द वेडिंग सीझन भाग 6

Love Story
साखरपुड्याचा दिवस उजाडला. समरला खरंतर यायचं नव्हतं. पण साखरपुडा मोडता आला तर हीच संधी आहे म्हणून मिंटी त्याला जबरदस्तीने घेऊन आली होती.
तो साखरपुड्याचे विधी बघत एकटाच मागे बसला होता. त्याचं सगळं लक्ष विदिशाकडे होतं. एरवी वेस्टर्न ड्रेसमध्ये असणारी विदिशा पारंपारिक वेषात खूप उठून दिसत होती. अंगावर डाळिंबी रंगाची पैठणी, हातात मॅचिंग बांगड्या, केसांची केलेली वेगळीच रचना, चेहऱ्यावर केलेल्या लाईट मेकअपमुळे चुलबुली विदिशा आज खूपच छान दिसत होती. जबाबदारीने वागत होती.

तिला पाहून समरला दोघांची पहिली भेट आठवली. त्याने नुकतंच वेडिंग प्लॅनर हे ऑफिस सुरू केलं होतं. विदिशा इंटरव्यू द्यायला आली. पण समरने इंटरव्यू न घेताच तिला सिलेक्ट केलं होतं.

हळूहळू दोघांत मैत्री झाली. नंतर ते एकमेकांचे पार्टनर झाले. तिच्या आयुष्यात जेव्हा तिसऱ्या व्यक्तीने एन्ट्री केली तेव्हा मात्र समरला जेलेस फिल झालं. आजपर्यंत दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्या कामात मिळालेलं सक्सेस दोघांनी सेलिब्रेट केलं होतं. या प्रवासात कधीकधी दोघेही धडपडले, हरले. पण जिद्दीने पुन्हा नव्याने सुरुवात केली होती दोघांनी. हक्काने एकमेकांशी भांडले आणि एकमेकांवर रुसलेही होते.

आता दोघांनाही एकमेकांची खूप सवय झाली होती. समर तिच्या बाबतीत फार पझेसिव्ह होता.
आपल्या शिवाय विदिशाच्या आयुष्यात आणखी दुसरी जवळची व्यक्ती येऊ शकते, ही कल्पना समरला सहन झाली नव्हती आणि तेव्हाच त्याला कळलं होतं, आपलं विदिशावर प्रेम आहे! या नवीन जाणिवेचा खरंतर त्याला धक्का बसला होता. तिने आपलं हे प्रेम समजून घ्यावं असं त्याला वाटत होतं. मात्र विदिशाने समरची केवळ एक मित्र म्हणून साथ देत आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड केली. समरला प्रसाद अजिबात आवडला नव्हता. का कोणास ठाऊक? पण त्याला तो विदिशासाठी योग्य वाटत नव्हता.

समर उठून बाहेर आला. स्टार्टरमधली मंच्युरियनची डिश घेऊन तो खुर्चीवर बसला. इतक्यात रोशन त्याला शोधत आला.
"सर, इथे कुठे बसलात? एकमेकांना अंगठी घालतील दोघे आता."

"मग मी काय करू?" समर.

"थांबवा हे सगळं." रोशन ओढून त्याला आत घेऊन गेला.

"हे शक्य नाही. बघ अंगठी घालून झाली आहे. फोटोशूट सुरू आहे. साला, आपण इतक्या जणांची लग्न केली. आपलं प्रेम मात्र.. जाऊ दे. चल, जेवायला जाऊ." दोघे जेवण करून आले तेव्हा विदिशा आणि प्रसाद सर्वांच्या पाया पडत होते. दोघेही समर जवळ आले.
"काँग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू." समरने प्रसादला मिठी मारली. त्याने विदिशाकडे मात्र साफ दुर्लक्ष केले. तिने हात पुढे केला. पण समर तिथून निघून गेला.
'याला काय झालं? प्रसाद याला आवडत नाही हे माहिती आहे. पण..' विदिशा मनात म्हणाली.

"हाय मॅम, खूप छान दिसताय आणि रिंगही छान आहे." मिंटी पुढे होत म्हणाली.

"थॅन्क्स. मिंटी, समरला काय झालं?" विदिशा हळूच म्हणाली.

"कळेल नंतर." मिंटीच्या तोंडून सहज निघून गेलं.

"म्हणजे?"

"मला माहिती नाही. मी आलेच." मिंटी तिथून निघून गेली.
--------------------------------------

दुसऱ्या दिवशी विदिशाला ऑफिसमध्ये बघून समरला आश्चर्य वाटलं.
"अरे, आज तू कशी काय आलीस? मला वाटलं आज तुझी सुट्टी असेल."

"नो. आज मला खूप काम आहे." विदिशा समरच्या खुर्चीजवळ आपली खुर्ची ओढून बसली.

"आज इथे काही काम नाही. त्याऐवजी तू असं का नाही करत? प्रसादला घेऊन मस्त लाँग ड्रायव्हला जाऊन ये. दोघे मस्त फिरून या. कालच तुमची एंगेजमेंट पार पडलीय. सो, लग्नाची तारीख ठरेपर्यंत थोडं एन्जॉय करा." समर विदिशाकडे पाठ करत म्हणाला.

"नाही. आज त्याला वेळ नाहीय आणि मलाही माझ्या रुसलेल्या मित्राची समजून काढायची
आहे." विदिशाने समरची खुर्ची आपल्याकडे वळवली. "तू असा का वागतो आहेस समर? माझं लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. मला वाटतं, तू जेलेस फील करतो आहेस." विदिशा आपल्या डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली.

"मी आणि जेलेस? का होईन? तूच सांग. मला फक्त आपल्या प्रेम..सॉरी, मैत्रीत दुसरा कोणी वाटेकरी नको होता." समर बोलताना गडबडला.

"काहीही हा. आज ना उद्या हे होणारच होतं. आज माझं लग्न ठरलं. उद्या तुझंही ठरेल तेव्हा मी तुझ्या होणाऱ्या बायकोशी अजिबात असं वागणार नाही. तिच्याशी छान मैत्री करेन. आपली सगळी सिक्रेट्स तिला सांगेन. कळलं? आता शहाण्या मुलासारखा नीट वाग." विदिशा त्याला फ्लाईंग किस देत म्हणाली. "हे फ्लाईंग किस तुझंच आहे हं. मागे तु मला दिलं होतंस. आठवतंय?" हे पाहून समर गालातल्या गालात हसत होता.
"ही तुझी मैत्री मला आयुष्यभर अशीच हवी आहे."

इतक्यात विदिशाला प्रसादचा फोन आला.
"अरे, आज तुला वेळ नव्हता ना? मग फोन कसा काय केलास?" ती उठून बाहेर आली.

"बायकोसाठी काहीही. आजची एक मीटिंग पार पडली. दुसरी मी कॅन्सल केली. चल, कुठेतरी मस्त लाँग ड्राईव्हला जाऊ." प्रसाद म्हणाला तशी विदिशाने एक नजर समरकडे टाकली. ती त्याला खाणाखुणा करत म्हणाली, 'तुम्हा दोघांना एकमेकांच्या मनातलं कळतं की काय?'
"पण ठीक आहे. जाऊ आपण. तू निघालास की कळव. मग मी इथून बाहेर पडते."

"त्याला इथेच ऑफिसखाली यायला सांग. तू एकटी बाहेर जाऊ नकोस. मी तुला सोडायला आलो असतो. पण ते प्रसादला चालणार नाही म्हणून त्याला इथे येऊ दे." समर.

"नक्की? बघ, तू पुन्हा दंगा करशील." विदिशा.

"नाही. येऊ दे त्याला."

विदिशाने प्रसाद निघेपर्यंत आपलं काम आटपलं. प्रसाद आला तशी ती बाहेर निघून गेली.

"कुठे जातोय आपण?" आड रस्त्याला गाडी येताच विदिशा प्रसादला म्हणाली.

"अगं, मगाशी नाही का ठरलं? लाँग ड्राईव्हला जातोय ना आपण?" प्रसाद विदिशाच्या जवळ येत म्हणाला.

"हो. पण हा रस्ता जास्त सूनसान वाटत नाहीय का?" विदिशा थोडी घाबरली होती.

"मी आहे ना? मग घाबरतेस कशाला?" प्रसादने अचानक गाडी थांबवली.

"गाडी का थांबवली?" विदिशा.

"बघ ना, किती मस्त वातावरण आहे! हा संधी प्रकाश, गार वारा, तू आणि मी! उतर खाली. थोडं पायी चालून येऊ." प्रसाद म्हणाला तशी विदिशा खाली उतरली.

"इथे चिटपाखरू देखील नाहीय. मला खरंच भीती वाटतेय. आपण पुन्हा मागे जाऊ. एखाद्या मस्त रेस्टॉरंटमध्ये? कॉफी, सँडविच किंवा आणखी काही?" विदिशा.

"जाऊ. पण त्याआधी मला तुझ्याकडून काहीतरी हवंय." प्रसाद विदिशाच्या एकदम जवळ आला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घट्ट धरला आणि अगदी तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेला.

"नको. प्रसाद.. हे सगळं लग्नानंतर ठीक आहे. मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या मी अजिबात करत नाही." विदिशा त्याला मागे ढकलत म्हणाली.

"काल आपला साखरपुडा झाला ना? मग आता काय हरकत आहे. कच्च लायसन मिळालं. पक्कं अजून बाकी आहे." प्रसादने तिला मागून मिठी मारली. "प्लीज विदिशा, ऐक माझं."

"काहीतरी बोलू नकोस. मी असलं काही करणार नाही." विदिशा गाडीत जाऊन बसली.
"आपण इथून निघतो आहे. तेही अंधार पडायच्या आत. तू बघतोयस ना? इथे आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाही." ती रागाने म्हणाली.

प्रसादकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने गाडी सुरू केली आणि स्पीड इतका वाढवला की विदिशा अक्षरशः जीव मुठीत घेऊन बसली. ऑफिस जवळ येताच प्रसादने गाडी थांबवली. तशी विदिशा काही न बोलता खाली उतरून बाहेर आली.
"हे तू बरं केलं नाहीस." प्रसाद त्याचं वेगाने निघून गेला. त्याची विचित्र नजर पाहून विदिशाला खूप भीती वाटली. ती पळतच ऑफिसमध्ये आली.
समरच्या केबिनमधला लाईट सुरू होता.
"समर.."

"विदि, काय झालं?" तिला असं पाहून समर पुढे आला. तशी विदिशा त्याला बिलगली.

"काय झालं?"

"समर, प्रसाद.."

"काय केलं त्याने? तुला तो काही बोलला की काही.." विदिशा काही बोलेना. ती तशीच थरथरत
उभी होती.

"काही बोलशील?" समर तिला बाजूला करत म्हणाला.

"काही नाही."

"सांगता येत नसेल तर सांगू नको. पण तुमच्या दोघांत काहीतरी घडलं आहे हे नक्की." समरने आपली पाण्याची बाटली पुढे केली. "कॉफी मागवू? बरं वाटेल."
थोड्याच वेळात कॉफी आली. कॉफी पिल्यावर तिला बरं वाटलं.

"मला प्रसादचं वागणं समजतच नाहीय. लग्न ठरलं त्यावेळी तो खूप चांगला वागत होता. आता साखरपुडा झाल्यानंतर काहीतरी वेगळाच वागतो आहे. लग्नानंतर ज्या गोष्टी करायच्या त्या..जाऊ दे समर. मला वाटतं मी त्याला समजून घ्यायला कमी पडते." विदिशा.

"त्याचं चुकत नसेल तर तू समजून घ्यायला कमी पडत असशील. पण तसा तो चांगला मुलगा वाटतो. पण होतं असं की, आम्हा पुरुषांच्या मनात काय असतं? हे तुम्हा मुलींना लवकर समजत नाही म्हणून थोडं अवघड होतं. तू गोड बोलून त्याला समजावून बघ." समर तिला समजावत म्हणाला.

"हम्म. पण तुझ्यासारखा हळुवारपणा त्याच्यात नाही रे. तो तुझ्यापेक्षा जास्त अग्रेसिव्ह आहे."

"विदि, माझी आणि त्याची तुलना होऊ शकत नाही. तू ती करु नयेस. कारण तो तुझा होणारा नवरा आहे आणि मी फक्त एक मित्र." समर मित्र या शब्दावर जोर देत म्हणाला.

"माझी निवड चुकली का रे?" विदिशा त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली. "मला त्याची भीती वाटते. मी होकार देण्याआधीचं त्याचं वागणं खूप वेगळं होतं आणि साखरपुडा जसा झाला, तसं त्याचं वागणं खूप बदललं. बहुतेक तो मला गृहीत धरतो आहे."

"ते साहजिकच आहे. शेवटी तुझा होणारा नवरा आहे तो. थोडा प्यार से बात करो. मग नंतर बघ, कसा नीट वागतो ते. चल मी आता तुला घरी सोडतो. खूप उशीर झाला आहे."
---------------------------------------

"विदिशा, सगळं ठीक आहे ना? तुमच्या दोघांत काहीतरी वाद किंवा भांडण झालं आहे का?
तुला फोन लावून दे म्हणून प्रसादला कितीवेळा सांगितलं! तो नाहीच म्हणत होता. माझ्याकडे तुझा नंबर नव्हता. त्याच्या फोनमधून जबरदस्तीने घेतला बघ." बेलवलकर बाई फोनवर म्हणत होत्या.

"नाही. तसं काहीच नाही." विदिशा.

"मग तुला भेटून आल्यापासून प्रसाद काहीतरी वेगळाच वागतो आहे. बरं ते जाऊ दे. तुझ्या लग्नाच्या साड्या घेशील तेव्हा मला बोलावं. हे सांगायला फोन केला." बेलवलकर बाई बोलत राहिल्या.
विदिशाला अजूनही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. प्रसादशी लग्नाचा घेतलेला निर्णय तिला एकदम चुकीचा वाटू लागला. त्याच्या डोळ्यांत निराळी दिसणारी छटा तिला अस्वस्थ करू लागली. आपलं मन समर आणि प्रसादची तुलना का करत आहे? हेच तिला कळत नव्हतं. समरशी आपलं छान जमतं. मात्र प्रसादशी लवकर कनेक्ट होता येत नाहीय. त्यात काल तो जे वागला, ते मला न पटण्यासारखं होतं. खरंच त्याला भावना कंट्रोल करता येत नसतील?की तो तसाच आहे? की तो फक्त चांगलं वागण्याचं नाटक करत होता?


क्रमशः




🎭 Series Post

View all