तृप्तीला आणखी एक नवा शोध लागला होता की, घराची साफसफाई करण्यासाठी जर नवऱ्याला मदतीला घ्यायचं असेल तर त्याला आधी छान तयार व्हायला सांगायचं. आणि सोबतच मुकेश चे एखादं दर्दभरं गाणंही म्हणायला लावायचं. श्रावणी निर्विकार पणे म्हणाली,"ये बाई सारीका चार आणायच्या कोंबडीला कशाला उगाच रुपयाचा मसाला लावते आहेस? बोल पटापटा."
केव्हापासून गप्प असलेली निशा मात्र आता श्रावणीला समजावून सांगत होती. "श्रावु बाळ चार आण्याच्या कोंबडीला आठ आण्याचा मसाला लावायचा असतो! उगाच आठ आण्याचा जास्तीचा खर्च, नको तिथे कशाला करायचा? आणि तोही विशेषतः मसाल्यावर तर अजिबात जास्त खर्च करू नये!"
निशाच्या या विशेष टिप्पणीवर अस्मिताला तर दे माय धरणी ठाय असं झालं, तर तृप्तीच्या चेहऱ्यावर असे भाव होते जणू तिला ब्रह्मज्ञान मिळालं. पण मेघा मॅडमला उत्सुकता फार की, सारिका आक्काच्या नवऱ्याने कुठलं गाणं म्हटलं. मेघा मॅडमने सारिकाला लगेच विचारलं "कोणतं गाणं म्हणाले हो, तुमचे अहो?"
नाईलाजास्तव, जड अंतःकरणाने अगदी ताला, सुरात सारिकाने गाणं म्हटलं, 'हम छोड चले है महफिल को, याद आये कभी तो मत रोना." गाण्याचे हे मधुर स्वर सारिकाच्या तोंडून ऐकून अर्चनाला तर मन आणि कान तृप्त झाल्याची अनुभूती मिळाली. बाकी इतरांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की, भीक नको पण कुत्रं आवर, शेवटी न राहून श्रावणी बोललीच, "ए बाई सारिका तुला नवरा पुराण सांगायचं नसेल ना तर ठीक आहे! पण प्लीज तेवढं गाणं मात्र म्हणू नकोस." श्रावणीच्या या वाक्यावर आता राग येण्याची पाळी सारिकाची होती. सारिकाचे डोळे रागाने लाल झाले होते.
वातावरणातला ताण घालवण्यासाठी ऋचाने मध्येच आपलं घोडं दामटवलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी लग्न न झालेली ऋचा काय म्हणते इकडे सगळ्याजणी लक्ष देऊन ऐकु लागल्या.
"मी तर लग्नानंतर कामाला हातच लावणार नाही बाई!" ऋचाने अगदी आत्मविश्वासाने आपलं भविष्यातलं प्लॅनिंग सांगितलं.
"का ग?" अगदी दबक्या, घाबरट आणि बारीक आवाजात जानकीने विचारलं. "तू सासरी माहेरी कुठेच, कधीच का काम करणार नाहीस?"
ऋचा अगदी समजावणीच्या सुरात जानकीला सांगत होती आणि बाकी इतर सगळ्याजणी अगदी कानात तेल घालून ते ऐकत होत्या. "माझी आई मला म्हणते की, 'तू परक्याचं धन आहेस, चार दिवसाची पाहुणी' आणि सासरी गेलं की, तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मला हे लक्षात आलं की, प्रत्येक सासू तिच्या सुनेला म्हणते 'की तू दुसऱ्या घरातून आली आहेस' जर दोन्ही घरं आपली नसतीलच तर कशाला उगाच मरमर करून दिवाळीची साफसफाई करायची नाही का?" ऋचाच्या या स्पष्ट विचारांबद्दल ऐकून सगळ्याजणी भाऊक होऊन 'हो ग हो, अगदी खरं आहे!' असं अगदी एक सुरात म्हणत होत्या. ऋचाच्या या विचारांवर सगळ्या जणींचा एक मत झाल्याचं बघून पूजाचाही हुरुप वाढला आणि ती पण तिला काय वाटतं ते सांगू लागली, "मी तर बाई म्हणते सासू कशीही असू देत पण सकाळी उशिरापर्यंत झोपू देणारी असावी."
"तर तर सकाळी उठून सासूने सगळी कामेही करावी आणि सुनेला गरम गरम चहा ही द्यावा असं म्हणायचंय ना तुम्हाला? एकदम पुरुषी आवाज ऐकून सगळ्याजणी गरकन मागे वळल्या तर तिथे सोसायटीचे सचिव, मराठीत काय म्हणतात ते सेक्रेटरी आणि 'अखिल भारतीय नवरे सगळे बिचारे' संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष प्रशांत गुरुजी तिथे आले होते.
"तुम्ही घरातली काय साफसफाई केली ते आधी सांगा." चिडून श्रावणी बोलली."नाहीतर काय! दसरा झाला की, आम्हा बायकांची साफसफाई मोहीम सुरू होते. खुर्च्या, खिडक्या, भांड्यांची रॅक, स्वयंपाक घरातले डबे, ठेवणीतली-रोजची वापरारची भांडी, सगळं सगळं घासून पुसून कसं लख्ख करून टाकतो आम्ही. या स्वच्छता मोहिमेत कितीदा आमची बोटं कापतात, याचा कधी विचार करता का तुम्ही?" राखी अगदी जीव तोडून सांगत होती."वरून किराणा मालाची भली मोठी यादी दिली म्हणून आम्हाला टोचून टोचून बोलतात ही सगळी नवरे मंडळी." राखीच्या बोलण्यातली कळकळ सगळ्या मैत्रिणींना जाणवत होती. पण हार मानतील ते गुरुजी कुठले?
कट्ट्यावरच्या समस्त महिला वर्गासमोर प्रशांत गुरुजी एका हाती कशी झुंज देतात ते पुढल्या भागात बघूया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा