द वेडिंग सीझन -भाग 7

Love Story
पुढचे दोन दिवस प्रसाद आणि विदिशाचं काही बोलणं झालं नाही. तिसऱ्या दिवशी मात्र तो अचानक घरी आला आणि विदिशाला फिरायला नेण्याची परवानगी मागू लागला. जया काकू हो म्हणाल्या. मात्र जयवंत काकांना विदिशाच्या चेहऱ्यावर काळजी जाणवली.
"मी काय म्हणतो, साखरपुडा झाला असला तरी असं रात्री -अपरात्री फिरायला जाणं योग्य नाही. लग्न झाल्यावर कुठेही जा. मी नाही म्हणणार नाही. पण आत्ता नको."
काकांच्या बोलण्याने प्रसादला राग आला.
"बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही की काय?"

"तसं नाही. मुलीचा बाप म्हणून मला ते योग्य वाटत नाही. त्यातूनही तुम्हाला जायचे तर जा." काका आपल्या रागावर संयम ठेवत म्हणाले.

"नको. तुमची परवानगी नसेल तर राहू दे." प्रसाद आला तसा निघून गेला.

"विदू, काही अडचण आहे? की कसलं टेन्शन आहे?" काका तिच्याजवळ बसत म्हणाले.

"नाही बाबा. तसं काही नाही. इतक्या रात्री जाणं मलाही योग्य वाटलं नाही. पण बरं झालं, तुम्हीही परवानगी दिली नाहीत. त्याच्या मनात कधी काय येईल ते सांगता यायचं नाही."

"म्हणजे? काही प्रोब्लेम तर नाही ना?" काका काळजीने म्हणाले.

"नाही. ते सगळं राहू द्या. उद्या आपल्याला समरकडे केळवण आहे, हे लक्षात आहे ना? मी ऑफिसमधून त्याच्यासोबत येईन. तुम्ही इथून लवकर निघा." समरचे नाव काढताच तिच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला.
------------------------------------------

"मी जे मनात येईल ते करून मोकळा होतो. आजवर माझ्या आई -वडिलांनी कधी मला विरोध केलेला नाही. विदि, तुझ्या बाबांना मात्र सांगून ठेव. माझ्या म्हणण्याला, निर्णयाला अजिबात विरोध करायचा नाही. नाहीतर.." प्रसाद फोनवर बोलत होता.

"नाहीतर काय प्रसाद?"

"काही नाही. आज संध्याकाळी आपण फिरायला जातोय आणि यावर मला कुठलीही कारणं नको आहेत."

"आज संध्याकाळी समरच्या घरी केळवण आहे. मी येऊ शकत नाही." विदिशा स्पष्टच म्हणाली.

"वाटलंच. सरळ सांगून का टाकत नाहीस, तुला माझ्यासोबत यायचं नाहीय ते आणि त्या समर शिवाय तुझं पानही हालत नाही? जेव्हा बघावं तेव्हा त्याचं नाव तुझ्या तोंडात असतंच. काय आहे त्याच्यात? जे माझ्यात नाही?" प्रसाद चिडून म्हणाला.

"शटअप प्रसाद. जे तोंडाला येईल ते बोलू नकोस. तो माझा चांगला मित्र आहे. बस्. तुझ्या मनासारखं झालं नाही की तू चिडतोस, वाट्टेल ते बोलतोस. कधी माझ्या मनाचा विचार करून बघ. लग्न म्हणजे फक्त पुरुषाचं ऐकायचं असं काही नाही. बायकोच्या म्हणण्याला सुद्धा तितकाच मान असतो." विदिशा चिडली आणि प्रसादने फोन ठेऊन दिला.
---------------------------------------

संध्याकाळी विदिशा आणि समरला यायला उशीर झाला. जया काकू आणि काका कधीच आले होते. अपर्णा ताई आणि सुदेशरावांशी त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या.

"मला वाटलं तुम्ही दोघे येता की नाही? बराच उशीर झाला आज! विदिशा ये. आज सगळं तुझ्या आवडीचं केलं आहे." अपर्णा ताई पानं मांडत म्हणाल्या.


जेवणं झाल्यावर सुदेशराव आईस्क्रीम घेऊन आले.
"समर, तू आईस्क्रीम खाऊ नकोस. नाहीतर पुन्हा आजारी पडशील आणि मी बघायला आले नाही म्हणून पुन्हा अबोला धरशील." विदिशा त्याच्या हातातला आईस्क्रीमचा कप काढून घेत म्हणाली.

"अगं, या आईस्क्रीमने काही होत नाही. तो परवा आणलेला फ्लेवर वेगळा होता. त्यानेच त्रास होतो मला." समरने पुन्हा तिच्या हातातला कप काढून घेतला.

"आई, बघा ना.. तुमचा मुलगा ऐकत नाहीय." अपर्णा ताईंना विदिशा चुकून आई म्हणून गेली. अपर्णा ताई दोघांची नोक-झोक लांबून पाहत होत्या. विदिशाच्या हाकेने त्या पुढे आल्या.
"सॉरी ताई, मी चुकून तुम्हाला आई म्हणाले." विदिशाने आपली जीभ चावली.

"असू दे गं. आईचं म्हण. ऐकायला छान वाटतं आणि समर, खरंच तू आईस्क्रीम खाऊ नकोस. त्रास होतो तुला. आजारी पडलास तर दोन, दोन दिवस खोलीच्या बाहेरही येत नाहीस आणि त्यामुळे कामाचा खोळंबा होईल तो वेगळाच." अपर्णा ताई.

हे ऐकून समरने आपला कप खाली ठेवला.

"नशीब. हा तुमचं तरी ऐकतो." विदिशा त्याला चिडवत म्हणाली.

अपर्णा ताई तिला हसून प्रतिसाद देत होत्या. 'या दोघांची जोडी अगदी छान जमते. विदिशाने त्या प्रसादला कसं काय पसंत केलं? देव जाणे. मला तो हिच्यासाठी म्हणावा तितका योग्य वाटत नाही.' ताई मनात म्हणाल्या.

"चला, आता निघतो आम्ही. खूप छान वाटलं. सुदेशराव आता आपली ओळख झाली तेव्हा कधीही घरी या." जयवंत काका त्यांना शेकहॅण्ड करत म्हणाले.

"हो. समर यांना घरी सोडून ये." अपर्णा ताईंनी विदिशा आणि जया काकूंना हळद -कुंकू लावून आहेर दिला.

"अहो, हे आणि कशाला? आत्ता कुठे लग्नाची तारीख ठरली आहे. खरेदी व्हायची आहे. पत्रिका काढायच्या अजून बाकी आहेत. त्या नंतर केळवणं सुरू होतील. पण म्हंटल तुम्ही बोलावलं आहे, तर तुमच्याकडे आधी जाऊन येऊ. नंतरचं नंतर." जया काकू म्हणाल्या. विदिशा अपर्णा ताई आणि सुदेशरावांच्या पाया पडली.
"लग्न झालं, तरी तू आमच्या घरी यायचं आहेस." सुदेशराव तिच्या गालावर थोपटत म्हणाले.

समर तिघांना सोडायला गेला.

"अहो, एक बोलू का? आपल्या समर आणि विदिशाची जोडी अगदी छान जमते. दोघे एकमेकांना ओळखतात. ती आपल्या घरची सून झाली असती तर मला खूप आनंद झाला असता. क्षणभर वाटलं, तिने प्रसादला का म्हणून निवडलं असेल?" अपर्णा ताई आवराआवर करत म्हणाल्या. खरंतर त्या सुदेशरावांशी कमी आणि स्वतःशीच जास्त बोलत होत्या.
"विदिशा छान आहे. आपल्या समरची काळजी घेते, त्याला जपण्याचा प्रयत्न करते. खरंच तिच्या मनात त्याच्याविषयी काही असेल की तिला अजून त्याची जाणीव झाली नसेल?"

"पण आता काय उपयोग? तिचं लग्न ठरलं आहे. म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या. असतात. नसता विचार करणं सोडून दे." बोलता बोलता सुदेशराव अपर्णा ताईंना मदत करू लागले.
----------------------------------------

"हाय फ्रेंड्स, शी इज माय फिऑन्से." प्रसाद आपल्या मित्र -मैत्रिणींना विदिशाची ओळख करून देत म्हणाला.

"ओ, हाय.." त्याच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या भोवती जमा झाल्या. विदिशा त्यांच्यात मिसळून गेली. प्रसाद तिच्यावर लक्ष ठेऊन होता. मधेच हसून तिला प्रतिसाद देत होता. पण विदिशा त्याच्या नजरेने अस्वस्थ होत होती. डिनर झाल्यानंतर पुन्हा सगळे तिच्याभोवती जमा झाले.
"ए, आमच्या प्रसादला सांभाळून घे हं. थोडा चिडका आहे तो." एक मैत्रीण म्हणाली.

"थोडा नाही. खूप चिडतो तो. पण आपल्या बायकोवर चिडणार नाही हं. कारण शेवटी बायको ही बायको असते." आणखी एक मैत्रीण तिच्या हातावर टाळी देत म्हणाली. "विदिशा, आम्हाला थोडं वेडिंग सीझनबद्दल सांग ना. तिथे काम करताना मजा येत असेल ना?"

"हो. पण लग्नानंतर ती कुठे काम करणार आहे तिथे?" प्रसाद मध्येच म्हणाला.

"म्हणजे? मी काम सोडणार नाहीय." विदिशा.

"हो. तू सोडू नकोस काम. नाहीतरी घरी बसून काय करायचं? प्रसाद, थिस इज नॉट फेअर. तिला हवं ते करू दे. प्रत्येक वेळी आपलंच खरं करायचं नसतं." त्यातलीच एक मैत्रीण म्हणाली.

"असो. आता आम्ही निघतो. खूप उशीर झाला आहे." प्रसाद आणि विदिशा गाडीत बसले.

"एक लक्षात ठेव. लग्नानंतर मी काम सोडणार नाही. तुला माझं काम आवडत होतं ना? मग आता अचानक काय झालं?" विदिशा.

"आवडत होतं. आता आवडत नाही. शिवाय तुला काम करायची काही गरज नाही. तसंही मला भरपूर पगार आहे. त्यात आपल्या सर्वांचं भागतं."

"ते ठीक आहे. पण माझं काम, माझं पॅशन आहे. माझी ओळख आहे. ती मी सोडू शकत नाही." विदिशा हट्टाने म्हणाली. बोलत बोलत दोघे घराजवळ आले.

"तू काहीही म्हणालीस तरी तू लग्नानंतर काम करायचं नाहीस आणि करायचं झालं तर माझ्या कंपनीत काम कर म्हणजे आपण दोघे एकत्र येऊ - जाऊ शकतो." प्रसाद.

"हे अति होतंय प्रसाद. आता तू माझ्यावर वॉच ठेवणार आहेस का?" विदिशा चिडली.

"हवं तर तसं समज. तू त्या समर सोबत काम करायचं नाहीस." प्रसाद.

"अच्छा.. म्हणजे हा प्रोब्लेम आहे तर! किती चीप विचार आहेत तुझे? मी तुला होकार दिला याचा मला आता पश्र्चाताप होतोय."

"पण आता दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे. आपलं लग्न तर होणारच."

"आणि मी जर नकार दिला तर?"

"तू तसं करू शकत नाहीस. कारण त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत." प्रसादने विदिशाच्या जवळ येऊन तिचा हात पकडला. "तू मला नकार
दिलास ना, तर तुझी हालत फार वाईट होईल." प्रसाद तिचा हात पिरगळत म्हणाला.

"हे काय करतोयस तू? सोड मला." विदिशा कळवळून म्हणाली.

"सोडतो. पण परत लग्न मोडायची भाषा करायची नाही. कळलं? हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे." प्रसाद मागे वळला, तशी त्याच्या एक कानाखाली बसली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो एकदम गडबडून गेला.

"समर, तू इथे काय करतो आहेस?" विदिशा आपला हात चोळत म्हणाली.

"काकांनी बोलावलं होत म्हणून आलो होतो. पण इथे काही वेगळच पाहायला मिळालं आणि तू जर तिला काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे." समर पुढे होत म्हणाला.

"आला हिरो. हिरोइनला वाचवायला." समर!
तू काय करणार आहेस रे? आणखी मारशील मला? मी घाबरत नाही जा. काय करायचं ते कर. विदिशा आता माझी होणारी बायको आहे हे तूच लक्षात ठेव." प्रसाद तिच्या जवळ आला.
"मी तिचा हात प्रेमाने जवळ घेईल नाहीतर.." प्रसादने तिचा हात पुन्हा थोडासा पिरगळला.

"प्रसाद, सोड तिला." समरच्या मजबूत हातांचा विळखा विदिशाच्या भोवती पडला. विदिशा आपला हात प्रसादच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात हा सगळा गोंधळ ऐकून जयवंत काका तिथे आले.

"हे काय चाललं आहे? प्रसाद, तिचा हात सोड." काका कितीतरी मोठ्यांदा ओरडले.
"काका, या समरने माझ्यावर हात उचलला." प्रसाद लहान मुलासारखी तक्रार करत म्हणाला.

"समर? हे काय चाललंय मला कळेल?" काका विदिशाला आपल्याजवळ ओढत म्हणाले.

"विचारा तुमच्या होणाऱ्या जावयाला. विदिशाला मारहाण करत होता.." समर.

"काय? प्रसाद, हे काय ऐकतोय मी? हे असं करायचं कारणच काय?"

"बाबा, हे दोघं खोटं बोलत आहेत. तुम्ही सांगा, मी असं का करेन?" प्रसाद चेहऱ्यावर साळसूदपणाचा आव आणत म्हणाला.

"बाबा, मी अजून काहीच बोलले नाहीय. पण समर जे म्हणतोय ते खरं आहे." विदिशाने पुढे येत प्रसादच्या एक कानाखाली मारली. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी तू माझ्यावर जी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास त्यासाठी एक आणि आत्ता जो प्रकार केलास त्यासाठी ही." विदिशाने प्रसादला आणखी एक लागावली.

"प्रसाद, हे काय चाललंय? तू असं काही करशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. जा निघ इथून आणि उद्या तुझ्या आई -वडिलांना इथे पाठव. तुझ्याशी बोलण्याऐवजी मी त्यांच्याशी बोलेन." काका त्याच्या अंगावर ओरडत म्हणाले.

"थँक्स समर. मला वाटतं आता तूही घरी जा. आपण उद्या बोलू. प्रसादचे आई-वडील आले की मी तुला फोन करेन." काका विदिशाला घेऊन आत आले. आत येताच विदिशाचा बांध फुटला. ती जया काकूंच्या गळ्यात पडून रडू लागली. जयवंत काकांनी आपल्या बायकोच्या कानावर कशीबशी ही गोष्ट घातली. काकूंना विश्वासच बसत नव्हता, प्रसाद असं काही करू शकतो!

"विदि, तू काहीच कशी बोलली नाहीस? बाळा, निदान आईला तरी या गोष्टी सांगायच्या. उद्या लग्न झाल्यानंतर असं काही घडलं असतं तर? काय करू शकलो असतो आपण?" काका हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होते.

"बाबा, मला वाटलं मीच प्रसादला समजून घेण्यासाठी कमी पडते आहे. नंतर वाटलं तो सुधारेल. माझ्याशी नीट वागायला लागेल. पण दिवसेंदिवस त्याचं वागणं विचित्र बनलं. मी त्याला टाळायचा खूप प्रयत्न केला. लग्न मोडेल म्हणून त्याला दमही दिला. पण आज मात्र त्याने आपली हद्द पार केली. आई, मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीय गं. मला भीती वाटते त्याची."

"हे बघ, असा लगेच कुठलाही निर्णय घेऊ नकोस. शेवटी पुरुष आहे तो. राग आला असेल त्याला." काकू तिला समजावत म्हणाल्या.

"जया, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे सारं. मलाही राग येतो म्हणून मी इतक्या वर्षात काही तुझ्यावर हात उचललेला नाही. तू हे असं समजावतेस तिला? मला हे अजिबात पटलेलं नाही आणि लग्न ठरलं म्हणून स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा हक्क कुठल्याच पुरुषाला मिळत नाही. आत्ताच्या आत्ता त्या बेलवलकर बाईंना फोन लाव आणि प्रसादाच्या वडिलांना घेऊन ठीक दहा वाजता उद्या येथे यायला सांग." काका.

"अहो, तुम्ही आपल्या लेकीचं लग्न मोडणार आहात की काय?" काकू घाबरून म्हणाल्या.

"आई, मला हे लग्न करायचं नाही. मी त्याच्या सहवासात असताना जे सहन केलं आहे, ते केवळ मलाच माहिती आहे. मी अशा माणसाशी आयुष्यभर संसार करू शकत नाही. मग उद्या लोकांनी मला दोषी ठरवलं तरी चालेल." विदिशा.

"काय बोलतेस हे? लग्न म्हणजे काही खेळ नव्हे. मांडलेला डाव लगेच मोडून रिकामं झालं! आपण प्रसादला समजावून सांगू. आणखी एक संधी देऊ." काकू.

"मला माझी मुलगी अशा घरात मुळीच द्यायची नाही. जो पुरुष लग्नाआधीच स्त्रीवर अत्याचार करतो, तो लग्नानंतर काय करेल? याचे उत्तर आहे तुझ्याकडे? आणि समजा, नंतर असा प्रसंग आलाच तर तेव्हा आपण काहीही करू शकणार नाही." काका.

"अहो, पण बेलवलकर बाई खूप चांगल्या आहेत. त्या सांगतील ना त्यांच्या मुलाला." काकू आपल्या म्हणण्यावर ठाम होत्या.

"जर असं झालं, तर ती जबाबदारी फक्त तुमची असेल. पण माझ्या मुलीच्या अंगाला कोणी हात लावला तर मी त्याला सोडणार नाही."
काका रागारागाने आपल्या खोलीत निघून गेले.

"विदि, जरा धीरांन घे बाळा. सगळं ठीक होईल. जुळलेले बंध मोडायला एक क्षणही पुरेसा असतो. पण नाती जोडायला खूप वेळ द्यावा लागतो." काकूंना काही समजत नव्हतं. साखरपुडा नुकताच पार पडला होता. लग्नाची तयारी सुरू होती आणि मधेच असं विघ्न आलं. प्रसाद असं काही करू शकतो, त्यांच्या कल्पनेच्या चौकटीत न बसणारं होतं. हे मात्र खरं.
'आजकाल मुलांच्या मनात काय येईल? हे सांगता येत नाही. लेकीचं ठरलेलं लग्न मोडलं तर उद्या लोक काय म्हणतील? आपल्या मनाचे अंदाज बांधतील. नको नको ते बोलतील. शिवाय पुन्हा तिचं लग्न ठरवताना अडचण येईल ती वेगळीच.' थरथरत्या हातांनी त्यांनी बेलवलकर बाईंना फोन लावला.

क्रमशः




🎭 Series Post

View all