'काय बाई हा एक नमुना!' असा कटाक्ष सगळ्यांनी चव्हाण मास्तरांकडे टाकला आणि चर्चासत्र पुढे सुरू झाले.
एवढा वेळ गप्प बसलेली वर्षाही मग कामवाली बाई नावाचं अवघड जागेचं दुखणं सांगू लागली,"हो ग हो या कामवाल्या असंच म्हणतात. घरात चार माणसं आहेत तर चारच चारच ताट, चार वाट्या, चार ग्लास, एकच कढई. कुकर नको. चाकु नको, काचेची भांडी नको, टिफीन नको. मग काय द्यायचं काय ह्यांना घासायला? सगळं जर आपल्यालाच घसायचं आहे तर! माझ्या आईंकडे आली होती एक अशी. आईने सरळ बाहेरचा रस्ता दाखवला तिला."
"काचेची भांडी तर द्यायचीच नाहीत. सरळ लग्न लावून मोकळ्या होतात ह्या बायका." अस्मिताने परत एक कटू अनुभव सांगितला.
"माझ्याकडे तर काचेचे भांडे जास्त असतात घासायला... मायक्रोव्हेव्ह मधले... त्यामुळे आता सवय झाली मला. मी कोणाला कधीच भांडी घासू देत नाही. माझी खूप वाईट सवय आहे... मी कधीच कोणाला किचन मधे काम करू देत नाही माझ्या, त्यामुळे सगळं माझ्याच अंगावर येतं." स्वतःचा स्वभाव स्वतःच उलगडून सांगताना तृप्तीला कळलच नाही की आपण काय बोलतो आहे ते.
"एक्सट्रा पोळ्या करायला सांगितल्या तरी कटकट असते अगं.. भाजीला तर चवच नसते." आधीच नोकरीतल्या वेगवेगळ्या ताणाने हैराण झालेली निशा मनमोकळ करत होती.
"अगं कोणतीही भाजी खा सारखीच लागते. कळत नाही भेंडी खतोय की गावार!" वर्षाने निशाची री ओढली.
"एकदम खरं.. भेंडी, गवार एकच रेसिपी.. सगळ्यात जिरे मोहरीची फोडणी, आणि तिच्या भाषेत असल्या फोडणीला खमंग फोडणी म्हणतात." एक उसासा टाकून निशा बोलली.
माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात, "राधिका तुझ्याकडे कामवाल्या बायका फार छान मिळतात कुठेही गेली तरी.. आणि हे खूप खरंय.. माझी बाई, काचेचे,देवाचे तांब्या पितळ्याचे,चांदीचे असतील तर ते असे वेगवेगळे धुवून वेगळे ठेवते.. न सांगता देवाची कृपा म्हणायची." कामवालीच्या बाबतीत आपण किती नशीबवान आहोत हे राधिकाने परत एकदा अधोरेखित केले.
"आम्ही इकडे नवीन शिफ्ट झालो होतो. एक बाई आली होती. झाडू पोछा 1500 रुपये म्हणे. तिला म्हटलं कमी कर, तर म्हणे मला पेट्रोलला पुरलं तर पाहिजे. तिच्या या वाक्यावर मी हसावं की रडावं तेच मला कळेना! मी तर तिचे नखरे बघून लावलीच नाही. तिला पंधराशे रुपये देणार ऐवजी मी स्वतःच झाडूपोछा करून स्वतःसाठी पंधराशे रुपये बाजूला टाकीन म्हटलं. नंतर मला चांगली बाई मिळाली… आता २ वर्ष झाले तीच आहे" किमयाने पण स्वतःचा अनुभव बोलून दाखवला.
"पैसे नाही बाजूला टाकले जात. काम ही कराव लागत आणि जैसे थे होत." "मी तर आता कामाला बाया लावून मस्त इव्हिनिंग वॉकला जाते आणि माझं लिखाण पण करते." एवढा वेळ शांत बसलेली शिल्पा आपबीती सांगत होती.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ऋचानेही स्वतःचा अनुभव सांगितला, "आमच्याकडे एक बाई होती, आठशे रूपये फक्त भांडी घासायला! आई आणि मी दोघीच, फक्त दोन आठवड्यात अर्धा लिटर लिक्विड डिश वॉश संपवले तिने आणि बहुतांश वेळा तेलाचे डाग तसेच होते भांड्यांना. त्यात दोन दिवस माझा वाढदिवस म्हणून आम्ही पुण्याला फिरायला गेलो होतो. तिचं काम बघून शेवटी मी कंटाळून आईला बोलले, 'ते पैसे मला दे, मी काम करते.' आता मी ऑनलाइन लेक्चर ऐकता ऐकता भांडी घासते."
"मला वाटल कशाला घर कामासाठी बाई हवी? त्या पैशाने महिन्यातून मी एक तरी ड्रेस घेईन. पण ड्रेस ही नाही आणि काम पण आपणच करा." आपण आयुष्यात कामवाली बाई न लावून किती मोठा मूर्खपणा केला हे तृप्तीने अगदी प्रांजळपणे कबूल केले.
"पण मी काय म्हणते ही घराची साफसफाई आणि फराळ बनवणे हे कुठल्या गृहिणीने शोधून काढले असेल बरे?" कट्ट्यावरच्या सगळ्याजणी दिवाळीचा फराळ करायला घरी जात असताना. मेघाने सगळ्यांच्या डोक्यात एक किडा सोडला आणि ती तडक घरी निघाली.
कट्ट्यावरच्या बायकांच्या ह्या अतरंगी गप्पा एकूण चव्हाण सरांनी त्यांना एक विशेष नाव दिले आणि ते म्हणजे.
"मोकळेष्मती साम्राज्यम बिनकामकाजमाता बिनकामिनीदेवी."
पसारा, आवरा आवरी, साफ सफाई प्रत्येक दिवाळीच्या आधी... न्यूटनच्या गतीच्या नियमाप्रमाणे सिद्ध होतात.
1ला आवराआवरी चा नियम.
घरातला पसारा कधीही आवरल्या जात नाही आणि संपतही नाही. तो फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून, माळ्यावर आणि माळ्यावरून, जिन्याखाली सरकवल्या ढकलल्या आणि कोंबल्या जातो.
आवरा आवरी चा दुसरा नियम
जर घरात आवरणाऱ्या व्यक्ती पसारा करणाऱ्या व्यक्तींपेक्षा कमी असतील तर पसारा कधीही आवरल्या जाणार नाही.
तिसरा नियम आवरा आवरीचा
जर घरात खूप पसारा असेल तर तो घरातल्या आळशी लोकांशी थेटपणे संबंधित असतो. घरात जितके जास्त आळशी लोक तितकं ते घर पसार्याने भरलेलं असतं. आणि हे आळशी लोक पसारा खुर्चीवरून कपाटात कोंबत असतात आणि कपाट भरलं की त्याकडे केवळ आ-वासून बघतात.
आवराआवरी चा चौथा नियम.
आवराआवरी ही केवळ दिवासनापूर्ती असते तर पसारा हा घरातल्या गृहिणीच्या पाचवीला पुजलेला असतो.
पाचवा नियम आवराआवरीचा.
आवरा आवरी करताना समस्त पुरुषांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कुठलीही वस्तू फेकताना ती घरातल्या गृहिणीची नाही ना याची आधी खात्री करून घ्यावी. नाहीतर घराबाहेर फेकलेली वस्तू दुप्पट वेगाने तुमच्यावर येऊन आदळेल. बायकोची असेल तर विचारूच नका!
आवरा आवरी करताना समस्त पुरुषांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कुठलीही वस्तू फेकताना ती घरातल्या गृहिणीची नाही ना याची आधी खात्री करून घ्यावी. नाहीतर घराबाहेर फेकलेली वस्तू दुप्पट वेगाने तुमच्यावर येऊन आदळेल. बायकोची असेल तर विचारूच नका!
आवरा आवरीचा सहावा नियम
आवरा आवरी, करताना तुम्ही एखादी वस्तू, गेल्या दशक भर सांभाळून ठेवली असेल आणि आत्ता फेकली तर तीची गरज तुम्हाला लगेच एका तासात लागेल. त्यामुळे पसारा आवरताना कुठल्या वस्तू फेकायच्या याचं तारतम्य आणि डोकं ठिकाणावर ठेवावं.
अनेक वर्ष घरातला पसारा स्वतःच्या हाताने आवरणाऱ्या एका गृहकृत्यदक्ष गृहलक्ष्मीने हे नियम बनवले आहे.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
******************
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून याचा वास्तव जीवनात कोणाशीही कुठलाही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हे लिखाण राखी भावसार भांडेकर यांचे असून याचे. कॉपीराईट रिझर्व आहेत कुठल्याही यूट्यूब चैनलने हे लिखाण परवानगीशिवाय वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून याचा वास्तव जीवनात कोणाशीही कुठलाही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हे लिखाण राखी भावसार भांडेकर यांचे असून याचे. कॉपीराईट रिझर्व आहेत कुठल्याही यूट्यूब चैनलने हे लिखाण परवानगीशिवाय वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा