द वेडिंग सीझन -भाग 5

Love Srory

"आमची पसंती आहे. आता फक्त तुमची पसंती बाकी आहे. अहो, फोटो बघूनच आमच्या प्रसादला विदिशा आवडली. तिचं काम आवडलं. काहीतरी वेगळं आहे असं म्हणाला." बेलवलकर बाई फोनवर जया काकूंना म्हणत होत्या.

"हो ना. आमची विदिशा आहेच तशी. आता बघण्याचा कार्यक्रम कधी करूया? ते सांगा." जया काकू .

"खरंतर त्यासाठीच फोन केला होता. शनिवारचा दिवस चांगला आहे. त्या दिवशी मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू आणि कसं होतं ना..आजकालच्या मुलींना बघण्याचा टिपिकल कार्यक्रम आवडत नाही. ऑकवर्ड वाटतं त्यांना म्हणून तुम्ही मुलीला घेऊन आमच्या घरी या. इथे मी सगळी तयारी करते. तुम्ही काही काळजी करू नका." बेलवलकर बाईंनी आणखी काही बोलून फोन ठेवला.
जया काकूंना त्यांचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं. 'एक सासू म्हणून त्या जर परक्या मुलीचा इतका विचार करत असतील तर किती चांगली गोष्ट आहे! अशा घरात माझी लेक सुखी राहील.'
-------------------------------------

जया काकूंनी विदिशाला फोन लावला.
"शनिवारी वेळ काढ. त्यांची पसंती आहे. पण आपल्याला मुलगा बघायला जायचं आहे."

"मुलगा बघायला म्हणजे?" विदिशा मोठ्याने म्हणाली.

"ते आल्यावर सांगते. पण सुट्टी काढून ठेव." जया काकूंनी फोन ठेवला. आज त्या फार खुशीत होत्या. पण आपली लेक लवकरच लग्न होऊन सासरी जाणार म्हणून त्यांना वाईट वाटत होतं.
----------------------------------------

"शनिवारी कुठे जायचा प्लॅन असेल तर करू नकोस. कारण त्या दिवशी आपली मीटिंग आहे."
समर.

"हो. पण मला जावं लागेल." विदिशा.

"का? इतकं काय महत्वाचं काम आहे?"

"मुलगा बघायला जायचं.."

"काय? कोणासाठी? तुझ्यासाठी?" समर.

"हो. आमच्या घरात मीच लग्नाची आहे."

"आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट! तुला मला सांगावस नाही वाटलं? समर चिडला.

"माझ्या पर्सनल गोष्टी मी तुला विचारून, सांगून ठरवायच्या का? तू कोण रे माझा? आणि तू माझ्याशी बोलत तरी होतास का? आजारी होतास तेव्हा तुला बघायला आले नाही म्हणून चिडला होतास ना? हे बघ, आज ना उद्या माझं लग्न होणार आहे. ही सुरुवात झाली म्हणायची." विदिशा.

"मुलगा कोण आहे? कुठे राहतो, काय करतो? हे सगळं मला कळायला हवं." समर उठून खिडकीजवळ जात म्हणाला.

"का?" विदिशा वैतागली होती.

"हो. नसते प्रश्न विचारू नकोस. मला त्याची माहिती हवी आहे." समर.

"मग तूही चल शनिवारी, आमच्यासोबत."

"हट, मी तिथे येऊन काय करु? तू फक्त माहिती सांग. बाकी मी बघून घेतो."

"म्हणजे? काय करणार आहेस तू?"

इतक्यात मिंटी केबिनमध्ये आली.
"एनी प्रॉब्लेम? का भांडताय दोघं? बाहेर आवाज ऐकू येतोय."

"विचार तुझ्या मॅमना. लग्न करायला निघाली आहे ती." समरचे डोळे भरून आले म्हणून त्याने पुन्हा खिडकीकडे तोंड फिरवले.

"व्हॉट? हे मी काय ऐकती आहे?" मिंटी विदिशा जवळ बसत म्हणाली. "मला वाटलं तुम्ही दोघे.. बरं ते जाऊदे. पण अचानक लग्नाचा निर्णय?"

"मिंटी, तुझ्या सरांना सांग. त्या मुलाला माझं काम आवडलं आहे आणि मी सुध्दा. मग आज ना उद्या लग्न करावं लागेलच. मी काय आयुष्यभर अशीच, इथे राहणार नाहीय." विदिशा उठून बाहेर निघून गेली.

"सर, आर यू क्राईंग? एक बोलू का? त्यांच्या मनात काय आहे हे मला माहिती नाही. पण मला वाटतं, तुमचं विदिशा मॅमवर प्रेम आहे. त्याशिवाय त्यांच्या लग्नाचा विषय निघाल्यावर तुम्ही असे अस्वस्थ झाला नसता. हो ना?" मिंटी समर जवळ आली.

"ही गोष्ट आपल्या दोघांतच राहिली पाहिजे." इतकं बोलून समर भरकन बाहेर निघून गेला.

'म्हणजे मला जे वाटत होतं ते खरं आहे तर. आता
मॅमना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे किंवा समर सरांच्या मनातलं तरी कळलं पाहिजे. यासाठी आता मलाच काहीतरी करायला हवं. पण माझ्या मदतीला कोणीतरी हवं. रोशन? की जयेश? मिंटी स्वतःशी बोलत बाहेर आली.
"रोशन, इधर आ. चल, कॉफी पिऊन येऊ." मिंटी आणि रोशन कॉफी प्यायला गेले.

"मिंटी, मला कॉफी नाही आवडत. काय झालं? काही बोलायचं होतं का?" रोशन.

"हो." मिंटीने त्याला सारी हकीकत सांगितली.
--------------------------------------

शनिवारी विदिशाचा बघण्याचा कार्यक्रम होऊ नये म्हणून समर मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होता. पण देवाने त्याचं ऐकलं नाही. अशातच त्याने मीटिंग कॅन्सल केली आणि तो घरीच थांबला. मिंटी आणि जयेश जाऊन हॉल बघून आले आणि ऋषभच्या लग्नाची तयारी सुरू झाली.

बेलवलकरांकडून होकार अपेक्षित होता. मात्र विदिशाने पसंतीसाठी दोन -तीन दिवसांचा वेळ मागून घेतला. शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून जया काकू आणि जयवंत काकांनी विदिशाला निर्णय घेण्यासाठी गडबड केली नाही.

रविवारी ऑफिस सुटल्यावर विदिशा घरी जायला निघाली तेव्हा प्रसाद तिला भेटायला ऑफिसजवळ येऊन थांबला होता.
"अरे, तू इथे कसा काय?" विदिशाला अचानक त्याला पाहून आश्चर्य वाटलं.

"तुला भेटावं वाटलं म्हणून आलो." प्रसाद.

"हो. पण मी तुला अजून होकार दिलेला नाही." विदिशा हसून म्हणाली.

"तोच घ्यायला आलोय असं समज हवं तर." प्रसाद आणि विदिशाचा संवाद खिडकीतून बघणाऱ्या समरला ऐकू येत नव्हता. पण मनातून तो खूप चिडला होता.
'हल्ली विदि माझ्याशी जास्त बोलत नाही आणि काही सांगतही नाही.' समर धडाधडा पायऱ्या उतरून खाली आला.
"विदि, अजून गेली नाहीस? चल मी सोडतो तुला." समर प्रसादकडे दुर्लक्ष करत म्हणाला.

"अरे, पाहिलं नाहीस? आम्ही दोघे बोलतोय. बरं, हा प्रसाद बेलवलकर आणि प्रसाद, हा समर. आमचा बॉस."

"ओ, हाय समर." प्रसादने आपला हात पुढे केला.
"मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे."

"कोणाकडून? विदिशाकडून की बाहेरून?" समर प्रसादला शेकहॅण्ड करत रुडपणे म्हणाला.

"वेल..मी बाहेरून ऐकलं आहे. 'द वेडिंग सीझन ' बद्दल!" प्रसाद.

"येस. थॅन्क्स. पण मी निघतो. मला उशीर होतोय." समर मागे न पाहताच निघून गेला.

"सॅम, ही वागण्याची पद्धत झाली का? तो बोलतोय तुझ्याशी." विदिशा मागून ओरडली.

"जाऊ दे अगं. खरंच गडबड असेल त्याला. बाय द वे, नाईस ड्रेस हं. पण मला वेस्टर्न कपडे आवडत नाहीत. भारतीयच आवडतात. असो, घरी जात असशील तर मी सोडतो तुला." प्रसाद.

"सॉरी. पण नको. कारण अजून मी होकार दिला नाहीय त्यामुळे तू असं आलेलं आई - बाबांना आवडणार नाही." विदिशा स्पष्टच म्हणाली.

"बरं. पण नक्की काय ते कळव. मी खूप एक्साईटेड आहे, तुझा होकार ऐकायला." प्रसाद निघून गेला. तशी विदिशा समरच्या मागे आली.
"तू अजूनही इथेच आहेस तर. तो गेलाय. बोल आता."

"तू कशाला आली आहेस? जा त्याच्या मागे मागे."

"मी अजून होकार दिला नाहीय समर."

"मग तो का आला होता?"

"भेटायला."

"वा! अजून होकार कळवला नाही, तरी भेटायला येतो तो? माझ्या ऑफिसच्या दारात त्याने परत पाऊल ठेवता कामा नये. हे तू लक्षात ठेव."

"समर, काय झालंय तुला? असा का वागतो आहेस? हे बघ, आपण दोघे पार्टनर आहोत. बाकी मैत्रीचं नातं सोडून दुसरं कसलंच नातं नाहीय आपल्यात. समजतंय का तुला? असं पझेसिव्ह नको होऊ रे. माझं आयुष्य वेगळं आणि तुझं वेगळं आहे. आपली छान मैत्री आहे. ती तशीच राहूदे."

"हम्म." समर इतकंच म्हणाला आणि तिथून निघून गेला.

दोन दिवस होऊनही विदिशाने आपला होकार कळवला नव्हता. तिचा होकार तर होताच. पण तो कळवण्यामागे नक्की काय बिनसलं आहे? हे तिला कळत नव्हतं.
अचानक एक दिवस प्रसाद आणि बेलवलकर बाई घरी आल्या.
" जया वहिनी, तुमच्या मुलीच्या मनात काय आहे? हे जाणून घ्यायला आलो आहोत. प्रसाद म्हणतो, लग्न करेन तर हिच्याशीच." बेलवलकर बाई मोठ्या थाटात म्हणाल्या. हे ऐकून जया काकूंना खूप आनंद झाला.

"मला एक कळत नाहीये, ही मंडळी लग्नासाठी एवढी गडबड का करत आहेत?" जयवंत काका जया काकूंना बाजूला घेऊन आले.

"बाबा, अहो तसं काही नाही. आम्हाला विदिशा पसंत आहे. चांगलं स्थळ हातचं जायला नको म्हणून ही सगळी गडबड. बाकी काही नाही." प्रसादला जयवंत काकांचं बोलणं ऐकू गेला होतं.

"तसं असेल तर ठीक आहे. पण मला वाटतं विदिशानेच उत्तर द्यावं." जयवंत काकांचं आपल्या लेकीकडे पाहत म्हणाले.

"मला प्रसाद पसंत आहे." विदिशा एकदमच म्हणाली.

"अरे, वा! हे. उत्तम झालं." प्रसाद जा. पेढे घेऊन ये. हवं तर दोघेही जा." बेलवलकर बाई आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या.
विदिशाने परवानगीसाठी आपल्या आईकडे पाहिले. जया काकूंनी आपल्या डोळ्यांनीच होकार दिला. तसे दोघे बाहेर पडले.

"थँक्स. होकार दिल्याबद्दल." प्रसाद जाता जाता म्हणाला.

"मला तू आवडला होतास. पण होकार द्यावा की नाही? या बाबतीत मी कन्फ्युज होते. शेवटी संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे हा." विदिशा.

"खरं आहे. आता मी रोज तुला ऑफिसमधून पिकअप करायला येईन." प्रसाद.

"नको. त्यापेक्षा घरी येत जा. इथेच भेटू आपण. साखरपुडा झाल्यानंतर बाहेर फिरायला जात जाऊ." विदिशाला माहिती होतं, समरला हे आवडणार नाही म्हणून तिने काहीतरी कारण पुढं केलं.
----------------------------------

"मी प्रसादाच्या बाबांशी बोलून साखरपुड्याची तारीख लवकरच ठरवते. साखरपुडा थोडक्यात करू आणि लग्न मात्र थाटात करू. यावर तुमचं काय मत आहे?" बेलवलकर बाई उत्साहाने बोलत होत्या. हवं तर लग्नाचा खर्च निम्मा निम्मा वाटून घेऊ. आजकाल तसंच करतात. विदिशाला याची जास्त माहिती असेल." बेलवलकर बाईंच्या या बोलण्याला जया काकू आणि जयवंत काकांनी होकार दिला. आपल्या लेकीचं लग्न ठरलं म्हणून देवापुढे पेढे ठेवले.
"अहो, साखरपुडा ठरल्याशिवाय कोणाला काहीच बोलायचे नाही. नाहीतर नातेवाईक मोडता घालायला तयारच असतात." जया काकूंनी देवापुढे हात जोडले.

लग्न ठरल्यापासून विदिशा आनंदात होती. मात्र हा आनंद तिला मनापासून झाला नव्हता. असे का होते आहे? हे तिचे तिलाच कळत नव्हते. काहीतरी चुकतंय का? पण याचे उत्तर तिला मिळत नव्हतं.
--------------------------------------

"हे कसले पेढे?" जयेश तोंडात दोन पेढे कोंबत म्हणाला.

"तुमच्या मॅडमच्या लग्नाचे." मिंटी आपलं तोंड वाकडं करत म्हणाली.

"ठरलं? आणि मला कोणी सांगितलंही नाही." जयेश आणखी एक पेढा उचलत म्हणाला.

"खा..खा. सगळे पेढे तूच खा." समर सरांनी या पेढ्याच्या बॉक्सकडे पाहिलं देखील नाहीय. सकाळपासून चेहरा पाडून बसले आहेत ते. जा त्यांना समजाव." मिंटी.

"मी काय समजावणार? आता विदिशा मॅमकडून अपेक्षा ठेवता कामा नये. निदान आणखी थोडे दिवस तरी आणि सरांचं त्या ऋषभच्या लग्नाच्या तयारीत लक्ष नाहीय. या लग्नाचं ओझं उगीचच डोक्यावर घेतलंय असं वाटायला लागलं आहे." जयेश आणि मिंटी बराच वेळ ऋषभच्या लग्नाचं प्लॅनिंग करत राहिले.
-------------------------------------

साखरपुड्याला अजून पंधरा दिवस बाकी होते. प्रसाद आणि विदिशा आता रोज भेटत होते. प्रसादने तिला जीन्स टॉप न घालण्याची गोड विनंती केली होती आणि विदिशाने ती मान्यही केली. समरला तिच्यातला हा बदल जाणवत होता. ती आपल्यापासून दूर जाते ही कल्पना त्याला करवत नव्हती त्यामुळे त्याची चिडचिड होणं स्वाभाविक होतं.

ऋषभच लग्न पार पडलं. मिंटी आणि बाकी टीमने मिळून हे लग्न जवळजवळ ओढून काढलं. पण सर्वांनी मिळून या लग्नाचे प्लॅनिंग जबरदस्त केलं होतं त्यामुळे समर खूप खुश होता.
विदिशाच्या साखरपुड्याची तारीख जशी जवळ येऊ लागली तसा समर जास्त अस्वस्थ होऊ लागला. विदिशा साखरपुड्यासाठी साड्यांच्या खरेदीसाठी जाणार होती. तिने समरला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला. पण तो आपल्या नकारावर ठाम राहिला.

"माझ्या लेकाच्या पसंतीनेच सगळ्या साड्या घ्यायच्या बरं." बेलवलकर बाई साड्यांच्या दुकानात बसून विदिशाशी बोलत होत्या.

"का?" त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? हे विदिशाला कळेना.

"अगं, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या पसंतीने खरेदी करणं मुलींना आवडतं म्हणून म्हणाले मी. पण तशी काही जबरदस्ती नाही हं. तुला ज्या साड्या आवडतील त्या घे." बेलवलकर बाई जया काकूंच्या जवळ बसत म्हणाल्या. या दोघांची चांगली गट्टी जमली होती. प्रसाद आला, तशी साड्यांची खरेदी सुरू झाली. विदिशाच्या पसंतीच्या सगळ्या साड्या प्रसादने रिजेक्ट केल्या. आता नक्की काय करायचं? हे विदिशाला कळेना.

"प्रसाद, तुला काहीच आवडत नाहीय ना? मग बाजूला हो. तिच्या पसंतीने तिला घेऊ दे." बेलवलकर बाईंनी आपल्या होणाऱ्या सुनेची बाजू घेतली म्हणून जया काकूंना आनंद झाला आणि सगळी खरेदी झाली ती विदिशाच्या पसंतीनेच.

"हे असं चालणार नाही. इथून पुढे तुला माझी पसंती सुद्धा विचारात घेतली पाहिजे." प्रसाद नाराजीने विदिशाला म्हणाला.

"अरे, साड्यांच्या खरेदीसाठी पुरुषांची कसली आली पसंती?" विदिशा हसून म्हणाली.

"माझ्या घरी आई हेच करते. तूही तेच करावं असं मला वाटतं." प्रसादच्या डोळ्यांत एक वेगळीच झलक होती. ती बघून विदिशा काही क्षण हादरली.

"आत्ता ठीक आहे. पण लग्नानंतर असं चालणार नाही." प्रसाद अचानक हसून म्हणाला. हे पाहून विदिशा थोडी रिलॅक्स झाली.
मात्र तिचं मन एका वेगळ्याच शंकेने भरून आलं. खरंच प्रसाद असा आहे की काही वेगळाच? त्याचं वागणं, बोलणं हे नेहमी असंच नॉर्मल असतं की त्याचा स्वभाव काही निराळा आहे? खरं काय खोटं काय हेच तिला कळेना. उगीचच तिच्या मनात समरची आठवण भरून आली.



क्रमशः













 

🎭 Series Post

View all