पाच
"कामवाली सुट्टी मारते आणि खाडा धरू नका म्हणते. कधी जास्त भांडे पडले तर मीच घासुन घेते. भांडी आणि धुणी कितीही असो 10 मिनिटात होतात कामवाली बाईचे. कित्येकदा तर काहीही स्वच्छ निघालेले नसते, आणि तारीख एक आली़ लगेच द्या पैसे म्हणून तर दादा लावते. काही जणींना तर ॲडव्हान्स मध्ये पैसे पाहिजे असतात. सणावाराला तर हमखास सुट्टी ठरलेली. बर्याचदा तर जीव नको होते कामवाली मुळे. शेवटी दिवाळी सगळे डबे मीच एकटी घासते एकाच दिवसात, नोकरी आहे त्यामुळे पर्याय नाही. बाकी दिवस बाईची मदत घ्यावीच लागते. गरजवंताला अक्कल नाही." मनातलं दुःख मोकळ करून भाग्यश्री घरी स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली.
"मोठ्या शहरातल्या कामावाल्या सगळ्या अशाच आहेत.. आणि आमच्या वहिनीबाई पण तुझ्यासारख्याच.. मग काय रागं रागं तिने भांड्यांचे डिश वॉशर घेतलं.. आता तिचं काम डबल वाढलं." राधिका अस्मिताला सांगत होती पण तीचे अनुभवाचे बोल सगळ्याजणी कान देऊन ऐकत होत्या. "त्या मशीन मध्ये भांडी सगळी स्वच्छ नळाखाली धुवून, मग त्यात ती दिलेल्या जागी लावावी लागतात. त्यानंतर ५० मिनिटांनी भांडी लख्ख धुवून येतात, पण खूप गरम असतात म्हणून लगेच वापरता येत नाहीत.. फक्त एक फायदा म्हणजे कितीही वेळा लावू शकतो आणि कोणत्याही वेळी.. बाकी त्याचे लाडच जास्त वाटले मला."
"अगं त्या दिवशी मी फोनवर बोलत होते आणि नेमकं कामवालीने दाराची बेल वाजवली. मी फोनवर बोलत बोलत दरवाजा उघडला तर पलीकडून मला विचारलं 'कोण आहे?' मी म्हटलं, 'कामवाली बाई!' तर लगेच त्या कामवालीला राग आला." अस्मिताने स्वतःचा आणखी एक अनुभव सांगितला.
"आमच्याकडे मंदा ताई आहे कामाला, माझ्या पेक्षा लहान आहेत पण तरीही आहो-जाहो करावे लागते. अरे तूरे केले की डोळे वटारून पहाते." सासूला आणि कामवाल्या बाईला घाबरणारी भाग्यश्री स्वतःचे दुःख सांगत होती.
"काय ग बाई, तू कामवाली बाई म्हणतेस तिला? मेड वगैरे म्हणायचं ना!" खुशीने समजावणीच्या स्वरात अस्मिताला सांगितले. अगं मी पण कामवाल्या बाईला मावशीबाई वगैरेच म्हणते पण ही जास्तच डोक्यात जात होती. मग मला आला राग आणि एका महिन्यात काय हिला मी मावशीबाई म्हणून? जरा-तरी तीने काम व्यवस्थित केलं तर विचार होऊ शकतो ना! कामवाली म्हणायचं की मावशी बाई याचा." अस्मिता स्वतःचं म्हणनं कसे योग्य आहे सगळ्यांना पटवून पटवून सांगत होती.
खुशीच्या तोंडी 'मेड' हा शब्द ऐकताच, इव्हिनिंग वॉकला आलेल्या दत्ता काकांनी खुशीला विचारले, "तो 'मेड' हा शब्द कॅपिटल मध्ये म्हणायचा की स्मॉल लेटर्स मधे?" "काका इंग्रजी शब्द आपण स्मॉल किंवा कॅपिटल कुठल्याही लेटर मध्ये म्हटला तरी समोरच्याला तो बरोबर समजतो." सारिकाने वेळ मारून नेली.
"तर तर म्हणे स्वयंपाक घर साफ करताना यांची बोटं कापतात आणि फोडण्या करताना मग त्या चिरलेल्या बोटाला कडक फोडणी बसते. सतत सोशल मीडियावर वावरणाऱ्या या बायका खरंच घरात काही काम करत असतील का हो दत्ता काका?" अतरंगी ग्रुप मधल्या बायकांचे किस्से ऐकून उगाच त्यांना चिडवण्यासाठी चव्हाण मास्तर बोलले.
उपस्थित महिला आपल्यावर चाल करून येतील आणि शाब्दिक चकमक उडेल त्याऐवजी आपण इथून पोबारा केलेलाच बरा असं वाटून दत्ता काकांनी तिथून तत्काळ घर गाठले.
आपण काय वाक्य बोललो हे काही क्षणानंतर चव्हाण मास्तरांना कळले आणि मग त्यांनी परत एक सारवासारवीच उत्तर दिलं, "मी जे काही म्हणतो त्याला ज्या महिला समर्थन देतील त्या खरंच गृहकृत्यदक्ष गृहिणी आहेत आणि ज्या वाद घालतील त्या सोशल मीडियावर रेंगाळणाऱ्या आधुनिक स्त्रिया आहेत. असं मी समजेन."
चव्हाण मास्तरांची कट्ट्यावरल्या बायका वाट लावतात की मन मोठे करून त्यांना माफ करतात हे पुढल्या भागात बघू.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा