द वेडिंग सीझन भाग अंतिम

Love Story

जया काकूंना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला.
"आई, तुम्ही दोघांनी कार्यक्रमाला नक्की यायचं आहे."
विदिशा कार्यक्रमाच्या तयारीला लागली.

समर ऑफिसमध्ये आला आणि सगळे एकदम ओरडले, "सरप्राइज." त्याची केबिन फुगे, फुलं लावून मस्त सजवली होती.
"सर, काँग्रॅच्युलेशन्स! ऑफिसच्या अकाउंटला मेल आला होता." एक- एक जण पुढे येऊन त्याचं अभिनंदन करत होता.

"हे काय? तुम्ही एकटेच आलात? मॅम कुठे आहेत?" रोशन.

"ती आज येणार नाहीय."

"असं कसं? इतकी छान बातमी आणि सेलिब्रेट करायला मॅम नाहीत? त्यांना यावंच लागेल." मिंटीने विदिशाला फोन लावला.
"मॅम तुम्हाला यावं लागेल. सरांसाठी सरप्राइज लंच ठेवले आहे. तुम्हीही इथे असणं गरजेचं आहे. तुमच्या शिवाय हे सेलिब्रेशन अपूर्ण आहे."
विदिशा आवरून काही वेळातच ऑफिसमध्ये आली.
दुपारचं जेवण हसत -खेळत पार पडलं.
समरला आता अभिनंदनाचे फोनवर फोन येऊ लागले. त्याचसोबत सगळे विदिशाचं अभिनंदन करत होते. पण आपले अभिनंदन का होते आहे? हेच तिला कळत नव्हतं.
---------------------------------

कार्यक्रमाची थीम ठरलेली होती. मेलसाठी व्हाईट शर्ट, ब्लॅक पँट आणि लेडीजसाठी रेड साडी. विदिशाने चार दिवस आधीच सगळी तयारी पूर्ण करून ठेवली होती.

समारंभाचा दिवस उजाडला. संध्याकाळी ठीक सात वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. विदिशाची दुपारपासूनच गडबड सुरू होती.
"आई, आम्हा दोघांची बसण्याची व्यवस्था वेगळी असेल. तुम्ही चौघांनी बरोबर आमच्या मागे बसायचं, म्हणजे ती फॅमिलीसाठी व्यवस्था वेगळी असते. बाकी आमच्या ऑफिसचा स्टाफ इतर ठिकाणी बसेल."

समरही तिला वेळेत आवरण्यासाठी गडबड करत होता. "विदि, मला सोहळ्याचा एकही क्षण मिस करायचा नाहीय. तू जितक्या लवकर आवरून तयार राहशील तितकं बरं होईल." समरला फोन आले की तो विदिशापासून लांब जाऊन बोलत होता.

"तू काहीतरी लपवतो आहेस का? मला सारखं तसं वाटतंय."

"नाही गं. तसं काहीच नाहीय." समर आपल्या चेहऱ्यावर शक्य तितका सिरियसनेस आणत म्हणाला.
------------------------------------

संध्याकाळी सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.

लाल रंगाच्या साडीत विदिशा खूप छान दिसत होती. केसांचा बन, त्यावर बांधलेला गजरा, कपाळावर छोटीशी टिकली, कानात घातलेले नाजूक खडे, गळ्यात छोटंस मंगळसूत्र.." खूप छान दिसतेस." समर तिच्याकडे पाहतच राहिला.

"तू सुद्धा हिरो सारखाच दिसतो आहेस समर. त्यातल्या त्यात बरं हेच की व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट हे कॉम्बिनेशन ठरवून दिलं होतं." विदिशा त्याच्या हातावर टाळी देत म्हणाली.

"शटअप..मला सेन्स नाहीय का? निदान या असल्या कार्यक्रमात तरी मी व्यवस्थित कपडे घातले असतेच." समर लटक्या रागाने म्हणाला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली.
संपूर्ण हॉल प्रेक्षकांनी गच्च भरून गेला होता.

सोहळा सुरू होईल म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर बसून घेतलं.
लाईट्सचा झगमगाट, जमिनीवर घातलेले रेड कार्पेट, ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांच्यासाठी वेगळ्या खुर्च्या आणि स्टेजवर ठेवलेली मोठी ट्रॉफी, जी या सोहळ्यात मिळणाऱ्या पुरस्काराचं प्रतिनिधित्व करत होती. हे सारं पाहून समरला एकदम आपण सेलिब्रेटी असल्याचा भास झाला.

काही वेळात प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. त्यांना पाहताच सर्वांना आश्चर्य वाटलं. वर्तक साहेबांनी स्टेजवर पाऊल टाकलं आणि त्यांच्या लोकप्रियतेची ग्वाही प्रेक्षकांच्या टाळ्यांद्वारे मिळाली.

पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. पहिलंच नाव समरचं होतं. समर स्टेजवर जातच वर्तक साहेबांनी त्याला मिठी मारली, त्याचं अभिनंदन केलं आणि भली मोठी ट्रॉफी त्याच्या हातात दिली. साहेबांनी दाखवलेल्या आपलेपणामुळे उपस्थित असणाऱ्यां सर्वांच्या भुवया उंचावल्या.

पुढचे तीन -चार पुरस्कार दिले गेले आणि अचानक विदिशाचं नाव पुकारलं गेलं. तिचा विश्र्वासच बसत नव्हता. तिच्यासाठी अनपेक्षित होतं हे सगळं! ती काही क्षण तशीच बसून राहिली.
"मिसेस विदिशा, प्लीज कम ऑन स्टेज.." पुन्हा आलेल्या आवाजासरशी समरने तिचा हात पकडून तिला स्टेजवर नेले. वर्तक साहेबांच्या हस्ते पुरस्कार घेताना तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि प्रेक्षक वर्गात बसलेल्या 'द वेडिंग सीझनच्या' स्टाफच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सर्वांनाच ऐकू येत होता.

पत्रकारांनी समर आणि विदिशाचे खूप सारे फोटो काढले. 'मिस्टर आणि मिसेस विथ यंग बिझनेमन अवॉर्ड..'ही उद्याच्या पेपरची हेडलाईन असणार होती.

समारंभ संपला आणि सारे विदिशा आणि समर भोवती गोळा झाले. अपर्णा ताईंनी विदिशाला जवळ घेतलं. जया काकू आणि जयवंत काकांच्या डोळ्यात आपल्या लेकीबद्दलचा अभिमान दाटून आला.

"हे खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. समर, तू हेच लपवत होतास की काय?" विदिशा त्याच्या जवळ जात म्हणाली.

"हम्म. जसा माझ्या अकाउंटला मेल आला, तसा तुझ्याही अकाउंटला मेल आला होता. तेव्हाच मला ही आयडिया सुचली. मग त्याच्यासोबत मी ऑफिसच्या अकाउंटचा मेलही डिलीट केला. बाकी आपल्या स्टाफला बजावून सांगितले, हे सरप्राइज तुला अजिबात कळता कामा नये." समर.

"हो ना. तुमच्यापासून हे लपवताना आमची मात्र दमछाक झाली." मिंटी मध्येच म्हणाली.

"सर, आता तरी पार्टीचं बघा." रोशन ओरडून म्हणाला.

"हो. आपण सगळे जेवायला जातोय." समर.

"समर, आम्ही चौघे निघतो. तुमची पार्टी होऊन जाऊदे. कारण तुमच्या यशाचे खरे वाटेकरी तुमचा स्टाफ आहे. जेवायला काय, आपण केव्हाही जाऊ शकतो." सुदेशराव म्हणाले.

"नको. तुमचा सर्वांचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्यच नव्हतं. बाबा, तुम्ही कुठेही जायचं नाही. आपण सगळे एकत्र जेवायला जातोय." विदिशा.

"अरे, पार्टी तो बनती है! समर आजची पार्टी माझ्यातर्फे. कोणी कुठेही जायचं नाही." वर्तक साहेब म्हणाले. तसे त्यांचे पी. ए. हॉटेल बुक करायला फोन घेऊन पुढे धावले.

"पण सर.."

"समर, प्रामाणिकपणा हा असा जगासमोर येतो. त्या दिवशी तू चेकवर खोटी अमाउंट लिहिली असतीस तर आज तू या इतक्या मोठ्या मॉब समोर माझ्या नजरेला नजर भिडवू शकला नसतास. खरं आहे ना? पण तू तसं केलं नाहीस. याचा मला अभिमान वाटतो आणि या मिळालेल्या पुरस्काराचा देखील म्हणून ही पार्टी माझ्याकडून! आणि हो, एक सांगायचं राहिलं, डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही हं. आपण आपलं काम मन लावून करायचं." वर्तक साहेबांनी समरच्या खांद्यावर हात ठेवला.

"नक्कीच सर. ही तर सुरुवात आहे. अजून खूप काही बाकी आहे." समर आणि विदिशा त्यांच्या पाया पडले. समरने आपल्या आई -बाबांची आणि सासू -सासऱ्यांची वर्तक साहेबांशी ओळख करून दिली.

"चला, हॉटेल बुक झालं आहे. सगळ्यांनी कंपल्सरी यायचं आहे."
वर्तक साहेबांच्या पाठोपाठ सगळ्यांच्या गाड्या आलिशान हॉटेलमध्ये पोहोचल्या.

हॉटेलमधलं वातावरण अतिशय सुंदर होतं. सगळीकडे चकचकीत, गुळगुळी स्वच्छ फरशा घातलेल्या होत्या. वेटर हातात डिश घेऊन, या टेबलावरून त्या टेबलावर धावत होते. जुन्या गाण्यांचं संगीत बॅकग्राऊंडला वाजत होतं. काही कपल्स डान्स करत होते, तर काही फॅमिलीज एकत्र नाचत होत्या.

"वेट, आणखी एक सरप्राईज आहे!" जयेश मधेच ओरडला. तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले.
"मिंटी और रोशनने शादी का फैसला किया है|"

"काय? वा.. मिंटी, या दिवसातल्या सुंदर सरप्राईजमधले हे एक मस्त सरप्राइज!" विदिशा तिला जवळ घेत म्हणाली.

"रोशन, हे कधी ठरलं?" समर त्याचे अभिनंदन करत म्हणाला.

"प्रपोज करून दोनच दिवस झाले. घरचे लोक मागे लागले. आता लग्नाचं वय झालं. मिंटी शिवाय चांगली मुलगी मिळाली नसती म्हणून तिलाच प्रपोज केलं." रोशन कसाबसा म्हणाला.
"आता या लग्नाची तयारी सुध्दा.. द वेडिंग सीझनकडेच असेल." सगळे एकसुरात ओरडले. तशी मिंटी गोड लाजली.

"अच्छा, जेवण येईपर्यंत थोडा डान्स तो बनता है|" समरने विदिशाच्या हाताला धरून ओढलं. गाण्याची मंद धून ऐकू येत होती.
'ये रातें, ये मौसम
नदी का किनारा
ये चंचल हवा..'
सगळे नाचण्यात गुंग झाले.

"समर, आय लव्ह.." विदिशा त्याचा डोळ्यांत पाहत हळूच म्हणाली.

"अरे, मी विसरलोच होतो. तू तुझ्या प्रेमाची कबुली दिली नव्हतीस. थेट मला लग्नासाठी विचारलं होतंस. आज मात्र मला सर्वांसमोर आत्ता जे तू म्हणालीस, ते पुन्हा एकदा ऐकायचं आहे."

"समर, नको ना." विदिशा बाजूला होत म्हणाली.

"असं कसं? मी तुझ्या घरात येऊन सर्वांसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. आता आपलं लग्न झालंय. मग काय हरकत आहे?" समर तिचे हात हातात घेत म्हणाला.

"प्लीज विदि, माझ्यासाठी? आजचा दिवस आपल्या आयुष्यातला 'द बेस्ट' दिवस आहे." समर खाली गुडघ्यावर बसत म्हणाला. आजूबाजूला छान रोमँटिक वातावरण होतं. हॉटेलच्या काचेच्या छतातून दिसणाऱ्या चंद्र -चांदण्या विदिशाचे ते तीन शब्द ऐकण्यासाठी जणू आतुर झाले होते. विदिशाने आजूबाजूला पाहिलं. सगळे या दोघांकडे पाहत होते.

"प्लीज मॅम, बोला ना." मिंटी, रोशन, जयेश सगळेच एकसुरात ओरडत होते.

"आय लव्ह यू समर." आपला चेहरा ओंजळीत लपवत ती कशीबशी म्हणाली. तिने लाजून खाली मान घातली. आपले हात पुन्हा एकदा समरच्या हातात दिले आणि गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येऊ लागले,
'ये बाहों में बाहें
ये बहकी निगाहें
लो आने लगा
जिंदगी का मजा.."

समाप्त.?







 

🎭 Series Post

View all