अतरंगी कट्ट्यावरच्या सतरंगी गावगप्पा
भाग एक
'काय बाई एक एक सुना असतात! घरात हाsss पसारा पडलेला आणि ही आमची सुनबाई पसाऱ्याचे फोटो काढते आहे.' श्रावणीची सासू मनातल्या मनात श्रावणी वर चिडत होती. श्रावणी मात्र बिनधास्त अतरंगी व्हाट्सअप ग्रुप वर पसाऱ्याचे फोटो टाकून सासूबाईंना अधिकच वैताग देत होती.
"काय बाई राखी तुझे ते स्टेटस एक नंबर हा!" राधिका आपल्यावर कमेंट करते आहे की, आपल्याला कॉम्प्लिमेंट देत आहे हे न समजल्याने राखीला धड हसता येईना आणि धड शांतही राहता येईना; पण तीन-चार वर्षांपूर्वी नवीनच बनलेल्या या इरा सोसायटीच्या लाॅन एरियाच्या बाकावर बसलेल्या अतरंगी ग्रुप मधली चित्रा थोडीच शांत राहणार होती. ती न रहावून बोललीच,"राधिकाताई, राखीचे स्टेटस म्हणजे सारिकाचे फॉरवर्डेड मेसेजेस असतात बरं का!"
आता चित्राच्या या अधिकच्या टिप्पणीवर इतर जणींना ही बडबड करण्याची आयती संधी चालून आली. पण आधी राधिकाताई आणि नंतर चित्रा वहिणींची प्रतिक्रिया सहन होऊन राखीच आधी बोलली, "स्टेटस कोणाचेही असो पण अगदी मिश्किल आणि दिवाळीच्या धामधुमीत अगदी चपखल बसतात की नाही?"
"तर तर! म्हणे स्टेटस चपखल असतात!" श्रावणी खुशीच्या कानात कुजबुजली. "तुला म्हणून सांगते, ही राखी ना आपण कोणीही काहीही ग्रुप वर टाकलं ना की लगेच स्टेटसला ठेवते. अगं हिच्यामुळे तर ग्रुप वर मिष्कील विनोद टाकायची सोय राहिली नाही." श्रावणीच्या प्रतिक्रियेला उत्तर देणार नाही ती खुशी कसली!"
"पण श्रावणी त्या दिवशी सारिकाने ग्रुप वर टाकलेला तो मीम नाही का, 'ज्याच्या नावाने घर तो साफसफाई करेल' तुही तुझ्या स्टेटसला ठेवला होता ना?" आता या खुशीला खाऊ की गिळू असं श्रावणीला मनात वाटत होतं, पण तेवढ्यात खुशीने लगेच दुसरा पेचात टाकणारा प्रश्न विचारला,"काय ग मग कुणी केली तुझ्या घरची साफसफाई? नाही, म्हणजे तू मागे म्हणत होती ना की घर तुझ्या नवऱ्याच्या नावाने आहे पण तुम्ही आता लहान दिराला देणार आहे म्हणून विचारलं."
श्रावणीला पण खुशीला चांगलं खरमरीत उत्तर द्यायचं होतं पण तेवढ्यात तृप्ती तिथे आली. हे तृप्ती प्रकरण म्हणजे 'मी नाही खात आणि माझा जीव त्यात.' राधिका तर तिला नेहमी म्हणे,'आली मोठी कामाची कमळा' आणि अस्मिता तिची री पुढे ओढे "आणि घरात सगळा केर-पुंजा."
शिल्पा मात्र हळू आवाजात सारिकाला काहीतरी विचारत होती, पण शिल्पाचा आवाज इतका होळू होता की, अस्मिता शेवटी चिडून म्हणालीच "हे असं इथे कट्ट्यावर जमायचं आणि कानात खुसुरफुसुर करायचं अजिबात चालणार नाही हे."
लगेच श्रावणीने अस्मिताला दुजोरा देत बोलली, "नाहीतर काय! याला काही अर्थ आहे का? आम्ही पहा बरं कशी घरची सगळी धुणी-भांडी इथेच कट्ट्यावर धुतो."
श्रावणीने धुणी-भांडी शब्द उच्चारतात, तृप्ती इकडे तिकडे कपडे आणि भांडी दिसतात का ते बघायला लागली.
तेवढ्यात अस्मिता आपल्या पहाडी आवाजात गरजली "या अतरंगी कट्ट्याचा जो कोणी सदस्य बनेल त्याने अगदी बिनदिक्कत आणि बेधडक बोलायचे असा नियमच बनवते मी आज आत्तापासून."
अस्मिताचा रागावलेला चेहरा, वटारलेले डोळे आणि आवळलेल्या मुठी बघून राधिकाने प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच क्षणी अस्मिता शांत झाली, तिचा आवाज वरमला पण तिच्या शब्दातला तिखटपणा काही कमी झाला नव्हता.
तृप्ती इकडे तिकडे भिरभिरणारी नजर फिरवून मनाशी हळूच बोलली. "अग बाई आपल्या या कट्ट्यावर घरची धुणी-भांडी घेऊन यायची असतात की काय घासायला आणि धुवायला? मला माहीतच नव्हतं." मग ती अस्मिताला अजीजीच्या स्वरात म्हणाली "ते कट्टा प्रमुख, कप्तान चव्हाण सर यांनीही मला काही पूर्वकल्पना दिली नाही. उद्यापासून मी आपल्या या कट्ट्यावर माझ्या घरची सगळी धुणी-भांडी आणि विशेष म्हणजे मायक्रोवेव्ह मधली काचेची भांडी घेऊन येईन हो घासायला."
पुढल्या भागात बघूया की तृप्ती खरंच कट्ट्यावर घरातली धुणीभांडी घेऊन जाते का धुवायला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा