द वेडिंग सीझन -भाग 8

Love Story
"आमचा प्रसाद असं काही करुच शकत नाही." बेलवलकर बाई सारखं तेच म्हणत होत्या.

"जसा तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास आहे. तसा आम्हाला आमच्या मुलीवर विश्वास आहे आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे." जयवंत काका म्हणाले.

"झालं असेल काहीतरी दोघांत. त्यात काय इतकं?"

"मीही तेच म्हणते. पुरुष म्हंटल्यावर थोडा जास्त राग येणारच." जया काकू मधेच म्हणाल्या.

"पण त्याने जबरदस्ती केली..हे बघा वहिनी, मला हे असले प्रकार पटत नाहीत. मी स्वतः कधी या दोघींवर विनाकारण ओरडलो नाही आणि लग्नानंतर नोकरी करायची की नाही याचा निर्णय विदिशाला घेऊ दे. जर प्रसादला तिने नोकरी केलेली चालणार नव्हती तर त्याने हिला होकार द्यायला नको होता." काका.

"आता मी स्पष्टच बोलते, काही केल्या आमच्या प्रसादचं लग्न ठरत नव्हतं. त्यासाठी किती उपवास, नवस झाले! तोवर विदिशाचं स्थळ आलं. प्रसादला विदिशा मनापासून आवडली, हेही तितकंच खरं आहे. आता विदिशाला तो पसंत असल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. तिचा होकार आला आणि एकदाचं गंगेत घोडं न्हालं. याआधी
आलेली स्थळं बाहेरुन चौकशी करून यायची आणि त्यांचे नकार यायचे. पण आमच्या घरात तर सगळं व्यवस्थित होतं. त्या लोकांना बाहेरून काय समजायचं देवालाच ठाऊक." बेलवलकर बाई.

"थोडक्यात तुम्ही आम्हाला फसवलंत." जया काकू उसळून म्हणाल्या. ही गोष्ट तुम्ही आधी सांगितली असती तर फार बरं झालं असतं. माझी बहिण मध्यस्थी असल्याने आम्ही जास्त चौकशी केली नाही. तुम्ही लाख चांगल्या असाल, पण तुमचा मुलगा बाहेर कसा वागतो? हे पालक या नात्याने तुम्हाला माहिती असायला हवे होते."

"मुलं बाहेर काय करतात? याकडे कोणते पालक लक्ष ठेवतात? तुम्ही तरी विदिशावर किती लक्ष ठेवता?" बेलवलकर बाईही चांगल्याच चिडल्या.

"आमचं लक्ष असतं आणि आम्हा तिघांत नेमका संवादही आहे. मीही आता स्पष्टच बोलते, आम्हाला तुमच्या घरी आमची मुलगी द्यायची नाही." जया काकू म्हणाल्या.

"द्यायची नाही म्हणजे? लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ आहे की काय? मांडला आणि मोडला? हे लग्न मोडून तुम्ही मोठी चूक करता आहात. उद्या विदिशाला पुढे जाऊन असंख्य अडचणी येतील. लोकं नाही ते बोलतील. ते कसं सहन करणार आहात?" बेलवलकर बाई.

"ते आमचं आम्ही बघून घेऊ. वहिनी, पुढे जाऊन संसार त्या दोघांना करायचा आहे. आपण काय आज आहोत नि उद्या नाही. एकवेळ घरच्या मंडळींशी सुनेचं जमलं नाहीतरी चालतं. पण नवरा तरी तिची बाजू ऐकून घेणारा हवा." जया काकू नरमाईने म्हणाल्या.
"एकवेळ तुम्ही आमच्या लेकीच्या बाजूने उभ्या राहाल. पण एकांतात तो हिच्याशी नीट वागेल हे सांगू शकाल? आयुष्यभर आम्हाला लेकीची काळजी वाटत राहिलं. मला माफ करा. पण हे लग्न होऊ शकत नाही."
हे ऐकून बेलवलकर बाई चिडून निघून गेल्या.

काही वेळाने विदिशाची मावशी घरी आली. साखरपुड्यानंतर तिला प्रसादच्या बाबतीत काही गोष्टी कळाल्या होत्या. तिने चौकशी केली असता दुर्दैवाने त्या खऱ्या निघाल्या. "जया, मी लोकांकडे चौकशी केली ते लोक म्हणाले, कसं काय तुम्ही या मुलाशी विदिशाचं लग्न ठरवलंत? आपण आधी पूर्ण चौकशी करायला हवी होती. माझंही चुकलंच गं. आपल्या पोरीने इतकी लग्नं जमवली, ती पार पाडली आणि आता तिचंच लग्न मोडलं." मावशीला फार वाईट वाटत होतं. पण झाल्या गोष्टीला इलाज नव्हता.

दुसऱ्या दिवशी प्रसादने येऊन खूप दंगा केला. लग्न मोडलं म्हणून तो तिच्या अंगावर धावून गेला. जयवंत काकांच्या मित्रांनी मधे पडत त्याला चांगलाच दम दिला.

जया काकूंना आजूबाजूच्या बायका बोलत होत्या. अडून अडून नक्की काय झालं? हे विचारण्याचा प्रयत्न करत होत्या. या अशा परिस्थिती बाहेरच्या लोकांशी 'डील' करणं फारच अवघड असतं. हे सगळ्यांनाच कळून चुकलं होतं.

मधेच अपर्णाताई आणि सुदेशराव येऊन भेटून गेले. त्यांनी जया काकू आणि विदिशाला आधार देण्याचा प्रयत्न केला.

लग्न मोडल्यानंतर विदिशा काही दिवस टेन्शन मध्ये होती. एखाद्या मुलीसाठी आपलं लग्न मोडणं ही सुखदायक गोष्ट नक्कीच नसते. नाही म्हंटल तरी, विदिशाचं मन काही काळ प्रसादमध्ये गुंतला होतं. तिने त्याच्यासोबत लग्नाची स्वप्नं पाहिली होती. मात्र त्याचं वागणं बदलत गेलं, तरीही विदिशाने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिने ज्या गोष्टी अनुभवल्या, सहन केल्या त्या तिलाच माहिती होत्या.
आता तिने ऑफिसमध्ये जाणं खूप कमी केलं होतं आणि ऑफिसमध्ये गेली तर काही काम करत नव्हती.
'साखरपुड्याच्या आठवणी कशी विसरू मी? गुंतलेल्या मनाला असं सहजासहजी सोडवता येत नाही.' ती तासनतास विचार करत बसून राहत होती.

समर, मिंटी, जयेश, विरू तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होते. तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिचं मन सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माणसाच्या आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते, त्यावेळेस त्याला काहीच नकोस वाटतं. स्वतःच्या विचारात गुंतून राहणं त्याला फार आवडतं. तसंच काहीसं विदिशाच्या बाबतीत झालं होतं.

या मधल्या काळात मिंटी, विरू, रोशन आणि जयेशने मिळून ऑफिस सांभाळलं. विदिशा टेन्शनमध्ये असल्याने समरचे कामात म्हणावे तसे लक्ष नव्हते. विदिशाने ऑफिसमध्ये येणे हे गरजेचं होतं. तिच्या इतका योग्य, क्रिएटिव्ह आणि चांगला पार्टनर समरला मिळू शकणार नव्हता. ऑफिसला, ऑफिसमधल्या सवंगड्यांना तिची गरज होती. समर तिला ऑफिसमध्ये येण्यासाठी रोज फोन करत होता. कधी तिला न्यायला घरी येत होता. पण विदिशा मानसिकरित्या थोडी खचली होती. तिला आधाराची गरज होती. तिथं वागणं पाहून जया काकू आणि जयवंत काकांना टेन्शन आलं होतं.
----------------------------------------

बघता बघता थंडीचे दिवस आले. विदिशा आता बऱ्यापैकी सावरली होती. म्हणतात ना, दुःखावर काळ हेच औषध असतं. हळूहळू ती ऑफिसमध्ये येऊ लागली. आधीसारख्या मोठ्या मीटिंग हँडल करू लागली.

लवकरच एका मोठ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी 'द वेडिंग सीझनकडे' डेस्टिनेशन वेडिंगसाठी मोठी रक्कम भरून बुकिंग कन्फर्म केलं. त्यानुसार तयारी सुरू झाली. डेस्टिनेशन वेडिंगसाठी अर्थातच शहराबाहेरचं निसर्गरम्य असं स्थळ पसंत करण्यात आलं होतं. त्यानुसार हॉटेलच्या रूम्स बुक झाल्या. जेवणाचा मेनू ठरला. फोटोग्राफरची आणि व्हिडिओग्राफरची डेट फिक्स झाली.

"डेस्टिनेशन वेडिंगची ही आपली पहिलीच ऑर्डर आहे. सो, हा लग्न सोहळा ग्लॅमरस व्हायला हवा. यानंतर आपल्या टीमकडे डेस्टिनेशन वेडिंगच्या आणखी इन्क्वायरी व्हायला हव्यात." समरच्या बोलण्याने सर्वांचा उत्साह वाढला होता. ऑफिसमध्ये नुसती कामाची धावपळ सुरू होती.

समर धावपळ करणाऱ्या विदिशाला न्याहाळत होता. विदिशा तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला कसंतरीच झालं. पण तिच्या कामात आधीसारखा उत्साह जाणवत होता. हे पाहून समरला बरं वाटलं. "विदि, इकडे ये."

"काय काम आहे? गडबडीच्यावेळी बोलवत जाऊ नकोस आणि तू नुसता उभा का आहेस? किती कामं पडली आहेत!" बोलता बोलता विदिशा त्याच्याजवळ आली.

"मी आधीच्या विदिला खूप छान ओळखायचो. ती खूप सुंदर दिसायची. मोकळेपणाने हसायची. कोणतीही अडचण असेल तर ती चुटकीसारखी सोडवायची. माझ्याशी भांडायची, हक्काने माझ्यावर चिडायची." समर हसत म्हणाला.

"मग? कुठे गेली ती?" विदिशाची नजर त्याच्यावर खिळली होती.

"सध्या ती हरवली आहे. मी तिलाच शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. बघ, तुला कुठे सापडली तर!"

"समर, मी कुठेही गेलेली नाहीय. इथेच तर आहे. तुझ्यासमोर!" विदिशाने मोकळेपणाने हसण्याचा प्रयत्न केला.

"गेल्या कित्येक महिन्यात आपल्यात भांडण झालं नाहीय. तू माझ्यावर रागावली नाहीस, रुसली नाहीस. मी ते सगळं मिस करतोय विदि. प्लीज परत ये. मला तुझी गरज आहे." समर तिच्यावरची आपली नजर न हटवता म्हणाला.
"तू..लग्न करशील माझ्याशी?" समर तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"काय? लग्न आणि तुझ्याशी? काहीतरी बोलू नकोस. आता खरंच भांडण होईल हं आपलं. चल, कामाला लाग. अजून खूप कामं बाकी आहेत." तिने प्रसादने घातलेली अंगठी काढून समरच्या हातात दिली. "ही नकोशी आठवण तात्पुरती तुझ्याकडे ठेव. हातात खुपते आहे ती. नंतर बघू याचं काय करायचं ते आणि हो.. हे ऑड कॉम्बिनेशन परत तुझ्या अंगावर दिसता कामा नये." विदिशा तिथून निघून गेली. तिला असं बोलताना पाहून समरला बरं वाटलं.

"सर, जमतंय तसं. फक्त आणखी प्रयत्न करत राहा." समरच्या मागे उभा असलेला विरू अचानक पुढे येत म्हणाला.

"ए, तुझं काय मधेच? जा. आपलं काम कर. दुसऱ्याचं बोलणं असं चोरून ऐकू नये." समरला खरंतर हसू येत होतं. पण त्याने लपवण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही जे बोललात ते आम्हीही ऐकलंय. हवं तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला मदत करू शकतो." जयेश, रोशन समरच्या बाजूला येऊन उभे राहिले.

"नक्की मदत कराल?" समर आळीपाळीने तिघांकडे पाहत म्हणाला.

"हो सर."

"मग जा आणि या लग्नाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही."
तसे तिघेही तोंड पाडून निघून गेले.
--------------------------------------

सगळी तयारी पूर्ण होत आली होती आणि अचानक त्या राजकीय नेत्याची मुलगी विरोधी पार्टीच्या नेत्याच्या मुलासोबत पळून गेल्याची बातमी आली. अर्थातच लग्न कॅन्सल झालं. वर्तक साहेबांनी समरकडे आपले पैसे परत मागितले नाहीत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू झाली. मात्र या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी रागारागाने उभारलेल्या शाही सेटची नासधूस केली.
वेडिंग सीझनचे मोठे नुकसान झाले.

"वर्तक साहेब, नुकसान भरपाई तुम्ही द्यायला हवी. तुम्ही दिलेला ॲडव्हान्स आम्ही खर्च केला. शिवाय आमचे पैसेही त्यात गुंतवले होते. तुमच्या कार्यकर्त्यांनी सेटचे नुकसान केले. या घटनेची जबाबदारी घेऊन तुम्ही निदान आम्ही गुंतवलेले पैसे तरी द्या." समर त्या राजकीय नेत्याच्या कार्यालयात बसला होता.

"समर, हे असं काही होईल याची कल्पना असती तर मी तुला आश्वासन दिलंच नसतं. मलाही मोठा धक्का बसला आहे. त्यात आमच्या माणसांनी राडा करून ठेवला. ती विरोधी पार्टी स्ट्रॉंग आहे. सगळचं अवघड झालंय. माझे हात दगडाखाली सापडलेत."

"तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात. पण आम्ही सामान्य माणसं! तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सेटचं नुकसान केलं नसतं, तर गोष्ट वेगळी होती. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या घटनेची जबाबदारी घ्यायला हवी असे मला वाटते." समर आपल्या रागावर ताबा ठेवत म्हणाला.

"ठीक आहे. आत्ता नाही. पण काही दिवसांनी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेन." वर्तक साहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले.

"म्हणजे मी इथे वरचेवर फेऱ्या माराव्यात असे तुम्हाला वाटते तर. तेही खरेच आहे म्हणा. लोकप्रतिनिधींचं कामचं असतं ते. केवळ आश्वासन द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत.
सर, कृपा करून मला महिन्याभराच्या आत माझी नुकसान भरपाई द्या." समर चिडून कार्यालयातून बाहेर आला.

"साहेब, त्या नुकसान भरपाईसाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल." वर्तक साहेबांचा पी. ए. त्याच्या मागे मागे येत म्हणाला.

"खड्ड्यात घाला तो अर्ज. मला एका महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळायला हवी. बस्." पी. ए. नी पुढे केलेला कागद समरने फेकून दिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all