नारी एक तिची रूपं अनेक…. जागतिक महिला दिन विषेश अलक
१. ती एक राज्यस्तरीय हॉकी खेळणारी खेळाडू पण लॉकडाऊन लागलं अन तिचा खेळ आणि सराव दोन्ही बंद झालं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पितृछत्रही हरवलं. तिच्या आईनं मग तिचं लग्न लावून स्वतः कर्तव्य पूर्ण केलं. तिच्या खेळण्यावर तिची सासू वारंवार टोमणे मारायची. तशातच एकदा तिची मैत्रीण तिला भेटली आणि समजावणीच्या स्वरात म्हणाली ,"अगं मीराबाई चानूसारखी संसाराच्या जवाबदाऱ्यांचं ओझं पेलणारी, सासूच्या टोमण्याचं शटल सिंधूप्रमाणे संयमाने परतवणारी तू, सासूच्या अपमानाच्या गुगली बॉल वर मिताली राज प्रमाणे चौकार नाहीतर षटकार मारायला शिक आणि सरावाच्या हाॅकीने यशाचा चेंडू गोल पोस्ट मध्ये टाक. "
२. चंद्रलेखा राजे यांचा एक मोठं सामाजिक - राजकीय व्यक्तिमत्व असा लौकिक होता. आज जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्या जरा उशिराच घरी परतल्या आणि सुनेला पाणी आणायला सांगितले. तान्हुल्याच्या किरकिरी मुळे सुनेला पाणी आणायला जरा उशीर झाला म्हणून चंद्रलेखा राजे यांनी तोच पाण्याचा ग्लास रागाने सुनेच्या तोंडवर रिकामा केला.
३. ती अगदी वक्तशीर आणि टापटीप राहणारी . एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी. घरी सासू सासरे आणि दोन जुळी मुलं, नवरा परदेशात. आज जागतिक महिला दिन म्हणून ऑफिसमधून पार्टी करून ती रात्री उशिरा घरी पोहोचली. हॉल मधला खेळण्यांचा आणि तिच्या मुलांच्या कपड्यांचा पसारा पाहून तिचा पारा चढला आणि एवढ्या रात्री तिने सासू-सासऱ्यांना सर्व्हंट क्वार्टरचा रस्ता दाखवला.
४. कोरोना काळात मातृ-पितृ छत्र हरवलेली 14 वर्षाची ती कोवळी पोर. घाबरलेली, भेदरलेली त्या बदनाम वस्तीत तिच्या दूरच्या काकानं तिला आणलं होतं. पण तिची निरागस नजर आणि भोळा चेहरा पाहून तिथल्या "मावशीनं" तिला आपल्या पंखा खाली घेतलं आणि तिचं नाव नगर परिषदेच्या शाळेत घातलं.
५. तो तिला वैवाहिक जीवनाचं सुख देऊ शकत नव्हता. स्वतःची उणीव तो तिला मारझोड करून आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून भरून काढी. एक दिवस कंटाळून तिने कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट मिळवला आणि एका स्वयंसेवी संस्थेत नोकरी करून आत्मनिर्भर झाली.
६. तिला दोन मुली. पण भावजयीला मुलबाळ नाही म्हणून तिनं वहिनीला तसं कधी जाणवू दिले नाही. भावजयीला टेस्ट ट्यूब बेबीमूळे मुलगा झाला आणि नंणंद प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागेल म्हणून वहिनींन तिच्याशी संबंध तोडले.
७. गेली पाच वर्ष ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आणि अचानक तिला दिवस गेले. त्याने अपेक्षेप्रमाणे हात वर केले. तिने हिमतीने स्वतःचं बाळ जन्माला घातलं आणि एकटीनेच त्याला मोठं केलं. तिची मुलगी आता भारतीय लष्करात लढाऊ विमान चालवते.
वाचक हो आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
जय हिंद
दिनांक ६/३/२०२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा