द वेडिंग सीझन -भाग 12

Love Story
पूजा पार पडली. देवदर्शन झालं आणि समर - विदिशा हनिमूनसाठी दहा दिवस जाऊन मस्त एंज्योय करून आले.

आल्यानंतर दोघांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. आता विदिशा घरी लवकर यायची. अपर्णा ताईंना मदत करायची. हळूहळू ती घरच्या रीती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. महिन्याभरात सून म्हणून ती छान रुळली देखील.
अपर्णा ताई आणि सुदेशरावांशी तिची छान गट्टी जमली. तशी याआधी ती समरची मैत्रीण, पार्टनर म्हणून घरी यायची. मात्र आता सून म्हणून या घराशी तिचं वेगळचं नातं जुळलं होतं.
-------------------------------------

काही कारणाने लग्न मोडलं किंवा कॅन्सल झालं तर त्याची नुकसान भरपाईसाठी ऑफिसकडे जमा करावी लागणार, असा नवीन नियम समरने काढला होता.

'द वेडिंग सीझनचे' नाव आता सर्वांच्या परिचयाचे झाले होते. बरेच मोठे क्लायंट लग्नाच्या निमित्ताने जोडले गेले होते. कामाचा पसारा वाढू लागला. तशी स्टाफची कमी भासू लागली. इतका सारा स्टाफ या ऑफिसमध्ये कसा काम करणार? हा प्रश्न समरला सतावत होता.
हेच ऑफिस वाढवायचं? की 'द वेडिंग सीझनची' दुसरी शाखा काढायची? यात समर आणि विदिशाचं एकमत होत नव्हतं.
आणखी एक शाखा काढायची असेल, तर दुसऱ्या शहरात काढावी असं विदिशाचं मत होतं. पण तिथले ऑफिस कोण बघणार? याची काळजी समरला वाटत होती. पण आलेल्या एका कॉन्ट्रॅक्टमुळे हा विषय थोडा मागे पडला.
-------------------------------------

"समर, आपण हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाहीय." विदिशा तणतण करत त्याच्या केबिनमध्ये येत म्हणाली.

"त्या गडकरींचे कॉन्ट्रॅक्ट? पण का घ्यायचं नाही? बडी पार्टी आहे ती. नताशा गडकरी आणि प्रसाद..बेलवलकर!" समर पुन्हा पुन्हा नावं वाचत आश्चर्याने म्हणाला. "प्रसाद? त्याचं लग्न ठरलं?"

"येस. मला पुन्हा त्या प्रसादचं तोंड सुद्धा बघायचं नाहीय. या एका महिन्यात त्याने नताशासारखा बडा मासा गळाला कसा काय लावला? देव जाणे! ते काही का असेना, आपण हे काम करणार नाही आहोत."

समर काही वेळ विचार करत राहिला.

"विदू, जरा प्रोफेशनली विचार कर. हे काम बेलवलकरांकडून नाही तर गडकरींकडून आलेलं आहे. आपल्याला काय फरक पडतो? साईटवर तू येऊ नको. मी स्वतः जाईन. बस्? शिवाय बाकी आपली टीम आहेच." समर.

"तो तुला काही बोलला तर?" विदिशा.

"अगं, आपण चुकीचं वागलो नाहीय तर तो चुकला आहे. आपल्या समोर येण्याआधी त्याने दहा वेळा विचार करायला हवा. नाही का?" समर तिला समजावत म्हणाला.

"तरीही मला वाटतं हे काम आपण करू नये." विदिशा.

"आपण सहसा कुठलं कॉन्ट्रॅक्ट कारणाशिवाय कॅन्सल करत नाही. इतकं इमोशनल होऊ नको. जरा बिझनेस माईंडने विचार करून बघ. हे काम आपण घेतोय विदि, याचा तुला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी."

"मला त्याच्यामुळे आपल्यात भांडण नको आहे. मी हे काम करणार नाही. तुझं तू काय ते बघ." विदिशा रागाने निघून गेली. तिचंही बरोबर होतं. पण समर कामाच्या दृष्टीने विचार करत होता त्यामुळे यात चुकीचं काही नव्हतं.

समरने लग्नाची तयारी सुरू केली. लग्न थोडक्यात असल्याने फारशी काळजी नव्हती. विदिशाने मात्र या कामापासून लांबच राहणं पसंत केलं. प्रसादचं लग्न इतक्या लवकर ठरलं कसं? हा प्रश्न तिला सतावत होता.
---------------------------------------------

लग्नाचा दिवस उजाडला. समरची धावपळ सुरू होती.

"हे समर, कसा आहेस?" प्रसाद त्याच्या मागून येत म्हणाला.

"ठीक." समर इतकंच म्हणाला.

"विदिशा कुठे दिसत नाहीय. इथे अजिबात यायचं नाही असं तूच तिला सांगितलं नाहीस ना? बाय द वे, कशी आहे ती आता?" प्रसाद विधींसाठी तयार झाला होता. विदिशा सोबत साखरपुडा झाला, तेच कपडे त्याच्या अंगावर होते.

"विदिशाचं नाव देखील काढायचं नाही हं तुझ्या तोंडून. आज तुझं लग्न आहे म्हणून सोडतोय तुला. नाहीतर..खरंतर हे काम मी घ्यायला नको होतं. पण भावनेपेक्षा काम महत्वाचं म्हणून मी हे काँट्रॅक्ट घेतलं. मात्र तुझ्यासारख्या मुलाचं लग्न ठरलं. हीच आश्चर्याची गोष्ट आहे! जा.. आता विधी सुरू होतील." समर रागाने म्हणाला.

"अरे समर, लग्नाची तयारी तुमच्या टीमकडे आहे हे मला उशीरा कळलं. तसंही लग्न मुलीकडेच असतं ना म्हणून मी जास्त लक्ष घातलं नाही. पण सगळी तयारी एकदम छान झाली आहे हं." बेलवलकर बाई खूप खुश होत्या.

"विदिशा लग्नाला नाही म्हणाली आणि प्रसाद खचून गेला. ते लग्न जुळायला आम्ही पुन्हा प्रयत्न केले. पण शेवटी लग्न मोडलेच. आम्ही दोघांनी समजावून सांगून प्रसादला अक्कल आली म्हणायची. त्याला या लग्नासाठी तयार केलं. शिवाय राग कमी करण्यासाठी त्याने नताशाच्या ओळखीने समुपदेशनाचा कोर्सही केला. त्याचा खूप उपयोग झाला आम्हाला.
आमचा मुलगा सुधारला नसता तर कोण मुलगी देणार होतं याला? तूच सांग.
माझ्या होणाऱ्या सुनेचं, नताशाचं आधीचं लग्न भर मांडवात मोडलं. यात तिची काहीच चूक नव्हती. प्रसादला ती आवडली म्हणून हा विषय अजिबात वाढवला नाही. तुम्हा दोघांचं लग्न झालं आणि आम्हाला हे स्थळ आलं. बाकी सगळं जुळून आलं म्हणताना आम्ही होकार दिला." बाई आनंदाने सांगत होत्या.
त्यांनी विदिशाची चौकशी केली. जया काकूंची आठवण काढली. पण विदिशा आणि प्रसादचं लग्न झालं नाही, याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. "शेवटी काय..लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात." असं म्हणत बेलवलकर बाई आपल्या नातेवाईकांत मिसळल्या.

"सॉरी समर. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला." प्रसाद त्याचा हात हातात घेऊन म्हणाला. "विदिशाला माझ्याकडून सॉरी म्हण. खरंतर माझ्या सासऱ्यांना मीच सांगितलं होतं, आमच्या लग्नाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायला. आईला हे माहिती नव्हतं. असो, झालं गेलं विसरून आता नवी सुरुवात!" प्रसाद इतकं बोलून विधींसाठी पुढे जाऊन बसला.

हे ऐकून समरला बरं वाटलं. आता सगळं ठीक झालं होतं. 'हे सगळं विदिशाला सांगायला हवं.' बाजूला येऊन त्याने तिला फोन लावला.
--------------------------------------

समर कॉम्प्युटरवर काहीतरी काम करत होता.
विदिशा, मिंटी, रोशन आणि जयेश त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते.
"समर, दुसऱ्या शहरात शाखा काढायची असेल तर मी सारं काम बघेन. तू हे ऑफिस सांभाळ." विदिशा.

"तू सगळं छान सांभाळशील यात शंका नाही. पण काही दिवस तुला तिथे जाऊन राहावं लागेल." समर.

"हो. रूटीन बसेपर्यंत मी राहीन. हवं तर तिथला सगळा कारभार मिंटीकडे सोपवू. अर्थात ती तयार असेल तर. कारण आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात सेटल होणं तितकं सोपं नाही किंवा आपण असंही करू शकतो, इथली सगळी सूत्र मिंटी आणि रोशनच्या हातात देऊन आपण दोघे तिकडे जाऊ शकतो." विदिशा एक एक कल्पना सुचवत होती.

"सर, मला वाटतं विरूला परत बोलवावं. सध्या त्याच्याकडे काहीच काम नाहीय. इथून गेल्यापासून तो नुसताच बसून आहे. हे काम त्याने आपणहून सोडल्याने आता परत इकडे यायचे तरी कसे? म्हणून तो आला नाही आणि सर, त्याचे प्लॅन्सही वेगळे असतात. शिवाय त्याचा अनुभवही दांडगा आहे." रोशन.

"हे आधी का नाही सांगितलंस? आजच त्याला फोन करून विचारून घेऊ. मिंटी आणि रोशन, तुम्ही ही नवीन जबाबदारी घ्यायला उत्सुक असाल तर पुढचा प्लॅन करायला हरकत नाही. सध्या केवळ चौकशीपुरते ऑफिस सुरू करू. लोकांचा प्रतिसाद कसा येतो, हे पाहून पुढचं प्लॅनिंग करू." समर विचार करत म्हणाला.

"सर, माझी काहीच हरकत नाही. मला हे काम करायला खूप आवडेल. माझ्यासोबत माझी असिस्टंट तिकडे येऊ शकतं असेल तर उत्तम होईल!" मिंटी.
रोशनही हो म्हणाला आणि लवकरच वेडिंग सीझनची दुसरी शाखा काढायचा प्लॅन बनवला गेला.

या नव्या ऑफिसच्या कल्पनेने सर्वांच्या अंगात उत्साह संचारला. 'द वेडिंग सीझनची' सगळी टीम वेगाने कामाला लागली.

काही दिवसांतच समरने दुसऱ्या शहरात नवीन ऑफिस घेतलं. तिथले केटरर्स, डेकोरेटर्स, मोठे हॉटेल्स, लायटिंग व्यवसायिक यांच्या प्रमुखांची एक मीटिंग घेतली. त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाल्याने रेंटवर एक छोटासा फ्लॅट घेऊन मिंटी, तिची असिस्टंट साक्षी यांची राहण्याची व्यवस्था केली. रोशन ऑफिसमध्येच राहणार होता आणि समर तिथले रूटीन लागेपर्यंत आपल्या आत्याकडे राहणार होता.

बघता बघता 'द वेडिंग सीझन 2' च उद्घाटन झालं. रूटीन लागेपर्यंत काही दिवस समर तिथे राहिला. मात्र सहा महिने गेले तरी लोकं नुसतीच चौकशी करून जात होते. प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्ट हातात येत नव्हते म्हणून हे ऑफिस बंद करून आपल्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी नवीन ऑफिस सुरू करून समरने सर्वांना धक्का दिला.
इथे मात्र छान रिस्पॉन्स मिळाला आणि 'द वेडिंग सीझन 2' चा पुढचा प्रवास नव्या उत्साहाने सुरू झाला. काम वाढलं, पुन्हा स्टाफ वाढला. ही जागा अपुरी पडू लागल्याने समरने पाहिलं ऑफिसही वाढवलं.

आपल्या मुलांची प्रगती पाहून अपर्णा ताई, सुदेशराव खुश होते आणि आपल्या मुलीला योग्य सासर आणि जोडीदार मिळाल्याने जया काकू आणि जयवंत काकाही आनंदात होते.
---------------------------------------------
दिवस असेच पळत होते.

"काँग्रॅच्युलेशन्स समर." एक दिवस विदिशा त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली.

"कशाबद्दल?" समर तिची मिठी सोडवून घेत बाहेर आला.

"मेल पहिलास का? तुला 'यंग बिझनेसमन म्हणून अवॉर्ड' मिळाला आहे! विदिशा त्याच्या पाठोपाठ खोलीतून बाहेर येत म्हणाली.

"अरे वा, ही तर गुड न्यूज आहे. विदी, आधी कॉफी घे आणि मग काम करत बस." अपर्णा ताई तिच्या समोर कॉफीचा मग ठेवत म्हणाल्या.

"आई, आज चहाऐवजी कॉफी?"

"हो. तुला आवडते म्हणून केली. आता तुझ्यामुळे मलाही सवय लागली आहे कॉफीची." अपर्णा ताई आपला कप घेऊन तिच्या समोर बसल्या.
विदिशाने काही दिवस घरात बसून दोन्ही ऑफिसच्या हिशोबाचे काम हातात घेतले होते, त्यामुळे सध्या ती घरीच काम करत होती.

"या अवॉर्डचं स्वरूप असं आहे, रोख रक्कम, एक मोठी ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि खूप सारी प्रसिद्धी..." विदिशा उठून पुन्हा एकदा समरचे अभिनंदन करत म्हणाली.

"पुढच्या आठवड्यात रविवारी हे अवॉर्ड फंक्शन असेल. आई आणि बाबा, तुम्ही दोघांनीही यायचं आहे. मी माझ्या आई -बाबांनाही सांगेन. आपण सगळे मिळून जाऊ." विदिशाला खूप आनंद झाला होता. कारण समरला मिळालेल्या यशात तिचाही तितकाच वाटा होता. तिने आनंदाने जया काकूंना फोन लावला.

क्रमशः


🎭 Series Post

View all