"अहो तुम्ही महिला केवळ यादी देता वाण-सामानाची पण खिसा आमचा रिकामा होतो ना!" गुरुजींनी ठेवणीतला मुद्दा काढला.
"तर तर म्हणे की खीसा रिकामा होतो." श्रावणीला गुरुजींचे बोलणे फारच लागले होते. "एकेक पदार्थ बनवायला दहा दहा जिन्नस टाकावे लागतात त्यात."श्रावणी नाक उडवत बोलली.
"अगं ह्या पुरुषांना दिवाणखान्यात फराळाच्या आयत्या बश्या मिळतात ना म्हणून आपल्या श्रमाचं मोल नाही." सुषमा श्रावणीला दुजोरा देत म्हणाली.
"भले शाब्बास! वाण्याच्या दुकानातून जड सामानाच्या पिशव्या हातात धरून घरी आणणारा, स्टुलावर चढून पंखे, माळे स्वच्छ करणारा, प्रत्येक घरातला गरीब माणूस कुणालाच कधीच दिसत नाही!" प्रशांत गुरुजी स्वतःचा मुद्दा सोडायला तयार नव्हते.
"पण माझ्या घरी तर किराण्याच्या पिशव्या मीच आणते. पंखे, माळे, मीच स्वच्छ करते." तृप्ती केविलवाण्या स्वरात म्हणत होती.
या शाब्दिक चकमकीत बिचाऱ्या सायलीने घाबरत घाबरत फक्त एवढेच म्हटले, "काडी काडी संसार उभा करताना, पोत्या पोत्याने आपण किती भंगार गोळा केलंय हे दिवाळीची साफसफाई करतानाच लक्षात येतं." सायलीच्या वाक्यावर प्रत्येकीने आपण काहीतरी खूप गमावले आहे या अविर्भावात एक साथ हम्म केले.
आता स्वच्छतेचं अंतहीन चर्चासत्र सुरू होणार असं पाहून प्रशांत गुरुजींनी तिथून काढता पाय घेतला.
साफसफाईचा नकोसा विषय टाळण्यासाठी राधिकाने एक उपाय सुचवला, "अगं मी काय म्हणते, दिवाळीची साफसफाई आपण कशाला करायची? कामवालीला द्यायची ना!" कामवाली हा शब्द ऐकाताच परत एकदा अस्मिताचा रागाचा पारा चढला. अस्मिता परत तावातवाने बोलत होती, "राधिका कामवालीचं नाव नको घेऊस! अग महिन्याभरापासून तिने माझ्या नाकात दम करून ठेवला आहे. घरात आल्या आल्या नुसत्या चांभार चौकशा असतात तिच्या. मला म्हणते कशी, 'तुम्ही काय काम करता?' म्हणजे तिला वाटतं की मला घरात काहीच काम नाही? पण तिला कोण सांगणार की, बाई तू माझ्याशी जास्त डोकं लावू नकोस नाहीतर……" अस्मिताला शांत करण्यासाठी राधिका ने परत एकदा मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तरीही अस्मिताने आपल्या मनातली भडभड ओकलीच, "घरात पाऊल टाकलं की त्या बाईच्या नकोश्या चौकशा सुरू होतात. 'आज कोणी पाहुणे आले का?' घर शांत असलं तर विचारते, 'घरातले कुठे बाहेर गेले का?' जणू ही केबीसीवाली अमिताभ बच्चन आणि मी घायकुतीला आलेला खेळाडू." अस्मिता जाम वैतागली होती. "अग तेलाचे भांड महिन्यातून दोनदा टाकणार असं ठरवल्यावर तुम्ही चारदा का टाकले म्हणून तिने माझं डोकं उठवलं, म्हणे 'सुरुवातीलाच मी सांगितलं होतं जास्त भांडी नको, भांड्यांमध्ये खरकट नको, भांडी जास्त नकोत, तेलकट नकोत, भांड्यांमध्ये कुकर नको, देवाची, तांब्या-पितळीची भांडी नको, जणू तांब्या पितळीची भांडी चिंचेने आणि पितांबरीने घासल्याने यांचे हात काळे होऊन झीजणार आहेत. भांडी स्वच्छ धुऊन पाणी घालून ठेवायची, भांडी कडक झाली की लवकर निघत नाही.' असं दाखवत होती जशी काय सगळी गरज माझीच आहे, आणि ही मोठी अधिकारीच आहे."
"अगदी माझ्या मनातलं बोललीस अस्मिता." निशा आता कामवाली पुराण सुरू करणार हे बघून गुरुजींनी तिथून काढता पाय घेतला. पण नेमके चव्हाण मास्तर तिथे आले आणि सगळ्यांच्या गप्पा कान देऊन ऐकू लागले. "तुम्हाला सांगते, माझी भांडीवाली नेमके चहाच्या कपाचा कानच फोडते. दर महिन्यात नवा चहाचा सेट घ्यावा लागतो बाई मला."
"तुझी भांडेवाली मागच्या जन्मी मास्तरीन असावी म्हणून सगळ्या कपांचा कान पकडून त्यांना अद्दल घडवते." खुशीने खुशखुशीत खसखस पिकवली, "पण तू एक काम का नाही करत? सरळ स्टीलचे कप घेऊन ये."
स्टीलचे कप हा शब्द ऐकल्याबरोबर निशाला जणू अंगावर पार पडल्यासारखं वाटलं, "शी: बाई स्टीलच्या कपात काय कॉफी प्यायची? आणि पाहुण्यांसमोर ते बरं दिसतं का? माझ्याकडे नाही आहेत स्टीलचे कप." निशाने मुद्दा उडवून लावण्याचा प्रयत्न केला. पण खुशीने चिकाटी नाही सोडली. "मग एक काम कर कॉफीचा मग स्टीलच्या कपात ठेव आणि पी कॉफी." खुशीच्या या वाक्यावर हसावं की रडावं तेच निशाला कळेना.
पुढल्या भागात बघू कट्ट्यावरच्या महिलांना कामवाल्या कशा प्रकारे छळतात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा