द वेडिंग सीझन -भाग 9

Love Story

"समर, आपल्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळायला हवी. त्याशिवाय सेट उभा करणं शक्य नाही. खूप सारं सामान नवीन घ्यायला हवं. बाकी सामानाची डागडुजी करायला हवी." विदिशा सामान चेक करत होती. बाकी सगळे तिच्या भोवती बसले होते. या घटनेमुळे विदिशाला प्रसादच्या विचारातून बाहेर यायला मदत झाली.
आता वेडिंग सीझनला यातून बाहेर कसं काढायचं? याचा विचार सर्वांच्या मनात सुरू होता. प्रत्येक जण वेगवगळ्या कल्पना मांडत होता. पैसे हातात आल्याशिवाय सामान घेता येत नव्हतं, ना पुढचे प्लॅन तयार करता येत होते. इतकं मोठं नुकसान पहिल्यांदाच झालं होतं.

समर त्या कार्यालयात सारख्या फेऱ्या मारत होता. पण वर्तक साहेब सतत दौऱ्यावर असल्याने त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती.
"विदिशा, या नुकसानीमुळे आपण इतर सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या आहेत. दुसऱ्या कोणत्याही ऑर्डर आपण सध्या घेऊ शकत नाही आहोत." समरला आता टेन्शन येऊ लागलं.

गेले महिनाभर द वेडिंग सीझनचं ऑफिस नुसतंच उघडतं होतं आणि कुठल्याही कामाविना बंद होत होतं.
आणखी एक प्रयत्न म्हणून समरने वर्तक साहेबांच्या पी. ए. ची भेट घेतली.
"मागे मी म्हणालो होतो ना, नुकसान भरपाईसाठी अर्ज करा म्हणून. तेव्हा तुम्ही अर्ज केला असता तर आत्तापर्यंत तुमचं काम झालं असतं." वर्तक साहेबांचा पी. ए. चेहऱ्यावरची एक रेषही न हलवता म्हणाला.

"जर मला पैसे मिळाले नाहीत तर माझं ऑफिस बंद होईल. अडीच -तीन वर्षांची मेहनत धुळीला मिळेल आणि कमावलेलं नाव सहज विरून जाईल. द्या आत्ता अर्ज करतो." समर काकूळतीला येत म्हणाला.

"समर, एक मिनिट थांब. सर, मला एक सांगा आम्ही आता अर्ज केला, तर मला किती दिवसात पैसे परत मिळतील?" विदिशा मधेच म्हणाली.

"ते मी सांगू शकत नाही. आधी तुम्ही अर्ज तरी करा. मग बघू." पी. ए.

"सांगू शकत नाही म्हणजे? त्याला काहीतरी ठराविक वेळ असेल ना? वर्तक साहेब कधी येणार आहेत ते सांगा. ते येईपर्यंत आम्ही थांबतो." विदिशा ठामपणे म्हणाली. तिने समरला अशा विचित्र मनस्थितीत आजवर कधीच पाहिले नव्हते. "समर, हवं तर तू घरी जा. साहेब येईपर्यंत मी इथे थांबेन." समर विदिशा सोबत तिथेच थांबला. पण संध्याकाळ होत आली तरी वर्तक साहेबांचा पत्ता नव्हता.

"तुम्ही अजून इथेच आहात? चांगल्या घरचे दिसता. मेहनत करून कमवा..जा. पुन्हा इथे दिसलात तर याद राखा." अखेर वर्तक साहेबांच्या पी. ए. ने दोघांना अक्षरशः हाकलून काढले.
------------------------------------------

"समर, काहीतरी मार्ग आणि निघेल. तू काळजी करू नकोस." विदिशा त्याला समजावत म्हणाली.

"सर, गेले महिनाभर आपल्या हाताला काम नाही. आम्हीही गावाकडे जाईन म्हणतो. तिथेच काहीतरी काम शोधायचं आणि आता तिथेच राहायचं." जयेश पुढे होत म्हणाला.

"होय. सर, जयेश म्हणतो ते खरं आहे. तुम्ही दिलेल्या पगारावर आमचं घर चालत होतं. आता हाताला काम नाही तर कसं मॅनेज करायचं? मीही उद्याच निघतो आहे." रोशन.

"मी पण निघतोय. आजपर्यंत तुम्ही खूप काही दिलंत सर. मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही जातोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला सोडून जातोय. आमचं हातावरचं पोट. आमच्या कमाईवर घर चालतं. आता कमाई नाही तर घर कसं चालणार? त्यासाठी दुसरं काम तर शोधावं लागेल." विरू समरला मिठी मारत म्हणाला.

"जा. सगळे जा. मला कोणाची गरज नाही. मी एकटा समर्थ आहे हे सगळं सांभाळायला. मिंटी, तू का अशी बघत बसली आहेस? तुलाही जायचं असेल ना? जा. यांच्यासोबत बाहेर पड. अशा स्थितीत जवळची माणसं साथ सोडून जातातच..मी तरी काय करू? सारं अवघड होऊन बसलं आहे."

"सर, मी कुठेही जाणार नाहीय. मी इथेच आहे. कायम तुमच्यासोबत. हे जयेश, विरू आणि रोशन तुम्हाला कधी ओळखू शकले नाहीत. कदाचित ते इथे मन लावून काम करत नसावेत म्हणून ही साथ सोडून जाण्याची भाषा करतात. पण जाऊ दे त्यांना. जाणाऱ्याला अडवू नये म्हणतात." मिंटी समरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

हे सारं लांबून पाहणारी विदिशा आपल्या अश्रूंना अडवू शकली नाही. समर सर्वांच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. जयेश, रोशन आणि विरू काही न बोलता निघून गेले आणि पाठोपाठ मिंटी बाहेर आली.

"समर, ते तरी काय करतील? परिस्थिती पुढे आपण सारे असहाय्य आहोत."

"विदि, तू देखील मला सोडून चाललीस ना? जा..पण पुन्हा येऊ नकोस." समर तिच्याकडे लक्ष न देता म्हणाला.

"नाही समर. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. कायम तुझ्यासोबत असेन मी. आपण आनंदाचे क्षण जसे सेलिब्रेट केले, तसे दुःखाचे क्षणही एकत्र साजरे करू." विदिशा समरच्या जवळ आली. तसा समर तिच्या मिठीत शिरला.
"मी काय करू सांग? झाल्या प्रकारात चूक कोणाचीच नव्हती. वर्तक साहेबांच्या मुलीने चूक केली आणि आपल्याला भोगावं लागलं. आता तू जर मला सोडून गेलीस तर मी जगू शकणार नाही विदि. सगळं संपल्यासारखं वाटतंय..अगदी हरल्यासारखं."

"हे असं काही बोलू नको समर. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास, मला धीर दिलास. संकटात माझी मदत केलीस आणि मी अशी तुझी साथ सोडून जाईन?" विदिशा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

"विदि, मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची, या ऑफिसची कल्पनाच करू शकत नाही. तू आहेस तर मी आहे. तू माझ्याशी हक्काने भांडतेस, माझ्यावर रागवतेस, चिडतेस हे मला हवं आहे. अगदी आयुष्यभरासाठी." समर तिच्या मिठीतून बाजूला झाला.

"म्हणजे?" विदिशा.

"काही नाही. तू मला कधीच सोडून जाऊ नको. इतकंच मला म्हणायचं होतं." समर.

"समर, इकडे बघ आणि तुझ्या मनात नक्की काय आहे? ते नीट सांग."

"जाऊ दे. विदि. हा विषय सोडून दे. खूप उशीर झाला आहे. चल, आता घरी जाऊ." समर आवरा आवर करत म्हणाला.

"तुझ्या मनात काय आहे? हे कळल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही."

"असा हट्ट करू नको. आता निघू आपण. हवं तर उद्या बोलू." समर केबिनचे दार उघडत म्हणाला.

"तुला मी आवडते ना?" विदिशाने पुढे येत पुन्हा दार बंद केले.

"तसं काही..नाहीय." समर अडखळत म्हणाला.

"मग कसं? तुला माझ्याशी लग्न करायचं आहे? मागे तू म्हणाला होतास." विदिशा दरवाजाला टेकून उभी राहिली.

"ते मी सहज म्हणालो होतो. चेष्टा करत होतो." समर तिची नजर चोरत म्हणाला.

"अच्छा. मग तुझ्या डोळ्यांत मला जे दिसतं ते काय आहे? आत्ता तुझ्या मिठीत जी भावना जाणवली, ती कोणती आहे समर? तुला प्रसाद कधीच आवडला नव्हता. आमच्या नात्याचा त्रास होऊ नये म्हणून तू त्याला ऑफिसमधे यायला मनाई केली होतीस. हो ना?
आमच्या साखरपुड्यात फक्त त्याचं अभिनंदन केलंस! पण मला विश न करता तसाच निघून गेला होतास. त्याने मला त्रास दिला तेव्हा तू त्याला कानाखाली ठेवून दिलीस. का समर?"

तो काही न बोलता तसाच उभा राहिला.

"या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. मला ती फक्त तुझ्या तोंडून ऐकायची आहेत." विदिशा त्याच्या जवळ येत म्हणाली.

"हो. मला तू आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. बस्? चल आता."

"असं प्रपोज करणार आहेस मला? मला वाटलं, एखाद्या फिल्ममधल्या हिरोसारखं गुडघ्यावर बसून प्रपोज करशील. आजूबाजूला मस्त रोमँटिक वातावरण असेल, आकाशातल्या चंद्र -चांदण्या आपल्या ठरणाऱ्या लग्नाच्या साक्षीदार असतील."
विदिशा आपल्या गुडघ्यावर खाली बसली.
"समर, खरंच लग्न करशील माझ्याशी?"

हे असं काही होईल, असं समरला स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं. ती काही वेळ तसाच स्तब्ध उभा राहिला.

"बोल ना..लग्न करशील माझ्याशी?" विदिशा त्याचा हात पकडून म्हणाली.

समर काही बोलणार इतक्यात दार वाजलं. तसा तो आपल्या खुर्चीत जाऊन बसला आणि विदिशा दार उघडायला पुढे आली.

"अरे, बाबा आणि काका तुम्ही इथे!" जयवंत काका आणि सुदेशराव आत आले.

"कामंच तसं होतं म्हणून आलो. बरं, बसा दोघेही थोडं बोलायचं होतं." सुदेशराव समर समोर बसले.
"द वेडिंग सीझन सध्या तोट्यात आहे..तर आम्ही दोघांनी तुम्हाला मदत म्हणून थोडी रक्कम द्यायचं ठरवलं आहे. आपल्या सामानाचं खूप नुकसान झालं आहे. ते तुम्ही या पैशातून भरून काढा." सुदेशरावांनी थेट मुद्याला हात घातला.

"पण बाबा.."

"समर, गेली दोन अडीच वर्षे आम्ही सगळ्यांनीच तुमची मेहनत पाहिली आहे. तुला नोकरीचा आग्रह धरणाऱ्या या तुझ्या बापाने हा बिझनेस उभा करण्यासाठी तुझे कष्ट अनुभवले आहेत. या सगळ्यात विदिशाने तुला साथ दिली. ती भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. आम्ही इतकी वर्षे नोकरी केली. यातून जे सेव्हींग केलं ते आता उपयोगी येत असेल तर त्या पैशांचा विनियोग झाला असं म्हणता येईल."

"हो. विदू, हे चेक घ्या आणि गो अ हेड." जयवंत काका सुदेशरावांकडे पाहत म्हणाले.
"इतकंच अवघडल्यासारखं होत असेल तर जमतील तसे सावकाश पैसे परत करा. अडचणीच्या वेळी मुलाच्या पाठीशी पालकांनी उभं राहायचं नाही तर कोणी उभं राहायचं?"

चेक घेण्यासाठी विदिशा आणि समर दोघेही एकदम पुढे आले.

"थॅन्क्स काका." समर इतकंच म्हणाला.

"अरे, थॅन्क्स म्हणण्याइतका परका झालास की काय?" जयवंत काका त्याचा कान पकडून म्हणाले.

काही वेळाने जयवंत काका विदिशाबरोबर निघून गेले. समर बराच वेळ पुढचे प्लॅन तयार करत ऑफिसमध्ये बसून राहिला.
------------------------------------

"हाय, वेटींग आउट साईड."रात्री उशीरा विदिशाच्या मोबाईलवर मेसेज आला. तिने खिडकीचे पडदे बाजूला करून डोकावून पाहिलं.

समर गेट जवळ उभा होता. त्याला पाहून विदिशाने येऊन पट्कन दार उघडलं.

"आत्ता या वेळी इथे काय करतो आहेस!"

"मगाशी तू प्रश्न विचारला होतास, त्याचं उत्तर द्यायला आलोय." समर इकडे तिकडे पाहत म्हणाला.

"ही वेळ झाली का यायची? ते उद्याही देऊ शकला असतास तू."

"शु..चूप. काहीही बोलू नको." समरने आपल्या खिशातून एक छानशी अंगठी बाहेर काढली आणि तिच्या बोटात घातली.
"आता तुला कळलं असेलच, तुझ्या प्रश्नाचं उत्तर 'हो' आहे ते." समर तिच्या कानाशी कुजबुज करत म्हणाला. "विदि, मला आयुष्यभर तुझी सोबत हवी आहे."

"ही अंगठी.." विदिशाला काय बोलावं हेच कळेना.

"आठवतंय? प्रसादने तुझ्या बोटात घातलेली अंगठी तू माझ्याकडे ठेवायला दिली होतीस. तिच्या मापाने ही अंगठी घेऊन आलो मी. काळजी करू नकोस, प्युअर सोन्याची नाहीय. आणखी एक प्रॉमिस, तुझा तो भूतकाळ आपल्या नात्याआड कधीही येणार नाही."
हे ऐकून विदिशाच्या ओठांवर हसू उमटलं.
"समर, आय लाईक यू व्हेरी मच. मला तुझ्यासोबत असताना खूप छान वाटतं. खूप सिक्युअर फील होतं आणि मला सांगता न येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू सांगेन कधीतरी." विदिशाने समरच्या गालावर हलकेच किस केलं.

"आता ही जबरदस्ती नाहीय का? पण हे मी आयुष्यभर जपून ठेवेन." समर आपल्या गालावर हात ठेवत म्हणाला.

"चल, जा आता. बाकी उद्या बोलू आणि हो, तुझ्या आणि माझ्या आई - बाबांना हे लवकरात लवकर सांगायला हवं." विदिशा त्याला ढकलत म्हणाली.

"जातोय मी. पण.."

"पण वगैरे काही नाही समर, खूप उशीर झालाय." विदिशाने त्याला जबरदस्तीने निरोप दिला.
ती आत आली. तिच्या चेहऱ्यावर अनेक भावना फेर धरून नाचत होत्या. आपल्याला काय होतंय? तिला समजत नव्हतं. 'आपण हेच मिस करत होतो तर इतके दिवस!'

इतक्यात तिला एका अनोळखी नंबर वरून फोन आला.

क्रमशः









 

🎭 Series Post

View all