द वेडिंग सीझन -भाग 3

Love Story

"मि. नाईक, आता हा इव्हेंट कॅन्सल होऊ शकत नाही. तुम्ही दिलेला ॲडव्हान्स आम्ही परत देऊ शकत नाही. ही रक्कम थोडी थोडकी नाही. तब्बल लाख रुपयांचा व्यवहार आहे हा." समर आपल्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला.

"तुमचं बरोबर आहे. खरं माझा मुलगा लग्नाला नाही म्हणतो. सगळं जमून आलं आणि अचानक काय झालं कोणाला ठाऊक? आधी हो म्हणाला. पण आता ती मुलगी पसंत नाही म्हणतो. आम्ही किती समजावण्याचा प्रयत्न केला. ठरलेलं लग्न मोडलं तर पुढे अवघड होईल." मि. नाईक चेहरा पाडून म्हणाले.

"तुम्ही म्हणत असाल तर, आम्ही त्याच्याशी बोलून बघतो. एक प्रयत्न म्हणून?" समर विचार करत म्हणाला.

"ठीक आहे. तो इथे येणं थोडं अवघड आहे. तरीही मी काहीतरी कारण काढून उद्या त्याला तुमच्याकडे पाठवतो." मि. नाईक निघून गेले.

"विदि, मि. नाईकांचा तो गर्विष्ठ मुलगा आता लग्नाला नाही म्हणतो. त्याचं कौन्सिलिंग करण्याचं काम तुझ्याकडे! प्लीज नाही म्हणू नकोस. हा इव्हेंट कॅन्सल झाला, तर आपलं मोठं नुकसान होईल आणि तो लग्नाला तयार झाला तर चांगलच आहे."

"मी आणि कौन्सलिंग? शक्यच नाही. त्याऐवजी त्यांचा अर्धा ॲडव्हान्स परत कर. त्याला समजावण्यापेक्षा मला तुझ्या आईसोबत मला चार गोष्टी जास्त बोलायला आवडतील. अपर्णा ताई खूपच छान आहेत."

"ताई काय म्हणतेस? माझी आई आहे ती." समर.

"अरे, त्यांनीच सांगितलं आहे. मला ताई म्हण. काकू म्हंटल की नको वाटतं. खरंच असं म्हणाल्या त्या."

"ते जाऊ दे. तू, त्या मि. नाईकांचा मुलाचं बघ. उद्या इथे येईल तो." समर आपल्या कामाला निघून गेला.

विचार करून विदिशाचं डोकं कामातून जायची वेळ आली.
"समर, मी त्या नाईकांच्या मुलाला काय समजावणार? तो साधारण आपल्याच वयाचा असेल आणि अग्रेसिव्ह आहे रे तो. पैसे परत द्या म्हंटला तर काय करायचं?"

"तसं काही होणार नाही. मीही असेन तिथे. आपण दोघे मिळून त्याला समजावू."

"इथून पुढे असे काही प्रसंग आले तर एक कौन्सिलर असलेला बरा. पण लगेच ही जागा भरणं शक्य नाही." समरने मिंटीला आणखी सूचना दिल्या.
------------------------------------

दुसऱ्या दिवशी नाईकांचा मुलगा ऋषभ रागारागाने ऑफिसमध्ये आला.
"तुम्ही स्वतःला कोण समजता? आमचे पैसे परत देत नाही म्हणजे काय?"

"ऋषभ, तुमच्या लग्नाची तारीख निश्चित होती. त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली होती त्यामुळे तुम्ही दिलेला ॲडव्हान्स आम्ही वापरला. आता तो परत करता येणार नाही." विदिशा स्पष्टच म्हणाली. "हा आमचा बिझनेस आहे. आम्ही तुम्हाला सेवा देण्याचं काम करतो. तुम्ही मनाला येईल तेव्हा लग्न ठरवाल आणि मनाला येईल तेव्हा मोडाल. मग आम्ही काय करायचं? तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि तेच तुम्हाला परत करायचे? इतकंच काम आहे की काय आम्हाला?"

"ऋषभ, आपण सहा तारीख फिक्स केली होती. त्या तारखेसाठी अजून दोन एन्क्वायरी होत्या. त्या आम्ही तुमच्यासाठी कॅन्सल केल्या. लग्न म्हणजे काही खेळ नव्हे. आज केलं आणि उद्या मोडलं!त्याहून लग्नाचा इव्हेंट ऑर्गनाईज करणे सोपी गोष्ट नाही. आम्हाला अगदी सुपारी पासून तुमच्या कपड्यांपर्यंत सगळं ठरवावं लागतं. त्यासाठी आमची माणसं सतत राबत असतात. त्याचा पगार देतो आम्ही त्यांना." समर.

हे ऐकून ऋषभचा चढलेला पारा थोडा खाली आला. "आय नो, बट मला ती मुलगी पसंत नाही."

"का? याला काहीतरी कारण असेल ना?" विदिशा.

"सुरभी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि तिचा पगारही माझ्या पगाराहून जास्त आहे." ऋषभ चिडून म्हणाला.

"बस्, इतकंच ना?" विदिशाला काही केल्या हसू आवरेना. "कुठल्या जमान्यात राहतोस ऋषभ? हा असला इगो काही कामाचा नाही. जा घरी जाऊन सर्वांना सांग. मी लग्नाला तयार आहे म्हणून."

"नाही. यात हसण्यासारखं काय आहे? लग्नानंतर या मुली डोक्यावर चढून बसतात. मग त्या जे सांगतील ते ऐकावं लागतं."

"काहीही बोलू नको. तू जाऊन सुरभीशी स्पष्ट काय ते बोल म्हणजे तुझ्या मनातले गैरसमज दूर होतील. हे काही लग्न मोडण्याचं रास्त कारण नव्हे. संसार नवरा -बायकोचा असला तरी लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा मेळ असतो.
आज जरी तुमचं लग्न मोडलं तरी उद्या समाज तिच्याकडे बोट दाखवेल आणि पुढे जाऊन तिचं लग्न ठरताना अडचणी येतील त्या वेगळ्याच." समर.

"अडचणी तिला येतील. मग मी का टेन्शन घेऊ?
मला हे स्थळ नको आहे." ऋषभ.

"या दोन -अडीच वर्षांत आम्ही एकोणीस यशस्वी लग्नं पार पाडली. प्लीज आमचे रेकॉर्ड खराब करू नकोस." विदिशा पुरती वैतागली होती.

"समर, मला वाटतं आता याला समजवण्यात काहीच अर्थ नाही. मला हे कौन्सिलिंग वगैरे नाही झेपत. याला इथून जायला सांग." विदिशा आपलं डोकं टेकवून खुर्चीत मागे टेकून बसली.

"मग माझे पैसे परत करा. त्याशिवाय मी जाणार नाही." ऋषभही खुर्चीत मागे टेकत म्हणाला.

"तिला याच्यापेक्षा दोन बोटं पगार जास्त आहे हे दिसतं. पण तिला कष्टही तितकेच करावे लागत असतील ते लक्षात येत नाहीय याच्या. उठ आणि प्लीज बाहेर जा." विदिशा टेबलावर हात आपटत म्हणाली.

"मी कुठेही जाणार नाही. आधी माझे पैसे परत करा." ऋषभ हट्टाला पेटला. "हवं तर आपण डील करू.

"गेट आउट. ही असली मानसिकता असणाऱ्या मुलासोबत मला कोणतीही डील करायची नाही. निघ इथून." विदिशा त्याच्या अंगावर धावून आली.
"विदी, काय करतेस? कंट्रोल युवर सेल्फ. अगं, आपला क्लायंट आहे तो. आपलं नुकसान झालं तर होऊ दे. मला कळलंय, त्याला समजावणं खूप अवघड आहे." समर तिला सांभाळत म्हणाला.

"किती चिप मनोवृत्ती आहे याची! म्हणजे स्त्रियांनी पुरुषांच्या पुढे कधी जायचंच नाही?"

"ए, जा ना तू. इथे माझ्याकडे बघत काय उभा आहेस? याला स्वतःच्या पैशांची किंमत आहे मात्र होणाऱ्या बायकोच्या पैशांची किंमत नाही." विदिशा जाम चिडली होती. तिचा रागरंग बघून ऋषभने तिथून काढता पाय घेतला.

"आपण इथे कष्ट करायचे एखाद्याचं लग्न छान व्हावं, यासाठी झटायचं आणि या असल्या लोकांपायी आपलं नुकसान करून घ्यायचं." विदिशा केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. समरला तिची अस्वस्थता कळत होती. पण अशावेळी काय करावे? हे मात्र त्याला समजत नव्हते. अचानक तो तिच्या पुढ्यात येऊन थांबला आणि हलकेच त्याने विदिशाला मिठी मारली आणि चट्कन तो बाजूला झाला.
"शांत हो बघू. आपलं नुकसान झालं, यासाठी तू चिडली आहेस की त्या ऋषभच्या निर्णयामुळे?"

"दोन्हींसाठी. समर, मला पगार जास्त आहे म्हणून तू माझ्याशी ठरलेले लग्न मोडले असतेस?" विदिशा त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणाली.

"नक्कीच नाही. माझ्या मनात तसा विचारही कधी आला नसता. या एकमेकांनी समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि तू त्याच्यासाठी इतकी इमोशनल होऊ नकोस. त्याला कसलाच फरक पडणार नाही." समर तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला. " तू आता घरी जा. मी बघतो काय करायचं ते."
आज समरला विदिशाचं वेगळचं रूप पाहायला मिळालं होतं. त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटत होतं. पण नक्की काय ते समजत नव्हतं. मनाची ही अस्वस्थता त्याला अगदी अपरिचित होती. या आधी न अनुभवलेली.
-------------------------------

"विदी, आज लवकर आलीस?" जया काकू कॉफीचा मग तिच्या हातात देत म्हणाल्या.

"हो. खूप थकायला झालंय आई. मी पडते थोडा वेळ."

"हम्म. उद्याही सुट्टी मिळते का बघ. मावशीकडे जाऊन येऊ. बऱ्याच दिवसांत तिच्याकडे जाणं झालं नाही." जया काकू.

"कशाला? ती स्थळं सांगणार असेल तर मी अजिबात येणार नाही. ती माझ्यासाठी असली स्थळं आणते, ज्यांना माझं काम पसंत नाही. मला माझं काम आवडतं. ते मी सोडणार नाही." विदिशा.

"झालं का सुरू? मावशीकडे जायचं राहू दे. तू आपली तुझ्या कामाला जा. माझी मी तिच्याकडे जाऊन येईन." जया काकू उठून आत निघून गेल्या.

"आई, चिडतेस काय लगेच? एक विचारू का? तुला तुझ्या लग्नाच्या वेळी किती पगार होता?" विदि त्यांच्या मागे येत म्हणाली.

"मला त्यावेळी सात हजार होता. तसा जास्तीच होता तो. लग्नानंतर मी वर्षभर नोकरी केली. मग तुझा जन्म झाला आणि माझी नोकरी सुटली."

"बाबांचा पाठिंबा होता का गं तुला? म्हणजे तू नोकरी करावी की नाही? याबाबत त्यांचं काय मत होतं?"

"तुझा जन्म झाल्यानंतर सहा महिन्यांनी मी नोकरीला जावं, यासाठी ते माझ्या मागे लागले होते. पण मीच नकार दिला. कारण घर, ऑफिस सांभाळून तुला बघणं शक्यच नव्हतं. या सगळ्या समजून घेण्याच्या गोष्टी असतात. आपण एकमेकांना समजून घेतलं तर संसार सुखाचा होतो." जया काकू.

"अगदी बरोबर आहे." विदिशाने आज घडलेला प्रकार आईच्या कानावर घातला." तुला माहिती आहे का आई? समर देखील हेच म्हणत होता. समर थोडा विचित्र वागत असला तरी त्याचे विचार, संस्कार चांगले आहेत. अपर्णा ताई आणि माझी गट्टी छान जमली आहे. त्या अगदी तुझ्यासारख्या आहेत. आता विचार बघू. मी त्यांना ताई का म्हणते ते? कारण त्यांना काकू म्हंटलेलं अजिबात आवडत नाही." विदि जया काकूंना बिलगली.

"अगं, मग आई म्हण. नाहीतरी माझ्यासारख्याच आहेत ना त्या?" विदिशाला आईचं म्हणणं पटलं. 'आईला आई म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं?'
ती आपला फोन घेऊन खोलीत आली. इतक्यात तिच्या फोनवर मेसेज आला.

"समरचा मेसेज?" तिने घाईघाईने व्हाट्सअप उघडले.

'हाय! वेटींग आउट साईड. कम फास्ट.'

मेसेज वाचून ती बाहेर आली.

"सरप्राईज.." तिला पाहताच समर मोठ्याने ओरडत म्हणाला.

"तू आत्ता इथे? इतकं अर्जंट काय काम आहे?" विदि आश्चर्याने म्हणाली.

"एक मस्त गुड न्यूज आहे." समर तिच्या हातात गुलाबाचे फूल देत म्हणाला.

"मला प्रपोज करण्याचा विचार आहे की काय?" विदि आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत म्हणाली.

तसा समर विचारात पडला.
"तूच सांग करू की नको? पण त्याआधी गुड न्यूज तरी ऐक." समर विदिच्या एकदम जवळ आला.

"काय करतो आहेस समर?" ती बाजूला होत म्हणाली.


क्रमशः








 

🎭 Series Post

View all