द वेडिंग सीझन- भाग 11

Love Story
समरने जयवंत काका आणि सुदेशरावांनी दिलेले पैसे परत केले. नुकसान झालेला सेट पुन्हा उभा केला आणि द वेडिंग सीझनची जाहिरात पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सुरू केली.
इकडे मिंटी, रोशन, जयेश आणि बाकी टीम समर अन् विदिशाच्या डेस्टिनेशन वेडिंगची जोरदार तयारी करत होती. इतकंच काय! तर सरप्राइज म्हणून त्यांच्यासाठी हनिमूनचं बुकिंगही करून ठेवलं होतं. समर आणि विदिशा दोघेही खुश होते. एक वेगळ्याच विश्वात दोघे मग्न होते.

नुकतीच साड्यांची खरेदी पार पडली होती. कोणत्या विधींसाठी कोणती साडी नेसायची? हे विदिशा ठरवत होती.
"खास लग्नासाठी आम्ही लेहेंगा सिलेक्ट केला होता. पण तुमच्या लेकीने तो रिजेक्ट केला. का? तर म्हणे, समरला पारंपारिक लूक आवडतो म्हणून ही पैठणी घेतली तिने." अपर्णा ताई जया काकूंना सांगत होत्या.
जांभळ्या रंगाच्या पैठणीवर बारीक, नाजूक डिझाईन असलेले केशरी काठ खूपच उठून दिसत होते. पदरावर मोराचे असलेले डिझाईन त्या साडीच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते.

"सगळे विधी एकाच दिवशी करायचे आहेत म्हणून फारशी खरेदी झाली नाही. पण लग्नानंतर मात्र मी विदिशाला हव्या त्या भरपूर साड्या घेऊन देणार आहे. नवी नवरी साडीत अगदी छानच दिसते. बाहेर जाताना काही दिवस साडी नेसू दे. नंतर मात्र कपड्यांची निवड तिचीच राहील. पण साडीच नेसायला हवी अशी काही जबरदस्ती नाही हं. नाहीतर म्हणाल, सासू लग्नाआधीच सूचना द्यायला लागली की काय!" अपर्णा ताई.

"आम्ही तसं काही म्हणणार नाही. सासू म्हंटलं की अपेक्षा आल्याचं. त्या सुनेने पूर्ण कराव्या आणि सासुने देखील सुनेला समजून घ्यावे. अर्थात तुम्हाला हे सांगायची गरज नाही म्हणा. मी आपलं सहज बोलले." जया काकू हळव्या होत म्हणाल्या.

"खरंतर मी पैठणी नको म्हणाले होते. पण समरला ही आवडली म्हणून घेतली." विदिशा आपल्या खांद्यावर साडी टाकून स्वतःला आरशात बघू लागली. 'साखरपुड्यात अशीच डाळिंबी रंगाची पैठणी मी नेसले.. आता नको ती आठवण.' तिने आपल्या खोलीत येऊन ती डाळिंबी रंगाची पैठणी एका पिशवीत घालून ती पिशवी कपाटाच्या कोपऱ्यात ठेऊन दिली.

समरने लग्नासाठी त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असा थ्री -पीस निवडला होता, अर्थात तोही विदिशाच्या पसंतीने. कारण त्याचं कपड्यांचे कॉम्बिनेशन विचित्र आहे, हे सर्वांनाच माहिती होतं.

लग्नाची खरेदी झाली होती. दोन्ही घरं आता पाहुण्यांनी भरून गेली. विदिशाच्या जवळच्या मैत्रिणी, समरचे मित्र नुसती धमाल करत होते. लग्नाची तारीख जशी जवळ येऊ लागली, तशी अपर्णा ताई आणि जया काकूंची गडबड वाढली. तसं लग्नाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट 'द वेडिंग सीझनकडे' असल्याने काळजी करण्याचं काही कारण नव्हतं.
-----------------------------------------

मेहंदी, हळदीचा कार्यक्रम पार पडला.

लग्नाचा दिवस उजाडला. पाहुणे मंडळी डेस्टिनेशनवर कधीच पोहोचली होती. समर आणि विदिशाची एन्ट्री मात्र थोडी उशिराच होणार होती.

स्वतःच्या खोलीत मेकअप करत असलेली विदिशा छान मूडमध्ये होती. चेहऱ्यावर लाईट मेकअप, डोळ्यांत काजळ, ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि सरळ केसांच्या हट्टाने कुरळ्या केलेल्या बटा सावरताना तिची चिडचिड होत होती.
"मिंटी, मला हे असं काही नको आहे. त्याऐवजी दुसरी एखादी हेअर स्टाईल केली तर?"

"नको. मला आता अजिबात वेळ नाहीय. त्या तुमच्या मैत्रिणी तिथे ओळीने उभ्या आहेत. तुमचं बघून त्यांना साडी नेसायची तीव्र इच्छा झालीय. माझी नवीन असिस्टंट त्यांचं आवरता, आवरता किती थकली आहे बघा. माझंही आवरायचं बाकी आहे अजून. शिवाय आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे ना? की वरात इथेच बोलावू? त्यातल्या त्यात एक बरं म्हणजे लग्नाचं ठिकाण अगदी जवळ आहे." मिंटीच्या बोलण्याने सगळेच हसायला लागले.
तिच्या हातात मेकअपचं साहित्य होतं. ओठांत तीन -चार पिना धरून ठेवलेल्या होत्या. त्यातून ती कशीबशी बोलत होती. केसांत दोन कंगवे अडकवले होते. जीन्सच्या खिशात थोडं साहित्य होतं. "माझं काम काय? आणि मला काय करायला लागतंय देवा?" मिंटी पुरती वैतागली होती.

"ते सगळं बाजूला ठेव. माझं आवरून झालं आहे. चल, मी तुला आवरायला मदत करते." विदिशाने काही मिनिटांतच मिंटीला आवरायला मदत केली.

"चला, आटपलं का? आता आपल्याला निघायला हवं. समर आणि वरात दोघेही घरातून बाहेर पडले आहेत. आपल्याला त्यांच्या आधी तिथे पोहोचायचं आहे." काही वेळाने विदिशाची मावशी खोलीत येत म्हणाली. तशा सगळ्याजणी गडबड करू लागल्या.
----------------------------------------

लग्नाचं डेस्टिनेशन आलं आणि सगळं डेकोरेशन पाहून विदिशा थक्क झाली. समोर पसरलेलं मोठं लॉन, व्हाईट आणि पिंक कलरच्या गुलाबाच्या फुलांच्या दुतर्फा लावलेल्या माळा, मधोमध सजवलेली चौरी, मुख्य लग्नासाठी सजवलेला छोटा स्टेज आणि समर - विदिशाच्या नावाची मोठी अक्षरं! हे सारं पाहून तिचे डोळे भरून आले.
"मिंटी, डेकोरेशन खूपच सुंदर झालंय." विदिशा तिला जवळ घेत म्हणाली.

"थँक्यू मॅम, गोरज मुहूर्तावर लग्न लागणार आहे ना, म्हणून त्याला साजेसं असं सगळं केलं आहे. तुम्हाला म्हणे, आकाशातल्या चंद्र -चांदण्या लग्नाच्या साक्षीदार हव्या होत्या." मिंटी तिला चिडवत म्हणाली.

"हे तुला कोणी सांगितलं?" विदिशा आपले डोळे बारीक करत म्हणाली.

"अगं, अशा बोलत काय बसलात? वरात आली सुद्धा.. मिंटी, चल लवकर आणि हो, विदू, समरला आम्ही ओवाळून आत घेऊ. त्या नंतर तू नाचायला ये. मात्र त्याआधी तू अजिबात खाली यायचं नाहीस." विदिशाची काकू गडबडीने म्हणाली.

विदिशा आपल्या रुमच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली. तिच्या दोन मैत्रिणी सोबतीला थांबल्या होत्या. वरातीचा आवाज जवळ आला, तशी विदिशा उत्सुकतेने वाकून बघू लागली. समरची वरात त्याच्या मित्रांसह बुलेटवरून आली होती. तर बाकी मित्र मंडळी आणि नातेवाईक नाचत येत होते.

"अरे, हे तर मस्त सरप्राइज आहे! विदि, कान्ट वेट..आम्ही खाली जातोय." तिच्या मैत्रिणी पळतच खाली आल्या. अगदी काही मिनिटांतच जया काकूंनी समरला ओवाळून आत घेतलं. तशी विदिशा खाली आली. नवरी मुलगी आलेली पाहून बँड पथकाला देखील जोर चढला. त्यांनी भरपूर गाणी वाजवली. विदिशा आणि समरने नाचून नुसता धुमाकूळ घातला.

इकडे भटजी गडबड करू लागले म्हणताना वरात आवरती घ्यावी लागली. दोघे मंडपात आले तशी विधींना सुरुवात झाली. भटजी मंत्र म्हणत होते. एक -एक विधी पार पडत होते. हे पाहताना जया काकू अधून -मधून डोळ्याला पदर लावत होत्या आणि त्यांच्यासोबत कन्यादान करणाऱ्या जयवंत काकांचे हात आपली लाडकी लेक आता कायमची सासरी जाणार या कल्पनेने थरथरत होते.
सुदेशराव आणि अपर्णा ताई कौतुकाने समर आणि विदिशाला न्याहाळत होते. मिंटी, जयेश, रोशन आणि द वेडिंग सीझनची बाकी टीम पाहुणे मंडळींच्या सरबराईत गुंतली होती. कोणाला काही कमी पडू नये म्हणून लक्ष ठेऊन होती.

"विदि, खूप छान दिसते आहेस. तू मगाशी डान्स केलास ना, त्या डान्सचा मी खूप मोठा फॅन झालोय गं." समर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत म्हणाला. तशी विदिशा कधी नव्हे ते छानशी लाजली.
"अच्छा, ही कला सुद्धा आहे आपल्या अंगात! याआधी कधी दिसली नाही ती?" समर हळूच म्हणाला.

"या आधी, अशी वेळ कधी आली नाही ना." विदिशा हळू आवाजात म्हणाली.

"लव्ह यू बायको..सो मचं." समर तिच्या कानाशी कुजबुजला.

"समर, गप्प बसून समोर लक्ष दे. गुरुजी काय म्हणतात ते ऐक आणि तूही खूप छान दिसतो आहेस." विदिशा लाजत त्याला कोपराने ढोसत म्हणाली.

सप्तपदीसाठी दोघे उठून उभे राहिले. एकमेकांचे हात हातात घेताच दोघांची मने एक वेगळ्याच जाणिवेने भरून आली. आनंद, प्रेम, बंधन, एक जबाबदारी, सुख -दुःख..इथून पुढचं सगळं आयुष्य आता एकमेकांसाठी समर्पित करायचं, ही जाणीव, भावना एकमेकांच्या हृदयापर्यंत पोहोचली होती.

सगळे विधी पार पडले. लग्नही अगदी दणक्यात झालं. विदिशाची सासरी जायची वेळ आली.
"आई, आधीच सांगितलं होतं. मी निघताना कोणीही रडायचं नाही." विदिशा जया काकूंचे डोळे पुसत म्हणाली.

"असं कसं? आपली लाडकी लेक सासरी जाणार म्हंटल्यावर आईला काय वाटतं? हे समजून घेण्यासाठी आईच व्हावं लागतं." जयवंत काका डोळ्यांतले पाणी पुसत म्हणाले.

"बाबा, रडू नका ना. मला भरल्या डोळ्यांनी निरोप देणार आहात का? छान हसा बघू." विदिशाचे डोळे भरून आले होते. ती जयवंत काकांना बिलगली. "दोघेही कायम आनंदी राहा आणि समर विदिशाची काळजी घे." जयवंत काका समर पुढे हात जोडत म्हणाले.

"बाबा, हे काय करताय? अहो, जावई झालो म्हणून पहिलं नातं बदलत नसतं. त्या दिवशी हक्काने जसा कान पकडलात, तसा कधीही पकडा." समर.

"जयवंत, अजिबात काळजी करू नका. विदिशा आमच्या लेकीसारखी आहे. आम्हाला मुलगी नाही, तिची कमी ती भरून काढेल." सुदेशराव पुढे होत म्हणाले.

विदिशा आपल्या सगळ्या नातेवाईकांची आणि मैत्रिणींची गळाभेट घेऊन गाडीत बसली.
"आई, येते. बाबा आईची नीट काळजी घ्या." विदिशाने पुन्हा बाहेर येऊन जया काकूंना गच्च मिठी मारली.

"चला, नाहीतर मलाच तुझ्यासोबत घरजावई म्हणून यावं लागेल." समर.

"हो. ही आयडिया छान आहे. बाबा, आपल्या घरी येऊ दे का त्याला?" विदिशा निरागसपणे आपले डोळे पुसत म्हणाली.

"चल, वेडी कुठली! आपल्याकडे अशी रीत नाही. चला, या आता. उगीच खोळंबा नको." जया काकू हसत म्हणाल्या.

"मग तू रडू नको. येते मी. बाबा, दोघेही एकमेकांची काळजी घ्या." गाडी पुढे जाईपर्यंत विदिशा हात हालवत राहिली.
------------------------------------------

संपूर्ण लग्नात मला कोणी नाव घे म्हणून आग्रह केला नाही. पण आता मी एक छान नाव घेणार आहे, प्लीज ऐका सगळ्यांनी." माप ओलांडून आत यायच्या तयारीत असलेली विदिशा म्हणाली.
"करेना कोणी आग्रह नावाचा
समरचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायचा."

"वा! खूप छान. आता माप ओलांडून आत ये." अपर्णा ताईंनी विदिशा आणि समरला ओवाळून आत घेतलं. गोरज मुहूर्तावर लग्न झाले असल्याने रात्री जेवणाचा प्रश्न नव्हता. समर आणि विदिशाला जवळच्या नातेवाईकांनी गिफ्ट द्यायला सुरुवात केली.
"हे काय? आम्ही आहेर घेणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं." समर आपल्या आत्याला म्हणाला.

"हो. पण तू माझा एकुलता एक भाचा आहेस. मनापासून वाटलं म्हणून आणलं. बघ तरी काय आहे ते." समरने पाकीट उघडले. त्यात थोडी रक्कम होती.
"हे इतकं मोठं गिफ्ट?"

"मध्यंतरी ऐकलं होतं. वेडिंग सीझन प्रोब्लेममध्ये आहे म्हणून माझ्याकडून ही थोडीशी मदत." आत्या.

"अगं, पण आता सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले आहेत त्यामुळे नको. हे तुझ्याकडेच ठेव." समरने पुन्हा आत्याच्या हातात पाकीट दिलं.

"माझ्यापेक्षा मोठा झालास की काय? मुकाट्याने ठेऊन घे. तुझ्या लहानपणी मी सुट्टीला आल्यावर तुझ्या आईच्या माघारी माझ्याकडून खाऊसाठी, किती पैसे घेतलेस ते आठवतंय तरी का?
सुनबाई, हे ठेऊन घ्या आणि काय हवं ते आणा नाहीतर बँकेत भरा." आत्याने पैसे विदिशाच्या हातावर ठेवले.

सगळ्यात शेवटी मिंटीने हनिमूनसाठी केलेले बुकिंग समर आणि विदिशाच्या हातात ठेवले.
"अरे..ही सुद्धा तयारी तुम्हीच केलीत?"

"हो. चांगलं दहा दिवसांच बुकिंग आहे. मस्त एन्जॉय करून या. ऑफिसची काळजी अजिबात करू नका. ते आम्ही सांभाळू आणि मॅम, घरची काळजी अजिबात करू नका. तुमच्या सासुबाईंना विचारूनच आम्ही हा प्लॅन केला आहे." मिंटी अपर्णा ताईंकडे पाहत म्हणाली.

"हो. परवा सत्यनारायणाची पूजा, देवदर्शन झालं की दुसऱ्या दिवशी तुम्ही निघा." अपर्णा ताई आवराआवरी करायला आत गेल्या. विदिशाही त्यांच्या पाठोपाठ मदतीला आली.

"अगं, तू आज काही करू नकोस. दमली असशील जा, आमच्या खोलीत जाऊन पड. बाकी मी बघते." अपर्णा ताईंनी विदिशाला झोपायला पाठवलं.

"तू इथे काय करते आहेस?" समर विदिशाच्या मागे येत म्हणाला.

"सासुबाईंनी सांगितलं तर ऐकायला नको का? जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. बाकीचं उद्या बोलू." विदिशा समरला ढकलत म्हणाली.

"असं कसं? लग्न झालं ना आपलं! मग?"

"अजून पूजा, देवदर्शन बाकी आहे म्हंटल." आत्या खोलीत येत म्हणाल्या. तसा समर गालातल्या गालात हसत, काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला आणि विदिशा आणि आत्या एकमेकींकडे पाहून मनमोकळ्या हसल्या.

"विदि, जरा इकडे ये." समर पुन्हा खोलीत डोकावला.

"आता काय काम आहे?" आत्या पुढे येत म्हणाली.

"अगं, काम नाही काही. ते आपलं थोडं बोलायचं होतं."

"आत्ता काही नाही. तुझी बायको खूप दमली आहे. तिला झोपेची गरज आहे. ती आत्ता कुठेही येणार नाही." आत्याने दम भरला, तसा समर निघून गेला.


क्रमशः

🎭 Series Post

View all