द वेडिंग सीझन- भाग 2

Love Story
समरला जाग आली तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं. आठ वाजून गेले होते. मुहूर्त अकरा वाजताचा होता. गडबडीने तो आवरायला उठणार इतक्यात फोन वाजला.
"हॅलो सर, कधीपासून फोन करतो आहे मी. इथे एक प्रॉब्लेम झालाय. आपण काल रात्री लावलेल्या सेटचा बराचसा भाग कोसळला आहे. तुम्ही जमेल तितक्या लवकर निघा."
रोशन त्याला बोलण्याची संधी न देता म्हणाला.

रोशनचं बोलणं ऐकून समर पटकन आवरायला पळाला. विदिशाला फोन करावा म्हणून तो बाथरूममधून पुन्हा पळत बाहेर आला. काही प्रॉब्लेम असेल तर ती चुटकीसरशी सोडवत असे. त्याने खूप वेळा विदिशाला फोन ट्राय केला. पण ती फोन उचलत नव्हती.
विदिशा फोन उचलत नाही म्हणून त्याने मिंटीला फोन लावला.
"सर, आता का फोन करताय? मी काल रात्रीच तुमचं बोलणं अजून विसरले नाहीय आणि मॅमही विसरल्या नसतील." मिंटी रागाने म्हणाली.
दोन मिनिटं समरला ती काय बोलते? हेच कळेना.
"ओ, कालच्या प्रकाराबद्दल सॉरी मिंटी. मी ते ड्रिंक्स.."

"सर, मला काहीही बोलायचं नाहीय आणि ऐकायचंही नाही. आजपासून मी तुमच्या कामासाठी अवेलेबल नाहीये, तेव्हा तुम्ही मला इथून पुढे प्लीज फोन करू नका." मिंटीने समरचं बोलणं ऐकून न घेता फोन ठेवून दिला.
'श्या, काल मी काय काय बोललो? हेच मला नीट आठवत नाहीये. म्हणून तर विदि फोन उचलत नाहीय.' समर स्वतःशी बोलत आवरून बाहेर पडला.

"समर, थांब जरा." समरला बाहेर पडताना पाहून अपर्णा ताई त्याच्यामागे आल्या.

"आता काय आई, दिसत नाहीये का मी गडबडीत आहे?" समर गाडीत बसत म्हणाला. आईचे पुढचे बोलणे न ऐकताच त्याने गाडीला स्टार्टर मारला देखील.

"अरे, ऐकून तर घे." अपर्णाताई बाहेर आल्या तेव्हा समरची गाडी पुढे निघून गेली होती.

'कसा मुलगा आहे हा? काही ऐकेल तर शप्पथ. कामाच्या ठिकाणी हे असलं कॉम्बिनेशन कोणी घालून जातं का? सगळे हसतील त्याला. विदिशा आहे म्हणा, त्याला सांभाळून घेण्यासाठी. नाहीतर माझा भरकटलेला मुलगा कधीच हाताबाहेर गेला असता.' अपर्णा ताई स्वतःशीच बोलत आत आल्या.
-----------------------------------

समर पोहोचला तेव्हा सारं काही नीट होतं.
"रोशन, इथे तर सगळं ठीक आहे. मग फोन का केला होता?"

"सर, ते विदिशा मॅडम आल्या म्हणून बरं झालं. नाहीतर सगळंच बदलाव लागलं असतं. थीम थोडी चेंज झाली. पण काही हरकत नाही. लग्नाचे विधी आता कधीही सुरू होतील. पण सर विदिशा मॅम म्हणतात तेच खरं. तुम्ही हे जे कॉम्बिनेशन केलं आहे, ते तुम्हाला बिलकूल सूट होत नाहीय. निदान या लग्नासारख्या समारंभात तरी नक्कीच नाही. तुम्हीच बघा. कसं दिसतं ते?" रोशन आपलं हसू आवरत म्हणाला.
तेव्हा कुठे समरचं लक्ष आपल्या ड्रेसकडे गेलं. ब्लू शर्ट अँड व्हाईट पॅन्ट! तो स्वतःशीच हसला.
-----------------------------------------

"हाय विदि." समरचे लक्ष विदिशाकडे जाताच त्याने हात हलवून तिला हाय केलं. पण ती मात्र तोंड फिरवून तिथून निघून गेली.

"सर, त्या आज येणारच नव्हत्या. पण सकाळी तुम्ही फोन उचलला नाही म्हणून नाईलाजाने त्यांना फोन करावा लागला आणि शेवटी त्यांच्या मित्राचं लग्न होतं म्हणून त्यांना यावं लागलं." रोशन म्हणाला.

"ती का येणार नव्हती?" समर न समजून म्हणाला.

"आठवतंय? काल रात्री तुम्ही त्यांना बरंच काही बोललात. त्यानंतर त्या आपल्यासोबत काम करणार नाहीत. असं त्यांनी कालच सांगितलं आहे." रोशन आपलं हसू आवरत म्हणाला.

आता समरला काल रात्री काय, काय घडलं? हे थोडं थोडं आठवायला लागलं. मिंटीला आपणच जायला सांगितलं, हे त्याला आठवलं. मात्र विदिशा नक्की का चिडली? हे मात्र त्याला आठवेना.
-------------------------------------------


"विदी, एक मिनिट थांब." तिला बराच वेळ शोधून समर थकला होता.
"ऐक, काल रात्री मी काय बोललो हे मला नक्की आठवत नाहीये. पण त्यासाठी सॉरी." समर आपले कान पकडत म्हणाला.

"मला काहीही बोलायचं नाही. प्लीज समर, तू जा इथून." विदिशाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
"आणि हो, मी उद्यापासून तुझ्यासोबत काम करणार नाही. हे लक्षात ठेव."

"सॉरी ना विदि. खरंच मला आठवत नाहीय, मी काय बोललो ते. त्या तुझ्या मित्राच्या मित्रांनी काल फार आग्रह केला. मला नाही म्हणता आलं नाही. प्लीज चिडू नको ना. तू माझ्यासोबत नसशील तर बघ काय, काय होतं ते! आज तुझं माझ्या ड्रेसिंग सेन्सकडे अजिबात लक्ष नाहीये." समर स्वतःला न्याहाळत म्हणाला.

"ब्लू शर्ट आणि व्हाईट पॅन्ट? काय यार? किती चिप दिसतं आहे ते. ऑकवर्ड होत नाहीये का तुला? सगळी लोकं तुझ्याकडे विचित्र नजरेने बघत आहेत. प्लीज मला आत्ता अजिबात ओळख दाखवू नकोस." विदिशा समरकडे पाठ फिरवून उभी राहिली.

"ओके. मी जातोय आणि थॅन्क्स! सकाळी सेट पुन्हा नव्याने उभा केल्याबद्दल. आज तू खूप छान दिसते आहेस विदि." समर विदिशाच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाला आणि पटकन तिथून निघूनही गेला.

तशी विदिशा मागे वळून म्हणाली, 'इव्हेंट मॅनेजमेंटचा सेन्स आहे. इथलं सगळं कॉम्बिनेशन अगदी छान जमतं. पण ड्रेसिंग सेन्स अजिबात नाही. समर कसं होणार तुझं?' ती गालातल्या गालात हसत म्हणाली.
--------------------------------------

लग्नाचे विधी पार पडले. खरे साहेबांनी समरची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांनी विदिशाच्या हातात वीस हजारांचा चेक ठेवला. "हे एक्स्ट्रा पेमेंट."

सगळं आवरून समर आणि विदिशा ऑफिसवर आले.
"मी इथे आले म्हणजे माझा तुझ्यावरचा राग गेला असं समजू नकोस. मी कालचं तुझं बोलणं विसरले नाहीय. बरं, त्यातले दहा हजार दे. मिंटीचे पेमेंट देऊन टाकू. ती उद्यापासून येणार नाही म्हणते." विदिशा फाईल चाळत म्हणाली.

"ती कशी येत नाही हेच बघतो. खरं सांगायचं तर तुझ्याविना आणि मिंटीविना मी अपूर्ण आहे. कारण तुम्ही दोघी आपापल्या कामात परफेक्ट आहात. मी तिलाही सॉरी म्हणेन. पण मला आणि या ऑफिसला सोडून जाऊ नका. मी वचन देतो विदि, इथून पुढे माझ्या हातून असं काहीही घडणार नाही." समर कळकळीने म्हणाला.
विदिशाने समरला माफ केलं. कारण त्याच्या बोलण्यातला खरेपणा तिला जाणवला होता.
---------------------------------------

"प्रत्येक नवरा -नवरीला वाटतं. आपलं लग्न मेमरेबल असावं. या सुंदर आठवणी कायम ताज्या राहाव्यात."
समर कसलासा विचार करत टेबलजवळ उभा होता आणि त्याच्या समोर जयेश, रोशन, मिंटी, विदिशा आणि विरु बसले होते.
"वेडिंग प्लॅनर म्हणजे काय? तर आपण सगळे एकत्र येऊन लग्नसमारंभासाठी ज्या, ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी आपण पुरवतो. यामध्ये डेकोरेशन, म्युझिक, डान्स, फोटोग्राफर, कपडे, गेस्टसाठी राहण्याची, प्रवासाची व्यवस्था, जेवण या सगळ्या सुविधा आपली टीम पुरवते. आपण आपली वेबसाईट मागच्या वर्षी लॉन्च केली. टीव्ही, मॅगझिन्स, सोशल मीडियावर एडवर्टाइज करूनही आपल्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स अजूनही मिळालेला नाही. आपल्या प्लॅनरची माऊथ पब्लिसिटी म्हणावी तशी झालेली नाही. यावर उपाय म्हणून आजची ही मीटिंग बोलावली आहे. कोणाला काही बोलायचं असल्यास बोलू शकता. काही आयडिया असल्यास सुचवू शकता." समर विचार करत म्हणाला.

"सर, मला वाटतं डेकोरेशनचा बराचसा भाग कोसळला, तशी घटना पुन्हा घडायला नको. त्यासाठी टीम वाढवण्याची गरज आहे. शिवाय आपल्याकडे जे डिझाइन्स उपलब्ध आहेत तेच आपण क्लायंटसना दाखवतो. याऐवजी त्यांच्याकडून काही आयडिया घेता येतात का? तेही पाहायला हवं." मिंटी आपल्या आयडिया नोट करत म्हणाली.

"एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचं होतं.
क्लायंटच्या अपेक्षा पूर्ण होणं गरजेचं आहे. क्लायंटचं कल्चर, नेचर याला धरून आपल्या कल्पना असाव्यात आणि आपण याच शहरा भोवती फिरत आहोत. थोडं दुसऱ्या शहरात डोकावून पाहायला काही हरकत नाही." विदिशाचं म्हणणं सर्वांना पटलं.

"सर, प्री वेडिंग फोटोशूट प्रमाणे पोस्ट वेडिंगची आयडिया कशी वाटते? याचा खर्च अर्थातच क्लायंटने द्यायचा." विरू.

"सर, हमारी कंपनी का नाम वेडिंग प्लॅनर नही, 'द वेडिंग सीझन 'होना चाहिए| रोशन स्वतःवर खुश होत म्हणाला. सर्वांनाच हे नाव आवडलं.
लवकरच कंपनीचे नाव बदललं गेलं. मिंटी आणि विदिशाने ज्या आयडिया सुचवल्या होत्या त्यावरही काम केलं गेलं आणि योगायोग असा की समर आणि विदिशाला कामातून डोकं वर काढण्यासाठी वेळ मिळेना. यामुळे रोशन, जयेश आणि मिंटीला प्रमोशन मिळालं. त्यांच्या हाताखाली आणखी चार -पाच लोकं काम करू लागले. विरू मात्र अजूनही फिल्डवर जात होता.
----------------------------------

काही दिवसांनी समरचे आई -बाबा आणि विदिशाचे आई -वडील एका ग्रँड वेडिंगच्या सक्सेस पार्टीमध्ये पहिल्यांदाच आले होते. पार्टी तशी साधीशी होती. समर आणि विदिशा सगळीकडे एकत्र फिरत होते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. कोणाला काय हवं, नको ते पाहत होते.

"ये दोनो साथ में बहुत अच्छे लगते है| नाही का?" विरू जयेशला हळूच म्हणाला.

"हो ना. मलाही वाटतं यांनी आयुष्यभर असंच एकत्र राहावं." मिंटी, समर आणि विदिशाकडे प्रेमाने पाहत म्हणाली.

"हो. पण हे त्यांचं त्यांना जाणवायला हवं. आपण काहीच बोलायचं नाही." जयेश तोंडावर बोट ठेवत म्हणाला.

"आई, ही आमची टीम." विदिशा आपल्या आईला, जया काकूंना सर्वांची ओळख करून देऊ लागली. "जयेश, ही मिंटी आणि रोशन.."

"आजपर्यंत फक्त नावं ऐकली होती. आज प्रत्यक्ष भेट झाली. तसा समर घरी येतो बऱ्याचदा. पण तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं आहे. त्यानिमित्ताने आपल्या भरपूर गप्पा होतील आणि तुम्हा सगळ्यांची छान ओळखही होईल. पण सुट्टीच्या दिवशी या हं. नाहीतर तुमच्या मॅडम ओरडतील. नाही का?" जया काकू छान हसून म्हणाल्या.
उत्तरादाखल सगळेच हसले.

अपर्णा ताई आणि जया काकू एकमेकींच्या मैत्रिणी असल्यासारख्या पार्टीत मिसळल्या तर सुदेशराव आणि विदिशाचे वडील, जयवंत काका या दोघांनी मात्र एकमेकांची तोंड ओळख करून घेण्यात आनंद मानला.

क्रमशः




🎭 Series Post

View all