला तिचं हसू आवरता येत नव्हतं.)
छोटू विचार करायला लागला, छ्या बुवा हे \"द सिक्रेट\" आपल्याला आता कधीच समजणार नाही. म्हणून छोटूचा चेहरा पडला.
आई - "छोटू, तुला जरी पाळी येणार नसली तरी मी सांगेन बरं का आमचं हे सिक्रेट. ये माझ्याजवळ."
आईच्या इशाऱ्याबरोबर छोटू आईजवळ उतावीळपणे जाऊन बसला.
लेखिका राखी भावसार भांडेकर.
*************************************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा