द वेडिंग सीझन -भाग 4

Love Story
"ऐक ना." समर विदिच्या कानापाशी वाकला.
"तो ऋषभ लग्नाला तयार झाला."

"खरं की काय?"

"अगदी खरं. मी ऑफिस बंद करत होतो. इतक्यात तो पुन्हा आला. मला वाटलं आता हा पैसे मागतो की काय? जर त्याने पैसे मागितले असते तर त्याला एक कानाखाली ठेवून देणार होतो. पण त्याच्या सुदैवाने त्याने पैसे मागितले नाहीत. उलट तो मला म्हणाला, मी सुरभीसोबत लग्न करायला तयार आहे.
तुमची आणि विदिशा मॅमची जोडी जशी छान जमते. तशीच आमचीही जमते आणि सॉरी म्हणुन त्याने मला मिठीसुद्धा मारली." समर खूप खुश होता.
"हे सगळं तुझ्यामुळे झालं. आय लव्ह यू.. सो मच." समर तिला फ्लाईंग किस देत म्हणाला.
"अगं, एक लग्न मोडण्यापासून वाचवलं आहे आपण. पार्टी तो बनती है|

"वेडा आहेस का? हे फ्लाईंग किस वगैरे तुझ्याकडे ठेव." विदीशा नाटकीपणे म्हणाली.

"ते सगळं जाऊ दे. पार्टी कधी ते सांग."

"अरे समर, तू कधी आलास? बरं, चला दोघेही जेवायला. पानं वाढते." जया काकू बाहेर येत म्हणाल्या.

"हो. काकूंच्या हातचं जेवण म्हणजे पर्वणीच! चला, मला खूप भूक लागली आहे. विदिशा आत जाण्याआधीच समर उडी मारून आत आला.

"अरे, इतका कसला आनंद झाला आहे?" जया काकू आश्चर्याने म्हणाल्या.

"ते तुमची मुलगी तुम्हाला सांगेल. पण या जेवणानंतर आईस्क्रीमची पार्टी माझ्याकडून." समर मनसोक्त जेवला. जेवणानंतर त्याने सर्वांची आवड विचारून आईस्क्रीमही आणले. जयवंत काकांना त्याने आपल्या ऑफिसमध्ये येण्याचा आग्रह केला आणि दहा वाजले, तसा समर घरी निघून गेला.

"किती अतरंगी मुलगा आहे हा! बडबड्या पण गमतीशीर स्वभावाचा, समोरच्याला क्षणात आपलंस करून घेणारा, सतत चेष्टा -मस्करी करणारा. दिसायला अगदी आपल्या आईसारखा आहे. तसंही मुलांनी आईचा चेहरा घ्यावा म्हणतात."

"म्हणजे?" विदि.

"मुलांनी मातृमुखी असावं आणि मुलींनी पितृमुखी.. तर ती जास्त सुखी होतात."
जया काकू आवराआवर करून जयवंत काकांसोबत शतपावली करायला बाहेर पडल्या.

"अहो, तुम्हाला समरबद्दल काय वाटतं?"

"म्हणजे? चांगला मुलगा आहे तो." काका सहजपणे म्हणाले.

"ते तर आहेच. पण आपल्या विदिसाठी कसा वाटतो? दोघे एकत्र काम करतात, त्यांचं ट्युनिंग छान आहे. दोघेही एकमेकांना शोभून दिसतात. नाही का? आणि अपर्णा ताईही खूप चांगल्या. आहेत." जया काकू खुश झाल्या होत्या.

"हम्म. पण त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी काही नसेल तर? आपण उगीच विषय वाढवायला नको." काका विचार करत म्हणाले.

"ते ठीक आहे. पण मी म्हणते, अडून अंदाज घ्यायला काय हरकत आहे? त्यांच्या मनात तसं काही नसेल तर आपण आग्रह करायचा नाही. फक्त दोघांच्या मनात एकमेकांविषयी काय आहे?हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. मुलांचं भविष्य हे त्यांच्या आई-वडिलांना आधीच कळतं असं म्हणतात. बघा, पुढे जाऊन त्यांचं लग्न होतं की नाही ते."
जया काकूंना समर आवडत होता. त्याचं कुटुंब, त्याचे संस्कार हे सगळं त्यांना आवडत होतं. शिवाय अपर्णा ताईंचा स्वभाव चांगला होता. त्यांच्यासारखी सासू आणि समर सारखा मुलगा नवरा म्हणून विदिशाला मिळाला तर तिची काळजी करायची गरजच नव्हती.
------------------------------------------

दुसऱ्या दिवशी विदिशा लवकर ऑफिसला आली.
"काँग्रॅच्युलेशन्स मॅम, तुमच्यामुळे एक लग्न मोडता मोडता वाचलं. आता सहा तारखेच्या तयारीला लागायला हवं. मी लिस्ट काढून ठेवली आहे ती तेवढी चेक करा." मिंटीने दारातच विदिशाचे स्वागत केले.

"हो अगं, आत तर येऊ दे मला आणि एक सांग समर कुठे आहे? तो आला की, अजून यायचा आहे?"

मिंटी जयेशकडे अर्थपूर्ण नजर टाकून म्हणाली, "ते आले नाहीत अजून. त्यांना बरं वाटतं नाहीय. बहुतेक येणार नाहीत असं वाटतंय."

"का? अचानक काय झालं? मला काहीच बोलला नाही तो?" विदिशा डोळे मोठे करत म्हणाली.

"तुम्हाला कसं काय माहिती नाही? त्यांचा घसा खूप दुखतोय. तापही आहे थोडा. काल त्यांनी आईस्क्रीम खाल्लं होतं म्हणे. आईस्क्रीम खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो, हे माहिती होतं मला." मिंटी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चष्मा सावरत म्हणाली.

"हो का? मला माहिती नव्हतं. बरं मी फोन करेन त्याला. तुम्ही जा आता. कामाचं बघा. मी केबिनमध्ये आहे. कोणी भेटायला, चौकशी करायला आलं तर सरळ केबिनमध्ये पाठव आणि हो, ती लिस्ट दे म्हणजे सहा तारखेचा सगळा आराखडा तयार करून ठेवेन."
आज विदिशा दिवसभर कामात होती. मिस्टर नाईक भेटून, थँक्स म्हणून गेले. त्यांनी आणखी काही पैसे भरून सहा तारीख पुन्हा फिक्स केली. नंतर दिवसभर ऑफिसमध्ये चौकशीचे फोन येत राहिले. बरेच जण चौकशी करून गेले त्यामुळे विदिशाला डोकं वर काढायला वेळ देखील मिळाला नाही.

संध्याकाळी घरी परत जाताना तिला समरची आठवण आली. 'ओ शीट, त्याला फोन करायचा राहिला!' गडबडीने विदिशाने आपल्या बॅगेतून फोन काढून समरला फोन लावला.
"विदि, दिस इज नॉट फेअर. मी सकाळपासून तुझ्या फोनची वाट बघत होतो आणि तू आत्ता फोन करते आहेस? बरोबर.. तुला माझी काळजी का असेल?"

"तसं नाहीय समर, आजचा सगळा दिवस खूप बिझी होता. खूप काम होतं. त्यातच मि. नाईक येऊन पैसे भरून गेले. सहा तारखेची तयारी सुरू करायला हवी. तू लवकर बरा हो." विदिशा.

"अच्छा, म्हणजे काम आहे म्हणून मी लवकर बरं व्हायचं? मला वाटलं, तू मला भेटायला येशील. जवळ बसून तब्येत कशी आहे? हे विचारशील. पण तुला कामाशिवाय काही दिसतच नाहीये. मी ना..मूर्ख आहे. तुझ्याकडून नसत्या अपेक्षा करतो." समर चिडून म्हणाला.

"समर, हे माझं एकटीच काम नव्हतं. आज तुझ्या वाट्याची काम मीच केली आहेत आणि सॉरी रे, फोन करायला उशीर झाला. मी आत्ता तुझ्या घरी येते." विदिशा त्याला समजावत म्हणाली.

"तुझं काय जातं? मला बरं वाटलं काय आणि नाही काय! तू आत्ता इथे येऊ नकोस. मला तुला भेटायचं नाहीये आणि तुझ्याशी बोलायचंही नाहीये." समर.

"असं काय करतोस? हातची सगळी कामं सोडून मी तुला फोन करायला हवा होता का? हवं तर मिंटीला विचार. तीही माझ्यासोबत होती. तुला माझ्याशी बोलायचं नाही, तर नको बोलू. आय डोन्ट केअर. इतका कसला इगो आहे रे तुला? कामाच्या गडबडीत मी फोन करायला विसरले. त्यात इतकं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे?" विदिशा.

"ते मला माहित नाही. चल, मी फोन ठेवतोय." समरने फोन कट केला.

"असा कसा आहे हा? क्षणात छान वागतो, तर क्षणात याचा इगो याच्यापेक्षाही मोठा होतो! विदिशा वैतागून घरी आली.

जेवण झाल्यावर जया काकू आणि जयवंत काका
विदिशा समोर बसले.
"विदू, थोडं बोलायचं होतं." काकू काकांच्याकडे पाहत म्हणाल्या.

"बाबांशी की माझ्याशी?" मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली विदिशा आईकडे न पाहतच म्हणाली.

"ते आधी बाजूला ठेव बघू. मोबाईल सारखा हातात असलाच पाहिजे का?
ऐक, मावशीने तुझ्यासाठी दोन स्थळं पाठवली आहेत." दोन फोटो हातात घेत, जया काकू म्हणाल्या.

"वाटलंच. त्याशिवाय तुम्ही दोघे माझ्यासमोर असे बसणार नाही." विदिशा.

"अगं, या दोन्ही स्थळांना तू पसंत आहेस आणि तुझं कामही त्यांना पसंत आहे." जयवंत काका मध्येच बोलले.

"पसंत म्हणजे? गोष्टी इथपर्यंत गेल्या? आणि मला काहीच माहिती नाही?" विदिशा.

"आम्हाला तरी कुठे माहिती होतं? तुझा फोटो आणि पत्रिका मावशीकडे आधीच देऊन ठेवलं होतं. तेच तिने पुढे पाठवलं. आज मी गेले होते तिच्याकडे. तिथेच हा सगळा विषय झाला. तुला लगेच फोन करावा म्हटलं तर तू बिझी असतेस. तुझ्या कामाच्या गडबडीत फोन केलेला तुला आवडत नाही. मग?" जया काकू गडबडीने म्हणाल्या."आणि या लग्नाच्या सगळ्या गोष्टी तुला माहिती असतात. आम्ही काय नव्याने सांगणार?"

"आई, लोकं लग्न ठरल्यावर आमच्याकडे येतात. आमचं मॅरेज ब्युरो नाहीय. लग्न फिक्स झाल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी आम्ही जमवून देतो."

"हे फोटो बघून तर घे आणि तुला मुलगा पसंत असल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही." काका.

"हे असलं काही मी अजिबात करणार नाही. मला लग्नच करायचं नाहीय. ते मुलगी बघायला येणं, कांदेपोहे, चहा करणं मला जमणार नाही."
विदिशा.

"या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आधी फोटो तरी पाहून घे. आवडला तर ठीक नाहीतर नाही म्हणून सांगू आणि एक लक्षात ठेव विदू, आई - बापाने जास्त सूट दिली म्हणून मुलांनी जास्त हवेत जायचं नसतं." काका थोडं रागावून म्हणाले.
"तुझ्या मनात दुसरे कोणी असेल तर तसं सांग. समर.. त्याच्याशी तुझं छान जमतं. तुम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचे आहे का? तसं असेल तर आमची हरकत नाही."

"काहीतरीच काय बाबा? समर आणि मी लग्न करणार? कधीच शक्य नाही हे. आमचं जमतं असं तुम्हाला वाटतं. पण मगाशीच आमचं भांडण झालंय. सगळं चांगलं असलं तरी त्याचा स्वभाव विचित्र आहे हेच खरं." विदिशाने ते दोन्ही फोटो हातात घेतले.
खरंतर दोन्ही मुलं हँडसम होती. विदिशाने बराच विचार करून त्यातला एक फोटो पसंत केला. "त्या समरशी लग्न करण्यापेक्षा मी याला पसंत करेन." इतकं बोलून विदिशा आपल्या खोलीत निघून गेली.

"चला, म्हणजे आता हे तरी नक्की झालंय. हिच्या मनात समरविषयी काही नाही म्हणजे आता हे स्थळ पाहायला हरकत नाही." जया काकू उत्साहाने म्हणाल्या.

"जया, इतकी गडबड करू नको. तिच्याजवळ बसून, आपली मुलगी म्हणून तिच्या मनात नक्की काय आहे? हे आधी जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तिच्या पसंती शिवाय आपण एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. शेवटी लग्न आणि संसार तिला करायचा आहे. तिच्या पसंतीने सारं काही होऊ दे." जयवंत काका.

"मला वाटलंच होतं, तुम्ही असं म्हणणार. कितीही झालं तरी बापाला आपली लेक लाडकी असते. आम्ही तिचे वैरी! आजपर्यंत तिच्या इच्छेविरुद्ध वागत आलो आणि तुम्ही प्रत्येक बाबतीत तिची बाजू घेत आलात. उद्या ती लग्न होऊन सासरी गेली म्हणजे अवघड जाईल तिला. प्रत्येक वेळेस तिला सांभाळून घेणं आता सोडून द्या."
बोलता बोलता जया काकू विदिशाच्या खोलीत आल्या.

विदिशा झोपली होती. दिवसभराचा शीण झोपेच्या आधीन झाला होता. जया काकू जवळ बसून तिच्या केसातून हात फिरवू लागल्या.
'लहानपणापासून इतका हट्टीपणा करते. पण आमचं ऐकते मात्र नक्की. आता द्यायची- घ्यायची मुलगी म्हणजे नीट वागायला नको का हिने? सगळं आपलंच खरं म्हटलं तर कसं व्हायचं?
पण आपली लेक फार लवकर मोठे झाली! अजूनही वाटतं, आई.. म्हणून शाळेतून येईल आणि आज हे बक्षीस मिळाले असं म्हणत गळ्यात पडेल. शाळेतून आल्यावर आवडीचा खाऊ हवा मागे लागेल आणि मोठी झाल्यानंतर मला नोकरी करायची म्हणूनही हट्ट करेल. खरंच मुली किती लवकर मोठ्या होतात! ही सासरी गेल्यावर माझं कसं व्हायचं? हे देवालाच ठाऊक.'
जया काकू भरल्या डोळ्यांनी विदिशाच्या खोलीतून बाहेर आल्या.

काकू बाहेर येताच विदिशाने डोळे उघडले. 'आई, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही जे म्हणाल ते सगळं ऐकेन मी.' मनाशी काही ठरवून ती झोपी गेली.
-------------------------------------

"आई, मी लग्नाला तयार आहे."

"हे काय सकाळी, सकाळी?" काकू.

"आज ना उद्या लग्न करावं लागणार. मग मनाची तयारी नको का व्हायला? पण मला मुलगा पसंत असल्याशिवाय मी लग्न करणार नाही." विदिशा.

"हो. तुला मुलगा तुझ्या पसंतीशिवाय आम्ही पुढे जाणार नाही." काकू.

विदिशा लग्नाला तयार झाली खरी. पण हातून काहीतरी निसटू पाहत आहे असं तिला उगीचच वाटून गेलं.