द वेडिंग सिझन -भाग 1

Love Story


"मिंटी, झालं की नाही? मेन गेट सजवायचा बाकी आहे अजून." सॅम गडबडीने येत म्हणाला.

"येस सर, हे काय! स्टेज डेकोरेशन तर कंप्लीट आहे. फक्त लॉनवर लायटिंग बाकी आहे." मिंटी पुढे येत म्हणाली.

"इतका वेळ काय करत होता? दोन वर्ष उलटून देखील सवय झाली नाही? रोशन, जयेश कुठे आहेत? आणि विरू! ए, विरू इधर आ| तुम्हारी मॅडम कहा है?"

"वो अभी तक आई नहीं|" विरूने लाईटिंगच्या माळा खांद्यावर टाकून कामाला सुरुवात केली.

"आली नाही म्हणजे? हा सगळा व्याप माझ्या एकट्याच्या जीवावर मांडला आहे की काय? इथे कामं कोण करणार? की सगळं आम्हीच करायचं?" सॅम चिडून म्हणाला.

इतक्यात भली मोठी गाडी येऊन थांबली आणि खरे साहेब आपल्या गाडीतून खाली उतरले.
"समर, डेकोरेशन पूर्ण झालं?"

"होतंय. फक्त मेन गेट बाकी आहे."

"प्लीज लवकर आटपा. पाहुणे कधीही येतील." बोलता बोलता खरे साहेब पायऱ्या चढून वर आले. समरही त्यांच्या मागोमाग आला.
"वॉव! फंटास्टिक."
त्यांच्यासमोर भलं मोठं लॉन पसरलं होतं. त्याच्या मधोमध स्टेज उभा होता. ज्यावर गुलाबाच्या लाल रंगाच्या फुलांनी सुंदर सजावट केली होती. तसंच लॉनच्या दोन्ही बाजूला पातळ कापडाचे लाल रंगाचे पडदे सोडले होते.
स्टेजपासून काही अंतरावर स्विमिंग पूल होता. त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून, लहान दिवे सोडण्यात आले होते. आलेल्या पाहुण्यांना बसण्याची सोय म्हणून नक्षीदार अशा खुर्च्या लॉनवर दिमाखात उभ्या होत्या.

"समर, मेन गेट लवकर सजवून घे. अर्ध्या, एक तासात मुलीकडची मंडळी हजर होतील." खरे साहेब सगळी सजावट न्याहाळत म्हणाले.
"आणि हो..विदिशा आमच्या घरी आहे. मीच बोलावलं होतं तिला. आमची मुलाकडची बाजू! उद्या नवरीला घरी न्यायचं म्हंटल तर त्या पायघड्या वगैरे सगळं हवं. असा आमच्या सौं.चा आग्रह. ती सगळी तयारी आजच झाली पाहिजे. उद्या घरी येऊन कोण करणार?" खरे साहेब हसत म्हणाले.

"पण सर, त्या कामाविषयी आपलं बोलणं झालं नव्हतं. त्याचे एक्स्ट्रा पेमेंट.." समर डोकं खाजवत म्हणाला.

"हम्म. विदिशाने कोटेशन दिलं आहे. मी उद्या त्याचे पैसे ट्रान्सफर करतोय."

"ओके. आणखी काही एक्स्ट्रा काम असेल तर ते आत्ताच सांगा. ऐनवेळी अरेंज होणार नाही." समर जरा स्पष्टच म्हणाला.

"नो. धीस इज इनफ. बाकी सगळं उत्तम आहे." खरे समरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
"तुम्ही आजकालची मुलं किती पट्कन सगळं कॅचअप करता! दोन वर्षांत हा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस वाढवणं म्हणजे चेष्टा नाही. तेही इतक्या कमी वयात! मला माझा बिझनेस वाढवायला सहा वर्षे गेली. त्यानंतर अशी एक वेळ आली की सगळं संपल्यात जमा होतं. नंतर तेही दिवस बदलले आणि आज माझा कोटींचा टर्नओव्हर आहे."

यावर समर नुसताच हसला. "इव्हेंट मॅनेजमेंट नाही सर. हवं तर 'वेडिंग प्लॅनर' म्हणा." समर खरे साहेबांच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

"ओ, सॉरी समर. आय लाईक युअर कॉन्फिडन्स." खरे साहेब समरच्या हसण्यात सामील झाले.

इतक्यात विदिशा आली. समर तिच्याकडे पाहतच राहिला. कपाळावर छोटीशी टिकली, कानात झुमके, हटके हेअर स्टाईल, अंगात पिंक कलरची कुर्ती त्यावर व्हाईट पटियाला सलवार. तिच्या गोऱ्या रंगावर हे सगळं खुलून दिसत होतं.
"क्या बात है| आज पारंपारिक लूक?" समर तिच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाला.

"हो. आफ्टर ऑल, मेरे यार की शादी है|" विदिशा आपले केस उडवत तिथून निघून गेली आणि समर तिच्या मागे आला.
"विदी, एक मिनिट. खरे सरांच्या घरी जाण्याआधी मला इन्फॉर्म करायची गरज वाटली नाही?"

"सॉरी समर. मी मिंटी आणि विरूला सगळ्या सूचना दिल्या होत्या. रोशनलाही नेमकं काय करायचं ते सांगितलं होतं. मला वाटतं, हा स्विमिंग पूल त्यानेच सजवला असावा. कारण ही आयडिया माझीच होती." विदिशा मेन गेट सजवायला मिंटी आणि विरूची मदत करत म्हणाली. "हे बघ. झालंच. इतकं चिडायची काहीच गरज नव्हती."

"ओ, म्हणजे मिंटीने तुला सगळी माहिती पुरवलेली दिसते." समर अजूनही रागातच होता.

"हो सर, मॅडमनी आम्हाला सगळ्या सूचना दिल्या होत्या." मिंटी आपला चष्मा सांभाळत म्हणाली.

"बोलली. मॅडमची चमची." समर मिंटीकडे रागाने पाहत म्हणाला.

"सर प्लीज. तुम्ही मला काही बोलू शकत नाही. तसंही मी आता काम सोडणार आहे." मिंटी नेहमीप्रमाणे चेहरा पाडून म्हणाली.

"गेले सहा महिने हीच धमकी देते आहे. सर, ती कुठेही जात नाही. जे हवं ते बोला." जयेश हसत म्हणाला. मिंटी आणि जयेश दोघं काम करता करता भांडत होते तर विदिशा काही न बोलता काम करत होती.

काही वेळातच रोशन स्टेजच्या पाठीमागून बाहेर आला.
"वो स्टेज के उपर जो लाईट लगाई थी, वहा की
रोशनी गायब हो गई थी| किती वेळ झाला दुरुस्त करतो आहे. वायरमध्ये काहीतरी फॉल्ट होता. आता ठीक झाला." रोशनचं बोलणं ऐकून सगळेच हसू लागले.

"समर, विदिशा जरी माझ्या मुलाची मैत्रीण असली तरी तूही माझा चांगला मित्र झाला आहेस, तेव्हा तू आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमाला नक्की यायचंस." खरे साहेब बाहेर येत समरला म्हणाले.

"नक्की सर."

"बरं. तुमचं चालू द्या. मी निघतो. मुलीकडची मंडळी जेव्हा मुलाला बोलवण्यासाठी येतील तेव्हा मी परत येईन. आत्ता सगळी व्यवस्था पाहण्यासाठी मी इथे आलो होतो." खरे साहेब निघून गेले.

"विरू, लॉनच्या कडेने व्यवस्थित लाइटिंग झालं पाहिजे. बल्ब चेक करून पटकन जोडायला घे." समर विरूसोबत पुन्हा लॉनवर आला.
-----------------------------------------

काही वेळातच संपूर्ण लॉन पाहुण्यांनी भरून गेला. सीमांतपूजन नुकतेच पार पडले होते. वेलकम ड्रिंक्स, चायनीज पदार्थ, समोसा, कटलेट अशा स्टार्टर्सचा आस्वाद घेत पाहुणे मंडळी आता हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करत होती.
एरवी हळदीच्या कार्यक्रमासाठी समरची स्ट्रिक्ट वॉर्निंग असे. डेकोरेशनला कुठलाही धक्का लागता कामा नये आणि उद्याच्या लग्नाच्या विधीसाठी डेकोरेशन जास्त असल्याने जेवण लवकर आटपायची त्याची अटच होती. कार्यक्रम वेळेतच सुरू करायचा आणि वेळेतच संपवायचा असल्याने सुरू असलेली लगबग समर आणि विदिशा पाहत उभे होते.

"तू इथे का उभी आहेस? जा. तुझ्या मित्राचं लग्न आहे ना?" समर आपले डोळे बारीक करत विदिशाला म्हणाला.

"आहे खरं. पण त्याची ती मित्रमंडळी मला बरी वाटत नाहीत. बघ, किती वल्गर आहेत ती! इतका चीप दंगा मला आवडत नाही. मस्ती करावी. पण लिमिटमध्ये राहून." विदिशा हळद खेळणाऱ्या मुलांकडे पाहून म्हणाली.

हे ऐकून समोर गालातल्या गालात हसला.
"तू थांब इथेच. मी जातोय." समर त्या पळत जाऊन त्या मुलांमध्ये मिसळला.

"शी. हा सुद्धा त्यांच्या सारखाच वागतोय. मुलं ही अशीच असतात." विदिशा नाक मुरडत तिथून निघून गेली.
---------------------------------------

रात्री उशीरा लग्न विधींचा मंडप सजला आणि विदिशाने निःश्वास सोडला. समर कुठे दिसत नव्हता म्हणून ती त्याला शोधत बाहेर आली.

"मॅम, निघायचं का? मिंटी सॅक पाठीवर टाकून बाकी सामान घेत म्हणाली. पाठोपाठ रोशन, विरु आणि जयेश आले.

"हो. पण समर कुठेच दिसत नाहीय."

"हो ना. मगाशी ते त्या नवीन मित्रांच्या घोळक्यात होते. सकाळी तुम्हाला ओरडले आणि आत्ता स्वतः हातातलं काम सोडून तसेच गेले." मिंटी जागेवरून समरला शोधत म्हणाली.

तसा समर आपल्या नवीन मित्रांचा निरोप घेत सर्वांच्या जवळ आला.
"झालं का पूर्ण?" तो अडखळत म्हणाला.

"शिट समर, आर यू ड्रंक?" विदिशाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला.

"हा. थोडी घेतली. फार आग्रह केला गं त्यांनी."

"तुला माहिती आहे ना? हे असलं काही तुला झेपत नाही आणि तू प्यायलेलं मला आवडत नाही." विदिशा तोंड फिरवत म्हणाली.

"मी पिलेली तुला का आवडत नाही? तुझा आणि माझा संबंधच काय? तू कोण लागतेस गं माझी? हा बिझनेस मी सुरू केला. अचानक कुठून तरी तू टपकलीस आणि माझी वाट लागली. समर तू हेच करायचं नाही, तेच करायचं नाहीस. हाच शर्ट घालायचा. असंच कॉम्बिनेशन असावं. हे तू कोण ठरवणार? आणि मी सिलेक्ट केलेली डिझाईन्स कायम रिजेक्ट करतेस. सगळा सेट स्वतःच्या मनाने उभा करतेस. मग माझं काय राहिलं? सांग." समर मनाला येईल ते बोलत होता.

"सॅम, तू काय बोलतो आहेस हे कळतंय का? उगीच तोंडाला येईल ते बरळू नकोस." विदिशा त्याच्या अंगावर धावून गेली.
.
"सर, आत्ता आपण घरी जाऊ. बाकी उद्या बोलू. जास्त झालीय तुम्हाला." रोशन समरला अडवत म्हणाला.

"रोशन, पिऊन आलेल्या माणसाला काय सांगून उपयोग? त्याला जास्त झालीय ते!" मिंटी मधेच म्हणाली.

"ए, ही कशाला बोलते रे मधेच? बघावं तेव्हा आहेच हिचं." समरला पुढे काय बोलावे हे कळेना. तो तसाच मिंटीकडे पाहत उभा राहिला.

"मी बोलणार. कारण तुम्ही चुकलात आणि मला जास्त बोलायचं नाही हा. तसंही मी काम सोडणार आहे."

"ए, जा..आत्ताच्या आत्ता जा. उद्या पुन्हा तोंड दाखवलंस, तर याद राख." समर धडपडत मिंटीला ढकलत म्हणाला.

"समर, स्टॉप इट. उद्या तिच काय, मी सुध्दा येणार नाहीय. जातोय आम्ही. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीय." विदिशा मिंटीला घेऊन तिथून निघाली. परिस्थिती पाहून जयेशने समरची कार काढली. "मॅम, तुम्ही दोघी गाडीत बसा. इतक्या रात्री आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही."

"मी या गाडीत बसणार नाही." विदिशाने कॅब बुक केली.

"कोणीच ऐकणार नाही. दोघेही अगदी एकसारखे आहेत. पण हे दोघेही मान्य करणार नाहीत." जयेश हात जोडून म्हणाला.
"विरु, तू मॅडम सोबत कॅबने जा. मी आणि रोशन सरांना घरी सोडतो."

समर शुद्धीत नव्हता आणि तो जे काही बोलला त्याचा राग मनात धरून विदिशा कॅबमध्ये बसली, पुन्हा कधीच समरचा चेहरा बघणार नाही हा निश्चय करूनच.

क्रमशः












 

🎭 Series Post

View all