भाग दोन
तृप्तीच्या या वाक्यावर अस्मिताला असं वाटलं की आता धरणी इथेच फाकावी आणि आपण त्यात सीतेसारखं सामावून जावं. पण गप्प बसेल ती तृप्ती कुठली? कट्ट्यावरच्या इतर मैत्रिणींना उद्देशून तृप्ती म्हणाली, "तुम्ही सगळ्याजणी याल ना ग माझ्या मदतीला? म्हणजे तीन माळे उतरून कपडे-भांडी आणि विशेष म्हणजे काचेची भांडी खाली आणताना माझी जरा कसरतच होईल ना म्हणून म्हटलं बाई!"
आता मात्र अस्मिताचा संयम परत एकदा सुटला आणि ती आवाजात जरब आणून तृप्तीला बोललीच, "ए बाई तू काय सी.बी.एस.सी. किंवा आय.सी.एस.सी बोर्डातून शिकलीस की काय ग?" अस्मिताच्या या वाक्यावर तृप्तीने चमत्कारिक नजरेने अस्मिता कडे बघितले. "हे असले नमुने आपल्याच ग्रुपमध्ये का आहेत कुणास ठाऊक?" अस्मिताची चिडचिड सुरूच होती.
आता अनु मध्ये पडली. "अग तृप्ती घरची धुणी-भांडी धूवायची म्हणजे सासरच्या लोकांच्या उखळ्या-पाखळ्या काढायच्या. कळलं का?"अनुने अजूनही स्वतःचा स्वर समजावणीचाच ठेवला होता. ऐव्हाना राधिका ने अस्मिताला शांत केले होते. तरीही ती दात ओठ खातच होती. अनुच्या समजावल्याने जसा न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा, आर्किमिडीजला घनत्वाचा आणि एडिसनला बल्बचा आणि इतर शास्त्रज्ञांना जसा कशाचा शोध लागला तसा तृप्तीला धुणी-भांडी शब्दाचा अर्थ नव्याने समजला.
तिकडे मात्र राखी आणि सारिकाचं वेगळच काहीतरी सुरू होतं, म्हणून तृप्तीवरून समस्त कट्ट्यावरच्या महिला राखी आणि सारिका कडे वळल्या.
राखी सारिकाला नसत्या चौकशा केल्या सारखं विचारत होती,"काय हो सारिका आक्का तुम्ही ते स्टेटस ठेवलं होते ना, 'मुझे छोडना इस तन्हाई मे, मुझे जरूर है तेरी घर की साफसफाई में' मग तुमच्या अहोंनी दिली का तुम्हाला साथ घरच्या साफ-सफाईत?"
या प्रश्नावर सारिकाने एक मोठ्ठा उसासा टाकला आणि ती बोलू लागली, "अहो राखीताई……"
सारिकाच्या तोंडी स्वतःविषयी 'ताई' हे विशेषण ऐकून राखी एकदम बिचकलीच आणि लगेच म्हणाली, "ताई मत कहो ना!"
सारिकाच्या तोंडी स्वतःविषयी 'ताई' हे विशेषण ऐकून राखी एकदम बिचकलीच आणि लगेच म्हणाली, "ताई मत कहो ना!"
सारिकानेही मग काय बाई नुसता वैताग आहे असले भाव चेहऱ्यावर आणून लगेच सारवा-सारव केली आणि बोलू लागली, "बरं बरं तर मी काय सांगत होते?"
थोड्या लांबच्या बाकावर, नवीनच लग्न ठरलेला आणि होणाऱ्या बायकोशी मोबाईलवर चॅटिंग करणारा राघव म्हणाला, "ते घरच्या साफसफाई विषयी काहीतरी…..!" त्याच्या या उत्तरावर कट्ट्यावरच्या सगळ्या जणींनी त्याच्याकडे असे पाहिले की, त्याला व्ही. शांताराम यांचा 'दो आँखें बारा हात' सिनेमातल्या बारा हातां ऐवजी वटारलेले आणि गरगर फिरणारे बारा डोळे दिसू लागले. पण करतो काय बापुडा? बसला बिचारा मोबाईल मध्ये डोके खूपसून.
सारिकाने सांगायला सुरुवात केली आणि पुजा, ऋचा, मेघा, शिल्पा आणि कट्ट्यावरच्या साऱ्याच जणी अगदी जीवाचा कान करून ऐकू लागल्या.
सारिका अगदी तन्मयतेने सांगू लागली "मी म्हटलं आज घरात कधी नव्हे तो एकांत आहे तर आपण छान……." सारिका आता काय बोलणार म्हणून राधिका, तृप्ती, अस्मिता, सायली, जानकी, निशा साऱ्यांनी कान टवकारले. सारिकाने अर्धवट राहिलेलं वाक्य पूर्ण केलं ".....म्हटलं छान साफसफाई करूया!" या वाक्य सरशी अस्मिताला असे वाटलं जणू कोहलीने षटकार मारावा आणि बॉण्ड्रीवर त्याची कॅच जावी, राधिकाला तर वाटलं क्लीन बोल्ड झालेल्या मॅक्सवेलला अंपायरने बॉलरला वाईड बाॅल सांगावा आणि तृप्तीच्या डोळ्याला तर धाराच लागल्या. पण राखीची उत्सुकता काही थांबेना.तु काही सारिकाचा पिच्छा सोडायला तयार नव्हती "मग काय म्हणाले तुमचे हे?"
सारिकाने मग सर्वांसमक्ष स्वतःच दुःख हलकं केलं. "काय म्हणणार? आमचे हे छान तयार झाले आणि मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजात गाऊ लागले….."
बायकोने घरची साफसफाई करायची म्हटलं तर नवरा चक्क मुकेशचे गाणे म्हणायला लागतो हे ऐकून चित्राने आश्चर्याने उडीच मारली, अनुने तोंडाचा मोठा आ-वासला.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर
पुढल्या भागात बघूया सारिकाच्या नवऱ्याने कुठले गाणे म्हटले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा